অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शासकीय योजनांचा लाभ घेत शेतीत नेत्रदिपक यश

राज्‍य शासनाच्‍या वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्‍काराने गौरव

प्रस्तावना

अहमदनगर जिल्ह्यात बोरबन (ता. संगमनेर) येथील आनंदराव गाडेकर (नाना) यांची 25 एकरांवरील डाळिंब, द्राक्षे, सीताफळ, पपई, आंबा व अन्य विविध पिकांची शेती दिशादर्शक आहे. टंचाई स्थितीतही पाण्याच्या काटेकोर वापरातून तब्बल 15 हजार झाडे जगविण्यात त्यांना यश आले आहे. शेतीतील अभ्‍यास, अनुभव, यश स्वतःपुरते मर्यादित न ठेवता इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शनातून त्यांनी किफायतशीर शेतीचे धडे दिले आहेत. कृषी विभागाच्‍या माध्‍यमातून शासकीय योजनांचा लाभ घेत त्‍यांनी शेतीत नेत्रदिपक यश मिळविले आहे, शेतीतील त्‍यांच्‍या कार्याचा गौरव म्‍हणून राज्‍य शासनाने त्‍यांना वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्‍काराने सन्‍मानीत केले आहे.

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका शेती व दुग्‍धव्‍यवसायामुळे देशाच्‍या पटलावर आला. याच तालुक्‍यात बोरबन या छोट्या गावात आनंदराव गाडेकर यांची एकत्रित 25 एकर शेती आहे. बारावी झालेल्या गाडेकर यांनी नोकरीच्या मागे न लागता पूर्णवेळ वडिलोपार्जित शेती करण्‍याचा निर्णय घेतला, वडिलोपार्जित बारा एकर शेती क्षेत्र आज तब्‍बल 25 एकरापर्यंत पोचले आहे.

डोंगराच्‍या कुशीत बहरली फळशेती

बोरबनसारख्या डोंगराळ भागात गाडेकर यांनी 1990 मध्ये तुटपुंज्या पाण्यावर डाळींब लागवड करण्याचा निर्णय घेतला. 12 बाय 8 फूट अंतरावर डाळींबाची 6 हजार झाडे व 9 बाय 5 फुट अंतरावर द्राक्षांची 5 हजार झाडांची लागवड केली. सीताफळ व इतर फळझाडांची लागवडही केली आहे. डोंगराच्‍या कुशीत असलेल्या या ठिकाणी मोठया नियोजनातून बहरलेली फळशेती जणू कृषी पर्यटनाचे केंद्रच बनले आहे. सर्व मिळून एकूण 15 हजारांपर्यंत झाडे आहेत.

दृष्टिक्षेपात फळशेती

डाळिंब

6000 झाडे आहेत. 80 ते 100 टन उत्पादन मिळते. मुंबई, नाशिक, जयपूर व दिल्‍ली बाजारपेठेत विक्री होते. प्रति किलो सरासरी 30 ते 80 रुपये दर मिळतो. उच्‍चत्‍तम प्रतिच्‍या मालाची युरोप येथे निर्यात केली जाते.

द्राक्ष

सुमारे 5000 झाडे. एकूण क्षेत्रातून 40 ते 50 टन उत्पादन मिळते. जयपूर दिल्‍ली बाजारपेठेत विक्री. प्रति किलो 40 ते 80 रूपये व सरासरी 60 रूपये दर मिळतो. उच्‍चत्‍तम प्रतिच्‍या मालाची निर्यात युरोप येथे केली जाते.

सीताफळ

सुमारे 3500 झाडे. एकूण क्षेत्रातून 32 टन उत्पादन मिळते. नाशिक, मुंबई बाजारपेठेत विक्री. प्रति किलो सरासरी 20 रुपये ते 80 रूपये व सरासरी 50 रूपये दर मिळतो. गुणवत्‍तेनुसार दरात वाढही होते.

आंबा

केसर व हापूस आंब्याची एकूण सुमारे 100 झाडे. मात्र उत्‍पादनक्षम 50 झाडे आहेत, त्यापासून सुमारे 5000 किलो उत्पादन मिळते. शेतीवरूनच विक्री होते, किलोला ग्रेडनुसार सरासरी 50 रुपये व प्रतवारीनुसार दर मिळतो.

नारळ

कोकणातील सुमारे 100 झाडे आहेत, त्यापासून 5 हजार नारळाचे उत्पादन मिळते. छोटे व्‍यापारी शेतावर येऊन 10 रुपये प्रति नारळ दराने खरेदी करतात.

गाडेकर यांच्या शेतीतील वैशिष्ट्ये -

1) फळशेतीत "मार्गदर्शक' ठरलेल्या गाडेकर यांनी शेततळ्यात मत्स्यपालन केले. त्यात रोहू, कटला, मृगळ आदींचे 25 पेट्या मत्स्यबीज सोडले आहे.

2) 25 एकरांतील शेतीत रासायनिक खताचे प्रमाण अत्‍यंत कमी आहे. 100 टनाचा गांडूळ प्रकल्प असून, हे खतही उपयुक्त ठरते. बागेत अच्‍छादनाचा वापर मोठया प्रमाणात केला जातो.

3) मत्स्यपालनातून उत्पन्नाची भर दर वर्षी पडते.

4) सुमारे 1 कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्यातून संपूर्ण शेतीला पाणी पुरविण्यात येते. 25 एकर शेतीसाठी ठिंबकचा वापर असून, काटेकोर नियोजनातून पाणी देण्यात येते.

5) डाळिंब, द्राक्षे, सीताफळ आदींसाठी आवश्‍यक सुविधा असलेले पॅकहाऊस आहे.

6) बांधावर बांबू, पेरू, बोर, कडुलिंब, चिकू, चिंच, नारळ यांचीही लागवड आहे. अंदाजे 400 विविध फळझाडांची लागवड आहे, त्‍यापासूनही उत्‍पन्‍नात भर पडली आहे.

7) यांत्रिकीकरणातून मजूरटंचाईवर मात केली असून फवारणीसाठी ब्‍लोअर, पावडर स्‍प्रे करण्‍यासाठी झुरळणी यंत्र, आंतरमशागतीसाठी विविध अवजारे उपयोगात आणली आहेत.

युरोपने चाखली डाळींब आणि द्राक्षाची गोडी

उजाड माळरानावर बहरलेल्या डाळींब आणि द्राक्षांचा गोडवा थेट युरोपमध्‍ये पोचला आहे. डाळींब व द्राक्ष निर्यातीसाठी आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करून मुंबई येथील निर्यातदाराच्या मदतीने त्यांनी डाळिंब व द्राक्षांची निर्यात थेट युरोपात केली आहे. बोरबन गावच्या उजाड माळरानावरील फळांचा गोडवा युरोपीय देशात पोचल्याचा आनंद गाडेकर कुटुंबियांना आहे.

शासनाच्‍या योजनांचा लाभ घेत फुलले शिवार

गाडेकर यांनी फळबाग लागवड, ठिंबक, ट्रॅक्‍टर, शेततळे, गांडुळखत प्रकल्‍प, यांत्रिकीकरण अशा विविध्‍ योजनांचा लाभ घेतला आहे. शासनाच्‍या योजनांचा लाभ घेत शेती किफायतशीर केली आहे, याकामी त्‍यांना उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, मंडळ कृषी अधिकारी किशोर आहेर आदींचे मार्गदर्शन मिळाले आहे.

कुटुंबाकडून मिळाला आत्मविश्‍वास

फळशेतीच्या सुरवातीला अडचणी आल्‍या, परंतु कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आत्मविश्‍वास दिला. भाऊ तानाजी, भावाची पत्नी सौ. सुजाता यांची शेतीत, तर पत्नी सौ. मंदाकिनी यांची शेती सांभाळण्यात मोठी साथ मिळाली. शेतीतून चांगले उत्‍पन्‍न मिळाल्‍यामुळे कुटुंबाने नेत्रदिपक प्रगती केली आहे. गाडेकर यांची मुले, मुली व पुतणे सर्व उच्‍चशिक्षित आहे, दोन मुले कृषी पदवीधर तर मुलगी अभियांत्रिकीमध्‍ये पदवीधर आहेत.

- गणेश फुंदे, उपमाहिती कार्यालय शिर्डी​

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate