অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिताफळ

प्रस्‍तावना

कोरडवाहू फळझाडांमध्‍ये सिताफळ हेक्‍टरी महत्‍वाचे फळपिक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने अवर्षणग्रस्‍त भागात आणि हलक्‍या जमिनीत केली जाते. फळबागांचे प्रस्‍थ विशेषतः कोरडवाहू भागात, पडिक आणि वरकस जमिनीत मोठया प्रमाणात वाढविणे ही एक आजच्‍या काळातील नितांत गरज होऊन बसली आहे. फार प्राचिन काळापासून सिताफळासारखे जंगल, द-या खो-यातले हेक्‍टरी कोरडवाहू फळझाड अगदी गरीबातल्‍या गरीबांचा रानमेवा म्‍हणून वरदायी ठरलेले आहे.

सिताफळाची लागवड प्रामुख्‍याने आंध्रप्रदेश, महाराष्‍ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्‍तरप्रदेश व बिहार राज्‍यात केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये बीड, जळगांव, औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सातारा व भंडारा या जिल्‍हयात सिताफळाची झाडे मोठया प्रमाणावर दिसून येतात. दौलताबाद व पुण्‍याची सिताफळे फारच स्‍वादिष्‍ट लागतात. अशा शेरा ब-याच चोखंदळ ग्राहकांकडून मिळतो.  मराठवाडयातील धारुर व बालाघाट ही गावे सिताफळासाठी प्रसिध्‍द आहेत. विदर्भात पवनी, भंडारा, गोंदिया, वाशिम, माहूर, तर सातारा जिल्‍हयात शिरवळ, कवठे, जवेळे, वाल्‍हे आणि खंडाळा फलटण तालुक्‍यातील काही ठराविक भाग सिताफळाकरिता यशस्‍वी लागवडीतून नावारूपाला येऊ लागला आहे. महाराष्‍ट्रात सन 1989-90 पर्यंत कोरडवाहू फळझाडाखाली एकूण 242100 हेक्‍टर क्षेत्र असताना त्‍यापैकी एकटया सिताफळाखाली 2800 हेक्‍टर क्षेत्र यशस्‍वी लागवडीची ग्‍वाही देणारे ठरले आहे. सन 1990 – 91 पासून सुरु झालेल्‍या रोजगार हमी योजनेशी निगडीत फलोत्‍पादन विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू फळझाडांच्‍या लागवडीस सिताफळाचा समावचेश करण्‍यात आलेला आहे. त्‍यामुळे सिताफळ लागवड ही शेतकरी बांधवांना चालून आलेली एक संधी आहे. महाराष्‍ट्रात सन 1990-91 पासून या योजनेअंतर्गत सिताफळाची यशस्‍वी लागवड 25906 हेक्‍टर क्षेत्रावर करण्‍यात आलेली आहे.

सिताफळ हेक्‍टरी अतिशय काटक फळझाड असून त्‍याचे लागवडीकडे अद्यापही शास्‍त्रीय दृष्‍टीने लक्ष देण्‍यात आलेले नाही. सिताफळाची पाने शेळयामेंढया, जनावरे किंवा इतर कोणताही प्राणी खात नाही म्‍हणून कोणत्‍याही प्रकारचे संरक्षण न करताही या फळझाडाची जोपासना सहज करता येते. बागेमध्‍ये कुंपणाच्‍या बाजूने या फळझाडाची लागवड करणे फायदेशिर ठरते. त्‍याचप्रमाणे बरड जमिन ओलाव्‍याची जागा, नदीकाठची जमीन, शेताचे बांध, माळराने, डोंगर उताराच्‍या जमिनी अशा वेगवेगळया प्रकारच्‍या जमिनीमध्‍ये या पिकाची लागवड करता येते.

सिताफळाचे उपयोग

सिताफळ हेक्‍टरी अत्‍यंत मधूर फळ आहे. सिताफळाचा गर नुसता खातात किंवा दुधात मिसळून त्‍याचे सरबत करतात. सिताफळामध्‍ये खनिजद्रव्‍ये आणि जीवनसत्‍वे उपलब्‍ध करून देण्‍याची चांगली क्षमता असल्‍यामुळे ते एक पुरक अन्‍न आहे. सिताफळाच्‍या ताब्‍या 100 ग्रॅम गरात पुढीलप्रमाणे अन्‍नघटक द्रव्‍यांचा समावेश होतो.

अ. नं.

घटक द्रव्‍ये

शेकडा प्रमाण

1.

पाणी

73.30

2.

प्रथिने

1.60

3.

खनिजे

0.70

4.

पिष्‍टमय पदार्थ

23.50

5.

चुना

0.20

6.

स्‍फुरद

0.47

7.

लोह

1.00

सिताफळाच्‍या झाडातील रसायने अभ्‍यासली असता. त्‍याचे औषधी आणि आयुर्वेदीक गुणधर्म देखील मोलाचे आहेत.  पानांचा वापर कडवट औषधे बनविण्‍यासाठी केला जातो तर बियांपासून तेलनिर्मिती करता येते व या तेलाचा उपयोग साबण निर्मितीसाठी केला जातो. ढेपेचा उपयोग खत म्‍हणून करतात. सिताफळांची भूकटी (पावडर) करून ती आईस्‍क्रीम बनविण्‍यासाठी वापरली जाते. तो एक छोटासा कुटिर उद्योग घरबसल्‍या महिलांना करण्‍यासारखा आहे. सिताफळाची मोठी झाडे जूनी झाली म्‍हणजे खोडावरील खरखरीत सालींची आणि वेडयावाकडया टणक वाळलेल्‍या फळांची कुटून बारीक पावडर करून ती कातडी कमविण्‍याच्‍या धंदयात देखिल वापरात आणता येते.

सिताफळाची लागवड शास्‍त्रीय दृष्‍टया  पुढिलप्रमाणे करता येते.

हवामान व जमीन

महाराष्‍ट्रातील  हवामानाचा विचार करता, सिताफळाची लागवड होण्‍यास भरपूर वाव आहे. अत्‍यंत कोरडया रखरखीत व उष्‍ण हवामानाच्‍या प्रदेशापासून भारी पाऊसमानाच्‍या हवामाना पर्यंतच्‍या प्रदेशात सिताफळ वाढते. मात्र उष्‍ण व कोरडया हवामानातील सिताफळे चविला गोड आणि उत्‍कृष्‍ट दर्जाची गुणवत्‍तेच्‍या बाबतीत सरस ठरतात असा अनुभव आहे. कोकणासारख्‍या जास्‍त दमटपणा असलेल्‍या भागाताही हे झाड वाढते. पण अशा हवामानात तेथील फळे आकाराने लहान येतो. आकाराने लहान असलेले हे फळझाड दमट हवामानामध्‍ये नेहमी हिरवेागर राहते. कमी पावसाच्‍या प्रदेशामध्‍ये डिसेंबर ते फेब्रूवारी  या काळात त्‍याची पान गळती होऊन झाडे विश्रांती घेतात. कडक थंडी व धुके या पिकाला मानवत नाही. थंड हवामानामध्‍ये फळे घटट व टणक राहून पिकत नाहीत. मोहोराच्‍या काळात कोरडी हवा आवश्‍यक असते. पावसाळा सुरु झाल्‍याखेरीज झाडांना फलधारणा होत नाही. सिताफळाचे झाड अवर्षणाला उत्‍तम प्रतिसाद देत असले तरी अति-अवर्षण मात्र या झाडाला अपायकारक ठरते. साधारणपणे झाडाच्‍या वाढीसाठी 500 ते 750 मिमि पाऊस आवश्‍यक असतो.

सिताफळाची लागवड ही अवर्षणग्रस्‍त भागासाठी शिफारस केली असल्‍यामुळे हेक्‍टरी फळझाड कोणत्‍याही जमिनीत येऊ शकते. अगदी खडकाळ रानापासून ते रेताड जमिनीत सुध्‍दा सिताफळाचे झाड वाढू शकते. अत्‍यंत हलक्‍या माळरानात जशी सिताफळाची वाढ चांगली होत, तशीच ही झाडे शेवाळयुक्‍त जमिनीत गाळमिश्रीत जमिनीत, लाल जमिनीत तसेच अगदी विस्‍तृत प्रकारच्‍या जमिनीतही निकोपपणे वाढतात. मात्र भारी, काळी, पाणी साठवून ठेवणारी अल्‍कलीयुक्‍त जमिनी या फळझाडाला अयोग्‍य ठरतात.

जाती

सिताफळाच्‍या 40 ते 50 विविध प्रजाती असून 120 जाती आहेत. अधिक उत्‍पादनासाठी अनेक जाती आहेत. बाळानगर ही मोठया फळाची चांगल्‍या गराची (48 टक्‍के ) जात असून आपल्‍या हवामानात आणि जमिनीत चांगली येते. अर्का सहान, अॅनोना हायब्रीड नं. 2 धारूर 3, 6 ऑयलॅड जेम्‍स, पिंक बुलक्‍स हाई, अॅर्टिमोया वॉशिंग्‍टन 10705, वॉशिंग्‍टन 98787 इ. जाती आहेत.

सुधारीत जाती

महाराष्‍ट्रात सिताफळाच्‍या नामवंत प्रचलित जाती बहूधा संशोधनातून विकसित झालेल्‍या नाहीत. आंध्रप्रदेशातील बाळानगर किंवा मॅमॉथ हया जाती उत्‍पादन व दर्जाचे दृष्‍टीने चांगल्‍या आढळून आलेल्‍या आहेत. वॉशिंग्‍टन पी-1, बारबाडोस या सुध्‍दा सुधारित जाती विकसित केलेल्‍या आहेत.

अभिवृध्‍दी

सिताफळाची लागवड प्रामुख्‍याने बियांपासून रोपे तयार करून केली जाते. ताजे बी तीन दिवस पाण्‍यात भिजून घालून नंतर पेरावे. रोप गादीवाफयावर किंवा पॉलिथीनच्‍या पिशवीत तयार करून पावसाळयामध्‍ये शेतात कायमच्‍या जागी लावावीत. ही रोपे पावसाळा संपल्‍यानंतर एकदा जगली की नंतर अवर्षणाला तोंड देत वाढू शकतात. सिताफळाचे डोळे भरून किंवा मृदुकाष्‍ट कलम सुध्दा करतात. कलमे करण्‍यासाठी स्‍थानिक सिताफळाचे खुंटाचा वापर करता येतो. त्‍याचप्रमाणे सिताफळाची अभिवृध्‍दी छाटे वापरून देखिल करता येते. मात्र छाटयांची अभिवृध्‍दी सहजासहजी होत नाही. छाटे घेण्‍यापूर्वी फांद्या जमिनीत गाडून नंतर त्‍या फांदयाची छाटे घेवून त्‍यांना 5000 पीपीएम एन ए ए चा वापर करून अतिसुक्ष्‍म तुषारगृहामध्‍ये ठेवल्‍यास छाटयांना मुळया फूटतात. सिताफळाच्‍या अभिवृध्‍दीसाठी डोळे भरणे, मृदकाष्‍ट आणि भेट कलम याव्‍दारे छाटयांपेक्षा अधिक यश मिळते.

लागवड

सिताफळाच्‍या लागवडीसाठी पावसाळयापूर्वी मे महिन्‍यात 0.60 बाय 0.60 बाय 0.60 मीटर आकाराचे खडडे जमिनीचा मगदुर पाहून घ्‍यावेत. 5 बाय 5 मिटर अंतरावर खडडे घ्‍यावेत.  5 बाय 5 मिटर अंतरावर लागवड केल्‍यास हेक्‍टरी 400 झाडे बसतात. हेक्‍टरी खडडे पावसाळयापूर्वी शेणखत, सिंगल सुपर फॉस्‍फेट, पोयटा मातीसह भरावेत. थायमेट 10 जी बांगडी पध्‍दतीने वापरण्‍यात यावे. यासाठी हेक्‍टरी अर्धा टन शेणखत 200 किलो सिंगल सुपर फॉस्‍फेटची आवश्‍यकता आहे. अशा प्रकारे खडडे भरल्‍यानंतर झाडाची लागवड पावसाळयात करावी.

खते

सिताफळाच्‍या झाडांना सहसा नियमितपणे खते दिली जात नाहीत. परंतु मोठे फळ व चांगले उत्‍पन्‍न येण्‍यासाठी पावसाळा सुरु झाल्‍याबरोबर प्रत्‍येक झाडाला  2 ते 3 पाटया चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्‍ट खत देणे योग्‍य ठरते. तसेच पहिल्‍या 3 वर्षापर्यंत प्रत्‍येक झाडांना पुढीलप्रमाणे खते द्यावीत.

वर्ष

नत्र (ग्रॅम)

स्‍फूरद (ग्रॅम)

पालाश (ग्रॅम)

1

125

125

125

2

250

250

250

3

375

250

250

5 वर्षापुढील प्रत्‍येक झाडाला 5 ते 7 पाटया शेणखत किंवा कंपोस्‍ट खत आणि 200 ते 500 ग्रॅम युरिया द्यावा.

पाणीपुरवठा

सिताफळ निसर्गतःच काटक फळझाड असल्‍याने वरच्‍या पाण्‍याशिवाय वाढू शकते. सिताफळाच्‍या पिकाला नियमित पाण्‍याची आवश्‍यकता नसते. निव्‍वळ पावसाच्‍या पाण्‍यावरही चांगले उत्‍पन्‍न येऊ शकते मात्र झाडाला पहिले 3 ते 4 वर्ष उन्‍हाळयात पाणी दिल्‍यास झाडांची वाढ चांगली होते. त्‍याचप्रमाणे फळधारणेनंतर साधारपणे सप्‍टेबर ऑक्‍टोबर महिन्‍यात पाण्‍याच्‍या 1 ते 2 पाळया दिल्‍यास भरपूर व मोठी फळे मिळतात.

बागेची निगा

  1. सिताफळाची रोपे लावल्‍यानंतर काही रोपे मेली असतील तर महिन्‍याचे आत नांग्‍या भरून घ्‍याव्‍यात. तसे शक्‍य न झाल्‍यास पुढील वर्षी जून महिन्‍यापूर्वी नांग्‍या भराव्‍यात.
  2. खुरपणी करून बागेतील तण काढावेत.
  3. रोपे लहान असताना पावसाचा ताण पडल्‍यास मधून मधून पाणी द्यावे.
  4. झाडाची वाढ जोमाने होण्‍याकरिता व चांगले फळ मिळण्‍याकरिता छाटणी करावी. छाटणी करताना झाडाला योग्‍य वळण सुरुवातीच्‍या वाढीच्‍या काळात द्यावे. त्‍यासाठी झाडावरील अनावश्‍यक फांद्या काढून टाकाव्‍यात.
  5. पावसाचा ताण जास्‍त पडल्‍यास 15 ते 20 दिवसांनी पाणी द्यावे.
  6. बागेमध्‍ये वेळोवेळी आंतर मशागत करावी.

आंतरपिके

सिताफळाचे झाड लहान असेपर्यंत त्‍यात जमिनीच्‍या मगदुरानुसार चवळी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, हरभरा, कलिंगड इत्‍यादी पिके घेता येतात.

बहार धरणे

बहार धरण्‍याच्‍या तंत्रांत पाणी तोडण्‍याची पनध्‍दत प्रथम विचारात घ्‍यावी. ताण देण्‍याचा काळ हा जमिनीच्‍या प्रतीनुसार आणि झाडांच्‍या वयोमानानुसार

कमी जास्‍त होऊ शकतो. विश्रांतीचा काळ बहार येण्‍यापूर्वीच हलक्‍या जमिनीत 35 ते 40 दिवस मध्‍यम भारी जमिनी 45 ते 55 दिवस अतिभारी जमिनीत 60 ते 70 दिवस ठेवावा. सर्वसाधारणपणे झाडांची 35 ते 50 टक्‍के पानगळ झाल्‍यानंतर झाडांना विश्रांती मिळाली असे समजावे.

ताण सुरु करण्‍यापूर्वी अगोदरच्‍या बहाराची सर्व फळे झाडावरून उतरवून घेणे गरजेचे असते. ताण देण्‍यापूर्वीच आवश्‍यक फळे, फूले, वाळलेली फळे झाडावर असल्‍यास ती काढून टाकावीत. त्‍यानंतर बागेचे पाणी हळूहळू कमी करत जाऊन नंतर बंद करावे.

काढणी, प्रतवारी, पॅकिंग व साठवण

सिताफळामध्‍ये डोळे उघडणे ही क्रिया पूर्ण झाली म्‍हणजे झाडावरची फळे उतरविण्‍यास काही हरकत नाही. बहूदा सिताफळाची लागवड केल्‍यापासून 5 ते 6 वर्षानी फळे मिळू लागतात. कलमे केलेल्‍या झाडांना 3 ते 4 वर्षात फळे लागण्‍यास सुरुवात होते. सिताफळांच्‍या झाडांना जून, जूलै मध्‍ये फूले येण्‍यास सुरुवात होते. फूले आल्‍यावर फळे तयार होण्‍यास सर्वसाधारणपणे 5 महिन्‍यांचा कालावधी लागतो. फळे सप्‍टेबर ते नोव्‍हेबर मध्‍ये तयार होतात. आणि दसरा, दिवाळीच्‍या सुमारास सिताफळे बाजारात येतात. शेतकरी बांधवांनी सर्वसाधारणपणे सिताफळाच्‍या बहरात फळधारणेपासून 100 ते 130 दिवस काढणीसाठी ग्राहय धरावेत अशा वेळी फळांचे खवले (कडा) उकलू लागल्‍या व आतील दुधाळ भाग किंचित दिसू लागला की फळे तयार झाली असे समजून फळांची काढणी करावी.

प्रतवारीसाठी पाडावर आलेली फळे काढून आकाराप्रमाणे निवडून काढावीत. मोठी व आकर्षक फळे निवड करून अ ग्रेड ची म्‍हणून बाजूला काढावीत. फळे मध्‍यम आकाराची असल्‍यास ती ब ग्रेड ची म्‍हणून निवडावीत आणि राहिलेली लहान सहान फळे ही क ग्रेडची म्‍हणून समजावीत.

स्‍थानिक बाजारपेठांकरिता जर माल पाठवायचा असेल तर उपलब्‍धतेनुसार बांबूच्‍या करंडयात खालीवर कडूलिंबाचा पाला घालून त्‍यात फळे व्‍यवस्थित भरावीत व फळे विक्रीसाठी तयार झालेली वेडयावाकडया आकाराची फळे शक्‍यतो अगदी जवळच्‍या स्‍थानिक बाजारात त्‍वरीत विकून टाकावीत.

सिताफळ हेक्‍टरी जास्‍त नाशवंत फळ असल्‍यामुळै ते जास्‍त दिवस साठविता येत नाही. शितगृहातसुध्‍दा सिताफळ जास्‍त दिवस ठेवता येत नाहीत आणि समजा मोठया प्रमाणात व्‍यापारी तत्‍वावर उत्‍पादन करणा-या या शेतकरी बांधवांनी सामुहीकपणे शितगृहाची व्‍यवस्‍था उपलब्‍ध केल्‍यास या फळासाठी शितगृहातील साठवणूकीचे तापमान 39 ते 42 फॅरनहिटस तर आर्द्रता 45 ते 90 टक्‍के राखावयास हवी. असे झाल्‍यास साठवणूकीचा कालावधी 5 ते 6 आठवडे राहतो.

प्रक्रिया

सिताफळाचे मार्मालेट, जामसाठी उपयोग, डबाबंद सिताफळ (कॅनिंग) घरगुती आणि व्‍यापारी तत्‍वावर शितपेय गृहउद्योगात आईस्क्रिम बनविण्‍यासाठी सिताफळाची भूकटी (कस्‍टर्ड पाऊडर) इत्‍यादी प्रकारे सिताफळाचे प्रक्रियाबाबत वाव आहे.

स्त्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 8/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate