Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia

मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / शेतकऱ्यांनी स्थापली कंपनी
शेअर करा
Views
  • स्थिती: परीक्षण प्रक्रिया चालू

शेतकऱ्यांनी स्थापली कंपनी

आज संघटित होऊन एकमेकांना सहकार्य करून शेतकऱ्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण करणे गरजेचे झाले आहे.

आज संघटित होऊन एकमेकांना सहकार्य करून शेतकऱ्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण करणे गरजेचे झाले आहे. या एकीतूनच आज शेतमालाचे उत्पादन, खर्च, बाजारभाव, विक्री व्यवस्था आदी प्रश्‍नांची तीव्रता कमी होण्यास मदत होते. कळंब (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील माउली शेतकरी गटाने शेतकरी प्रोड्यूसर कंपनी स्थापन करून या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत. 
पुणे जिल्ह्यातील कळंब (ता. आंबेगाव) गावची लोकसंख्या सुमारे सात हजार आहे. गावचा परिसर डोंगराळ असून, पाण्याचा मुबलक पुरवठा आहे. त्यामुळे येथील शेतकरी द्राक्ष पिकासह विविध भाजीपाला पिके घेतात. मात्र किडी-रोग, मालाची वाहतूक, बाजारभावांतील बेभरवसा आदी अडचणींना तोड द्यावे लागे. त्यामुळे गावातील चार-पाच शेतकऱ्यांनी 2010 मध्ये एकत्रित येऊन काकडीची शेती सुरू केली. पुढे त्यांनी गावातील आणखी शेतकऱ्यांना एकत्र करून झेंडू, काकडी घेण्यास सुरवात केली. तालुका कृषी अधिकारी हिरामण शेवाळे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभू लागले. एकत्रित शेतीमुळे खते, बियाणे, कीडनाशके या निविष्ठा खर्चात बचत, वाहतूक या गोष्टी सोयीच्या होऊन आर्थिक फायदा झाला. दरम्यान, कृषी सहायक एन. एस. राशीनकर, मंडळ अधिकारी पी. एस. थोरात, कृषी पर्यवेक्षक एम. बी. घेवडे यांनी "आत्मा'अंतर्गत शेतकरी गट स्थापन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.

माउली शेतकरी गटांची सुरवात

एकूण 30 शेतकऱ्यांनी माउली गट स्थापन केला. भाजीपाला पिकांचे उत्पादन हे शेतकरी करतात. महिन्याला 100 रुपयांप्रमाणे बचत सुरू केली. सध्या महिन्याला 500 रुपयांप्रमाणे बचत सुरू आहे. मालाची एकत्रित वाहतूक सुरू केल्याने विक्री सोपी झाली. पुढे जानेवारी 2013 मध्ये शासनाने शेतकरी-ग्राहक थेट भाजीपाला विक्री उपक्रम सुरू केला. त्यात हा गट सहभागी झाला. त्यांना नफ्याचे मार्जीन चांगले मिळू लागले.

प्रोड्यूसर कंपनीची स्थापना

सुमारे दीड वर्षातच माउली गटाने साधलेला विकास अन्य शेतकऱ्यांना दिसू लागला. कळंब गावासह परिसरातील चांडोली, लौकी, नांदूर, मंचर, लांडेवाडी, वारुळवाडी या गावचे शेतकरीही या गटामध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न करू लागले. मात्र माउली गटांच्या नियमानुसार 30 हून अधिकांना त्यात सहभागी होता येत नव्हते. त्यामुळे कृषी विभागातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने गटाने शेतकरी प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली. संपर्कातील परिसरातील सहा-सात गावांतील 400 ते 500 शेतकरीही त्यात सहभागी झाले. कंपनीचे सभासद होण्यासाठी त्यांच्याकडून एक हजार सभासद फी व 100 रुपये प्रवेश फी घेण्यात आली. त्यामुळे कंपनीचे भांडवल वाढले.
गटस्थापनेमुळे प्रशिक्षण, शिबिर, चर्चासत्रे, कृषी सहलीच्या माध्यमातून विविध प्रयोगांचा अनुभव गटातील शेतकऱ्यांनी घेतला. गट, तसेच कृषी विभागामार्फत बारामती, सिन्नर, नाशिक, कृषी विद्यापीठ कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या येथील शेतकऱ्यांच्या प्लॉटवर प्रत्यक्ष जाऊन पीक पाहणी केली, तर सध्या अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, जळगाव, औरंगाबाद जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनीही माउली गटातील शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन त्यांचे प्रयोग समजावून घेतले आहेत. 
माउली शेतकरी गटाचे दशरथ थोरात अध्यक्ष व ज्ञानेश्‍वर थोरात उपाध्यक्ष आहेत, तर प्रोड्यूसर कंपनीचे अजित थोरात व पांडुरंग थोरात हे व्यवस्थापकीय संचालक आहेत. रमेश थोरात हे व्यवस्थापक आहेत.

माउली कृषी उद्योग केंद्राची स्थापना

कमी दरात खते, बियाणे, कीडनाशके आदी निविष्ठा सभासद शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी शेतकरी गटाची बचत व प्रोड्यूसर कंपनीचे भांडवल यांचा आधार घेऊन ना नफा ना तोटा या तत्त्वावर ऑगस्ट, 2013 मध्ये माउली कृषी उद्योग केंद्र सुरू केले.

गटातील शेतकऱ्यांकडे असलेली पिके

  • द्राक्षे, झेंडू, भाजीपाला पिके.
  • भाजीपाला पिकांत काकडी, वांगी, कोबी, बटाटा, ढोबळी मिरची, साधी मिरची, कोथिंबीर, मेथी, दुधी भोपळा, दोडका, कांदा, वालवड आदी.
  • कोणी कोणते पीक घ्यायचे याचे आगामी नियोजन होते. त्यामुळे विविध भाजीपाला उत्पादित होण्यास मदत होते.
  • गटातील शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करतात. खतेही त्याद्वाराच दिली जातात. त्यामुळे उत्पादनात 20 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.
  • गटातील शेतकऱ्यांकडे एकूण क्षेत्रापैकी सुमारे 60 टक्के क्षेत्रावर मल्चिंगवर भाजीपाला पिके घेतली जातात. त्यामुळे खुरपणी, मजुरी, वेळ यात बचत झाली आहे.

संकलन व प्रतवारी केंद्र

शेतमालाचे संकलन व प्रतवारी करण्यासाठी स्वतंत्र केंद्र आहे. त्यामध्ये गटातील सर्व शेतकरी त्यांच्याकडील उपलब्ध माल केंद्रावर आणतात. दररोज सुमारे अडीच ते तीन टन माल संकलित होतो. दररोज संध्याकाळी मालाची प्रतवारी व 250 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1 किलो, दोन किलो, पाच किलो असे पॅकिंग शेतकरीच करतात. त्यामुळे अन्य शेतकऱ्यांचा वेळ वाचतो.

मालाची विक्री 

शेतमाल वाहतुकीसाठी स्वतंत्र गाडी आहे. भाजीपाल्याची शेतकरी ते ग्राहक योजनेअंतर्गत दर गुरुवारी व रविवारी पुण्यातील इंद्रलोक निवासी सोसायटीत, फुलेनगर येथे खुल्या पद्धतीने विक्री होते. दररोज सुमारे 600 किलोपासून एक ते दीड टन मालाची विक्री होते. मुंबईच्या वाशी मार्केटला, तसेच सानपाडा येथेही विक्री केली जाते. त्याचबरोबर माल मोठ्या प्रमाणात असल्याने दर निश्‍चित करून व्यापाऱ्यांना जागेवरही विक्री केली जाते. बाजारपेठेतील दर, मालाची वाहतूक, अडत, मालाची उपलब्धता आदी अनेक गोष्टी अभ्यासून दर वेळोवेळी निश्‍चित केले जातात. प्रति भाजीपाला हंगामात प्रति शेतकऱ्याला या उपक्रमातून किमान दहा ते एकरा हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. आगामी काळात खासगी कंपन्यांना मालाची विक्री करण्याचा गटाचा मानस आहे. द्राक्षाची निर्यात व "कोल्ड स्टोरेज' बांधण्याचा विचार सुरू आहे. 

संपर्क - दशरथ थोरात - 9860596210 
माउली शेतकरी गट - 
मु.पो. कळंब, ता. आंबेगाव, जि. पुणे.

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

3.08
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन
Back to top