অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तरडगव्हाणचा जलसंधारण पॅटर्न

तरडगव्हाणचा जलसंधारण पॅटर्न

नदी, ओढ्यांचे तेरा किलोमीटर रुंदीकरण व खोलीकरण टॅंकरमुक्‍त गाव तरडगव्हाणची नवी ओळख

मराठवाड्यातील कायम दुष्काळी शिरूरकासार तालुक्‍यातील तरडगव्हाण गावाने यंदा पाण्याचा टॅंकर नाकारला आहे. गेल्या वर्षी गावशिवारात झालेल्या जलसंधारण कामांमुळे भर उन्हाळ्यातही विहिरींना चांगले पाणी आहे. आता शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर गावशिवारांतील नदी, ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरणाद्वारा सोळा ठिकाणी साखळी सिमेंट बंधाऱ्यांची उभारणी सुरू आहे. पाच बंधारे पूर्ण झाले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात सुमारे बावीस दशलक्ष घनफूट पाण्याची साठवणूक अपेक्षित असून, तरडगव्हाणची जलश्रीमंती राज्यातील दुष्काळी गावांसाठी प्रेरक ठरेल.


मराठवाड्यातील कायम दुष्काळी तालुका अशी बीड जिल्ह्यातील शिरूरकासारची ओळख आहे. तालुक्‍यातील तरडगव्हाण हे गाव कल्याण ते विशाखापट्‌टणम राज्य मार्गालगत शिंगडवाडी फाट्यापासून तीन किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. दोन हजार लोकसंख्येच्या या छोट्याशा गावात उन्हाळा सुरू झाला की टॅंकरही सुरू, असे समीकरण ठरलेले होते. मात्र ही परिस्थिती आता बदलू लागली आहे. दुष्काळावर मात करत लगतच्या नगर जिल्ह्यातील हिवरेबाजार गावाने जलसुरक्षा मिळवली. आपलेही गाव असेच जलसुरक्षित करण्याचा निर्धार अभियंता केशवराव आघाव यांनी केला. गावशिवारातला दुष्काळ कायमचा हटविण्याच्या या निर्धाराला ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी साथ दिली अन्‌ परिवर्तनांची नांदी झाली.

बावीस दशलक्ष घनफूट पाण्याची होणार साठवणूक


तरडगव्हाण गाव जलसंपन्न करण्यासाठी मुख्यमंत्री निधीअंतर्गत पंचवीस लाख रुपये खर्चातून तीन साखळी सिमेंट बंधारे उभारण्यास मंजुरी मिळाली. तरडगव्हाणचेच रहिवासी व व्यवसायाने अभियंता असलेले केशवराव आघाव यांनी खानदेशातील "शिरपूर पॅटर्न'प्रमाणे परिसरातील तेरा किलोमीटरपर्यंत नदी, चार ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम हाती घेतले. ----फूट खोल, नऊ ते पंधरा मीटर रुंद असे पात्र रुंद करण्यात आले. प्रत्येकी तीनशे ते चारशे मीटरवर एक सिमेंट बंधारा, याप्रमाणे पाच बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले. स्वखर्चातून चार, तर जलसंधारण महामंडळाअंतर्गत चार, अशा आठ बंधाऱ्यांचे काम सुरू आहे. सोळा साखळी सिमेंट बंधारे उभारण्यात येणार आहेत. नदी व ओढ्यांचे खोलीकरण-रुंदीकरण केल्याने पावसाचे पाणी साठेल व झिरपेल. एका बंधाऱ्यापासून दुसऱ्या बंधाऱ्यापर्यंत दीड दशलक्ष घनफूट म्हणजेच सोळा बंधाऱ्यांत बावीस दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा होणार आहे.

शिवारात फुलणार हिरवाई

नजर टाकली तरी कुठे पाणी दिसायचे नाही, अशी तरडगव्हाणची ओळख. गावात पाण्यासाठी वणवण भटकंती असायची. शेतीसाठी पाणी असा विषय काढला तरी जणू नवल वाटायचे. गावातील कौटुंबिक अर्थव्यवस्थाही त्यामुळे नाजूकच. गावची हीच स्थिती मनाला कायम बोचणाऱ्या आघाव यांनी जलसंपन्न गावाचा निर्धार केला. गावातील शेतकऱ्यांनी कामाला गती देण्यासाठी बळ दिल्याने त्यांचा उत्साह वाढत गेला. परिसरात दीडशे जुन्या व नव्वद नवीन विहिरी आहेत. साधारणपणे दोन ते तीन फुटांवर मुरूम असल्याने जमीन पाणी धरून ठेवत नाही. त्यामुळे सोळा बंधाऱ्यांत साठलेले पाणी झिरपून या विहिरी पाण्याने भरणार आहेत. दुष्काळ अन्‌ टंचाईच्या शिवारात हिरवाई फुलणार आहे.

बाराशे एकर शेतीला होणार लाभ

जलसंधारणाच्या कामांपूर्वी तरडगव्हाणची स्थिती अत्यंत बिकट होती. जिरायती शेतीवर गावची अर्थव्यवस्था आधारलेली. गतवर्षी गाळउपसा व गावतलावाच्या दुरुस्तीमुळे गावातील पाणीटंचाई हटली. शिवाय गावातील काही शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणीपातळी उंचावण्यास मदत झाली. गेल्या वर्षीच्या लाभामुळे यंदा जलसंधारणाच्या कामाला गती देण्यात आली. गावालगत पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या विहिरीला भर उन्हाळ्यातही बऱ्यापैकी पाणीसाठा टिकून आहे. त्याचा सुमारे बाराशे एकर क्षेत्राला लाभ होईल.

शेतकऱ्यांना भाजीपाला पिकांचा पर्याय

गावात जलसंधारणाच्या कामानंतर पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर भाजीपाला पिकांचे नियोजन करणे शेतकऱ्यांना शक्‍य होणार आहे. अर्थात कमी पाण्यावरची पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहील. भाजीपाला उत्पादकांना त्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. गटशेतीतून शेती विकास साधला जाणार आहे. 

दुष्काळाचे गांभीर्य घेत तरडगव्हाणला नवी दिशा मिळाली. दुष्काळी गाव अशी ओळख असलेलं तरडगव्हाण पाण्याबाबत स्वयंपूर्ण होत आहे. शिरपूर पॅटर्न'च्या धर्तीवर काम करताना मुख्यमंत्री निधीतून बंधाऱ्याचे काम होत असताना जलसंधारणाची लोकचळवळ उभी राहिली. तरडगव्हाणचा आदर्श घेत मराठवाड्यातील अनेक गावं आता जलस्वयंपूर्ण होतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही. 
नाथराव कराड 
गटशेतीचे प्रणेते 
इंजेगाव, ता. परळी, जि. बीड.

सरंपच कोट

जलसंधारणाच्या कामामुळे आमचे दुष्काळी गाव टॅंकरमुक्‍त झाले आहे. गेल्या वर्षीच्या कामांचा फायदा पाहून यंदा कामाला गती दिली. सोळा बंधारे बांधून पूर्ण झाल्यानंतर पाण्याची साठवणूक वाढणार आहे. गावातील सर्व शेतकऱ्यांचे मिळालेले सहकार्य महत्त्वाचे आहे. पावसाळ्यानंतर गावचे चित्र बदलणार, हे मात्र नक्‍की. 
राजाभाऊ आघाव - 9657914399 
सरपंच, तरडगव्हाण

शेतीला आता मिळणार पाणी 


गावाला दर वर्षी डिसेंबर महिन्यातच टॅंकरची गरज भासत होती. गावातील विहिरी कोरड्याठाक पडत होत्या. गेल्या वर्षी काही प्रमाणात जलसंधारणाचे काम झाले. त्याचा यंदा परिणाम दिसला. अद्याप तरी टॅंकरची गरज पडलेली नाही. 
रामनाथ शिवनाथ आघाव 

दुष्काळातून बाहेर पडण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले. त्यातून आम्ही ओढे आणि नदीचे रुंदीकरण करून बंधारे घातले. पावसाळ्यात गावातील सर्वच विहिरींची पाणीपातळी वाढेल व पाणीटंचाई कायमची हटेल. 
बाबासाहेब सूर्यभान आघाव 

गावालगत असलेल्या तलावातील गाळ काढल्यामुळे तलावापासून दोन किलोमीटरपर्यंत असलेल्या विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. गावाला टॅंकरमुक्ती मिळाली. 
आदिनाथ त्रिंबक बारगजे 

सन 1972 पासून गाव सतत दुष्काळ सोसतंय. दिवाळी झाली की त्यानंतर पाणीटंचाई सुरू व्हायची. 
आता सामूहिक शक्तीतून गाळ काढण्यात आला. ओढे, नदीचं काम केलं. शेतीसाठीही त्याचा मोठा फायदा होणार आहे. 
माणिकराव उत्तमराव बारगजे 
वयोवृद्ध शेतकरी 

गावातील विहिरीला पाण्याचा थेंबही नव्हता. यंदा भर उन्हाळ्यातही विहिरीला बऱ्यापैकी पाणी आहे बघा. 
गहिनाथ ज्ञानोबा बारगजे 

मे महिन्यात गावातल्या साऱ्या विहिरी कोरड्यिा असायच्या. आता विहिरींना पाणी दिसतंय. 
जगन्नाथ किसन नागरगोजे 

गावालगत असलेल्या तलावाला गळती होती. जलसंधारणाच्या कामावेळी तलावाचीही दुरुस्ती केली. गळती थांबली अन्‌ विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. 
जगन्नाथ दाजीबा गिते

गाळउपशाचा झाला लाभ


दुष्काळी स्थितीत प्रशासनाकडून गाळउपशाबाबत झालेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तरडगव्हाण गावशिवारात असलेला गावतलावातील गाळ उपसा करण्यात आला. त्या वेळी तलावाला असलेले पाझर बंद करण्यावर भर दिला गेला. तलावदुरुस्तीसोबत जलरोधकाची दुरुस्ती करण्यात आल्यामुळे यंदा भर उन्हाळ्यातही गावासह शिवारातील काही विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

गावासाठी केला साठ लाख रुपयांचा खर्च


गाव जलसंपन्न व्हावे, या जिद्घीतून केशवराव आघाव यांनी जलसंधारण कामांतील खर्चाचा सत्तर टक्‍के भार स्वत: उचलला. स्वत:कडील पोकलेन यंत्राद्वारे काम करून घेतले. गावातील कुणाकडूनही पैसा घेतला नाही. गावातील तेरा किलोमीटर क्षेत्रातील नदी, नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण करून त्यात काही मातीबांध तर काही सिमेंट बंधारे बांधण्यात आले. गेल्या वर्षीचे कामही आघाव यांनी स्व:खर्चातून केले.

नव्याने साकारला नाला जोडप्रकल्प


नदी जोडप्रकल्प ही संकल्पना आपण ऐकतो. मात्र तरडगव्हाण गावात नदीला मिळणारे गावातील सर्व नाल्यांना एकत्रित जोडण्यात आले आहे. गावातील तीन मोठे नाले एकमेकांना जोडण्यात आले आहेत. नाले जोडणीमुळे पाण्याचा प्रवाह वाढला. पाण्याची उपलब्धता त्यामुळे वाढेलच, शिवाय गावालगतच्या विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. नाले जोडणीचा मराठवाड्यातील हा पहिलाच प्रकल्प असावा.

जलसंधारण विभागाची मदत


गावात जलसंधारण काम पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक असणारे तांत्रिक मार्गदर्शन जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता बी. डी. जटाळे, उप अभियंता व्ही. बी. घोळवे, कनिष्ठ अभियंता ए. एम. सुरवसे यांनी केले. तांत्रिक मार्गदर्शनामुळे कामाला गती मिळालीच, शिवाय कामात सुलभता आली.

नाल्यालगत शेतरस्त्यांची निर्मिती


जलसंधारणाचे काम करत असताना पाच नाल्यांचे खोलीकरण करताना निघालेला गाळ, माती व मुरूम यांच्या उपयोगातून नदी व नाल्याच्या काठावर शेतीत जाण्यासाठी रस्त्यांची निर्मिती करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल गावापर्यंत आणण्यासाठी फायदा होणार आहे. 

तरडगव्हाणातील प्रत्येक शेतकरी पाण्याद्वारे समृद्ध व्हावा अशी मनापासून इच्छा आहे. गावातील समृद्धीत अडथळा होता पाण्याचाच. गावात पाण्याची उपलब्धता झाली तर इथला प्रत्येक शेतकरी कुटुंबसंपन्न होईल, असा विचार करून जलसंधारणाचे काम हाती घेतले. कामासाठी शासनाचा निधी मर्यादित होता. गावात काम करण्यासाठी बऱ्यापैकी भौगोलिक अनुकूलता असल्याने उर्वरित कामाचा भार स्वत: उचलला. पावसाळ्यापूर्वीच सर्व काम पूर्ण करण्यात येणार आहे. यंदा चांगल्या पावसाची आशा आहे. पावसाळ्यानंतर गावाचे चित्र पूर्णपणे बदलेल, असा विश्‍वास आहे. 
केशवराव आघाव - 9404961699, 9822496259.

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate