অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेततळ्यांचे शतक पूर्ण करणारे चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गाव

शेततळ्यांचे शतक पूर्ण करणारे चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गाव

एकाच गावात झाले 111 शेततळे

शेततळ्यांमुळे वाढले 137 एकर बागायत क्षेत्र

शिवार झाले पाणीदार

शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत सिंचनाची जोड मिळाली तर ते या संधीचं सोनं केल्याशिवाय राहत नाही. आणि हेच करुन दाखविले आहे, चाळीसगाव तालुक्यातील शिंदी या गावातील शेतकऱ्यांनी. शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत या एकाच गावात तब्बल 111 शेततळे घेण्यात आली आहेत. या शेततळ्यांमुळे या गावाच्या बागायती क्षेत्रात तब्बल 137 हेक्टर ने वाढ झाली असून भर उन्हाळ्यातही शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष, डाळींब, मोसंबी, पेरु च्या फळबागा जगविल्या आहेत. एवढेच नाही तर दर एकरी द्राक्ष उत्पादन 14 टनावरुन 25 टनापर्यंत तर मोसंबी उत्पादन 18 टनावरुन 25 टनापर्यंत वाढले आहे. यामुळे गावाचे शिवार पाणीदार झाले आहे. त्याशिवाय गावात मोठ्या प्रमाणात भाजीपालावर्गीय पिके घेतल्यामुळे शेतकऱ्‍यांना शाश्वत उत्पनाची हमी मिळाली आहे.

मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत कृषी विभागातर्फे चाळीसगाव तालुक्यातील शिंदी या गावातील शेतकऱ्‍यांनी तब्बल 111 शेततळी खेादली आहेत. शेततळ्यांसाठी शेतकऱ्यांना शासनातर्फे प्रत्येकी 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. 40 शेतकऱ्‍यांनी शेततळ्याचे अस्तरीकरण केल्याने ती पाण्याने भरली आहेत. एका शेततळ्याची पाणी साठवण क्षमता 2.196 टीसीएम एवढी आहे. या शेततळ्यांमुळे शेतकऱ्‍यांचे शेत हिरवेगार झाले आहे. या शेततळ्यांमुळे शिंदी गावातील बागायत क्षेत्रात 248 हेक्टरवरुन 349 हेक्टर म्हणजेच 137 हेक्टरने वाढ झाली आहे. एका शेततळ्यातून किमान 5 एकर शेतीला पाणी देणे शक्य होणार आहे.

जिरायत शेती झाली बागायती, उत्पन्नही वाढले

शिंदी येथील रमेश रामचंद्र राऊत या शेतकऱ्‍याने त्यांच्या शेतात 34 बाय 34 बाय 2 मीटर आकाराचे शेततळे खोदलेले आहे. त्यांच्याकडे 8 हेक्टर शेती होती. त्यापैकी 4.35 हेक्टर बागायती तर 3.65 हेक्टर शेती जिरायती होती. शेततळ्यांमुळे त्यांचे संपूर्ण 8 हेक्टर क्षेत्र बागायती झाले आहे. 2015-16 मध्ये त्यांनी शेतात 12 टन द्राक्षाचे उत्पादन घेतले होते. तर शेततळ्यामुळे सन 2017-18 मध्ये शेततळ्यांमुळे त्यांच्या द्राक्षांच्या उत्पादनात 25 टनापर्यंत वाढ झाली असून आता त्यांच्या शेतात शेवगा, डाळींब, मोसंबी आदि पिके घेतली आहेत. त्याचप्राणे गुलाब विठ्ठल जाधव या शेतकऱ्‍याच्या मोसंबीच्या बागेला शेततळ्याचा आधार झाला आहे. पूर्वी फक्त 0.50 हेक्टर मोसंबीची लागवड होती ती आता शेततळ्यामुळे 1.50 हेक्टर इतकी झाली आहे. तर संजय पोपट कोंकणे हे शेतकरी त्यांच्या 2015 हेक्टर शेतात मोसंबी, डाळींब व कांदा या पीकांची लागवड केली होती. शेततळ्यामुळे त्यांची संपूर्ण शेती बागायती होऊन मोसंबी पिकाच्या उत्पादनात 17 टनावरुन 25 टनापर्यंत वाढ झाली आहे. या गावातील अनेक शेतकऱ्‍यांनी त्यांच्या विहिरीत भरपूर पाणी असताना ते पाइप लाइनद्वारे शेततळ्यांमध्ये साठवले असल्याने भर उन्हाळ्यात शेततळ्यांमधील पाणी पिकांचा आधार बनले आहे.

शेततळ्यामुळे गावातही घडला बदल

शिंदी या गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र 490.83 हेक्टर इतके आहे. त्यापैकी 461.18 हेक्टर क्षेत्र वहिती असून त्यापैकी 248.50 हेक्टर क्षेत्र बागायती तर 212.50 हेक्टर क्षेत्र जिरायती आहे. शेततळ्यांमुळे या गावातील शेकडो हेक्टर जिरायती क्षेत्र घटून ते बागायती झाले आहे. आगामी काळात शेततळ्याचे अस्तरीकरण केल्यांनतर सर्व शेततळ्यांमध्ये पाणी साचून तब्बल 349 हेक्टर क्षेत्र बागायती होण्यास मदत होईल.

लवकरच गावाचे रुपडे पालटणार

शिंदी गावात मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत 111 शेततळी खोदण्यात आलेली आहेत. त्यापैकी अस्तरीकरण झालेल्या 40 शेततळ्यांमध्ये पाणी साचले आहे. उर्वरित शेततळ्यांचे अस्तरीकरण लवकरच पूर्ण होणार आहे. ते पूर्ण झाल्यानंतर या सर्व 111 शेततळ्यांमध्ये पाणी साचल्यास या गावाचे रुपडेच पालटेल व हे गाव पूर्णत: बागाईतदारांचे गाव म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास या गावचे कृषी सहायक टी.आर.पवार यांनी व्यक्त केला आहे.

- विलास बोडके

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate