অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आदर्श सांगणारी शेती

सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतराव निवृत्ती पाटील यांचे वय 84 वर्षे आहे. मात्र त्यांचा शेतीतील उत्साह तरुणांना लाजवणारा असाच आहे. आजही या वयात ते दिवसभर शेतीत राबतात. कामात बदल हीच विश्रांती, असे त्यांचे तत्त्वज्ञान आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी संलग्न राहून सातत्यपूर्ण कष्ट व दर्जेदार शेतमालाचे उत्पादन अशी त्यांनी अंगीकारलेली पद्धती आजच्या पिढीसाठी आदर्श आहे.
पुणे ते बंगळूर महामार्गावरून कोल्हापूरकडे जाताना मार्गालगतच कासेगाव लागते. डोंगरउताराची माळरान व काहीशी काळी कसदार असे गावच्या एकूण शेतीचे स्वरूप. गावातील संपतराव निवृत्ती पाटील यांचे वय वर्षे 84 आहे. त्यांचे शिक्षण त्या काळातील सातवीपर्यंत झाले आहे. उतारवय असूनही ते शेतीत धडपड करतात. सकाळी लवकरच सायकलीवरून त्यांची पावले शेतीकडे वळतात ती सायंकाळीच घरी परततात. त्यांना गावच्या पश्‍चिमेस वडिलोपार्जित पाच एकर व विकत घेतलेली दोन एकर शेती आहे. माळरान स्वरूपाचे त्यांचे सर्व क्षेत्र विहीर बागायत आहे.

आजमितीला सध्या चार एकर आडसाली ऊस, दोन एकर लावणीतील केळी, 10 गुंठे खोडव्यातील केळीचे पीक आहे. शेतीचा व्याप तेच सांभाळतात. त्यांची दोन मुले निमशासकीय सेवेत आहेत. ते दोघेही नोकरीतून रिकाम्या मिळणाऱ्या वेळेत वडिलांना शेतीत मदत करतात.

मशागत, लागवड, खत व्यवस्थापन, पीककाढणी, तसेच विक्रीपर्यंतची जबाबदारी संपतराव मोठ्या हिमतीने सांभाळतात. आधुनिक तंत्रज्ञानाची सांगडही त्यांनी अभ्यासातून जुळवली आहे.
त्यांच्या शेतीची पार्श्‍वभूमी सांगायची, तर ती काही वर्षांपूर्वी जिरायती स्वरूपाची होती. ज्वारी, हरभरा, बटाटा व गहू ही हंगामी पीकपद्धत त्यांच्याकडे होती. जमिनीची सुप्त ताकद फार मोठी आहे. ती जागृत करण्यासाठी कष्ट करण्याची गरज आहे. हा मूलमंत्र घेऊन पिकांचे अधिकाधिक उत्पादन घेण्यावर त्यांचा भर असतो.

शेतीतील पूर्वापार पद्धती त्यांना योग्य वाटतात. कमी खर्चातील किफायतशीर शेती हे तंत्र घेऊन ते शेतीत कार्यरत आहेत. स्वतःच्या विहिरीतील पाणी उपलब्ध झाल्यानंतर हमीदायी उत्पन्नासाठी ते उसाचे पीक घेऊ लागले. साधारण सात वर्षांपूर्वी गावातील प्रगतिशील केळीउत्पादक शेतकरी शिवाजीराव माधवराव पाटील यांच्या सल्ल्याने ते उसाबरोबर केळी पिकाकडे वळले.

पाटील यांच्या शेतीची ठळक वैशिष्ट्ये

स्वतःच्या गोठ्यातील जनावरांचे शेणखत तसेच गरजेएवढे विकत घेऊनही त्याचा वापर

  • केळीच्या खोडवा पिकाचे लक्षपूर्वक नियोजन
  • लागवडीसाठी सशक्त रोपांची निवड. काटेकोर व्यवस्थापन.
  • लागवडीपूर्वी हिरवळीचे खत म्हणून तागाचे पीक घेतात. ते फुलोऱ्यावर आल्यानंतर सरीमध्ये गाडतात.
  • शेतीतील उत्पादनखर्च कमी करण्यावर भर.
  • शाश्‍वत उत्पादन मिळविण्याच्या उद्देशाने सेंद्रिय पद्धतीच्या शेतीकडे कल

ऊस व केळी पिकातील उत्पन्नातून विहिरीवर अडीच किलोमीटर पाइपलाइन करून सर्व क्षेत्र सिंचनाखाली आणले आहे. मे 2013 मध्ये एक एकर क्षेत्रात जी-9 जातीच्या केळीची लागवड केली आहे. सहा एकर क्षेत्रात ठिबक सिंचनाचा अवलंब केला आहे. लागवडीपूर्वी नांगरटीनंतर एकरी सात ट्रेलर चांगले कुजलेले शेणखत देतात. रोपलागवडीनंतर रोपाभोवती भरणी वेळी तीन रोपांस 15 किलो याप्रमाणे शेणखत देतात. एक महिन्यानंतर आठवड्यातून एक वेळ याप्रमाणे विद्राव्य खतांचा वापर करतात. जनावरांच्या मलमूत्राचा केळी बागेत वापर करतात.

पाटील यांच्याकडून शिकण्यासारखे

  • रोपलागवड, तणनियंत्रण, स्वच्छता व निगा, मालकाढणी या महत्त्वपूर्ण बाबी ते स्वतः सांभाळतात.
  • बाजारपेठेतील शेतमालाचा चढ-उतार जाणून घेऊन विक्रीचे व्यवस्थापन
  • दर चांगला मिळावा व वाहतूकखर्च पेलता यावा यासाठी शेतमालाची जवळच्या कराड बाजारपेठेत विक्री. जो अधिक दर देईल, त्या व्यापाऱ्याकडे मालाची विक्री
  • तणव्यवस्थापन व मालाची काढणी सोपी व्हावी याकरिता स्वकल्पनेतून छोटी अवजारेही विकसित केली आहेत. तणनियंत्रणासाठी हातकोळप्याचा वापर करतात. 6 इंच, 9 इंच व 18 इंच फाशाच्या सायकल कोळप्याच्या साह्याने ते तणनियंत्रण करतात. विशिष्ट खुरप्याच्या साह्याने केळीच्या घडाची काढणी करतात. त्यामुळे मजूर खर्चावर नियंत्रण आणण्यात ते यशस्वी झाले आहेत.

रोपाची लहान अवस्था, घड बाहेर येताना व अखेरचा कालावधी यानुसार पाण्याचे नियोजन करतात.
एक एकरातील क्षेत्रात प्रतिघड सरासरी 22 ते 25 किलोपर्यंत वजन त्यांना मिळाले आहे. मशागत, शेणखत, रोपे, ठिबक संच, रासायनिक खते या कामी एकरी 98 हजार रुपये खर्च आला आहे. मालाची कराड बाजारपेठेत विक्री केली. यंदा केळीचे दर स्थिर असल्यामुळे दरात फारसा चढ-उतार राहिलेला नाही. आतापर्यंतच्या उत्पन्नातून एक लाखाचा निव्वळ नफा हाती आला आहे. अजून काही उत्पादन व उत्पन्न येणे बाकी आहे.

केळीमध्ये घेतलेल्या हरभरा पिकाचे तीन क्विंटल उत्पादन मिळाले आहे. हरभऱ्यामुळे केळी पोषणासाठी मोठी मदत झाली आहे. गेल्या वर्षी दोन एकर क्षेत्रामध्ये त्यांनी केळीपासून सुमारे 10 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. उसाचे ते प्रति गुंठ्यास दोन टन याप्रमाणे उत्पादन घेतात. उसात सोयाबीनचे आंतरपीक घेतात. त्यांच्याकडे दोन गायी, दोन म्हशी व एक रेडकू आहे. उत्पादित दुधाची विक्री न करता, त्याचा घरगुती वापर केला जातो.


संपतराव पाटील-9975918925.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate