Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 05:26:17.172472 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/17 05:26:17.178053 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 05:26:17.208485 GMT+0530

माळरानावर सोने

सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांचे नुकतेच निधन झाले.

सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांचे नुकतेच निधन झाले. वनराईचे संस्थापक स्व. डॉ. मोहन धारिया आणि स्व. अप्पासाहेबांमध्ये अतिशय प्रेमाचे व मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांचे चिरंजीव श्री. गणपतराव पाटील ‘वनराई’चे विश्‍वस्त आहेत. एक आदर्श नेता कसा असावा, हे अप्पासाहेबांनी दाखवून दिले आहेच; परंतु एक आदर्श पिता कसा असावा, हे देखील त्यांनी श्री. गणपतरावांच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. एकशे तीन एकराच्या माळरानावर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे परदेशी भाज्या व फुलांचे विक्रमी उत्पादन घेणार्‍या श्री. गणपतरावांना ‘भारतीय हरितगृह शेतीचे बादशाह’ म्हणून आज ओळखले जाते. अशा कर्तृत्ववान पिता-पुत्रावर ‘तेथे कर माझे जुळती’ या पुस्तकामध्ये स्व. डॉ. मोहन धारियांनी लेख लिहिला होता. या लेखाचा संपादित भाग प्रसिद्ध करून अप्पासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत आहोत...

शिरोळ (जि. कोल्हापूर) येथील अप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील आणि गणपतराव पाटील या उभयंतांचे नाव सहकार व फुलशेतीच्या क्षेत्रामध्ये सर्वत्र पसरले आहे. जबरदस्त महत्वाकांक्षा, उमेद, अथक परिश्रम घेण्याची तयारी आणि स्वप्नपूर्तीसाठी पडेल तो संघर्ष करण्यास तयार असणारे अप्पासाहेब व गणपतराव पाटील या उभयंतांनी एक नवा आदर्श सर्वांच्यासमोर ठेवला आहे.

१९४७-४८ मध्ये खासगी मोटार वाहतूक व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्याच्या मागणीसाठी ज्या चळवळीचे मी नेतृत्व केले, त्याचे प्रेरणास्थान कोल्हापूर परिसरातील मोटार-कामगार संघटना होती. साहजिकच त्या काळापासून कोल्हापूर परिसराशी माझा जवळचा संबंध आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून कार्यरत असताना सन १९६२ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणूका झाल्या. तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र प्रचार करण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाने माझ्यावर सोपविली होती. साहजिकच त्याकाळात संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करण्याची संधी मला मिळाली. दरम्यानच्या काळातच सेवा दलाचे सैनिक आणि समाजवादी पक्षाचे त्या भागातील नेते अप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांची ओळख झाली आणि ती सातत्याने वाढत गेली.

फारसे शिक्षण नसतानाही काँग्रेस पक्ष संघटनेबरोबरच सहकार क्षेत्रात व विधायक कामात अप्पासाहेबांनी लक्ष देण्यास सुरुवात केली. सहकार क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती म्हणून अप्पासाहेबांकडे सर्वजण पहात असतात. देशातील अत्यंत सुंदर परिसर असलेला आणि कार्यक्षम सहकारी साखर कारखाना म्हणून देशामध्ये ज्या ‘श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्या’चे नाव घेतले जाते, त्याच्या उभारणीपासूनच अप्पासाहेबांचा या कारखान्याशी संबंध आहे. अप्पासाहेब गेल्या कित्येक वर्षांपासून या कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. या कारखान्याचे ते मुख्य आधारस्तंभ आहेत. साखर कारखान्याबरोबरच त्यांनी सहकारी तत्त्वावरील असंख्य जलसिंचन योजना सुरू केल्या. उसाचे विक्रमी उत्पादन घेऊन कित्येक शेतकर्‍यांचे जीवन आनंदमय केले. साखर कारखान्याला धरूनच मद्यार्क निर्मिती, सहकारी ग्राहक भांडार, पतसंस्था, सामाजिक संस्था, कामगारांसाठी अद्ययावत व्यायामशाळा आदी कित्येक संस्था त्यांनी उभ्या केल्या. तेलबियांवर प्रक्रिया करण्याचा एक फार मोठा उद्योग सहकार क्षेत्रात त्यांनी सुरू केला होता; परंतु बँकांच्या व शासनाच्या धोरणामुळे तेलबियांवरील प्रक्रिया उद्योगामध्ये त्यांना फारशी प्रगती करता आली नाही. हा अपवाद वगळता कित्येक क्षेत्रांत त्यांनी आदर्श स्वरूपाचे काम केले असून, ‘श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना’ आणि कारखान्याचा सुंदर परिसर सर्वांचेच आकर्षण ठरला आहे.

‘श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्या’च्या प्रवेशद्वारापासून दोन्ही बाजूला नारळाच्या रांगा आहेत. या रांगांमधून कारखान्याच्या आवारात फिरत असताना आपण परदेशातील कुठल्यातरी पर्यटन स्थळाला भेट देत आहोत, असे वाटू लागते. देखणी प्रशासकीय इमारत, त्याबाहेरील छानशी हिरवळ, गुलाबाच्या फुलांचे ताटवे आणि प्रसन्न वातावरण कोणालाही भारावून टाकते. इतका स्वच्छ व सुरेख परिसर असलेला साखर कारखाना भारतातच काय पण परदेशातदेखील मी पाहिलेला नाही. अप्पासाहेब आपला व्यवसाय सांभाळत साधना ट्रस्ट, राष्ट्र सेवा दल, वनराई यांसह विविध शिक्षण संस्था आणि विधायक क्षेत्रांत धडपडणारे कार्यकर्ते आदी सर्वांना सढळ हाताने सहकार्य करीत असतात.

आपल्या मुलाने उच्च शिक्षण घ्यावे आणि चांगल्या रीतीने पदवीधर व्हावे, अशी तीव्र इच्छा शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अप्पासाहेबांची होती. तसा त्यांचा आग्रहही होता; परंतु लहानपणापासून आपल्या आजोबांबरोबर शेतीत काम करीत असताना शेतीविषयी गणपतरावांच्या मनात विलक्षण प्रेम निर्माण झाले. मात्र, त्या क्षेत्रात आपण यशस्वी होऊ की नाही, अशी शंका गणपतरावांच्या मनात सारखी डोकावत होती. त्यांची चलबिचल अप्पासाहेबांनी हेरली आणि शेतीचे महत्त्व समजावे म्हणून त्यांनी गणपतरावांना पंजाबमधील पंत कृषी विद्यापीठ, तसेच दिल्ली व केरळ येथील कृषी विद्यापीठांमध्ये माहिती घेण्यासाठी नेले. उत्तर प्रदेशातील पंतनगर येथील आधुनिक शेती व शेतीतील विविध प्रयोग आणि संशोधन जवळून दाखविले. दिल्ली येथील पुसा येथे हायब्रीड बियाणांसाठी होणारे संशोधन पाहून गणपतरावांना नवचैतन्य मिळाले. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या केरळने त्यांना भारावून टाकले आणि कृषी क्षेत्रात काम करण्याचा निर्धार करूनच ते गावाला परतले. त्यावेळी त्यांचे वय फक्त २० वर्षे होते.

शिरोळ तालुक्यातील कोंडीग्रे गावात त्यांची खडकाळ जमीन होती. पाण्याची टंचाई व शेतकर्‍याला ग्रासणारी सर्व प्रकारची संकटे तिथे होती. अशा परिस्थितीत माळरानावर सोने पिकविण्याची जिद्द अप्पासाहेबांनी गणपतरावांच्या मनात निर्माण केली. गणपतराव झपाट्याने कामाला लागले. त्यासाठी त्यांनी ९ किलोमीटर अंतरावरून पंचगंगा नदीतून पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याची व्यवस्था केली. त्याआधारे द्राक्षे, डाळींब, आंबा, बोर, चिक्कू या फळबागांबरोबरच सोयाबीन, भात, गहू, आणि टोमॅटो आदी पिके घेण्यास त्यांनी सुरुवात केली. अप्पासाहेबांच्या मार्गदर्शनातून प्रत्येक क्षेत्रात विक्रमी उत्पादन घेण्याचा पराक्रम गणपतरावांनी केला. त्यांनी एका एकरामध्ये ६० ते ७० टन टोमॅटोचे उत्पादन घेऊन एक नवा विक्रम प्रस्थापित केला. हे सर्व करीत असताना त्यांनी मातीला आपली ‘माता’ मानले आणि भारत माता सर्व प्रकारे सजविण्यासाठी अथक प्रयत्न सुुरू ठेवले. पारंपरिक पिकांचे उत्पादन आधुनिक पद्धतीने घेत असताना गणपतरावांनी हरितगृहातील शेती करण्याचे ठरविले. सुरुवातीस ४ एकरांच्या हरितगृहात जरबेरा, कार्नेशन व रंगीत ढोबळी मिरची यांसारखी पिके घेतली. हे सर्व प्रयोग करीत असताना अप्पासाहेबांनी गणपतरावांना अमेरिकेतील कॅलिफोर्निया, तसेच हॉलंड व ईस्राइलसारख्या प्रगत देशांना भेट देण्यास पाठविले. गणपतरावांनी तेथील बारकावे चाणाक्षपणे हेरले व या क्षेत्रात अपेक्षेपेक्षाही जास्त यश प्राप्त केले.

गणपतरावांच्या खडकाळ जमिनीत सुपीक मातीचा अभाव होता. या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी मातीविना शेती करण्याचा निर्धार केला. खडकाळ जमिनीमध्ये फूलशेतीचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी कुंभारांनी बनविलेल्या मातीच्या कुंड्यांमधून गुलाब, जरबेरा आणि अन्य फुलांच्या निर्मितीचा प्रयोग सुरू केला. हरितगृहात कुंड्या ठेवण्यासाठी खास स्टँड तयार केले. कुंड्यांमध्ये मातीऐवजी कोकोपीट घातले आणि मातेसारखी या फुलांची जोपासना केली. एका एकरात गुलाबासाठी १४ हजार कुंड्या व जरबेरासाठी २८ हजार कुंड्या वापरल्या. मातीविना गुलाबाची निर्मिती जास्त दर्जेदारपणे करता येते, हे त्यांनी सिद्ध केले. देशातील हा पहिला यशस्वी प्रयोग ठरला. त्यांच्या या पद्धतीने फुलविलेल्या गुलाबाला केवळ भारताच्या प्रमुख बाजारपेठेतच नाही, तर जगातल्या प्रमुख राष्ट्रांच्या बाजारपेठेतही चांगली मागणी आहे. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, दुबई, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, जपान आणि हॉलंडसारख्या देशांचा समावेश आहे. गणपतरावांनी केलेले आधुनिक शेतीचे प्रयोग देशातील वेगवेगळ्या विभागात व कृषी विद्यापीठांत सुरू आहेत.

गणपतरावांच्या आधुनिक शेतीचा फायदा कित्येक कुंभारांना झाला. कारणमातीविना गुलाबाची शेती गणपतरावांनी सुरू केली, तेव्हा त्यांना अडीच लाख कुंड्यांची गरज होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोणताही कुंभार कुंड्या तयार करत नव्हता व तो धोका पत्करण्यासही कोणी तयार नव्हते. अशा वेळी बेळगाव जिल्ह्यातील संप गावातील एका कुंभार महिलेने हे आव्हान स्वीकारले आणि ४० कुटुंबांना एकत्र आणून कुंड्या पुरविण्याचे काम पूर्ण केले. त्या महिलेसह सर्वांचा गणपतरावांनी उचित गौरव केला. या यशस्वी प्रयोगामुळे कुंभारांसाठी कायमस्वरूपी रोजगार उत्पन्न झाला.

एक एकरच्या हरितगृहात गणपतरावांनी रंगीत ढोबळी मिरचीचे उच्चांकी उत्पादन काढून दाखवले. त्यांनी केवळ ९ महिन्यांच्या कालावधीत एकरी ५५ टन ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले आणि ती मिरची मुंबई व दिल्लीच्या बाजारपेठेत सरासरी प्रतिकिलो ४३ रुपये दराने विकली गेली. या दराने त्यांना साधारणतः २४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यातील ११ लाख रुपये उत्पादन खर्च वगळता ९ महिन्यांच्या कालावधीत एका एकरमध्ये निवळ नफा १३ लाख रुपये मिळवून गणपतरावांनी देशात नवा उच्चांक निर्माण केला आहे. जरबेराचे पीक सामान्यत: दोन ते अडीच वर्षांमध्ये निकामी होत असल्यामुळे काढून टाकावे लागते; परंतु गणपतरावांनी हरितगृहामध्येच लागवड केलेले जरबेरा फुलाचे उत्पादन पाच वर्षांपर्यंत घेतले. गेल्या पाच वर्षांत या एका एकरात ५५ लाख फुलांचे उत्पादन त्यांनी घेतले. गणपतरावांच्या हरितगृहातील प्रति फुलास दोन रूपये असा विक्रमी दर मिळाला. त्यांनी बाजारपेठांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून दर्जेदार मालाची निर्मिती केली होती. यांद्वारे परदेशातील बाजारपेठ मिळविण्यात ते यशस्वी झाले होते. एवढी मोठी हरितगृहातील शेती असणारे गणपतराव माझ्या माहितीप्रमाणे भारतातील एकमेव शेतकरी आहेत. योग्य व्यवस्थापनातून उत्पादन खर्च कमीत कमी ठेवून अधिकाधिक उत्पन्न घेण्याचा यशस्वी उपक्रम गणपतरावांनी केला आहे. स्वत:च्या श्रमातून व कौशल्यातून त्यांनी मिळविलेले नफ्याचे आकडे अतिशयोक्ती वाटणारे असले, तरी ती वस्तुस्थिती आहे. गणपतरावांनी आज हरितगृहाखालील क्षेत्र ४ एकरवरून १०५ एकर क्षेत्रापर्यंत आणले आहे. त्यात ते विविध प्रकारच्या फुलांचे व ढोबळी मिरचीचे भरघोस उत्पादन घेत आहेत. एखाद्या कंपनीने नव्हे तर फक्त एका शेतकर्‍याने १०५ एकरवर हरितगृहाची शेती करण्याचा उच्चांक केला आहे. ते एकमेव शेतकरी म्हणजे गणपतराव.

एक साधा शेतकरी फारसे शिक्षण नसतानासुद्धा निरनिराळ्या देशांमध्ये जातो, प्रवास करतो, तेथील अद्ययावत ज्ञान हस्तगत करतो आणि धोका पत्करून फार मोठे कर्ज घेऊनसुद्धा या धंद्यामध्ये यशस्वी होतो. हे सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे. आज मागासलेल्या अवस्थेतील निराशेने वेढलेली तरुण पिढी मी जेव्हा आजूबाजूला पाहतो, तेव्हा सवर्र् अडचणींवर मात करून यशस्वी होणारा गणपतरावांसारखा शेतकरी अंधकारात धडपडणार्‍या पिढीला नेहमीच प्रकाशाचे किरण दाखवीत असतो. भारताच्या भवितव्याचा विचार करता अप्पासाहेबांचे अमूल्य मार्गदर्शन लाभलेले आणि शेतीतून सोने पिकविणारे गणपतरावांसारखे उद्योजकच भारताचे उज्जवल भविष्य साकारतील, असे वाटते.

आपली भूमी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, तीच या देशाची खरी ताकद आहे, असे गणपतरावांना मनापासून वाटते. आपल्या भूमीला ते मातेप्रमाणे मानतात आणि माता समजून ते भूमीची पूजा करतात. त्यांना मिळालेले यश त्यांचे वैयक्तिक यश असल्याचे गणपतराव मानत नाहीत. लहानपणी कुटुंबात आई-वडिलांनी केलेले संस्कार, सेवा दलात झालेले संस्कार, विशेषत: अप्पासाहेबांनी दिलेली साथ यामुळेच हे शक्य झाले असून, त्यांच्याबरोबर काम करणारे मजूर, अधिकारी या सर्वांचा या यशात वाटा असल्याचे गणपतराव नेहमी सांगत असतात. अप्पासाहेब व गणपतराव यांनी ‘श्रीवर्धन बायोटेक’ हा प्रकल्प उभारला. या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यासाठी मला मुद्दाम बोलावून घेतले होते. या सर्व प्रकल्पाची सुरूवात करण्याचा बहुमान मला मिळाला, याचा मला नेहमीच सार्थ अभिमान वाटतो.

‘श्रीवर्धन बायोटेक’च्या माध्यमातून हे यश मिळवित असताना शेतकरी म्हणून गणपतरावांना असंख्य संकटांना सामोरे जावे लागले. एकतर बँकेचे कर्ज लवकर मिळत नाही आणि व्याजाचा दरही ११-१२ टक्क्यांखाली असू शकत नाही. प्रगत देशामध्ये व्याजाचा दर ३ टक्के अथवा त्याहून कमी आहे. उत्पादकांसाठी व्याजाचा दर ३ टक्क्यांपर्यंत खाली आणल्याशिवाय जागतिक स्पर्धेमध्ये टिकणे अवघड होणार आहे.

आपली पॅकेजिंगची व्यवस्थादेखील जागतिक बाजारपेठेचा विचार करता अत्यंत मागासलेल्या अवस्थेत आहे. पॅकेजिंग करण्यासाठी लागणारा माल, प्रशिक्षित कारागीर आणि टिकाऊ स्वरूपाचे पॅकेजिंग असल्याशिवाय नाशवंत माल परदेशात जाईपर्यंतच मार खाऊ शकतो. आपली वाहतूकीची व्यवस्था तितकीच मागासलेली आहे. फुले, फळे, भाजीपाला विमानतळापर्यंत जलदगतीने नेऊ शकणार्‍या वातानुकुलीत वाहनांची व्यवस्था शासनाने केली पाहिजे. त्यासाठी त्याला योग्य ती सवलत मिळाली पाहिजे. विशेषत: निरनिराळ्या बाजारपेठांमध्ये कोणत्या मालाची किंमत काय आहे, कोणत्या मालाला मागणी आहे, कच्चा माल कोठे मिळतो आदी माहिती सर्व उत्पादकांना देणारी अद्ययावत माहिती केंद्र ग्रामीण भागातील महत्त्वाच्या ठिकाणी उपलब्ध असली पाहिजेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झालेली क्रांती केवळ सरकारी दप्तरात अडकून चालणार नाही, तर ती सामान्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे.

जागतिक बाजारपेठ सर्वांना खुली झाली आहे. कुठल्याही देशातील कोणताही माल कोठेही जाऊ शकतो आणि त्यावर कोणाचेही बंधन राहू शकत नाही. अशा अवस्थेमध्ये आपल्याला जागतिक बाजारपेठेत यशस्वी व्हायचे असेल, तर त्याची पूर्वतयारी असावी लागते. त्यामध्ये-

  • निर्यातदार उत्पादकांसाठी अद्ययावत माहिती उपलब्ध होणे.
  • परदेशी बाजारपेठेतील स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी कृषी अथवा औद्योगिक क्षेत्रातील निर्यातदारांसाठी व्याजाचा दर खाली आणणे.
  • परदेशात आपला माल खपावा, म्हणून आकर्षक पॅकेजिंग करण्यासाठी कच्च्या मालापासून प्रशिक्षणापर्यंत व्यवस्था करणे.
  • माल तयार झाल्यानंतर विमानतळापर्यंत सुरक्षित नेण्यासाठी वातानुकूलित वाहनांची व्यवस्था करणे.
  • खास मालवाहू विमाने शक्यतो शासनामार्फतच उपलब्ध करून देणे.

अशा आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. विशेषत: परदेशात जाणार्‍या मालासाठी एक्स्पोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन अद्ययावत करणेेे आणि आवश्यक ते आर्थिक पाठबळ त्या संस्थेला देणे महत्त्वाचे आहे. गणपतरावांंशी चर्चा करताना आपल्या अनुभवावर आधारित असे विषय प्रभावीपणे मांडून आपल्या कृषी क्षेत्राची कशा प्रकारे उपेक्षा झाली आहे आदी माहिती अधिकारवाणीने ते देत असतात.

अप्पासाहेब सा. रे. पाटील यांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली. तेव्हा मी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता; परंतु केवळ पंधरा दिवसातच एका बैठकीसाठी ते पुण्याला येऊन गेले आणि परत २२ फेब्रुवारी २०१० रोजी त्यांनी पुण्याला पुन्हा दुसरी चक्कर मारली. मी त्यांना म्हटले की, “अप्पासाहेब, तुम्हाला विश्रांतीची गरज असताना वरचेवर प्रवास करता हे बरं नव्हे. काही पथ्य पाळणे आवश्यक आहे.” त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते म्हणाले, “अण्णासाहेब, माझे चुकले आहे, यापुढे मी दक्षता घेईन.” इतके बोलून ते मोकळे झाले; परंतु जे ठरविले आहे ते कोणत्याही परिस्थितीत प्रकृतीची तमा न बाळगता पूर्ण करायचे हा त्यांचा स्वभाव मला खरोखर मनापासून आवडतो. या जिद्दी स्वभावातूनच ते पुढे आले आहेत.

अप्पासाहेब आणि गणपतराव यांच्यावर एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, साने गुरूजी आदी समाजवादी नेत्यांचा आणि त्यांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव आहे. नुकताच ऋषीतुल्य व्यक्तीमत्व म्हणून या कर्तृत्ववान जोडीचा गौरव झाला आहे. एकाचवेळी दोघांचाही ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व म्हणून गौरव होतो व तोही पुणे शहरात होतो, यातच त्यांच्या यशस्वी जीवनाचे मर्म समजू शकते. जेव्हा मी या उभयतांकडे पाहतो, तेव्हा साने गुरूजींच्या धडपडणार्‍या मुलाची मला आठवण येते. अशा तर्‍हेचे हिमालयाच्या उंचीचे मान्यवर पाहिले की, वयाने ते लहान आहेत की मोठे आहेत, हा विचार बाजूला सोडून त्यांना नम्रपणे अभिवादन करावेसे वाटते.

 

स्त्रोत: वनराई

3.04285714286
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 05:26:17.855347 GMT+0530

T24 2019/10/17 05:26:17.862053 GMT+0530
Back to top

T12019/10/17 05:26:17.007452 GMT+0530

T612019/10/17 05:26:17.025848 GMT+0530

T622019/10/17 05:26:17.161958 GMT+0530

T632019/10/17 05:26:17.162824 GMT+0530