অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रब्बी उत्पादनवाढीसाठी ओलावा व्यवस्थापन

रब्बी उत्पादनवाढीसाठी ओलावा व्यवस्थापन

रब्बीमध्ये जिरायतीसाठी जमिनीतील ओलावा अत्यंत महत्त्वाचा असून, अधिकाधिक ओलावा साठविण्यासाठी जल व मृद्‌ संधारणाच्या सोप्या बाबींचा अवलंब फायद्याचा ठरू शकतो.

कार्यक्षम जलसंधारणाच्या उपायामध्ये शक्‍यतो जमिनीचा पृष्ठभाग भुसभुशीत करून अथवा सरीसदृश उपचाराचा उपयोग करावा. रब्बीसाठी राखलेल्या शेतात बळिराम नांगराने उभी-आडवी मशागत करावी. त्यानंतर क्षेत्र तणविरहित व भुसभुशीत राखण्याकरिता वखराच्या एक-दोन हलक्‍या पाळ्या दिल्यास जलसंधारणाकरिता फारच उपयुक्त ठरते.

सपाट अथवा कमी उताराच्या भारी जमिनीमध्ये, रबी पेरणीपूर्वी 10 x 10 मीटरचे चौरस अथवा चौकोनी वाफे करून त्यामध्ये पेरणी करणे व मध्यम उताराच्या जमिनीवर 5 ते 10 मीटर अंतरावर, बैलाने ओढणाऱ्या रिजरच्या साह्याने उताराला आडवी जलसंधारण सरी काढून, दोन सरींमधील भागात पेरणी करण्याने परिणामकारक जलसंधारण होऊन उत्पादनात वाढ होते.

सुलभ आच्छादनाचा वापर

जमिनीवर आच्छादनाचा वापर केल्यास जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होते. ओलावा जास्त काळ टिकतो. यासाठी शेतात सहज उपलब्ध घटकांचा (गव्हाचा भुसा, सोयाबीनचा भुसा, शेतावरील काडीकचरा, उसाचे चिपाड इ. ) वापर करता येतो. ही आच्छादने पीक उगवणीनंतर 25 ते 30 दिवसांनी (1 कोळपणी आणि निंदणी झाल्यानंतर) समप्रमाणात जमिनीवर पसरावीत.

संरक्षित पाण्याचा करा योग्य वेळी वापर

जिरायती क्षेत्रामध्ये रब्बी पिकांना खताची उपलब्धता कार्यक्षमपणे होण्यासाठी खते पेरणीपूर्वी 1 किंवा 2 दिवस अगोदर तिफणीच्या साह्याने 12 ते 15 सें.मी. खोलीवर शक्‍यतो पेरून द्यावे.

  • पिकांच्या पाणीसंवेदनशील अवस्था जाणून घेऊन नेमक्‍या त्या काळी संरक्षित पाणी एक किंवा दोन सरीआड द्यावे.
  • प्रयोगामध्ये करडई पिकाला फुलोऱ्याच्या अवस्थेत दिलेल्या एका संरक्षित सिंचनाने, विना सिंचनाच्या तुलनेत, 98 टक्के अधिक उत्पादन मिळाले. करडईस एक संरक्षित सिंचन फुलोऱ्याच्या अवस्थेत म्हणजेच 65 ते 75 दिवसांनी देण्यात यावे. यामुळे बोंडाची वाढ योग्य होऊन दाणे भरण्यास मदत होते.
  • रब्बी ज्वारीस एक संरक्षित सिंचन पेरणीनंतर 55 ते 65 दिवसांनी पिकाच्या फुलोऱ्याच्या अवस्थेत देण्यात यावे. यामुळे परागसिंचन योग्य होऊन कणसात दाणेही पूर्ण भरले जातात.
  • हरभरा पिकाला एक संरक्षित सिंचन फुले लागण्याच्या अवस्थेत पेरणीनंतर 35 ते 40 दिवसांनी देण्यात यावे.
  • बऱ्याच शेतकऱ्यांनी पाणी उपसून शेततळ्यात साठविलेले आहे. त्या पाण्याचा वापर रब्बी पिकांचे शाश्‍वत उत्पादन घेण्यासाठी संरक्षित सिंचन तुषार सिंचन प्रणालीचा वापर करून करावा. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कमीत कमी दोन अश्‍वशक्ती (एचपी) च्या डिझेल किंवा इलेक्‍ट्रिक पंपाद्वारा तुषारसिंचन संचासोबत चार तोट्यांचा वापर करून रब्बी हंगामातील करडई, हरभरा यांसारख्या पिकांना एक किंवा दोन संरक्षित/ पूरक सिंचन देण्यात यावे, ज्याद्वारा पीक उत्पादनात निश्‍चितच 40 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होते.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate