অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जनावरांतील बाह्य परोपजीवींचे वेळीच करा नियंत्रण

बाह्य परोपजीवींचे नियंत्रण करण्याची फार मोठी समस्या आज पशुपालकांसमोर आहे. त्यासाठी बाजारात विविध प्रकारची कीटकनाशके उपलब्ध आहेत, परंतु त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने किंवा योग्य प्रमाणात न केल्यास बऱ्याच जनावरांमध्ये विषबाधा होते. वेळेत उपचार न केल्यास जनावरांचा मृत्यू होऊन आर्थिक नुकसान होते. जनावरांमध्ये होणारी ही विषबाधा होऊ नये म्हणून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच फवारणी करावी.

बाह्य परोपजीवीमुळे जनावरांमध्ये अनेक प्रकारचे जसे, की दुभत्या जनावरांचे दूध कमी होणे, वासरांची वाढ कमी होणे, हगवण लागणे असे दुष्परिणाम दिसतात. तेव्हा जनावरांचे व्यवस्थापन करताना त्यांच्या अंगावरील गोचीड, गोमाश्‍या व इतर बाह्य परोपजीवींचे वेळीच नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे. तसेच काही परोपजीवी रोगांचा प्रसार करतात. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे गोचीड ताप (थायलेरियासिस), बबेसिऑसिस (रक्त लघवी) इत्यादी रोगांमुळे पशुधनाचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे.
जनावरांमध्ये बाह्य परोपजीवींचे नियंत्रण करण्यासाठी चार प्रकारची कीटकनाशके उपलब्ध आहेत, ती अशी....

  1. ऑरगॅनोक्‍लोरिन  - उदा. ऑल्ड्रिन, डायल्ड्रीन
  1. ऑरगॅनोफॉस्फेट - उदा. क्‍लोरपायरिफॉस, डायक्‍लोरव्हॉस, मॅलॅथिऑन, ट्रायझोफॉस इत्यादी
  1. कार्बामेटस उदा. कार्बारिल, अल्डीकार्ब इत्यादी.
  2. पायरेथ्रॉईड उदा. सायपरमेथ्रीन इत्यादी.
टीप -  फवारणीचे माहितीपुस्तिकेनुसार तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन प्रमाण ठरवूनच कीटकनाशकाची फवारणी करावी.

जनावरांना या कारणांनी होऊ शकते विषबाधा

  1. (अनवधानाने / अपघाताने जनावरे या कीटकनाशकांच्या संपर्कात आल्यास.
  2. पिकांवर फवारणी केलेली असताना असे पीक जनावरांनी खाल्ल्यास.
  3. फवारणी केलेल्या शेतातील पाणी प्यायल्यामुळे.
  4. धान्याला कीडनाशक लावलेले असल्यास आणि तसे धान्य जनावरांनी खाल्ल्यास.
  5. कीडनाशक वापरलेल्या बकेटमध्ये किंवा टोपलीमध्ये जनावरांना चारा, पाणी दिल्यास.
  6. कीटकनाशकांचे रिकामे डबे जनावरांनी चाटल्यास.
  7. कधी कधी कीटकनाशके व जनावरांचे खुराक खाद्य एकाच ठिकाणी साठवले जाते. अशा वेळी कीटकनाशकांचे काही अंश डबे गळतीमुळे खाद्यात मिसळले जातात आणि अशा प्रकारे साठविलेले खुराक जनावरांनी खाल्ल्यास.
  8. पिण्याच्या पाण्याचा ठिकाणी उदा. नदी, ओढे, नाले इत्यादी ठिकाणी फवारणी केलेल्या शेतातील पाणी झिरपून येते आणि पाणी दूषित होते. असे पाणी जनावरांनी प्यायल्यास.
  9. जनावरांच्या अंगावरील गोचीड, गोमाश्‍या यांचा नायनाट करण्यासाठी पिकांसाठी आणलेल्या कीडनाशकांचा वापर केल्यास.

लक्षणे

ऑरगॅनोक्‍लोरिन या प्रकारच्या कीडनाशकाची विषबाधा झाल्यास...

  • जनावरांच्या शारीरिक हालचालींमध्ये बदल होतो. उदा. जनावरे रागीट बनतात.
  • न दिसणाऱ्या वस्तूवर जनावरे उड्या मारतात.
  • जनावरे भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करतात.
  • जनावरे वेडसर झाल्यासारखी वागतात.
  • जनावरांना हात लावल्यास ती थकल्यासारखी करतात.
  • ताप वाढतो.
  • जनावरे थरथर कापतात.
  • काही जनावरांमध्ये लाळ गळते, डोळे मोठे होतात. ही झाली ऑरगॅनोक्‍लोरिनमुळे दिसणारी लक्षणे.
  • पायरेथ्रॉइडमुळे दिसणारी लक्षणे वरीलप्रमाणे असतात.

ऑरगॅनोफॉस्फेटमुळे दिसणारी लक्षणे

  • जनावरांच्या तोंडाला फेस भरपूर प्रमाणात येतो, डोळ्यांतून पाणी वाहते, घाम येतो, हगवण लागते, डोळे बारीक होतात. श्‍वासोच्छ्वास घेण्यास त्रास होतो.
  • कार्बामेटमुळे विषबाधा झाल्यास दिसणारी लक्षणे ही सर्वसाधारणपणे ऑरगॅनोफॉस्फेटमुळे दिसणाऱ्या लक्षणांसारखीच असतात.

विषबाधा झाल्यास करावयाचे प्रथमोपचार

  • फवारणी केलेले पीक किंवा दूषित पाणी प्यायल्यामुळे विषबाधा झाली असल्यास ते तत्काळ जनावरांपासून काढून घ्यावे.
  • विषबाधा जर जनावरांच्या अंगावर फवारल्यामुळे झाली असेल तर जनावरांचे अंग स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे.
  • जनावरांनी फवारणी केलेले खाद्य खाल्ले असल्याने कीडनाशकांचा शरीरात शोषण थांबविण्यासाठी कोळशाची भुकटी पाण्यात मिसळून पाजावी किंवा अंड्यातील पांढरा बलक पाण्यात मिसळून जनावरांना पाजावा.
  • चिंचेचे पाणी किंवा थंड पाणी पाजावे. अशा प्रकारे प्रथमोपचार केल्यानंतर जवळच्या पशुवैद्यकाला बोलावून पुढील उपचार करून घ्यावा.

कीटकनाशके जनावरांच्या अंगावर फवारताना घ्यावयाची काळजी

  • बाह्य परोपजीवींचे नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर त्यांच्यासोबत आलेली माहितीपत्रिका वाचून काटेकोरपणे करावा. कारण ती सर्व कीटकनाशके फार विषारी असतात. त्यामुळे त्यांचे प्रमाण घेताना योग्य घ्यावे.
  • शेतातील पिकांवरील कीटकनाशके जनावरांच्या अंगावर फवारण्यासाठी वापरू नयेत. त्यासाठी खास जनावरांसाठी उपलब्ध असलेली कीटकनाशके योग्य त्या दुकानातून खरेदी करून तीच वापरावीत. काही शेतकरी पिकांवरील कीटकनाशकांचा वापर जनावरांसाठी करतात. अशावेळी जनावरांमध्ये विषबाधा होऊन जनावरे मृत्यू पावतात.
  • कोणतीही दोन कीटकनाशके एकत्र मिसळून ती जनावरांसाठी वापरू नयेत.
  • जनावरे आजारी असताना त्यांच्या अंगावर कीटकनाशकाची फवारणी करू नये.
  • गाभण जनावरे किंवा दुभत्या जनावरांमध्ये वापरण्यासाठी शिफारस केलेलीच कीटकनाशके वापरावीत.
  • जनावरांच्या अंगावर जखमा असताना कोणत्याही प्रकारची कीटकनाशके फवारू नयेत, कारण अशा जखमांमधून कीटकनाशक शरीरात जातात आणि त्यामुळे विषबाधा होते.
  • कधी कधी शेतकरी गोचीड, गोमाश्‍या नियंत्रणासाठी कीटकनाशक पावडरचा अयोग्य वापर करतात. अशा वेळी ही पावडर शरीरात शोषली जाते. त्यामुळे जनावरांना विषबाधा होते. त्यामुळे कोणत्याही पावडरचा वापर हा पाण्यात मिसळूनच करावा.
  • जनावरांच्या अंगावर कीटकनाशकांची फवारणी किंवा पावडर लावली असता जनावरांच्या तोंडाला मुस्के घालावे जेणेकरून जनावर अंगावरील द्रावण चाटणार नाही.
  • नंतर एक-दोन तासांनंतर जनावरांचे अंग साबण, पाण्याने स्वच्छ करावे.
  • पिकांवरील कीटकनाशक फवारणीचा पंप जनावरांच्या अंगावर फवारणी करण्यासाठी वापरू नये.
  • कीटकनाशके ही व्यवस्थित ठेवावीत, जेणेकरून ती लहान मुलांच्या हाताला किंवा जनावर चाटणार नाही अशा ठिकाणी ठेवावीत.
  • कीटकनाशके वापरल्यानंतर रिकामे डबे व्यवस्थित खड्ड्यात पुरावेत.
  • कोणत्याही कीटकनाशक फवारणीमुळे जनावरांना विषबाधा झाल्यास तत्काळ पशुवैद्यकांकडून उपचार करून घ्यावेत.

अशा प्रकारे काळजी घेतल्यास जनावरांतील विषबाधा व मृत्यूचे प्रमाण कमी करता येऊ शकते.
संपर्क - डॉ. घुमरे, 9423731679 
(लेखक औषध व विषशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

परजीवींमुळे जनावरांवर होणारे दुष्परिणाम

जनावरांवर मुख्यत्वे दोन प्रकारचे परजीवी आढळतात. काही शरीरामध्ये व काही शरीरावर आढळत असतात. हे परजीव जनावरांपेक्षा आकाराने लहान असतात, परंतु संख्येने अनेक असल्या कारणामुळे एकत्र येऊन जनावरांवर विविध प्रकारचे दुष्परिणाम करीत असतात. या परजीवींचे पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेळीच नियंत्रण करावे.
  1. जनावरांची अत्यावश्‍यक जीवनसत्त्वे हे परोपजीवी शोषतात व आपला जीवनक्रम पूर्ण करतात, त्यामुळे जनावरांमध्ये अत्यावश्‍यक द्रव्यांची कमतरता भासते व ते इतर रोगांना बळी पडतात.
  2. जनावरांची भूक मंदावते. जनावरांमध्ये चयापचय प्रक्रियेचा वेग कमी होऊन बरोबर अन्नाचे पूर्ण पचन होत नाही.
  3. आतड्यामधील विविध प्रकारच्या परोपजीवींमुळे आतड्यामधील जीवनसत्त्वे शोषण करण्याचा भाग कमी होतो.
  4. जनावरांच्या शरीरामध्ये प्रथिने तयार होण्याचे प्रमाण कमी होते. आतड्यामधील परोपजीवींमुळे जनावरांच्या शरीरामधील पाणी, सोडिअम व क्‍लोराईड यांच्या प्रमाणात बदल होतो.
  5. परोपजीवीमुळे जनावरांमधील रक्‍त व इतर प्रकारची द्रव्ये शरीरामधून शोषली जातात, त्यामुळे रक्तक्षय होतो.
  6. परोपजीवी हे जनावरांच्या शरीरामध्ये विविध भागांमध्ये वाढतात व त्या भागावर राहून त्यावर आपली उपजीविका करतात.
  7. पट्टकृमीमुळे जनावरांच्या आतड्यांमध्ये आठळ्या निर्माण करतात. काही परोपजीवी शरीरामधील मूळ जागा सोडून, शरीरामधील श्‍वासनलिका, पित्तनलिका, रक्तवाहिन्या यांच्या मार्गात अडथळा निर्माण करतात.
  8. जनावरांच्या रक्तामधील परोपजीवींमुळे रक्तामधील विविध पेशींचे प्रमाण कमी होते व रक्तक्षयसुद्धा होऊ शकतो.
  9. परोपजीवीमुळे जनावरांच्या पेशीमध्ये दाह होऊन नैमित्तिक प्रक्रिया मंदावते किंवा कार्यक्षमता कमी होते. परोपजीवीमुळे जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन जनावरे लहान आजारांनाही बळी पडतात.
  10. परोपजीवींमुळे लहान वासरे, शेळ्या व मेंढ्यांमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात दुष्परिणाम प्रामुख्याने जाणवतात, त्यामुळे जनावरांची वाढ खुंटते, वजन कमी होते. शरीरावरील केस गळून जातात. रोगप्रतिकारक क्षमता कमी होते व लहान वासरे आंतरपरोपजीवींमुळे अचानक दगावूसुद्धा शकतात.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate