Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/26 15:53:11.204144 GMT+0530
शेअर करा

T3 2019/06/26 15:53:11.209838 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/26 15:53:11.240832 GMT+0530

कारल्याची गटशेती

सातारा जिल्ह्यात ऊस पट्ट्यातील मालगावमधील काही शेतकरी भाजीपाला पिकांच्या गटशेतीकडे वळले आहेत.

सातारा जिल्हा विविध पिकांसाठी तसेच पूरक व्यवसायासाठीही प्रसिद्ध आहे. आले-हळदीच्या या पट्ट्यात ऊस हेदेखील मुख्य पीक असते. सातारा-फलटण रस्त्यावरील सातारा शहरापासून 18 किलोमीटरवर मालगाव आहे. गावास मुबलक पाणी असल्यामुळे उसाचे क्षेत्रही अधिक आहे. उसाला दरही बऱ्यापैकी मिळतो. साहजिकच भाजीपाल्यासारखी पिके घेण्यावर इथल्या शेतकऱ्यांचा फारसा भर नसायचा. आता मात्र बदलत्या काळानुसार इथला शेतकरी कारले, काकडी यांसारख्या पिकांकडे वळून शेतीत बदल करू लागला आहे.

कार्यशाळेतून मानसिकता बदलली

विक्रम कदम आणि राजकुमार इथाते हे गावातले धडपडे शेतकरी. आयडीबीआय बॅंकेतर्फे सातारा येथे भरवलेल्या 13 दिवसांच्या सम्रग शेती कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली. यात गटशेतीचे महत्त्व, ती कशी केली जाते, पूरक व्यवसाय याबाबत जागृती करण्यात आली. सर्व काही आपल्यापाशीच आहे, मग ते वाढवू का नये, असा विचार कदम यांच्या डोक्‍यात आला. कधीकाळी म्हणजे 1987 च्या सुमारास मंडळ स्थापन करून त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो तितकासा यशस्वी झाला नव्हता. आता मात्र गटशेती करायचीच असे त्यांनी ठरवले. गावातील समविचारी शेतकरी एकत्र आले. त्यातून सुमारे 15 शेतकरी सदस्य असलेला भैरवनाथ शेतकरी बचत गट स्थापना झाला. कृषी साहायक अजय कांबळे यांच्या मदतीने कृषी विभागांतर्गत "आत्मा'अंतर्गत गटाची नोंदणी करण्यात आली.

कारले पिकातून निर्यातीचे स्वप्न

गटशेतीत एकच पीक घेण्याचे ठरवले. बाजारपेठा, पिकांचा अभ्यास तसेच प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतीस भेटी देण्यात दिल्या. प्रथम भोपळ्याचा विचार पुढे आला. मात्र त्यात बदल करून निर्यातीसाठी महत्त्व असलेल्या कारले पिकाची निवड करण्यात आली. व्यापाऱ्यांशी बोलून दरही निश्‍चित करण्यात आला. सुरवातीस सर्व क्षेत्राचे माती परीक्षण करण्यात आले. मार्चच्या पहिल्या आठवड्यात गटशेतीतील सदस्यांनी दोन-तीन दिवसांच्या फरकाने मात्र एकाच कालावधीत कारली लावण केली. गादीवाफे, पॉलिमल्चिंग पेपर व ठिबक सिंचन या तीन गोष्टींचा वापर सर्वांनी केला. एकरी सुमारे 2800 ते तीन हजार रोपांची लागवड झाली. गटातील प्रत्येकाचे सरासरी क्षेत्र एक ते पाऊण एकर क्षेत्र होते.

सामूहिक खरेदीतून खर्च वाचवला

कारले पिकासाठी लागणारी रोपे एकत्र खरेदी केल्याने चार रुपये दहा पैसे किमतीचे प्रति रोप तीन रुपयांत उपलब्ध झाले. तार, काठी, खते, कीडनाशकेही एकत्र खरेदी केली. मांडवासाठी एकरी 19 हजार रुपये खर्च सांगण्यात आला होता. प्रत्येकाने दुसऱ्याला मदत करून त्यातून दहा हजार रुपये वाचवले. मल्चिंग पेपरसाठी प्रति बंडल 2150 रुपये दर 1800 रुपयांप्रमाणे मिळाला. भांडवली खर्चात अशा रीतीने बचत झाली.

अर्थशास्त्र ठरले फायदेशीर

भैरवनाथ गटाचे एक एकर क्षेत्राचे प्रातनिधिक अर्थशास्त्र सांगायचे, तर एकूण उत्पादन खर्च एक लाख 20 हजार रुपये आला. सुमारे 16 तोडे झाले. एकरी सरासरी आठ ते दहा टनांपर्यंत उत्पादन मिळाले. वाशी व पुणे मार्केटला कारल्याची विक्री केली. प्रति किलोस किमान 18 रु. सरासरी 30 ते 32 रुपये, तर कमाल 40 ते 42 रुपये दर मिळाला. खर्च वजा जाता सुमारे साडेचार महिन्यांमध्ये सुमारे सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, असा विश्‍वास "भैरवनाथ'च्या सदस्यांना येऊ लागला आहे. सदस्यांनी आता पुढील पीक म्हणून पॉलिमल्चिंगवर काकडीची निवड केली आहे. त्याची तयारीही झाली आहे. 
गटाला कृषी विभागाचे तांत्रिक मार्गदर्शन मिळाले आहे.

शेतकऱ्यांची झाली सरशी

सुरवातीला कारले व्यापाऱ्यांना निर्यातीच्या दृष्टीने द्यायचे ठरले होते. मात्र मध्यंतरी कारले निर्यातीवर बंदी आल्यानंतर ते नियोजन फसले. त्यानंतर शेतकऱ्यांनी वाशी व पुणे मार्केट शोधले. गटशेतीमुळे काढणीवेळी सर्व शेतकऱ्यांचा मिळून सुमारे दीड ते पावणेदोन टन माल एकावेळी उपलब्ध व्हायचा. मालाचा दर्जा उत्कृष्ट होता.

साहजिकच व्यापारी तिकडे आकृष्ट झाले. मात्र बाहेर किलोला 34 रुपये दर असेल, तर व्यापाऱ्यांकडून तो 35 रुपये मिळविण्यात भैरवनाथचे शेतकरी यशस्वी झाले. मालाची प्रतवारी, वजन शेतावरच केले जाते. मॉलमध्ये माल पाठविण्याचीही तयारी केली जात आहे.

"ऍग्रोवन' ठरला मार्गदर्शक


गटातील बहुतांशी सदस्य "ऍग्रोवन'चे वाचक आहेत. या वर्तमानपत्राची कधी रद्दी होत नाही. आमच्यासाठी तो संगणकच असल्याची प्रतिक्रिया गटाचे अध्यक्ष विक्रम कदम यांनी दिली.

गटशेती सदस्यांच्या प्रतिक्रिया

गटशेतीत माझे कारल्याचे 30 गुंठे क्षेत्र आहे. त्यामुळे बाजारपेठेत माल पाठवणे सोपे झाले आहे. खर्च वजा जाता मला 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 
प्रल्हाद कदम 
गटातील सर्व सदस्यांकडून मालाची प्रतवारी केल्याने व्यापाऱ्यांकडून चांगला दर मिळत आहे. 
सचिन दरेकर 
आम्ही एकत्र चर्चा करून शेतीचे नियोजन करतो. मध्यंतरी उन्हाळ्यात रोपे मरतुकीची समस्याही जाणवली. गारपिटीत मांडव कोसळले. मात्र सर्वांची शक्ती एकवटल्यामुळे पुढे जाणे शक्‍य झाले आहे. 
विक्रम कदम, अध्यक्ष, भैरवनाथ शेतकरी बचत गट.

भैरवनाथ शेतकरी गटाची वैशिष्ट्ये


1) पाण्याची बचत व उत्पादन वाढीसाठी ठिबक सिंचन, पॉलिमल्चिंग पेपरचा वापर 
2) सेंद्रिय पद्धतीचा वापर करण्याकडे कल 
3) कीड नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर 
4) एकच पीक-एकच वाण पद्धतीचा वापर 
5) दुग्ध व्यवसायात मुक्त गोठा पद्धतीचा वापरही काही सदस्य करतात. 

संपर्क - विक्रम कदम, 9766550591 
अध्यक्ष, भैरवनाथ शेतकरी बचत गट 
प्रल्हाद कदम, 9225470841 
राजकुमार इधाते, 9604501177

स्त्रोत: अग्रोवन

3.0
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/26 15:53:11.895541 GMT+0530

T24 2019/06/26 15:53:11.902140 GMT+0530
Back to top

T12019/06/26 15:53:11.034297 GMT+0530

T612019/06/26 15:53:11.053666 GMT+0530

T622019/06/26 15:53:11.192753 GMT+0530

T632019/06/26 15:53:11.193753 GMT+0530