অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

असा असावा दूध प्रक्रिया प्रकल्प

दुग्ध प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्‍यक इमारत ही विविध सुविधांनी सुसज्ज असावी. या प्रकल्पामध्ये पाणीपुरवठा, वीज आणि उपकरणे स्वच्छता या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.
साधारणपणे लहान स्तरावर दैनंदिन 500 लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता असणाऱ्या दुग्ध प्रक्रिया प्रकल्पाचा आराखडा लक्षात घेऊन नियोजन करावे. प्रकल्पासाठी जागेची निवड करताना पुढील बाबी विचारात घ्याव्यात.

पाणीपुरवठा

  • दूध गरम व थंड करणे तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या संपर्कात येत असल्यामुळे स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असावे.
  • प्रकल्पाची इमारत व शेजारील इतर इमारतींवर पावसाचे पाणी एकत्रित करण्याची व्यवस्था करावी.

जमीन

  • प्रकल्पाची जागा सभोवतालच्या जमिनीपासून उंचावर असावी, जमीन मुरमाची पाण्याचा सहज निचरा होणारी असावी.
  • भविष्यातील विस्तारीकरणासाठी पुरेशी जागा उपलब्ध असावी.

इतर इमारती

  • जनावरांचा वाळलेला चारा किंवा अंबोण साठवण्याची इमारत, प्रकल्पाच्या इमारतीजवळ नसावी. कारण त्या ठिकाणी वाढणारी बुरशी व धूळ यामुळे दूध व इतर कच्चा माल दूषित होतो.
  • शेणाचे ढीग/ खड्डे तसेच जनावरांचे गोठे यापासून प्रकल्पाची इमारत दूर असावी. जेणेकरून त्या ठिकाणची दुर्गंधी व माशांचा प्रादुर्भाव होणार नाही.

रस्ते

  • दुधाचे संकलन व दुग्ध पदार्थांचे वितरण सुलभ होण्यासाठी इमारत रस्त्यालगत असावी.
  • मुख्य रस्त्याशी जोडणारे उत्तम रस्ते असावेत. इमारत रस्त्यालगत असल्यास वाहनामुळे उडणारी धूळ प्रकल्पातील अस्वच्छतेस कारणीभूत ठरते म्हणून इमारतीच्या खिडक्‍या व दरवाजे मुख्य रस्त्याच्या बाजूस नसावेत.
  • फक्त प्रकाशासाठी ठेवलेल्या खिडक्‍या रस्त्याच्या बाजूला असण्यास हरकत नाही. मजुरांची उपलब्धता ः
  • प्रामाणिक व स्वस्त मजुरांची उपलब्धता परिसरात असावी.

वीज

प्रकल्पाच्या ठिकाणी 24 तास विजेची उपलब्धता असावी.
कच्च्या व पक्‍क्‍या मालाची बाजारपेठ ः 
  • दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी आवश्‍यक पदार्थ परिसरात सहज उपलब्ध असावेत.
  • दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी बाजारपेठ जवळच असावी.

सांडपाण्याची विल्हेवाट

  • प्रकल्पातील सांडपाण्याची खात्रीशीर विल्हेवाट होणे अत्यावश्‍यक असते.
  • प्रकल्पातील बहुतेक सांडपाण्यात स्वच्छतेसाठी वापरलेले पाणी व हाताळणी दरम्यान सांडणारे दूध तसेच दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश असतो.
  • प्रक्रियेची योग्य पद्धत वापरणे, हाताळणी दरम्यान होणारी सांडासांड टाळणे व तयार पदार्थ योग्य पद्धतीने साठवणे यामुळे सांडपाण्याचे प्रमाण कमी होते.
  • उपकरणे व भांडी धुण्यासाठी वापरलेले पाणी पाइपलाइनद्वारा प्रकल्पाच्या इमारतीपासून किमान 15 मीटर अंतरावर तयार केलेल्या शोषखड्ड्यात सोडावे, नदी किंवा पाण्याच्या इतर कोणत्याही सार्वजनिक स्रोतामध्ये सोडू नये.
  • प्रकल्पाच्या इमारतीमधून सांडपाण्याची विल्हेवाट तत्काळ व संपूर्णपणे करावी.

इमारतीचा प्रकार

  • दैनंदिन 500 लिटर दूध प्रक्रियेची क्षमता असणाऱ्या प्रकल्पासाठी किमान 800 चौरस फूट क्षेत्रफळ असणारी इमारत पुरेशी होते.
  • याशिवाय 200 चौरस फूट जागा कार्यालय व साठवणूक यासाठी असावी, छताची उंची 12 फूट असावी.
  • इमारतीचा पाया व जमीन, दगड व सिमेंट कॉंक्रीटची असावी.

इमारतीची जमीन

  • जमिनीसाठी सिमेंट कॉंक्रीटचा वापर करावा आणि आम्ल प्रतिबंधक फरशा जमिनीवर बसवाव्यात.
  • सांडपाण्याचा निचरा व स्वच्छता यासाठी जमिनीस एका दिशेने 1 ते 1.5 टक्के उतार असावा.
प्रकाश व वायुविजन

खिडक्‍या व दरवाजे

  • इमारतीत उत्तम वायुविजन व भरपूर सूर्यप्रकाशासाठी पुरेशा प्रमाणात खिडक्‍या बसवाव्यात.
  • कीटक व कचरा इमारतीत प्रवेश करू नये यासाठी खिडक्‍यांना जाळी बसवावी.
  • खिडक्‍यांद्वारा पावसाचे पाणी व धूळ इमारतीत येणार नाही अशी रचना करावी.
  • उपकरणे व यंत्रे इमारतीत सहज नेता यावीत यासाठी इमारतीचा मुख्य दरवाजा पुरेसा रुंद असावा.
  • वाहनातील दुधाचे कॅन सहजरीत्या काढून मुख्य दरवाजासमोर घेण्यासाठी 3 फूट उंचीचा कट्टा बांधावा.

छप्पर

पावसाचे पाणी, कचरा, धूळ यांना इमारतीत प्रतिबंध करणारे छप्पर तयार करावे. त्यासाठी शक्‍यतो सिमेंट कॉंक्रीटचा वापर करावा.

भिंती

  • विटा व सिमेंट कॉंक्रीटचा वापर करून भिंती बांधाव्यात.
  • भिंतींची स्वच्छता उत्तम करता येण्यासाठी इमारतीचे सर्व कोपरे आतील बाजूला गोल करून घ्यावेत.
  • भिंतींना जमिनीपासून किमान 3 फूट उंचीपर्यंत आम्ल प्रतिबंधक पांढऱ्या रंगाच्या फरशा बसवाव्यात.
  • उरलेल्या भिंती व छत पांढऱ्या रंगाच्या ऑइल पेंटने रंगवाव्यात.

परिसर

  • इमारतीचा परिसर कचरा, धूळ, कीटक यांपासून मुक्त असावा.
  • वृक्ष लागवड करून परिसर सुशोभित करावा.

उपकरणे, यंत्रांची इमारतीतील मांडणी करतेवेळी महत्त्वाच्या बाबी

1) स्वच्छता व सुरक्षितता. 
2) प्रत्येक उपकरण/ यंत्र वापरण्यास व स्वच्छता करण्यास पुरेशी जागा. 
3) कच्च्या मालापासून पक्का माल तयार होईपर्यंत टप्प्याटप्प्याने करावयाची प्रक्रिया. 
4) पदार्थांची साठवण व विक्री. 
5) उपपदार्थांची विल्हेवाट.

उपकरणे व यंत्रांची स्थापना

सर्व उपकरणे व यंत्रांची स्थापना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून करावी. 
वापरण्यासाठी सोयीचे व्हावे याकरिता क्रीम सेपरेटर व इतर आवश्‍यक उपकरणे योग्य उंचीच्या स्टॅंडवर घट्ट बसवून घ्यावीत. त्यांची स्थापना जमिनीस समांतर होण्यासाठी नट बोल्ट घट्ट आवळण्यापूर्वी खात्री करून घ्यावी. 
------------------ 
संपर्क ः डॉ. बी. आर. कदम ः 9762505866 
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate