Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 10:10:13.969375 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / संकट व योद्धा शेतकरी
शेअर करा

T3 2019/05/20 10:10:13.974323 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 10:10:13.999343 GMT+0530

संकट व योद्धा शेतकरी

मॉन्सूनचे सरासरीपेक्षा कमी पडणे व त्याचा धान्य उत्पादनावर परिणाम होणे हा देशासाठी एक प्रश्न असला तरी फार काळजीचे कारण नसते

जाहीर होणार म्हणून गाजत असलेला केंद्रीय हवामान खात्याचा अंदाज अखेर २४ एप्रिलला जाहीर झाला! या अंदाजानुसार या वर्षीचा मॉन्सून सरासरीएवढा असला तरी त्यात ५ ते १२ टक्के घट येण्याची शक्यता आहे. मॉन्सून भारताच्या वेशीवर केव्हा येणार याबाबतीत अजून तरी हवामान खाते काही बोलत नाही. मात्र ‘अल निनो’ या राक्षसाची भीती ६० टक्के असल्याचे म्हटले आहे. भारतीय शेती व अर्थव्यवस्था प्रतिवर्षी मॉन्सूनच्या आगमनाशी जोडलेली असते. देशाची १२ टक्के आर्थिक उलाढाल शेतीशी निगडित असून, ६५ कोटी लोक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शेती व त्यावर आधारित जोडधंद्यांशी जोडलेले आहेत. म्हणूनच प्रतिवर्षी ८९ से.मी. पडणारा सरासरी पाऊस या वर्षी ७७ ते ८४ सें.मी. पडण्याची शक्यता बळिराजास चिंतीत करणे साहजिक आहे. मॉन्सून हा दर वर्षी नियमित येतो. प्रथम अंदमान, नंतर श्रीलंका, केरळ, कोकण, मुंबईचा प्रवास करत पश्चिम घाटाचे डोंगर ओलांडून देशावर मनमुराद बरसतो. या वर्षीसुद्धा तो असाच येणार आणि बरसणार. मात्र त्याच्या या बरसण्यावर ‘अल निनो’चा बऱ्यापैकी प्रभाव असणार आहे.

शेतकऱ्यांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. ‘अल निनो’ हा सागरी हवामान बदलाचा एक प्रकार असून, तो दक्षिण अमेरिकेतील पॅसेफिक महासागराचा पृष्ठभाग तापल्यामुळे तयार होतो. आशियाई खंडाकडे झेपावणाऱ्या मॉन्सूनच्या प्रवासामध्ये अडथळे निर्माण करण्याचे काम हा ‘अल निनो’ करत असतो. ‘अल निनो’मुळे गेल्या दशकातील २००२, २००४ आणि २००९ या वर्षी भारतीय शेतीस दक्षिण पश्चिम मॉन्सूनने चांगलाच झटका दिलेला आहे. २००९ चा मॉन्सून अल निनोच्या प्रभावाखाली होता. त्यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा २३ टक्के कमी झाला; परंतु अन्नधान्याच्या उत्पादनात फक्त ७ टक्केच घट झाली. भाताचे उत्पादन कमी झाले. मात्र गहू उत्पादन वाढले.

२००९ च्या पावसाने पंजाब, हरियाना, मध्य प्रदेशला रब्बीसाठी आशीर्वाद दिला, मात्र महाराष्ट्रावर तो रुसला होता. मॉन्सूनचे सरासरीपेक्षा कमी पडणे व त्याचा धान्य उत्पादनावर परिणाम होणे हा देशासाठी एक प्रश्न असला तरी फार काळजीचे कारण नसते. एका राज्यात उत्पादन कमी झाले, तर दुसऱ्या राज्यात त्याची भरपाई होते. प्रश्न आहे तो मॉन्सूनवरच अवलंबून शेती करणाऱ्या अल्पभूधारकांचा. कोकण विभागात भात शेतीस प्राधान्य असल्यामुळे खरीप पिके जोरात असतात. मात्र रब्बी तेवढा महत्त्वाचा नसतो. वाल, तूर व वेलवर्गीय पिके घेऊन शेतकरी आंबा, नारळ, फणस, सुपारी, काजू, चिकू यांच्याकडे आर्थिक उलाढाल म्हणून पाहत असतात. मात्र, उर्वरित महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी हे दोन्ही हंगाम साधले तरच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित व्यवस्थित सुटते. त्यातील एक हंगाम हुकला तरी बळिराजाचा आर्थिक इमला कोसळतो. त्यातून उभारी घेण्यास परत दोन-तीन वर्षे जातात. हे चित्र मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात सहजपणे आढळून येते. म्हणूनच या सर्व भूभागासाठी हवामान खात्याचा अंदाज अतिशय महत्त्वाचा ठरतो.

जेव्हा केंद्रीय हवामान खाते या वर्षी पाऊस पाच टक्के कमी पडेल असे म्हणते, तेव्हा आपण तो दहा टक्के कमी पडणार असे गृहित धरूनच खरीप आणि रब्बीची आखणी करावयास हवी आणि त्याची सुरवात आताच करावी. मागील पावसाळा लांबला. त्यानंतर गारांचा पाऊस झाला. त्यामुळे जमिनीत अजूनही ओलावा शिल्लक आहे. या ओलाव्यास पकडून ठेवणे गरजेचे आहे. शेतातील पिकांचा पडलेला पालापाचोळा वापरून हा ओलावा आपण टिकवून ठेवू शकतो. वळवाच्या पावसानंतर पेरणी करण्याचा विचार टाळावा. मॉन्सूनचा भक्कम पाऊस झाल्यावरच पेरणी करावी. महागामोलाच्या बियाण्याची उगवणशक्ती पाहिल्याशिवाय पेरणी करू नये. रासायनिक खतासाठी हात आखडता घेणे गरजेचे आहे. अशा खतामुळे जमिनीची तहान वाढते. भरपूर पाणी पिणारी पिके टाळावीत. देशी वाण प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा थोडे तरी उत्पादन देते. पाऊस कमी पडो अथवा जास्त, सेंद्रिय शेती व देशी बियाणे वापरणारा शेतकरी नेहमी राजा असतो. पाऊस पडण्याच्या आधी शेताजवळचे ओढे, तलाव, नाले, नद्यांना खोदून त्यातील बहुमोल गाळ शेतात टाकावा.

शेताभोवतालचे नाले, ओढे शेतकऱ्यांसाठी गंगा-यमुना आहेत. त्यांना वाहते ठेवा. हेच पाणी आपल्या खरीप, रब्बीला अमृत आहे. शेताच्या चारीही बाजूंस एक फूट खोल व तेवढाच रूंद चर खोदल्यास पावसाचे पाणी त्यात साठून वावरामध्ये ओलावा राहण्यास मदत होते. यावर्षी प्रत्येक शेतकऱ्याने शेततळे घेण्याचा प्रयत्न करून पावसाचे पाणी अडवण्याचा प्रयत्न करावा. बियांची उगवण झाल्यावर लगेच तण काढणे जरुरीचे असते. काढलेले तण रोपाच्या भोवती चेपून लावले असता मुळाभोवती ओलावा टिकून तर राहतोच, शिवाय याचाच वापर नंतर खत म्हणूनही होतो. वापसा झाल्यावर बियाणे पेरून ते उगवण्याची आणि नंतर ते जगवण्यासाठी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी तयार रोपेच जमिनीत लावली तर उत्तम. प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये रोपे तयार करण्याचे तंत्रज्ञान आता विकसित झाले आहे. यामुळे तीन-चार आठवड्यांचा कालावधी वाचतो त्याचबरोबर बियाणे न उगवल्यामुळे झालेली फसगत, रुजलेले बी जमिनीमध्येच किडा-मुंगीने खाण्याची भीतीसुद्धा राहत नाही.

हवामान खात्याचा अंदाज गृहित धरून शेतकऱ्यांनी या वर्षी हा प्रयोग जरूर करावा. दोन वर्षे दुष्काळ आणि मागील वर्षाच्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी कमी पावसाचा अंदाज आणि एकंदरीतच परिस्थिती शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान असणार आहे. काही संकटे अचानक येतात, तर काही येण्याअगोदर पूर्वसूचना देतात. सर्व शस्त्रास्त्रांचा वापर योग्य वेळी करून लढाई जिंकणाराच खरा योद्धा. असा योद्धा तुम्ही पाहिला आहे का, असा प्रश्न कुणी मला विचारल्यास माझे उत्तर असेल होय. ‘माझा बळिराजाच’ खरा योद्धा आहे. अशा योद्ध्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!


डॉ. नागेश टेकाळे ९८६९६१२५३१.
(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

५ मे २०१४

2.97115384615
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/20 10:10:14.237115 GMT+0530

T24 2019/05/20 10:10:14.243639 GMT+0530
Back to top

T12019/05/20 10:10:13.901220 GMT+0530

T612019/05/20 10:10:13.920136 GMT+0530

T622019/05/20 10:10:13.959539 GMT+0530

T632019/05/20 10:10:13.960311 GMT+0530