Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/22 06:01:58.724055 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / रेशीम उत्पादनातून आर्थिक वाटचाल
शेअर करा

T3 2019/05/22 06:01:58.729364 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/22 06:01:58.795206 GMT+0530

रेशीम उत्पादनातून आर्थिक वाटचाल

तुती रेशीम लागवडीच्या माध्यमातून आमुलाग्र बदल झालेला आहे.

हिंगोली जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी इत्यादी कोरडवाहू तर ऊस, हळद, केळी ही पाण्याची पिके घेतली जातात. अलीकडील काही काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल सोयाबीन व हळद पिकाकडे अधिक वाढलेला दिसून येत आहे. तसे पाहता हिंगोली जिल्ह्याचे सिंचित क्षेत्र सुमारे 14 ते 15 टक्केच्या आसपास आहे. केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकारातून हिंगोली जिल्ह्यात रेशीम कोषच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात असून सद्यस्थितीत सुमारे 300 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करून शेतकरी रेशीम कोषचे उत्पादन घेत आहेत. रेशीम कोषच्या उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हातात प्रतीमहा नगदी पैसा येत असून रेशीमचे उत्पादन घेणारे शेतकऱ्यांची आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू झालेली आहे. कळमनुरी तालुक्यातील घोळवा गावातील प्रभू गुलाबराव मगर या शेतकऱ्यांकडे पाहिले असता याची प्रचिती येते.

घोळवा गावाचा शिवार तसा हलका-मध्यम व मुरमाड जमिनीचा आहे. या गावातील डिगंबर मस्के या शेतकऱ्याने सन 1996 पासून रेशीम शेतीचे उत्पादन घेण्यास सुरूवात केली. एका एकरावर तुतीची लागवड करून सिंचनाची व्यवस्था केली. कमी पाण्यावर ही तुतीची चांगली जोपासना करून रेशीम अंडी कोषच्या माध्यमातून वार्षिक तीन ते चार लाखाचे उत्पन्न घेऊन गावातील इतर शेतकऱ्यांसमोर एक चांगला आदर्श ठेवला. शेतकरी दिगंबर म्हस्के यांचा तुती शेतीचा आदर्श घेऊन घोळवा गावातील शेतकरी प्रभू गुलाबराव मगर यांनी आपल्या माळरानावरील पाच एकर जमिनीपैकी दीड एकरावर पाण्याची व्यवस्था करून तुतीची लागवड केली. याकरिता शेतकरी मस्के व जिल्हा रेशीम कार्यालय यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन तुतीची जोपासना केली. शेतामध्ये एक 50X25 फुटाचे एक शेड तयार करून त्यामध्ये रेशीम अंडीपुंज आणून रेशीम किड्यांची जोपासना केली. रेशीम कोषची पहिलीच बॅच दीड क्विंटलची झाली. हा कोष बेंगलोरजवळील रामनगरच्या बाजारपेठेमध्ये जाऊन विक्री केली. या रेशीम कोषाला प्रति किलो 307 रु. दर मिळाला त्यामुळे पहिल्या बॅचचे उत्पन्न जवळपास 45 हजारापर्यंत गेले व याकरिता कालावधी लागला फक्त 28 दिवस !

हे 45 हजाराचे उत्पन्न पाहून शेतकरी मगर यांना आनंद व्यक्त करण्यास शब्द अपुरे पडू लागले. कारण काही वर्षापूर्वी दुसऱ्यांच्या शेतावर सालगडी म्हणून वार्षिक 9 हजारावर राबणाऱ्यास दीड महिन्यातच 45 हजार रुपये हाती आले व तेही स्वत:च्या शेतात श्रम करून ! सद्यस्थितीमध्ये वर्षातून किमान 6 बॅच घेत असून वार्षिक सरासरी अडीच ते तीन लाखाचे उत्पन्न मिळवित आहेत. यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये चांगली सुधारणा झालेली असून ते स्वत:च्या शेतात पत्नीच्या मदतीने रेशीम शेती करीत आहेत.

श्री. मगर यांच्या जीवनात तुती रेशीम लागवडीच्या माध्यमातून आमुलाग्र बदल झालेला आहे. आज त्यांच्याकडे दुचाकी असून आर्थिक सुबत्ता आलेली आहे. श्री. मगर यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी हिंगोली शहरात ठेवले आहे. तसेच श्री. मगर यांना रेशीम शेतीचा अभिमान आहे. पाच एकर माळरान जमिनीपैकी दीड एकरात तुतीची लागवड रेशीम कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली करून वर्षातून पाच ते सहा बॅच उत्पन्न घेऊन वार्षिक उलाढाल खर्च वजा जाता तीन लाखापर्यंत आहे. श्री. मगर याना शासकीय पगारदार व्यक्ती इतका दरमहा पगार रेशीम शेतीमुळे मिळत आहे. हे शक्य झालं ते नाविन्यपूर्ण अशा तुती रेशीम कोषमुळे !

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी किमान पाण्याची व्यवस्था असल्यास इतर पिके घेण्यापेक्षा हमखास दरमहा हातात पैसे मिळवून देणाऱ्या व कमी पाण्यावर येणाऱ्या रेशीम शेतीकडे वळावे. या माध्यमातून टंचाईच्या परिस्थितीमध्ये अगदी कमी पाण्यावर आपल्या उत्पन्नात सातत्य ठेवता येते. त्यामुळे जिल्हा प्रशासन व जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालय शेतकरी वर्गात रेशीम शेती करण्याचे आवाहन करीत आहेत. घोळवा या गावाचे डिगंबर मस्के व प्रभू मगर या शेतकऱ्यांच्या आर्थिक संपन्नतेकडे पाहून इतर शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन रेशीम शेती करावी.

-संकलन

जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली.

लेखक : महान्यूज

2.875
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/22 06:01:59.628165 GMT+0530

T24 2019/05/22 06:01:59.635303 GMT+0530
Back to top

T12019/05/22 06:01:58.634774 GMT+0530

T612019/05/22 06:01:58.654808 GMT+0530

T622019/05/22 06:01:58.712108 GMT+0530

T632019/05/22 06:01:58.713004 GMT+0530