Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 19:29:39.358206 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / जलस्‍वयंपूर्ण उक्‍कडगाव : जलयुक्‍त शिवार अभियानाचे यश
शेअर करा

T3 2019/10/17 19:29:39.366624 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 19:29:39.451685 GMT+0530

जलस्‍वयंपूर्ण उक्‍कडगाव : जलयुक्‍त शिवार अभियानाचे यश

जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या माध्‍यमातून टँकरवर अवलंबून असलेल्‍या उक्‍कडगावात केलेला जलसंवर्धनाचा प्रयत्न उक्‍कडगावला जलस्वयंपूर्ण करण्यात मोलाचा ठरला आहे.

लोकसहभाग व शासकीय यंत्रणांचा सहभाग ठरला महत्‍वाचा

जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या माध्‍यमातून टँकरवर अवलंबून असलेल्‍या उक्‍कडगावात केलेला जलसंवर्धनाचा प्रयत्न उक्‍कडगावला जलस्वयंपूर्ण करण्यात मोलाचा ठरला आहे. गावशिवारातील विहिरींची पाणीपातळी वाढली असून, यामुळे आता अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. गावांत झालेल्‍या कामांमुळे 369 हजार घनमीटर पाणी अडवण्यात आले आहे.

कोपरगाव तालुका मुख्यालयापासून वीस किलोमीटर अंतरावर दोन हजार लोकसंख्‍येचे उक्‍कडगाव गाव आहे. गावातील कौटुंबिक अर्थव्‍यवस्‍था शेतीवर आधारलेली आहे. पावसाच्‍या पाण्‍याव्‍यतिरिक्‍त पाण्‍याचा कुठलाही स्‍त्रोत नसल्‍यामुळे उक्‍कडगाव बारमाही जिरायती गाव म्‍हणुन ओळखले जाते. गावात पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई असायची, पावसाच्‍या पाण्‍यावर अवलंबून असलेली पिके घेतली जात होती, ही सर्व परिस्थिती बदलण्‍यासाठी जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या माध्‍यमातून कामांची सुरूवात झाली. पाण्‍यासाठी गाव एकवटले. लोकसहभाग, शासकीय यंत्रणांचा सहभाग यातून जिरायती उक्‍कडगावची बागायती उक्‍कडगाव अशी नवी ओळख निर्माण झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्‍या मार्गदर्शनाने कामाला प्रारंभ झाला. जिल्‍हाधिकारी अनिल कवडे, उपविभागीय अधिकारी कुंदन सोनवणे, जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी भाउसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब खटकाळे, मंडळ कृषी अधिकारी मनोज सोनवणे, कृषी पर्यवेक्षक ए.के. आरणे, कृषी सहायक राजेश तुंभारे, ग्रामसेवक मधुकर पगारे यांचे मार्गदर्शन महत्‍वाचे ठरले. जेष्‍ठ सामाजिक कार्येकर्ते बबनराव निकम, सरपंच हेमंत निकम, उपसरपंच सौ. शकुंतला ञिभूवन, यांनी अत्‍यंत बारकाईने ही कामे पुर्ण केली. शासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एक‍ञितपणे कामाचे नियोजन करून कामे पुर्ण केली.

अशी झाली कामाला सुरूवात

कोपरगाव तालुक्‍यात जलसंवर्धनासाठी शासनाच्‍या जलसंधारण विभागाच्‍या माध्‍यमातून जलयुक्‍त शिवार योजना राबविण्यासाठी कोपरगाव कृषी, जलसंधारण विभाग व ग्रामस्‍थांनी पुढाकार घेतला. जानेवारी 2015 मध्‍ये थेट शिवारात कामाला सुरवात झाली. प्रथम गावाचा भौगोलिक अभ्यास झाला. लोकसहभाग वाढावा यासाठी सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्‍थ यांचा सहभाग घेत कामाची आखणी करण्‍यात आली. कृषी विभागातील तज्ज्ञांनी जलसाक्षरतेचे धडे दिले. यासाठी गावात चित्ररथ व भजनाच्‍या माध्‍यमातून जागृती करण्‍यात आली. लोकसहभाग वाढू लागला. गावात जुन्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीपासून थेट नव्याने नाला खोलीकरणाची कामे करण्‍यात आली. जलयुक्‍त शिवार अभियानाला गती मिळाली आणि त्यातून पहिल्याच प्रयत्‍नात गाव जलसंपन्न झाले.

शिवार फेरी आणि ग्रामसभेतून नियोजन

जलयुक्‍त शिवार अभियान- 2014-15 सर्वांसाठी पाणी- टंचाई मुक्‍त महाराष्‍ट्र- 2019 अंतर्गत अभियानाची सुरूवात झाली. गावशिवारात झालेल्‍या फेरीत सरपंच, विविध संस्‍थाचे प्रतिनिधी, कृषी मंडळे, ग्रामस्‍थ यांचा सहभाग महत्‍वाचा ठरला. ग्रामसभा घेत पाणलोट विकासाचे कामे, नाला खोलीकरण व रुंदीकरण याप्रमाणे नव्‍याने सुचविलेली कामे, जुन्‍या कामांची दुरुस्‍ती, गाळ काढणे, विहिर पुनर्भरण, फळबाग लागवड, ठिंबक व तुषार सिंचन यांचा वापर करुन पाण्‍याचा कार्यक्षम वापर, पिण्‍याच्‍या पाण्‍याचे साठयांचे बळकटीकरण करण्‍यासोबतच कामांची दुरुस्‍ती, गाळ काढणे, नाला खोलीकरण या बाबींवर भर देण्‍याबाबत एकमत झाले. शिवार फेरी आणि ग्रामसभेतून झालेले नियोजन महत्‍वाचे ठरले.

उक्‍कडगावचा पाणी ताळेबंद

पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस, पावसाचे निव्‍वळ वाहून जाणारे पाणी, पाणलोटातील एकुण पाण्‍याची उपलब्‍धता, गावासाठी नेमकी पाण्‍याची गरज, वाहुन जाणारे पाणी त्‍यापैकी किती पाणी अडविले आहे व अजून किती पाणी अडवू शकतो, सुचविलेल्‍या कामांपैकी प्राधान्‍याने कोणती कामे घेता येतील या सर्व बाबींचा विचार करुन वेगवेगळ्या यंत्रणाचा सहभाग घेऊन पाण्‍याचा ताळेबंद तयार करुन गावचा आराखडा तयार करण्‍यात आला, ग्रामसभेत यासंदर्भात चर्चा झाली आणि कृतीची जोड देण्‍यात आली. 2071.01 टीसीएम एवढी गावासाठी लागणाऱ्या पाण्‍याची गरज नोंदविण्‍यात आली. यानुसार नियोजन करण्‍यात आले.

पाणीदार गावाचा आनंद

गावे निवडताना पाणीटंचाई असलेली तसेच टँकर सुरू असलेल्‍या व पन्‍नास टक्‍केच्‍यावर पाणलोटाची कामे न झालेल्‍या गावात जलयुक्‍त शिवार अभियान राबविण्‍याचा आराखडा समोर ठेवून कृषी विभागाने गावात थेट कामाला सुरूवात केली. निवडलेल्‍या उक्‍कडगावात सरासरी 450 मिलीमीटरपर्यंतच पाऊस पडतो. पडलेल्‍या पावसाचे पाणी अडविण्‍यासाठी कोणतीच व्‍यवस्‍था नसल्‍याने पाणी वाहून जात असल्‍याने गावात पुन्‍हा पाणीटंचाई निर्माण होत असे. जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या कामानंतर शेतीतील पिकपद्धती बदलू लागली. शेतकरी भाजीपाला शेती करू लागले. पाणी दिसू लागल्‍यामुळे आज शेतकरी, ग्रामस्‍थ आणि महिलांच्‍या चेहऱ्यावर आनंद स्‍पष्‍टपणे दिसत आहे.

एक हजार एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभ

उक्‍कडगावांत साकारलेल्या कामांमुळे सुमारे एक हजार एकर शेती नव्‍याने सिंचनाखाली येईल, असा अंदाजही पहिल्या टप्प्यात कृषी विभागाकडून बांधण्यात आला आहे. या क्षेत्रात हरभरा, कापूस, रब्‍बी कांदा, मका व चारा पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

प्रतिक्रिया

माझी शेती कोरडवाहू होती. गावात जलयुक्‍त शिवारचे काम झाले. माझ्‍या विहिरीला पाणी वाढले. विहिरीतून शेततळ्यात पाण्‍याची साठवण केली आहे. कपाशीचे चांगले उत्‍पादन तर मिळणार आहे, शेततळ्यातील पाण्‍यामुळे कांदा लागवड करणे शक्‍य झाले आहे.
- मदन बबन निकम, शेतकरी

जलयुक्‍त शिवार योजनेमुळे पाणीसाठवण क्षमतेत वाढ झाली. शेततळ्यामुळे शेतीउत्‍पादनात वाढ होणार आहे. जलयुक्‍तसोबतच कोरडवाहू शेती अभियानाचाही चांगला लाभ झाला आहे.
- बबन नामदेव निकम, सामाजिक कार्येकर्ते

जलयुक्‍त शिवार योजनेमुळे गावशिवारात पाणी जिरल्‍यामुळे विहीरींच्‍या पाणीपातळीत वाढ झाली आहे. शासनाने यासाठी विशेष पुढाकार व ग्रामस्‍थांचा सहभाग यामुळे गावचा पाणीप्रश्‍न सुटण्‍यास मदत झाली आहे.
- हेमंत बाबासाहेब निकम, सरपंच

अशी झाली ठळक कामे

 • कोरडवाहू शेती अभियानाच्‍या माध्‍यमातून 34 शेततळे, महात्‍मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 4 शेततळे, मागेल त्‍याला शेततळे योजने अंतर्गत 6 शेततळे असे एकूण 44 शेततळे पुर्ण करण्‍यात आले, यातून 66.32 टीसीएम एवढा पाणीसाठा निर्माण झाला.
 • महात्‍मा फुले जलभूमी संधारण अभियानातुन 5 व लोकसहभागातुन 2 अशी नाला खोलीकरण व रूंदीकरणाची एकूण 7 कामे झाली, यातून 32.88 टीसीएम एवढा पाणीसाठा निर्माण झाला.
 • महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीच्‍या माध्‍यमातून 22 विहिरींचे पुनर्भरण करण्‍यात आले. त्‍यामुळे पाणीपातळीत वाढ झाली.
 • 2014-15 व 2015-16 या वर्षात एकूण 25.55 हेक्‍टर क्षेञावर ठिबक व तुषार संच बसविण्‍यात आले असून यामुळे पाण्‍याची बचत झाली.
 • संरक्षित शेती व फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढले असून गावातील पीक पद्धतीत बदल झाला.
 • उक्‍कडगाव येथे ग्रामपंचायतीच्‍या माध्‍यमातून पाझरतलावातून सुमारे 14,000 घनमीटर गाळ उपसण्‍यात आला. यातून सुमारे 14 टीसीएम एवढी पाणीसाठवण क्षमता निर्माण होण्‍यास मदत झाली.
 • लोकसहभागातुन दोन नाल्‍यांचे खोलीकरण करण्‍यात आले, यातुन सुमारे 24 टीसीएम एवढी पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली आहे.
 • उक्‍कडगाव येथे लोकसहभागातून 2014-15 व 2015-16 या कालावधीत सुमारे 20 वनराई बंधारे बांधण्‍यात आले असून 100 झाडांची लागवड करण्‍यात आली.
 • गावातील जुन्‍या कामाची दुरूस्‍ती व नवीन कामांमुळे 368.28 टीसीएम एवढा पाणीसाठा निर्माण झाला आहे.

असा झाला फायदा

 • "जलयुक्‍त शिवार अभियाना'च्या कामानंतर गावातील शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळली आहेत. शेततळ्यांचाही भाजीपाला शेतीसाठी चांगला आधार झाला आहे.
 • पूर्वी गावातील विहिरींना अत्यंत कमी पाणी होते. जलयुक्त शिवार अभियानातून काम पूर्ण झाले आणि पहिल्याच पावसात विहिरींना पाणी वाढले. त्‍यामुळे खरीप व रब्बी दोन्ही पिके घेता येणे शक्‍य झाले.
 • गावात पुर्वी टँकरने पाणीपुरवठा केला जात होता, आज माञ टँकरची गरज भासणार नाही.
 • शेतीला पाणी मिळू लागल्‍यामुळे उत्‍पादनात वाढ झाली. खरिपासोबतच रब्‍बी हंगाम घेतल्‍यामुळे उत्‍पन्‍न वाढले, पर्यांयाने अर्थव्‍यवस्‍था सुधारली.


लेखक - गणेश फुंदे,
प्र. माहिती अधिकारी, उप माहिती कार्यालय, शिर्डी

स्त्रोत - महान्युज

3.15217391304
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 19:29:40.342884 GMT+0530

T24 2019/10/17 19:29:40.349984 GMT+0530
Back to top

T12019/10/17 19:29:39.020588 GMT+0530

T612019/10/17 19:29:39.117193 GMT+0530

T622019/10/17 19:29:39.313444 GMT+0530

T632019/10/17 19:29:39.314548 GMT+0530