Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:57:45.324040 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / वसुंधरा दिन...!
शेअर करा

T3 2019/10/14 06:57:45.328541 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:57:45.352684 GMT+0530

वसुंधरा दिन...!

वसुंधरा दिन हा पर्यावरणविषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्याचा पाया आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या सार्वजनिक वचनबद्धतेला पुन्हा एकदा संजीवनी मिळते.

जाणून घेऊया वसुंधरा दिनाविषयी...!

वसुंधरा दिन हा पर्यावरणविषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्याचा पाया आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या सार्वजनिक वचनबद्धतेला पुन्हा एकदा संजीवनी मिळते. हा दिन साजरा करण्यामुळे जगभर व्यापक वैविध्यपूर्ण कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यासाठी सामाजिक चालना मिळते. वसुंधरा दिन हा जगातील सर्वाधिक मोठा कार्यक्रम आहे. भिन्न पार्श्‍वभूमी, श्रद्धा, विश्‍वास आणि राष्ट्रीयत्व असलेले जगभरातील सर्व लोक हा दिन साजरा करतात. या कार्यक्रमात दरवर्षी एक अब्जाहून अधिक लोक सहभागी होतात. यातून समाज विकास आणि पर्यावरण संरक्षण कार्यक्रमांद्वारे काम करणार्‍या हजारो कार्यकर्त्यांशी वर्षभर समन्वय साधला जातो. जागतिक पातळीवरील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना एकत्र जोडणार्‍या ‘अर्थ डे नेटवर्क ’(EDN) या आंतरराष्ट्रीय संघटनेने वसुंधरा दिनाच्या वाटचालीचा आढावा आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. या माहितीचा संपादित भाग ‘वनराई’च्या वाचकांना उपलब्ध करून देत आहोत...

गेल्या ४५ वर्षांपासून दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस ‘वसुंधरा दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. १९७० च्या दशकामधील आधुनिक पर्यावरण चळवळीचा जन्म हा दिवस साजरा करण्यातूनच झाला, असे अनेक जण मानतात. त्या काळात अमेरिकन लोक ‘व्ही ८ सेडन’ हे भले मोठे वाहन वापरत असत. या वाहनातून वातावरणात सोडला जाणारा धूर मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण करत असे. त्याचप्रमाणे कारखान्यातूनही अनिर्बंधपणे वातावरणात विषारी धूर आणि कसल्याही प्रक्रियेविना रसायनमिश्रित पाणी आसपासच्या परिसरात सोडले जात असे. त्यांना कायद्याची किंवा माध्यमांची भीती नव्हती. लोकांकडून आणि औद्योगिक क्षेत्राकडून होणारे जल-वायू प्रदूषण याकडे ‘समृद्धीचे प्रतिक’ म्हणून अभिमानाने पाहिले जात असे.

प्रदूषणाला खरे तर मान्यताच प्राप्त झालेली होती. त्यावेळी ‘पर्यावरण’ हा शब्द वेगळ्याच कोणत्या तरी कारणाने आणि अगदी क्वचितच वापरला जात होता. पर्यावरणविषयक चिंता अमेरिकेतील मुख्य प्रवाहाच्या गावीही नव्हती. मात्र, सन १९६२ मध्ये सागरी जीवशास्त्रज्ञ राचेल कार्सन लिखित ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक न्युयार्क टाईम्सने प्रकाशित केले आणि उत्तम खपाच्या या पुस्तकाने बदलाची नांदी घडवून आणली. २४ देशांत या पुस्तकाच्या पाच लाखांहून अधिक प्रती खपल्या. या पुस्तकाच्या माध्यमातून कार्सन यांनी सजीव, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य यासंदर्भात केलेली जनजागृती ही तोपर्यंतच्या कोणत्याही इतर व्यक्तीच्या तुलनेत खूप अधिक होती. या वाढत्या जागृतीमधूनच सन १९७० मध्ये ‘वसुंधरा दिन’ साजरा करण्याची कल्पना पुढे आली. ही वसुंधरा दिनाची कल्पना सर्वप्रथम गेलॉर्ड नेल्सन यांनी मांडली. नेल्सन हे त्यावेळी अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्याचे सिनेटर (खासदार) होते.

पहिला वसुंधरा दिन (१९७०)

अमेरिकेने व्हिएतनामविरोधात पुकारलेल्या युद्धाला अमेरिकेतील विविध विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रचंड विरोध केला. यातून युवा शक्तीचा जोश आणि तिची ताकद देशातील नागरिकांना अनुभवायला मिळाली. सन १९६९ मध्ये कॅलिफोर्नियातील सांता बार्बारा येथे प्रचंड प्रमाणात तेलगळती झाली. त्याच्या निषेधार्थ जनतेने मोठ्या प्रमाणात केलेली नासधूस आणि लुटालूट नेल्सन यांनी पाहिली होती. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या युद्धविरोधी चळवळीपासूनही त्यांना प्रेरणा मिळाली होती.

नेल्सन यांच्या लक्षात आले की, जल आणि वायू प्रदूषणाच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग केला, तर पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा राष्ट्रीय राजकीय कार्यक्रमपत्रिकेवर घेणे सरकारला भाग पडेल. म्हणून सिनेटर नेल्सन यांनी पर्यावरणावर राष्ट्रीय शिकवण देण्याची आपली कल्पना राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमधून जाहीर केली. आपल्याबरोबर सहअध्यक्षपद स्वीकारण्यास त्यांनी रिपब्लिकन काँग्रेसच्या पीटी मॅकक्लोस्की यांना राजी केले आणि राष्ट्रीय समन्वयक म्हणून डेनिस हेज यांना सहभागी करून घेतले. हेज यांनी देशभर सर्वत्र यासंदर्भात कार्यक्रम करण्यासाठी ८५ कर्मचार्‍यांची नियुक्ती केली. परिणामी, २२ एप्रिल रोजी पहिल्या वसुंधरा दिनानिमित्त निरोगी, स्वच्छ आणि शाश्‍वत पर्यावरणासाठी एका किनार्‍यापासून दुसर्‍या किनार्‍यापर्यंत, रस्त्यांवरून, बागांमध्ये फेर्‍या काढण्यात आल्या.

विविध सभागृहांत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पर्यावरणाच्या नासाडीविरोधात यावेळी निदर्शनेही करण्यात आली. या सर्व कार्यक्रमांमध्ये दोन कोटींहून अधिक अमेरिकन सहभागी झाले. हजारो महाविद्यालयांनी आणि विद्यापीठांनी निषेधात्मक कार्यक्रम सादर केले. यामुळे तेलगळती, कारखाने आणि ऊर्जा प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण, विनाप्रक्रिया विषारी पदार्थ फेकून देणे, कीटकनाशकांचा वाढता वापर, जंगलांचा, मोकळ्या जागांचा आणि वन्यसृष्टीचा नाश या सर्वांच्या विरोधात स्वतंत्रपणे लढणार्‍या छोट्या छोट्या गटांच्या लक्षात आले, की आपण सारेजण एकाच उद्दिष्टासाठी लढत आहोत. १९७० मध्ये क्वचितच दिसणारे राजकीय पक्षांचे ऐक्य वसुंधरा दिनाच्या निमित्ताने पहावयास मिळाले.

रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅट्सनी वसुंधरा दिनाला पाठिंबा दिला. गरीब आणि श्रीमंत, शहरातील कुशल कामगार आणि ग्रामीण शेतकरी, उद्योगपती आणि कामगार या सार्‍यांचे एकमत होते. या एकमताच्या जोरावर पहिल्या वसुंधरा दिनी ‘युनायटेड स्टेट्स एन्व्हायरन्मेंटल प्रोटेक्शन एजन्सी’ची स्थापना झाली, तसेच स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि नामशेष होऊ पाहणार्‍या प्रजातींसाठी कायदे करण्याचा मार्ग मोकळा झाला. या दिवसाची आठवण सांगताना गेलॉर्ड नेल्सन म्हणतात, “वसुंधरा दिन हा एक प्रकारचा जुगार होता. मात्र, तो सफल झाला.’

वस्तुंच्या पुनर्वापरास चालना (१९९०)

सन १९९० मध्ये पर्यावरणवादी गटाच्या नेत्यांनी डेनिस हेज यांना आणखी एक मोठी मोहीम आखण्यास सांगितले. या मोहिमेनुसार, वसुंधरा दिन जागतिक स्तरावर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेत १४१ देशांतील वीस कोटींहून अधिक लोक सहभागी झाले. सन १९९० च्या वसुंधरा दिनामुळे टाकाऊ वस्तूंवर पुनर्प्रक्रिया करून त्यांचा पुनर्वापर करण्याच्या (रिसायकलिंग) विषयाला जागतिक पातळीवर चालना मिळाली. यातूनच सन १९९२ मध्ये ‘रिओ दी जानेरो’ येथे संयुक्त राष्ट्रसंघाकडून‘वसुंधरा शिखर परिषदे’चे आयोजन करण्यात आले. या वाटचालीची दखल घेऊन सन १९९५ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिटंन यांनी ‘वसुंधरा दिन’ साजरा करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल सेनेटर नेल्सन यांना ‘स्वातंत्र्याचे प्रेसिडेन्शियल पदक’ देऊन त्यांचा गौरव केला. ‘प्रेसिडेन्शियल पदक’ हे अमेरिकेतील नागरिकाला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे.

जागतिक तापमानवाढीचा विषय केंद्रस्थानी (२०००)

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे सन २००० मध्ये वसुंधरा दिनानिमित्त डेनिस हेज यांनी आणखी एक मोहीम हाती घेण्याचे मान्य केले. जागतिक तापमानवाढ हा विषय केंद्रस्थानी ठेवून स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. एकूण १८४ देशांतील ५ हजार पर्यावरणवादी गट आणि कोट्यवधी लोक यात सहभागी झाले. हा वसुंधरा दिन साजरा करण्यासाठी इंटरनेटचा वापर करून पर्यावरणवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना संघटित करण्यात आले, तसेच वसुंधरा दिनाचा प्रचार गॅबन, आफ्रिकेतील गावागावांपर्यंत होण्यासाठी दवंड्यांप्रमाणे ढोलसारख्या वाद्यांचाही वापर करण्यात आला. परिणामी, वसुंधरा दिनानिमित्त ‘वॉशिंग्टन डीसी’ येथील नॅशनल मॉलजवळ हजारो लोक जमले. सन २००० मधील वसुंधरा दिनामुळे जगभरच्या नागरिकांना स्वच्छ उर्जेसाठी तात्काळ, ठाम कृती हवी आहे, हा संदेश जगभरातील नेत्यांपर्यंत पोहोचला.

‘ए बिलियन अ‍ॅक्ट्स ऑफ ग्रीन’ मोहिम (२०१०)

सन १९७० प्रमाणेच सन २०१० मधील वसुंधरा दिनीही पर्यावरणवाद्यांसमोर आणखी एक मोठे आव्हान होते. हवामान बदल नाकारणारे लोक, तेल लॉबीतील गर्भश्रीमंत, आपल्या मनाचा थांगपत्ता लागू न देणारे राजकारणी, उदासिन लोक आणि पर्यावरणवाद्यांमध्ये पडलेली फूट या सर्वांमुळे वसुंधरा दिन साजरे करण्याच्या कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला. पर्यावरणविषयक प्रगती व बदल घडून येण्याच्या प्रक्रियेवर त्याचा विपरीत परिणाम झाला, तरीही जागतिक पातळीवरील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना एकत्र जोडणार्‍या ‘अर्थ डे नेटवर्क’ (EDN) या संघटनेने पर्यावरणवादी लोकांच्या मनावर एक बाब ठसवण्यात यश मिळवले. ती म्हणजे ‘वसुंधरा दिन हे पर्यावरण संरक्षणाच्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करण्याचे एक प्रभावी साधन आहे. या वसुंधरा दिनी ‘हवामान’ हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून काढण्यात आलेल्या फेरीत (Climate Rally) सव्वा दोन लाख लोक सहभागी झाले होते.

कार्बन उत्सर्जनात कपात करणे आणि त्यासाठी शाश्‍वत स्वरूपाचे पाठबळ मिळवून देणे या उद्देशाने सन २०१० मध्ये ४० व्या वसुंधरा दिनानिमित्त ‘ए बिलियन अ‍ॅक्ट्स ऑफ ग्रीन’ या मोहिमेची सुरूवात झाली. सन २०१२ मधील वसुंधरा दिनानिमित्त बिजिंग येथे १९२ देशातील १ अब्जहून अधिक लोक एकत्र आले. ‘ए बिलियन अ‍ॅक्ट्स ऑफ ग्रीन’ या मोहिमेअंतर्गत सन २०१२ पर्यंत चार कोटी लोक सहभागी झाले. याशिवाय प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी दहा लाख झाडे लावण्यासाठी पुढाकार घेतला. या संदर्भातील ऑनलाईन मोहिमेमध्ये नऊ लाख कम्युनिटीतील सदस्य सहभागी झाले होते.

आपल्यातील उर्जेचा शोध घ्या

हवामान बदल दिवसेंदिवस स्पष्टपणे जाणवू लागल्यामुळे स्वच्छ पर्यावरणाची गरज अधिक तातडीने अधोरेखीत होऊ लागली आहे. शुद्ध पर्यावरणाची लढाई अजून सुरू असून, दिवसेंदिवस तिची व्यापकता वाढवणे अत्यावश्यक बनले आहे. पर्यावरण संरक्षणाच्या इतिहासात अधिक विजयांची आणि यशोगाथांची नोंद घडवून आणण्यासाठी या मोहिमेत प्रत्येक जण सहभागी होऊ शकतो. आपल्याकडे किती ऊर्जा आहे, याची कल्पनाही अद्याप आपल्याला आलेली नसेल. या ऊर्जेचा शोध घ्या. तिची जाणीव करून घ्या. आपल्या पायांखालच्या गवताच्या पात्यांचा चरचरता आवाज तुमच्या कानी सातत्याने पडत राहू द्या आणि त्याच वेळी आपल्या बोटांच्या टोकांवर असलेल्या तंत्रज्ञानाचा वापरही करून घ्या. या दोहोंचा समन्वय साधून आगामी पिढ्यांसाठी निरोगी, स्वच्छ, वैविध्यतेने नटलेल्या जगाची उभारणी करा.

मी काय करू शकतो किंवा शकते?

वसुंधरा दिनाच्या कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी अनंत संधी आहेत. स्वयंसेवक बना. महोत्सवांत सहभागी व्हा. तुमच्या घरांच्या छपरांवर सौर पॅनेल्सची उभारणी करा. तुमच्या समाजात कार्यक्रमाची आखणी करा. आपल्या समाजासाठी सार्वजनिक बगीचा तयार करण्याचा कार्यक्रम हाती घ्या. आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीशी आपल्या पर्यावरणविषयक प्राधान्यक्रमांविषयी संवाद साधा.

तुम्हाला पृथ्वीसाठी जे जे चांगले करता येईल, ते ते सारे करा, सारे काही मजेत करा. लोकांना भेटा. त्यासाठी वसुंधरा दिन कधी येईल, याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक दिवस हा वसुंधरा दिनच असतो. आपल्या भवितव्याची अधिक चांगली बांधणी करण्यासाठी संपूर्ण वर्षभरच सर्वांनी पर्यावरण रक्षणासाठी वचनबद्ध राहिले पाहिजे.

‘अर्थ डे नेटवर्क’ (EDN) म्हणजे काय?

सन १९७० मध्ये पहिल्या जागतिक वसुंधरा दिनाच्या आयोजकांनी ‘अर्थ डे नेटवर्क’(EDN) या संस्थेची स्थापना केली. हे नेटवर्क संपूर्ण वर्षभर जागतिक पर्यावरण, नागरिकत्व आणि कृती यांना प्रोत्साहन देते. जगभर पर्यावरणविषयक जागृतीला चालना आणि गती देते. ‘अर्थ डे नेटवर्क’च्या माध्यमातून पर्यावरण चळवळीचे प्रमुख व चळवळीचे कार्यकर्ते परस्परांच्या संपर्कात राहतात आणि परस्परांशी आंतरक्रिया करतात. विचारांची देवाणघेवाण करतात आणि या विचारांचा प्रभाव आपापल्या समाजावर पाडण्याचा प्रयत्न करतात. याद्वारे स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक धोरणांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणतात. आंतरराष्ट्रीय जाळे हे १९२ देशांतील तब्बल २२ हजार संघटनांपर्यंत पसरलेले आहे. यातून स्थानिक कार्यक्रमांद्वारे सुमारे ३० हजारांहून अधिक प्रशिक्षकांना साहाय्य केले जाते.

  • ‘अर्थ डे नेटवर्क’चे आवाहन - आता नेतृत्वाची वेळ आपलीच! (२०१५)
  • सन २०१५ च्या वसुंधरा दिनाची मध्यवर्ती संकल्पना ‘आता नेतृत्वाची वेळ आपलीच!’  ही आहे
  • आर्थिक वृद्धी आणि शाश्‍वतता या दोन्ही गोष्टी यंदा एकत्रित नांदू देत, तसेच यंदा नागरिक आणि संस्था-संघटना यांनी खनिज तेलापासून दूर होऊन स्वच्छ ऊर्जेच्या पर्यायांमध्ये आपला पैसा गुंतवला पाहिजे.
  • कार्बन उत्सर्जन कमी करण्याविषयीची राजकीय प्रक्रिया मंद गतीने सुरू आहे. मात्र, आपल्या मदतीने जागतिक नेते एक पाऊल पुढे टाकतील आणि यंदाच्या वर्षअखेरीस पॅरिस येथे होत असलेल्या पर्यावरण बदलविषयक करारावर ते स्वाक्षर्‍या करतील.
  • जागतिक पातळीवर गरिबी निर्मूलन करणे शक्य आहे; परंतु त्यासाठी सर्वच देशांनी भविष्यात कार्बनच्या उत्सर्जनात कपात करण्यासाठी वचनबद्ध झाले पाहिजे. आपल्याकडे तंत्रज्ञान आहे. आता आपल्याला फक्त इच्छाशक्तीचीच गरज आहे.
  • शाश्‍वतता हेच विकासाचे एकमेव उत्तर आहे.
  • जागतिक वसुंधरा दिनी तुम्ही आता नेमकी भूमिका घेण्याची गरज आहे. त्यातूनच जगाला नवीन दिशा मिळेल.
  • आता नेतृत्वाची वेळ आपलीच आहे. आपले जागतिक नेते आपल्या मागे येतील आणि आपण घेतलेल्या निर्णयाचे पालन करतील.
  • चला, सन २०१५ मध्ये विकास कसा असू शकेल याची पुनर्व्याख्या करूया.

 

स्त्रोत: वनराई

3.13274336283
नितीन कांबळे Apr 22, 2017 01:44 PM

खूप व्यवस्तित माहिती मिळाली धन्यवाद

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:57:45.753942 GMT+0530

T24 2019/10/14 06:57:45.759657 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:57:45.229803 GMT+0530

T612019/10/14 06:57:45.247466 GMT+0530

T622019/10/14 06:57:45.314364 GMT+0530

T632019/10/14 06:57:45.315128 GMT+0530