Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:51:26.817558 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / वनसंवर्धन आवश्यक!
शेअर करा

T3 2019/10/14 06:51:26.824232 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:51:26.960585 GMT+0530

वनसंवर्धन आवश्यक!

लोकसंख्या विस्फोट, प्रदूषण, जंगलतोड, पर्यावरणाची नासाडी विचारात घेऊन सन १९९२ मध्ये ‘रिओ दि जानेरो’ येथे पहिली वसुंधरा शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती

पृथ्वीच्या आरोग्य रक्षणासाठी वनसंवर्धन आवश्यक!

दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस ‘वसुंधरा दिन’ म्हणून साजरा केला जातो. वसुंधरेवरील म्हणजेच पृथ्वीवरील वने, माती, हवा, पाणी व जैवविविधता यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणे, तसेच पुढील पिढ्यांसाठी त्यांचे संवर्धन करणे, मानवनिर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण व पर्यावरणाची नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालणे. याविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी गेल्या ४५ वर्षांपासून जगभर ‘वसुंधरा दिन’ साजरा केला जात आहे.

लोकसंख्या विस्फोट, प्रदूषण, जंगलतोड, पर्यावरणाची नासाडी यामुळे पृथ्वीवरील वाढता ताण विचारात घेऊन सन १९९२ मध्ये ‘रिओ दि जानेरो’ येथे पहिली वसुंधरा शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. या जागतिक परिषदेत पृथ्वी वाचविण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाली व त्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण ठरावही संमत करण्यात आले. यावेळी ‘अजेंडा-२१’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या घोषणापत्राने पर्यावरणाचा प्रश्‍न संयुक्त राष्ट्रसंघ आणि देशोदेशीच्या सरकारांच्या कार्यक्रमपत्रिकेवर आला. ही शिखर परिषद पार पडून आता जवळपास २५ वर्षांचा काळ लोटला आहे. दरम्यानच्या काळात परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी ती अधिकच बिघडत गेली आहे.

जागतिक लोकसंख्या १.६ अब्जांनी वाढली आहे. या प्रचंड लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी  पृथ्वी जेवढे देऊ शकते किंवा राखू शकते, त्याहूनही अधिक प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर आपण करीत आहोत. त्यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन ४८ टक्क्यांनी वाढले आहे. मानवी कृतीतून उत्सर्जित होणार्‍या हरितगृह वायूंपैकी ‘कार्बन डाय-ऑक्साइड’ हा सर्वाधिक घातक असा वायू आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार, गेल्या १० वर्षांत पृथ्वीच्या तापमानात जेवढी वाढ झाली आहे. त्यापैकी ८५ टक्के तापमानवाढ एकट्या कार्बन डाय-ऑक्साइडमुळे झाली आहे. खनिज इंधने ही मानवनिर्मित कार्बन डाय-ऑक्साइडच्या उत्सर्जनाचे मोठे स्रोत आहेत. आपण ज्या ज्या वेळी वाहनांचा व उर्जेचा अतिरेकी वापर करत असतो. त्या त्या वेळी खनिज इंधने जाळून कार्बन डाय-ऑक्साइडची निर्मिती करत आपण जागतिक तापमानवाढीला हातभार लावत असतो.

केवळ खनिज इंधनांद्वारेच जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरणार्‍या वायूंची निर्मिती होते, असे नव्हे. तर आपल्या इतर छोट्या-मोठ्या कृतीतूनही पर्यावरणास घातक ठरणार्‍या वायूंची निर्मिती होत असते. जसे की- आपल्याला नको असलेले अन्न जेव्हा आपण फेकून देतो, तेव्हा जमिनीत फेकल्या गेलेल्या अन्नामुळेही जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरणार्‍या वायूची निर्मिती होत असते. सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे आजमितीस उत्पादित अन्नाच्या साधारणपणे एक तृतीयांश अन्न फेकून दिले जाते. या कृतीतून आपण कोणाच्या तरी हक्काच्या अन्नाची नासाडी करतोच. शिवाय अन्नधान्य उत्पादनासाठी वापरली गेलेली जमीन, पाणी, ऊर्जा या संसाधनांचीही एका अर्थाने नासाडीच करत असतो आणि अंतिमतः तापमानवाढीला चालना देत असतो. जागतिक तापमानवाढीचे परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. हिमपर्वत व हिमनद्या वितळू लागल्या आहेत आणि त्यांच्या पाण्यामुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर जागतिक पर्यावरणतज्ज्ञांनी छोटी बेटे आणि समुद्रसपाटीजवळ असलेल्या जगभरातील सर्वच शहरांना धोक्याचा इशारा दिला आहे.

जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी एकूण भूभागापैकी ३३ टक्के क्षेत्र हरित आच्छादनाखाली म्हणजेच वनांखाली असणे आवश्यक मानले जाते. मात्र, प्रत्यक्षात हे प्रमाण राखण्याऐवजी दिवसेंदिवस यातही घटच होत आहे. गेल्या २५ वर्षांत ३०० दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील वने तोडण्यात आली आहेत. भारताच्या बाबतीत विचार करता, भारतामध्ये १९८० ते २००५ या कालावधीत १ लाख, ६४ हजार ६१० हेक्टर जंगलांचे खाणींमध्ये रूपांतर झाले आहे. खाणीसाठी रूपांतरीत झालेल्या एकूण वन जमिनीपैकी निम्म्याहून अधिक जमिनीवर आज कोळशाच्या खाणी आहेत.

‘भारतीय वन सर्वेक्षण संस्थे’च्या नोंदीनुसार, २००९ ते २०११ या कालावधीत देशात एकंदर ३६७ चौरस किमी जंगलांचा नाश झाला आहे. भारतातील नैसर्गिक जंगले दरवर्षी १.५ ते २.७ टक्के या वेगाने घटत चालली आहेत. अशा प्रकारे एका बाजूला आपण प्रदूषण वाढवत आहोत, तर दुसर्‍या बाजूला प्रदूषण रोखणारी वने नष्ट करत आहोत. याचे गंभीर परिणामही आता दिसू लागले आहेत. सन २००० पासून जगभरात प्रदूषणामुळे होणार्‍या मृत्यूमध्ये ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यापैकी ६५ टक्के मृत्यू आशियात होत आहेत. ‘जागतिक आरोग्य संघटने’नुसार जगभरात दरवर्षी ३.२ दशलक्ष मृत्यू प्रदूषणाशी निगडित आजारांनी होत आहेत. शिवाय स्वाईन फ्ल्यूसारखे नवनवीन आजार जगभरात पसरत आहेत.

एकूण सारासार विचार करता पृथ्वीचे आरोग्य राखणे म्हणजे आपले आरोग्य राखण्यासारखेच आहे.पृथ्वीचे आरोग्य राखण्यामध्ये वने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एक मोठे झाड छोट्या-छोट्या वनस्पती, कीटक, प्राणी-पक्षी यांना आसरा देते. विषारी कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेऊन जागतिक तापमानवाढ कमी करते आणि प्राणवायू असलेल्या ऑक्सिजनचे उत्सर्जन करते. वनांमुळे जमिनीची धूप रोखली जाते. जमिनीत पाणी मुरते व पूर-दुष्काळ यांसारख्या आपत्ती रोखण्यास मदत होते. तसेच वनांपासून फळे-फुले, औषधे, मसाले, रंग, जनावरांसाठी चारा, जळणासाठी, निरनिराळ्या वस्तू बनविण्यासाठी आणि घरबांधणीसाठी लाकूड मिळते. अशा प्रकारची जवळपास ५० हजार कोटी रुपयांची साधनसंपत्ती भारतातील वने दरवर्षी आपल्याला दरवर्षी उपलब्ध करून देतात. म्हणूनच यंदाच्या वसुंधरा दिनाच्या निमित्ताने प्रस्तुत अंकातून भारतातील वनसंवर्धनाच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण पैलूंवर प्रकाशझोत टाकत आहोत. यातून भारतीय वनसर्वेक्षणाचा इतिहास व त्याचे महत्त्व, भारतीय वनसंपत्तीसमोरील संधी व आव्हाने, तसेच वनशेती किंवा वनीकरणाच्या दृष्टीने आवळा लागवडीचे महत्त्व अधोरेखित होईल, असा आम्हाला विश्वास आहे. या अंकातून प्रेरणा घेऊन वन संवर्धनाच्या दृष्टीने प्रत्येकाने वैयक्तिक किंवा सार्वजनिक पातळीवर किमान काही प्रयत्न केले, तरी या अंकाच्या निर्मितीसाठी घेतलेल्या कष्टांचे सार्थक झाले, असे आम्हाला वाटेल.

अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या आपल्या मूलभूत गरजा असोत किंवा चंगळवादी संस्कृतीतील  चैनीच्या वस्तू असोत. आपली प्रत्येक गरज पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीद्वारेच भागविली जाते. त्यामुळे पृथ्वीविषयी कृतज्ञतेची भावना बाळगणे, आपली पृथ्वी स्वच्छ, सुंदर व हरित ठेवणे, ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. म्हणूनच वसुंधरा दिनाच्या निमित्ताने पृथ्वी वाचविण्याच्या कार्यात आपण हातभार लावण्याचा संकल्प करूया व त्या दिशेने कृतीशील होऊया!

 

- अमित वाडेकर

स्त्रोत: वनराई

3.14814814815
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:51:27.420470 GMT+0530

T24 2019/10/14 06:51:27.427354 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:51:26.707589 GMT+0530

T612019/10/14 06:51:26.726549 GMT+0530

T622019/10/14 06:51:26.800211 GMT+0530

T632019/10/14 06:51:26.801241 GMT+0530