অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

देखभाल आजारी जनावरांची...

जनावर सांसर्गिक आजाराने ग्रस्त असल्यास बहुतेक वेळा चुकीच्या देखभालीमुळे तो आजार गोठ्यातील इतर जनावरांमध्ये संक्रमित होतो. आजारामुळे जनावरांची उत्पादन व कार्यक्षमता कमी होते. भविष्यातील होणारे नुकसान लक्षात घेऊन जनावरांची योग्य देखभाल केल्यास सांसर्गिक आजारांच्या प्रसारास प्रतिबंध होण्यास मदत होते.

आजारी जनावरांची देखभाल करताना वैयक्तिक, गोठा, पाणी, गुरे व वातावरण इ.ची स्वच्छता आवश्‍यक असते. रोगी जनावराचे मलमूत्र, चारा, श्‍वासोच्छ्वास इत्यादीमधून रोगाणू सतत बाहेर पडत असतात. त्यामुळे सभोवतालची हवा, चारा, पाणी व जनावराच्या सान्निध्यात येणारी विविध उपकरणे दूषित होत असतात. दूषित उपकरणे, हवा, चारा आणि पाण्याच्या माध्यमातून रोगाणू वातावरण आणि इतर जनावरांमध्ये संक्रमित होत असतात. म्हणून सांसर्गिक रोगानेग्रस्त जनावरांना त्वरित ओळखून इतरांपासून वेगळे करावे. पशुवैद्यकामार्फत आजारी जनावरांवर योग्य उपचार करावेत.
आजारी जनावराची व्यवस्था भरपूर उजेड व खेळती हवा असलेल्या ठिकाणी करावी. शक्‍य असल्यास आजारी जनावराची देखभाल स्वतंत्र व्यक्तीने करावी. आजारी जनावरांच्या देखभालीसाठी वेगळा व्यक्ती ठेवणे शक्‍य नसल्यास पशुपालकाने प्रथम निरोगी जनावरे हाताळावी. त्यानंतर आजारी जनावराची देखभाल करावी. सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्यात शिफारशीत जंतुनाशक औषध टाकून आजारी पशूचे डोळे, नाकपुड्या व जननेंद्रिये स्वच्छ करावे. आजारी जनावराला त्रास देऊ नये; तसेच त्याला दररोज थोडा वेळ सूर्यप्रकाशात बांधावे. थंडी व उकाड्यापासून जनावरांचे संरक्षण करावे.

आजारी जनावरांना समतोल व लवकर पचणारा चारा द्यावा. आजारी जनावर एकाच वेळी पोटभर खात नाही. त्यामुळे त्यास थोड्या थोड्या वेळाने ताजा हिरवा लुसलुशीत चारा द्यावा. दिवसांतून चार ते पाच वेळा स्वच्छ व मुबलक पाणी पिण्यास द्यावे. आजारी जनावरास खरारा व मॉलिश करावे. त्यामुळे कातडीवरील घाण स्वच्छ होते. मॉलिश केल्यामुळे रक्तपुरवठा वाढतो. कातडीवरील जखमा, दाह लक्षात येतो व बाह्यपरोपजीवी दिसून येतात.

आजारी जनावरांचे व्यवस्थापन

आजारी जनावराच्या गोठ्यातील जमीन हिवाळ्यात ऊबदार व उन्हाळ्यात गार राहील अशी असावी. जमीन जास्त गुळगुळीत (फरशीची) असल्यास जनावर घसरून पडण्याचा धोका असतो. गोठ्यात जनावरांसाठी वाळलेल्या गवताचा बिछाना अंथरावा. आजारातून बरे झाल्यानंतर जनावरांचा बिछाना, खाद्य इ. जाळून टाकावे. गोठ्यात आवश्‍यकतेनुसार वेळोवेळी जंतुनाशक औषध फवारावे. गोठ्यातील वातावरण आल्हाददायक करण्याचा प्रयत्न करावा.

जनावराच्या शरीरावर बाह्यपरोपजीवी असल्यास जनावरावरील ताण वाढतो. आजारी जनावर चिडचिडे बनते. त्यामुळे गोचिडीसारखे परोपजीवींचे नियंत्रण करावे. गोठ्यात माश्‍या व डासांचा प्रादुर्भाव वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी.

नवीन जनावरे विकत घेतल्यानंतर त्यांना लगेच इतर जनावरांमध्ये मिसळू देऊ नये. त्यांना 15 ते 20 दिवस वेगळे ठेवून निरीक्षण करावे. त्यांच्यात कोणत्याही आजाराची लक्षणे दिसत नसल्यासच इतर जनावरांमध्ये मिसळू द्यावे. आजाराची लक्षणे दाखविणाऱ्या जनावरांवर पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावे. जनावर बरे झाल्यानंतर इतर जनावरांत मिसळू द्यावे. अशा जनावरात लसीकरण केले नसल्यास लसीकरण करून घ्यावे.

आजारी जनावरांची नोंद

जनावर आजारी पडल्यावर कोणती लक्षणे दाखवतात हे पशुपालकांनी जाणून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी गरज भासल्यास पशुवैद्यकाची मदत घ्यावी. आपले जनावर आजारी असल्याचे लक्षात आल्यास आजाराची लक्षणे टिपून/ नोंदवून ठेवावी व पशुवैद्यकास ही लक्षणे सांगावी. या लक्षणांवरून व इतर माहितीद्वारे आजाराचे निदान करता येऊ शकते. अचूक निदान करून योग्य उपचार झाल्यास जनावर लवकरात लवकर बरे होण्यास मदत होते. आपली चूक लपविण्यासाठी पशुवैद्यकास अयोग्य किंवा चुकीची माहिती सांगू नये. त्यामुळे आजाराचे योग्य निदान करण्यास अडचणी निर्माण होतात. अचूक उपचार पद्धतीचा अवलंब करता येत नाही आणि आजार बळावण्याची शक्‍यता असते.

आजारी जनावरासंबंधी पशुवैद्यकाला द्यावयाची माहिती

  1. जनावराचे वय काय आहे?
  2. जनावर किती काळापासून आजारी आहे.
  3. चारा व पाणी यात काही बदल केला होता का?
  4. जनावर नेहमीसारखे रवंथ करते का?
  5. शेण व मुत्रात काही बदल जाणवतो का?
  6. लसीकरण केले आहे की नाही?
  7. अगोदर कोणता औषधोपचार केला होता?
  8. शरीरक्रियेत कोणता बदल जाणवतो?
  9. गावात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे का?
  10. हगवणयुक्त जनावराचे शेण तपासणीसाठी द्यावे.
  11. विषबाधा झाल्यास जनावराने सेवन केलेले पदार्थ पशुवैद्यकाला दाखवावेत.

संपर्क - 9503397929
(लेखक पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 8/10/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate