অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फळबाग बहार प्रक्रिया

वर्षभर फळे घेत राहिल्याने बागेतून मिळणाऱ्या फळांची संख्या व प्रत यावर परिणाम होतो, त्यामुळे फळझाडांना योग्य वेळी विश्रांती, पालेदार वाढ आणि फांद्यांची पक्वता यांचे नियोजन केले पाहिजे. या बहार प्रक्रियेतून अधिक व दर्जेदार उत्पादन मिळविता येते. 
फळबागेपासून फळांचे उत्पादन वाढविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धतीपैकी महत्त्वाची पद्धती म्हणजे बहार प्रक्रिया. अधिक फळासाठी सुरवातीच्या काळात झाडाची भरपूर पालेदार वाढ व्हावी लागते, दुसऱ्या टप्प्यामध्ये फांद्या पक्व करून घ्याव्या लागतात म्हणजे त्या फांद्यांवरील डोळे चांगले फुटून बहार येतो.

  • झाडाच्या पालेदार वाढीसाठी नत्राची, तर फांद्या व फळांच्या योग्य पक्वतेसाठी स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची आवश्यकता आहे. शिफारशीत खतांचा वापर केल्यास फूल व फळधारणा होण्यास फायदा मिळतो.
  • झाडांवर बहार येण्यासाठी उतीतील जीव-रसायन पातळी योग्य असली पाहिजे.
  • झाडांच्या फळधारणेवर कार्बन नायट्रोजन गुणोत्तराचा मोठा प्रभाव पडतो. फळांचे डोळे फुटण्याच्या सुमारास हे गुणोत्तर जास्त असते. झाडातील कार्बनचे प्रमाण कमी असते तेव्हा झाडाची पालेदार वाढ जास्त प्रमाणात होते. मात्र फळधारणा होत नाही.
  • कर्ब नत्र गुणोत्तर योग्य ठेवण्यासाठी झाडावर विशिष्ट उपचार करावे लागतात. यामध्ये पाण्याचा ताण देणे (उदा. संत्री), मुळ्या उघड्या टाकणे (उदा. पेरू), साल काढणे/गर्डलिंग (उदा. द्राक्ष) किंवा फांद्या वाकविणे (उदा. पेरू) यासारख्या पद्धतीचा वापर होतो. यामुळे झाडामधील कार्बोहायड्रेटचा साठा वाढून इच्छित कार्बन नायट्रोजन गुणोत्तर मिळते.

बहार का धरावा

विभागातील हवामानाप्रमाणे फळ झाडांना विशिष्ट हंगामात बहार येतो. 
  • काही फळ झाडांवर वर्षभर तीनही हंगामांत फुले, फळे येत असतात. अशा फळ झाडांना विश्रांती न मिळाल्याने झाडांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. फळझाडांची वाढ नियंत्रित न ठेवल्यास झाडांवर वर्षभर निरनिराळ्या आकारांची फळे दिसतात.
  • एका हंगामातील फळे झाडांवर असल्यास दुसऱ्या हंगामाचा बहार कमी प्रमाणात येतो. त्याशिवाय किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. वर्षभर फळ झाडांची राखण व फळांची तोडणी करावी लागते. उत्पादन खर्च वाढतो. पर्यायाने नफ्याचे प्रमाण घटते. म्हणून वर्षभर फुले व फळे येण्याचे चक्र नियंत्रित करून कोणत्याही एका हंगामात बहार धरणे उपयुक्त ठरते.
  • बहार प्रक्रियेमध्ये झाडांवर एकाच वेळी फळे तयार होतात. त्यांची तोडणी एका वेळी होऊन फळे बाजारात एकदम पाठविता येतात. किडी आणि रोगांचा प्रसार कमी राहतो. तसेच नियंत्रणही सुलभ होते. उत्पादन खर्चात बचत होते. झाडाचे उत्पादनयुक्त आयुष्य वाढण्यास मदत होते.

बहार प्रक्रिया

विशिष्ट हंगामात बागायती फळझाडांचे पाणी बंद केल्याने पाण्याचा ताण बसतो. याला विदर्भात ‘तडन’ (इंग्रजीत ‘स्ट्रेस’) असे म्हणतात. या काळात झाडांची पालेदार वाढ मंदावते. फांद्यामध्ये अन्नाचा भरपूर साठा होतो. पुढे या अन्नाचा उपयोग नवती (पालवी) फुटणे, त्यावर बहार धरणे, फळधारणा होणे आणि फळांच्या जोपासनेसाठी होतो. अशा प्रकारे एकाच हंगामात फळांचे भरपूर उत्पादन मिळविता येते.

बहार केव्हा घ्यावा

१. बागेत कलमांची किंवा रोपांची लावणी केल्यापासून पहिल्या तीन वर्षांत झाडांची पालेदार वाढ उत्तम आणि जोमदार करून, झाडांचा मजबूत सांगाडा तयार झाला पाहिजे. या काळात जर झाडांवर फुले आणि फळे वाढू दिल्यास झाडे कमजोर राहतात. म्हणून पहिली तीन वर्षे झाडावरील फुले व फळे खुडून टाकावीत. फळझाडांची योग्यतम वाढ झाल्यानंतर चौथ्या, पाचव्या वर्षी झाडांवर फळधारणा होऊ द्यावी. 
२. महाराष्ट्रातील हवामानात डाळिंब, पेरू, संत्री, मोसंबी, कागदी लिंबू या फळझाडांना नैसर्गिकपणे वर्षातून तीन वेळा नवीन पालवी फुटते आणि बहार येतो. 
  • मृग नक्षत्रात म्हणजेच जून-जुलै महिन्यात येणाऱ्या बहाराला ‘मृग बहार’ असे म्हणतात.
  • हस्त नक्षत्रात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये येणाऱ्या बहाराला ‘हस्त बहार’ असे म्हणतात.
  • जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये येणाऱ्या बहाराला ‘आंबे बहार’ असे म्हणतात.
३. बहार येण्यासाठी त्या झाडांना विश्रांतीची आवश्यकता असते. नैसर्गिकपणे ही विश्रांती मिळत नसल्यास पाण्याचा ताण देऊन झाडांना विश्रांती घेण्यास भाग पाडावे लागते. थोडक्यात म्हणजे भरपूर फळ उत्पादनासाठी झाडांना विश्रांती देऊन वर्षातून कोणत्याही एका हंगामात बहार घेणे फायदेशीर असते. मात्र कागदी लिंबाचा एकच बहार न धरता तीनही बहारांची फळे वर्षभर घेणे फायदेशीर ठरते.

 

बहार प्रक्रियेची निवड कशी करावी

  • बहार निश्चितीसाठी फळबागेची स्थानिक परिस्थिती, पाणीपुरवठ्याची सोय, मजुरांची उपलब्धता, किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव, फळांची प्रत, बाजारातील फळांची मागणी आणि बाजारभाव या बाबींचा विचार करावा.
  • उन्हाळ्यातही मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या व तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नसलेल्या बागेमध्ये आंबे बहार घेता येतो. या बहाराची प्रक्रिया नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात सुरू होते. या वेळी तापमान आणि सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी असते. सूर्यप्रकाशाचा काळही कमी असतो, त्यामुळे फुलोऱ्यास प्रतिबंध करणाऱ्या संजीवकाचे (जिबरेलिक ॲसिडचे) प्रमाण झाडामध्ये निसर्गतःच कमी असते. ताण देऊन हे प्रमाण आणखी कमी करता येते. तसेच या कालावधीत वळिवाचा पाऊस पडून ताणाच्या प्रक्रियेत अडचणी येण्याची शक्यता नसते. म्हणून आंबे बहार खात्रीचा असतो. ताण संपल्यानंतर पाणी दिल्यास नवीन पालवी फुटण्यास आणि बहार येण्यास संक्रांतीनंतर वाढणाऱ्या तापमानाचा फायदा होतो, त्यामुळे या बहाराला भरपूर फुले लागतात. मात्र या बहारासाठी बागेला नियमितपणे पाणीपुरवठा चालू ठेवावा लागतो. डाळिंबाचा आंबे बहार घेणे फायद्याचे ठरते. उन्हाळ्यात पाणीपुरवठा अपुरा पडणार असल्यास आंबे बहार घेणे तोट्याचे ठरते म्हणून मृग बहार घ्यावा.
  • मृग बहारासाठी एप्रिल-मे महिन्यापासून बागेचे पाणी बंद केले जाते. उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा लाभ घेता येतो. मात्र मृग बहारामध्ये उन्हाळ्यात वळिवाचा पाऊस पडल्यास अडथळे येत असल्याने हा आंबे बहाराइतका खात्रीचा नसतो. झाडांना पाण्याचा ताण अपुरा पडून फुलोऱ्याचे प्रमाण कमी होते.
  • हस्त बहाराचा काळ सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात येतो. या काळात पावसाळ्यातील अखेरचा पाऊस पडत असल्याने पाण्याचा ताण देणे शक्य होत नाही. याचाच अर्थ हस्त बहार घेणे शक्य होत नाही.

पाणयाचा ताण देण्याची पद्धत

  • पाण्याचा ताण देण्याची पद्धत जमिनीची प्रत आणि झाडांचे वय यावर अवलंबून असते. बहार येण्यापूर्वी झाडांच्या विश्रांतीची मुदत हलक्या जमिनीकरिता ३५ ते ४० दिवस, मध्यम भारी जमिनीकरिता ४५ ते ५५ दिवस आणि अतिभारी जमिनीकरिता ६० ते ७० दिवस ठेवावी लागते.
  • पाण्याचा ताण सुरू करण्यापूर्वी आधीच्या बहाराची सर्व फळे झाडावरून काढावीत. बागेचे पाणी हळूहळू कमी करत जाऊन नंतर पूर्णपणे बंद करावे. पाण्याच्या ताणास सुरवात झाली की जमिनीच्या मगदुराप्रमाणे २५ ते ३० दिवसांत पाने पिवळी पडून पानगळ सुरू होते. झाडाची ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत पानगळ झाली की विश्रांतीचा काळ पूर्ण झाला असे समजावे.
  • झाडांना जास्त ताण दिल्यास पानगळ मोठ्या प्रमाणावर होऊन काड्या मरतात. झाडाला हानी पोचते म्हणून पाण्याचा ताण अत्यंत काळजीपूर्वक द्यावा.
  • भारी जमिनीची आणि अयोग्य निचऱ्याच्या जमिनीमध्ये हलकी नांगरणी करावी. त्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागातील लहान मुळ्या तुटतात. झाडांचा पाणीपुरवठा कमी होतो. झाडांची वाढ तांबते. पूर्वी संत्रा झाडांना ताण देण्यासाठी जमीन खोदून बारीक मुळ्यांची छाटणी (चाळणी) करण्याची शिफारस होती. मात्र या पद्धतीचा झाडांवर दुष्परिणाम दिसून आल्याने सध्या ही शिफारस मागे घेण्यात आली आहे. सामान्यपणे तणांच्या नियंत्रणासाठी बागेची हलकी नांगरणी करावी. खोल नांगरणी मात्र करू नये.
  • पाणी दिल्यामुळे झाडाच्या आळ्यातील जमीन कडक बनते. ती कुदळीने खोदून भुसभुशीत करावी. पुन्हा झाडांभोवती आळी बांधावी. संत्री-मोसंबीच्या झाडांकरिता दुहेरी आळे पद्धतीचा उपयोग करावा. झाडाच्या वाळलेल्या तसेच रोगट फांद्या या काळात छाटून टाकाव्यात. छाटणीनंतर झाडावर शिफारशीत आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी. नवीन वाढणाऱ्या पालवीवर किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढणार नाही.

पाण्याचा ताण कसा सोडावा

  • पाण्याच्या ताणाची मुदत संपल्यानंतर पहिले पाणी (आंबवणी) अतिशय हलक्या प्रमाणात द्यावे. या पाण्यासोबत भरखते आणि अर्धी नत्राची मात्रा द्यावी. त्यानंतर पाण्याची दुसरी पाळी (चिंबवणी) ७ ते १० दिवसांनी द्यावी. या वेळी संपूर्ण स्फुरद आणि पालाशाची मात्रा द्यावी. तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी द्यावे. त्यानंतर शिफारशीप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
  • खते आणि पाणी दिल्यामुळे नवीन फूट जोमाने आणि झाडांना बहार येतो. ताण सोडल्यावर २० ते २५ दिवसांत झाडांवर बहार फुटतो. पाणी देण्यासाठी दुहेरी आळे पद्धतीचा वापर केल्यामुळे झाडाच्या खोडाजवळ पाणी साचून राहत नाही. कीड, रोगांचे सर्वेक्षण करून शिफारसीप्रमाणे नियंत्रणाकडे लक्ष ठेवावे.

संपर्क - 
- डॉ. सचिन बा. ठावरी, ९०९६३२२४६२ 
(रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय, पिपरी- वर्धा. ) 
- प्रा. कमलकिशोर नं. बारसे, ८२७५०३६७९५ 
(कृषी विज्ञान शाखा, ग्रामीण शिक्षण संस्था, पिपरी-वर्धा.)

-----------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन


अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate