অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फळगळसाठी कारणे शोधून करा उपाययोजना

फळगळसाठी कारणे शोधून करा उपाययोजना

लिंबूवर्गीय पीक सल्ला

महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेशातील छिंदवाडा भागमध्ये विविध कारणांमुळे लिंबूवर्गीय फळबागांचे नुकसान वाढत आहे. हे टाळण्यासाठी भारत सरकारने लिंबूवर्गीय फळबागेसाठी तंत्रज्ञान अभियानार्फत विदर्भातील संत्रा फळबागेतील कामासाठी मार्गदर्शक शिफारशी मांडल्या आहेत.

  1. ठिबक सिंचन संच असल्यास त्याच्या नळ्या पसराव्यात. ठिबक सिंचन नव्याने करणार असल्यास दाब नियामक ड्रीपरचा वापर करावा. त्यामुळे सर्व ड्रीपरमधून बाहेर पडणारे पाणी सारखे राहते. ठिबक सिंचनाची सुविधा नसल्यास दुहेरी रिंग पद्धतीने सिंचनासाठी आळे करावे.
  2. संत्रा व मोसंबीच्या एक वर्षाच्या झाडाला प्रतिदिवस, प्रतिझाड 9 लिटर पाणी द्यावे. चार वर्षांच्या झाडाला प्रतिदिवस, प्रतिझाड 40 लिटर पाणी, आठ वर्षांच्या झाडाला प्रतिदिवस, प्रतिझाड 105 लिटर पाणी आणि दहा वर्षे व त्यावरील झाडाला प्रतिदिवस, प्रतिझाड 131 लिटर पाणी द्यावे.
  3. संत्रा व मोसंबीपेक्षा लिंबाच्या झाडाला पाण्याची गरज कमी असते. लिंबाच्या एक वर्षाच्या झाडाला प्रतिदिवस, प्रतिझाड 6 लिटर पाणी द्यावे. चार वर्षांच्या झाडाला प्रतिदिवस, प्रतिझाड 19 लिटर पाणी, आठ वर्षांच्या झाडाला प्रतिदिवस, प्रतिझाड 57 लिटर पाणी आणि दहा वर्षे व त्यावरील झाडाला प्रतिदिवस, प्रतिझाड 92 लिटर पाणी द्यावे.
  4. जमिनीची मशागत आणि निंदणी करावी.
  5. अंबिया बहराचे फळ तोडणे चालू करावे.
  6. फळगळ कमी करण्याकरिता 1.5 ग्रॅम 2,4-डी किंवा जिबरेलिक आम्ल आणि 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम (50 डब्ल्यूपी) आणि 1 किलो युरिया यांचे 100 लिटर पाण्यात द्रावण करून फवारणी करावी. 15 दिवसांनी पुन्हा दुसरी फवारणी करावी.
  7. मृग बहराच्या फळांचा आकार वाढविण्याकरिता एक ग्रॅम जिबरेलिक आम्लामध्ये मोनो पोटॅशिअम फॉस्फेट, डायअमोनिअम फॉस्फेट, पोटॅशिअम नायट्रेट 2 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे 15-20 दिवसांच्या अंतराने फवारावे.
  8. फायटोप्थोराग्रस्त झाडांवर मेटेलॅक्‍झील एम (मेफेनोक्‍झाम) अधिक मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक 2.75 ग्रॅम किंवा फोसेटील एएल 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घेऊन संपूर्ण झाड ओले होईपर्यंत फवारावे. हे द्रावण झाडाभोवतीही टाकावे.
  9. झाडाच्या बुंध्यावर 2 फुटांपर्यंत बोर्डो पेस्ट ब्रशने लावावी. बोर्डो पेस्ट तयार करण्याकरिता 1 किलो मोरचूद 5 लिटर पाण्यात 1 किलो चुना प्रति 5 लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र करून पेस्ट करावी.
  10. रोपवाटिकाधारकांनी खुंटासाठी रंगपूर किंवा जंबेरीच्या बियांची पेरणी प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये करावी.
  11. या महिन्यात फळातील रस शोषणाऱ्या पतंगाचाही प्रादुर्भाव असतो. या पतंगांना आकर्षित करून त्यांचे नियंत्रण करण्यासाठी 10 मि.लि. मॅलॅथिऑन किंवा 50 मि.लि. क्विनॉलफॉस प्रति 900 मि.लि. पाण्यात 100 ग्रॅम गूळ आणि 100 मि.लि. फळांचे रस मिसळून विषारी मिश्रण तयार करावे. एखाद्या प्लॅस्टिक ट्रेमध्ये ठेवून त्यावर प्रकाशाचा सापळा लावून बगीच्यामध्ये ठेवावे. गळलेली फळे गोळा करून मातीत दाबून नष्ट करावीत.
  12. या महिन्यात पिकलेल्या फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव असतो. नर माशीला आकर्षित करण्यासाठी 1 मि.लि. (0.1 टक्का) मिथाईल युजेनॉल आणि अर्धा मि.लि. (0.05 टक्का) मॅलॅथिऑनचे मिश्रण रुंद तोंडाच्या बाटलीत घेऊन बागेत ठेवावे. नर माश्‍या त्याकडे आकर्षित होऊन त्यास बळी पडतात. फळतोडणीच्या 60 दिवसांपूर्वीपासूनच या मिश्रणाच्या 25 बाटल्या प्रतिहेक्‍टर या प्रमाणात बागेत ठेवाव्यात. यातील कीटकनाशकाचे द्रावण दर 30 दिवसांनी बदलावे.
  13. कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसताक्षणीच डायकोफॉल 2 मि.लि. किंवा इथिऑन 2 मि.लि. किंवा प्रोपरगाईट 1 मि.लि. किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे द्रावण बनवून फवारणी करावी. आवश्‍यकता भासल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने घ्यावी.


संपर्क - 0712/ 2500325 
(लेखक राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र, नागपूर येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate