Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/26 17:14:58.083376 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / पॉलिहाउसमध्ये काकडीचा प्रयोग
शेअर करा

T3 2019/06/26 17:14:58.088851 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/26 17:14:58.119358 GMT+0530

पॉलिहाउसमध्ये काकडीचा प्रयोग

नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्धती फायदेशीर वाटली नाही. त्यांनी सुधारित पद्धतीने व पॉलिहाउसमध्ये काकडी घेण्याचा निर्णय घेतला.

मुंबई बाजारपेठेत मिळतोय चांगला भाव

नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्धती फायदेशीर वाटली नाही. त्यांनी सुधारित पद्धतीने व पॉलिहाउसमध्ये काकडी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 47 गुंठ्यांवर पॉलिहाउस उभारून त्यात हिरव्या व पांढऱ्या काकडीची लागवड केली. पन्नास टन उत्पादनाचे टार्गेट ठेवून केलेल्या या काकडीची आत्तापर्यंत 20 टन विक्री झाली असून, या प्रयोगाने पठारे यांना चांगले बळ दिले आहे. नव्याने एका एकरावर शेडनेटही त्यांनी उभारले असून त्यातही काकडी व हिरव्या मिरचीची लागवड केली आहे.

नगर तालुक्‍यातील खातगाव टाकळी या दुष्काळी गावातील बलभीम पठारे यांची गावात दहा एकर जिरायती शेती. शेतीतून पुरेसे उत्पादन निघत नसल्याने नगरला औद्योगिक वसाहतीत शालेय साहित्य तयार करण्याचा तर पुण्याजवळील सनसवाडीत "क्रिकेटची बॅट' तयार करण्याचा उद्योग सुरू केला. अत्यंत कष्टातून त्यांनी उद्योजक म्हणून ओळख मिळवली; पण जीव शेतीत गुंतलेला. पठारे यांनी देहरे परिसरात पंधरा एकर शेती खरेदी केली. या भागात पाण्याचा स्रोत चांगला आहे. त्यातील सहा एकरांवर गेल्या वर्षी हरभऱ्याची लागवड केली. जेवढा खर्च आला त्या तुलनेत उत्पादन न मिळाल्याने पठारे निराश झाले.

पारंपरिक पिकांऐवजी नव्या तंत्रज्ञानाचा वापर व वेगळी पीक पद्धती वापरण्याचा निर्णय घेतला. कृषी विभागाच्या मदतीने सुरवातीला 47 गुंठ्यांवर पॉलिहाउस उभारले. त्यात हिरव्या व पांढऱ्या अशा काकडीच्या दोन वाणांची लागवड केली. दोन्ही वाण हे हॉलंडचे आहेत. पॉलिहाउसमध्ये काकडीचे उत्पादन चांगले यावे यासाठी त्याला सुसंगत असेच हे वाण आहेत.

पठारे यांचे महाविद्यालयापासून सोबत असलेले मित्र व या विषयातील सल्लागार दिलीप जाधव यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. शेती व्यवस्थापक म्हणून अमोल चोपडे जबाबदारी सांभाळतात.

काकडी लागवड व व्यवस्थापन

  • सुमारे 47 गुंठे क्षेत्रात चोवीस लाख रुपये खर्च करून उभारलेल्या पॉलिहाउस मध्ये सुरवातीला बेड तयार केले. त्या वेळी शेणखत व गव्हाच्या भुश्‍शाचा वापर केला. यंदाच्या फेब्रुवारीत 15 गुंठ्यांत पांढऱ्या रंगाच्या काकडीचे तर उर्वरित क्षेत्रात हिरव्या काकडीची लागवड केली. लागवडीचे अंतर 45 बाय 45 सेंटीमीटर ठेवले. एकूण सुमारे अकरा हजार रोपे बसवली.
  • तीन लाख रुपये खर्च करून ठिबक सिंचन केले. पाण्यासाठी पठारे यांच्या शेतात दोन विहिरी आहेत. सर्व विहिरीतील पाणी एका विहिरीत जमा करून दर दिवसाला सुमारे पंचवीस हजार लिटर पाणी ठिबकमधून दिले जाते.
  • नियोजनानुसार सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस खतांच्या मात्रा देण्याचे निश्‍चित केले. झाडांच्या वाढीसाठी सुरवातीला 19-19-19, फुले व कळ्या लागल्यापासून 0ः52ः34 आदींचा वापर केला. दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्यांचाही वापर केला. 0ः0ः50, 12ः61ः0 आदी खते वाढीच्या शेवटच्या टप्प्यात वापरली. खते ठिबकमधून दिली. संतुलितरीत्या पाणी व खते दिल्याने झाडांची एकसारखी वाढ झाली. फळांची गुणवत्ताही सुधारली.
  • कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड व स्ट्रेप्टोमायसीन या रसायनांचा वापर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून केला. काकडीवर प्रामुख्याने नागअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असल्याने ट्रायझोफॉस, क्‍लोरपायरीफॉस आदींची फवारणी केली.

मुंबई बाजारपेठेवर लक्ष केंद्रित

काकडीच्या पांढऱ्या रंगाच्या वाणाला स्थानिक बाजारात चांगला दर मिळण्यास अडचण आली. वास्तविक मुंबई येथील तीन व पंचतारांकित, चायनीज, इटालियन रेस्टॉरंटमधून या काकड्यांना चांगली मागणी असते, त्यामुळे त्याच बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले. सुरवातीला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. आता मात्र ग्राहकांकडून मागणी आल्यानंतर व्यापारीही मालाची मागणी करू लागले आहेत.

अर्थशास्त्राचे गणीत मांडले

काकडीला किलोला पंधरा रुपये दर मिळाला व प्रति झाड चार किलो माल मिळाला तरी प्रति झाड 60 रुपये मिळतात. त्यासाठी खर्च हा 35 रुपये धरला आहे. आतापर्यंत दीड महिन्याच्या कालावधीत वीस टन मालाची विक्री केली आहे. अजून तीस टन माल उत्पादनाची अपेक्षा आहे. हिरव्या काकडीला किलोला सरासरी 20 रुपये तर पांढऱ्या काकडीला 16 ते 18 रुपये दर मिळाला आहे. सध्या शेतात दररोज पाच मजूर कार्यरत आहेत. काकडीला पॉलिहाउस उभारणी, ठिबक, रोपे व आतापर्यंत एकूण 30 लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. यातील उत्पादन खर्च वगळता बाकी खर्च हा दीर्घकाळ गुंतवणुकीचा आहे.

स्वखर्चाने उभारला बंधारा

पठारे यांनी नाट्यक्षेत्रात कलावंत म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांनी स्थापन केलेल्या अक्षर विचार प्रतिष्ठानच्या माध्यमातून दर वर्षी नगरला राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा घेतल्या जातात. "निळकंठ मास्तर' नावाच्या मराठी चित्रपटाचीही त्यांनी निर्मिती केली आहे. अक्षर विचार प्रतिष्ठानची सामाजिक जबाबदारी म्हणून खतगाव टाकळी या दुष्काळी भागात पंधरा लाख रुपये खर्चून त्यांनी "शिरपूर पॅटर्न'च्या धर्तीवर वीस फूट खोली, शंभर फूट रुंदी व दीड हजार फूट लांबीचा बंधारा बांधला आहे. त्याचा खातगाव टाकळीसह जखणगाव परिसराला फायदा होणार आहे.

पठारे यांचे आगामी नियोजन

दहा एकर शेती पॉलिहाउस व शेडनेटखाली तर पाच एकरांत डाळिंबासह अन्य फळपिकांची लागवड करण्याचे नियोजन आहे. दोन कोटी लिटर क्षमतेची दोन शेततळी उभारण्याचे काम सुरू आहे. देहरे परिसरासह तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मार्केटिंग व विक्री सुलभ व्हावी यासाठी भाजीपाला व फळे विक्री केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. शेळीपालन, शेततळ्यातील मत्स्य व्यवसायाबरोबर शेतीलाही शुद्ध पाण्याची गरज असल्याने पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवण्याचा मानस आहे.

सुधारित पद्धतीने व नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शेती केली, तर चांगले उत्पादन निघू शकते, हे मला काकडीने दाखवून दिले आहे. नगर परिसरासह जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी सुधारित पद्धतीने शेती करून दर्जेदार उत्पादन घेतले तरी त्यांना मार्केटिंग करण्याची सोय नाही, त्यामुळे पुणे, मुंबई व अन्य ठिकाणी माल विक्रीसाठी न्यावा लागतो. शेतीमालाच्या मार्केटिंगसाठी नगरलाच सुविधा उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांचा त्रास कमी होईल. 

बलभीम पठारे 
संपर्क - बलभीम पठारे - 8378918001 
अमोल चोपडे (शेती व्यवस्थापक) -9762029007

लेखक : सूर्यकांत नेटके

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 

3.11688311688
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/26 17:14:58.855256 GMT+0530

T24 2019/06/26 17:14:58.862306 GMT+0530
Back to top

T12019/06/26 17:14:57.919509 GMT+0530

T612019/06/26 17:14:57.938573 GMT+0530

T622019/06/26 17:14:58.072761 GMT+0530

T632019/06/26 17:14:58.073718 GMT+0530