অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लिंबूवर्गीय फळपिकांवर प्रक्रिया-२

लिंबूवर्गीय फळपिकांवर प्रक्रिया-२

लिंबूवर्गीय फळपिकांवर प्रक्रिया करुन अनेक प्रकारे पदार्थांची निर्मिती करता येते. त्यामुळे फळांचे गुणधर्म व आहारमूल्य कायम राहून ते अधिक काळ टिकतात. त्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊन शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होते. शिवाय रोजगार निर्मितीही होत असते.

लिंबूवर्गीय फळपिकांपासून तयार होणारे काही पदार्थ व प्रक्रिया-

रस निर्मिती

कृती

  • पक्व, ताजी, मोठ्या आकाराची रसाळ फळे निवडावीत व फळे स्वच्छ पाण्याने धुवून फडक्याने कोरडी करावीत.
  • साल हाताने काढून त्यावरील पांढऱ्या शिरा व पातळ पापुद्रा काढून टाकावा व फोडी अलग कराव्यात.
  • फोडी ज्यूस एक्सट्रॅक्टरमध्ये टाकून त्याचा रस काढून घ्यावा.
  • मशिनमधून रस काढत असताना बिया चिरडू नयेत, याची दखल घ्यावी.
  • रस बारीक गाळणीतून किंवा मसलिन क्लॉथमधून गाळून घ्यावा.
  • रसाची साठवण करण्यासाठी स्टीलच्या पातेल्यात रस घेऊन पातेले शेगडीवर मंद आचेवर ठेवावे.
  • रस 80 अंश सें. तापमानाला 20 मिनिटे गरम करावा.
  • रस थोडा थंड झाल्यानंतर त्यामध्ये प्रति लिटर रसास 600 मि. ग्र. सोडियम बेन्झोएट मिसळावे.
  • रस साठविण्यासाठी वापरावयाच्या बाटल्या व झाकणे उकळत्या पाण्यात 25 ते 30 मिनिटे ठेवून निर्जंतूक करुन कोरड्या कराव्यात.
  • रस भरुन त्यांना निर्जंतूक करुन घेतलेली झाकणे हवा बंद करावीत.
  • परत 85 अंश सें. तापमानास गरम पाण्यात 25 ते 30 मिनिटे ठेवाव्यात. नंतर कोरड्या व थंड जागेत साठवावे.

सरबत

फळांपासून काढलेल्या नैसर्गिक रसामध्ये साखर, सायट्रीक आम्ल व पाणी मिसळून तयार केलेल्या पदार्थाला सरबत असे म्हणतात.
रसामध्ये 13 टक्के ब्रिक्स व 0.8 टक्के आम्लता गृहित धरुन रसाचे सरबत करण्यासाठी 10 टक्के रस, 15 टक्के साखर, 0.25 टक्के सायट्रिक आम्ल या सूत्रानुसार घटक पदार्थ वापरावेत.

कृती

  • रस तयार करावा. स्टीलच्या पातेल्यात प्रथम पाणी मोजून घ्यावे व त्यामध्ये साखर व सायट्रीक आम्ल टाकून विरघळून घ्यावे.
  • प्रतिलिटर सरबतात 100 मि. ग्र. सोडीअम बेन्झोएट मिसळावे, संत्र्याचा रस मोजून टाकावा.
  • ते मिश्रण एकजीव करावे, मलमल कपड्यातून किंवा गाळणीतून गाळून घ्यावे.
  • बाटल्यामध्ये भरुन 80 -85 अंश सें. तापमान 25 -30 मिनिटे गरम पाण्यात ठेवून त्याचे निर्जंतुकीकरण करावे व कोरड्या व थंड जागेत साठवावे.

स्कॅश

  • फळांच्या गरयुक्त रसामध्ये गोडी आणण्यासाठी साखर मिसळून तयार केलल्या पदार्थाला स्कॅश असे म्हणतात.
  • उत्तम प्रतिच्या स्कॅशमध्ये मूळ रसाचे प्रमाण 30 टक्के विद्राव्य घटकाचे (साखरेचे) प्रमाण 45 व आम्लतेचे प्रमाण 1 टक्के असावे.
  • उदा. लेमन स्कॅश, ऑरेंज स्कॅश व पायनापल स्कॅश.
  • रसात 13 टक्के ब्रिक्स, 0.8 टक्के आम्लता गृहीत धरुन स्कॅश तयार करण्यासाठी 25 टक्के रस. 45 टक्के साखर व 1 टक्का सायट्रिक ॲसिड या सूत्रानुसार घटक पदार्थांचे प्रमाण वापरावे.

कृती

  • रस वजन करुन घ्यावा. त्यामध्ये साखर व पाणी टाकून साखर विरघळवून घ्यावी.
  • दोन ग्लासमध्ये गरम केलेला थोडा-थोडा स्कॅश घेऊन एकामध्ये सायट्रिक आम्ल व दुसऱ्यामध्ये जरुरीप्रमाणे खाद्य रंग स्कॅशमध्ये टाकून एकजीव करावे.
  • नंतर पातेले शेगडीवरुन खाली उतरुन घ्यावे.
  • नंतर थोडा स्कॅश घेऊन त्यामध्ये सोडियम बेन्झोएट पूर्णपणे विरघळून घ्यावे.
  • स्कॅश पातळ मलमल कापडातून गाळून घ्यावा.
  • स्कॅश पूर्ण थंड करुन निर्जंतूक केलेल्य बाटल्यामध्ये भरावा.
  • बाटल्याची साठवण थंड व कोरड्या ठिकाणी करावी.
  • स्कॅशपासून सरबत तयार करताना 100 मिली स्कॅशमध्ये 200 मिली पाणी टाकून एकत्र केल्यास पिण्यास योग्य सरबत तयार होते. (1:2 प्रमाण)

सिरप

  • स्कॅशपेक्षा सिरप थोडे वेगळे असते.
  • सिरपमध्ये फळांच्या रसाचे प्रमाण 40 टक्के असते तर साखरेचे प्रमाण 65 ते 70 टक्के असते.
  • साधारण सिरपमध्ये अन्नसंरक्षक मिसळण्याची आवश्यकता नसते.
  • कारण यात साखरेचे प्रमाण जास्त असते.
  • परंतू अधिक सुरक्षितेसाठी जेव्हा सिरप जास्त कालावधीसाठी टिकवायचे असते त्यावेळी मात्र 600 ते 700 पीपीएम सोडियम बेन्झोएट मिसळावे.
  • रसात 13 टक्के ब्रिक्स व 0.8 टक्के आम्लता गृहित धरुन सिरप तयार करण्यासाठी 25 टक्के रस, 65 टक्के साखर 600-700 पीपीएस सोडियम बेन्झोएट व 1.5 ते 2.00 टक्के सायट्रिक आम्ल या सूत्रानुसार घटक पदार्थाचे प्रमाण वापरावे.

संत्रा जॅम

फळांचा ताजा गर, साखर व सायट्रिक आम्ल याच्या योग्य प्रमाणातील मिश्रणाला घट्ट रबडीप्रमाणे आटवून तयार करता येतो.

लेखक - प्रा. तुषार गोरे (अन्नशास्त्र तंत्रज्ञान)
डॉ.हेमंत बाहेती, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद, जळगाव.

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 8/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate