অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ठिबकवर वांग्याची शेती

सातारा जिल्ह्यातील सुनील मिळशेटे यांची आदर्श नियोजनातील शेती

सातारा जिल्ह्यातील काही भाग डोंगरी आहे. या भागात पाणीटंचाईमुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. विहीर असूनही पाण्याअभावी हंगामी शेती करावी लागते. त्यामुळे अनेकजण उदरनिर्वाहासाठी मुंबईचा रस्ता धरतात. मात्र, मरळी येथील सुनील शंकर मिळशेटे यांनी पॉलिमल्चिंग व ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून यंदाच्या दुष्काळात आपल्या शेतीत सकारात्मक चित्र निर्माण केले आहे. 
पाल खंडोबापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर बाराशे लोकसंख्या असलेले पाटण तालुक्‍यातील (जि. सातारा) मरळी हे गाव. गावचा भोवताल डोंगराळ असून मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे, यामुळे अनेक शेतकरी हंगामी शेती करतात; मात्र पाण्याचे योग्य व्यवस्थापन तसेच सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करत गावातील सुनील मिळशेटे यांनी शेतीतील आपला पाया घट्ट केला आहे. त्यांना एकूण सहा एकर जमीन आहे. त्यातील चार एकर जमीन पाण्याअभावी हंगामी व अवघी दोन एकर कशीबशी बागायत केली जाते. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून त्यांनी वांगी, सोयाबीन, शाळू व भात पिकवला आहे. विहीर असूनही पाणी नसल्यामुळे 2011 मध्ये त्यांनी बोअरवेल घेतले, त्याला दीड इंच पाणी लागले; मात्र ते एकसारखे येत नसल्यामुळे पाण्याची शेततळ्यात साठवणूक करून ते ठिबकद्वारे व सायफनद्वारे शेताला दिले. खरिपात सोयाबीनचे बीजोत्पादन त्यांनी घेतले आहे. चार गुंठ्यांत बेडवर घेतलेल्या कांद्याचे एक टनापर्यंतचे उत्पादन मिळाले होते, त्याची हातविक्री केली. रब्बी हंगामात एक एकरात शाळू घेतला. यात 13 क्विंटल उत्पादन मिळाले. शाळूची व्यापाऱ्यांना विक्री न करता ती थेट ग्राहकांना विकली, त्याला प्रति क्विंटल दोन हजार दोनशे रुपयांपर्यंत दर मिळाला. केळीची फेब्रुवारीत 2012 मध्ये लागवड केली आहे. यंदा वादळामुळे नुकसान झाले असले तरी आतापर्यंत काही उत्पन्न हाती आले आहे. केळीस सायफन पद्धतीने पाणी दिले जाते. पूरक भाजीपाला म्हणून अळू असून त्याची आठवड्याला विक्री केली जाते.

मल्चिंगवर व ठिबकवर वांग्याची लागवड

मिळशेटे यांच्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष कायम असल्याने त्यांनी पाण्याची बचत करण्याच्या दृष्टीने व चांगले उत्पादन मिळावे यासाठी पॉलिमल्चिंग पेपरचा वापर करण्याचे ठरवले, त्याला ठिबक सिंचनाची जोड दिली. गावात पॉलिमल्चिंगचा हा पहिलाच प्रयोग होता. सुमारे 12 गुंठे क्षेत्र त्यासाठी निवडले. लागवडीचे नियोजन करताना सुरवातीला दोन ट्रेलर शेणखत वापरले. त्यानंतर रासायनिक खत, गांडूळ खत व सूक्ष्म अन्नद्रव्ये मातीत मिसळून बेड तयार केले. त्यानंतर मल्चिंग पेपरचे आच्छादन केले. त्यानंतर रोपांची लागवड केली. आवश्‍यकतेनुसार 19-19-19, 12-61-0, 0-52-34 व सूक्ष्म अन्नद्रव्ये ठिबक सिंचनाद्वारे दिली.

पाणी व्यवस्थापन

वांग्याची रोपे दोन महिन्यांची असेपर्यंत ठिबकद्वारे प्रति दिवस एक तास पाणी दिले, त्यानंतर प्रति दिवस दोन तास पाणी दिले जाते. उन्हाची तीव्रता वाढल्यावर पंपाद्वारे पाण्याच्या फवारण्या दिल्या. बोअरवेलमधून पाणी उपसा केल्यावर एकसारखे पाणी येत नाही, त्यामुळे 20 बाय 20 बाय 10 फूट क्षेत्रफळाचे छोटे शेततळे तयार केले आहे, त्यात पाण्याची साठवणूक केली जाते. अन्य पिकांना सायफन पद्धतीने पाणी दिले जाते. 
पीक संरक्षण - फुलकळी सुरू झाल्यावर वांग्यावर शेंडाअळीचा प्रादुर्भाव झाला होता, त्या वेळी रासायनिक फवारणी घेऊन किडीचे नियंत्रण केले. पांढरी माशी नियंत्रणासाठीही फवारणी घेतली, सापळ्यांद्वारेही किडीचा प्रादुर्भाव रोखला.

मिळशेटे यांच्या शेती नियोजनाची वैशिष्ट्ये

  • झाडांवर फळांचा भार येऊ नये, फळे जमिनीस टेकू नयेत यासाठी तार- काठीचा वापर करून रोपे बांधली.
  • वांगी निरोगी राहण्यासाठी गोमूत्राचा वापर
  • खते ठिबक सिंचनाद्वारे दिली जातात.
  • गावात प्रथमच ठिबक सिंचन व पॉलिमल्चिंग पेपरचा वापर केला.
  • पाणी साठवणुकीसाठी छोटेखानी शेततळे
  • गांडूळ खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांवरही भर

मिळशेटे यांच्याकडून शिकण्यासारखे

  • वांगी तसेच अन्य भाजीपाला बाजारपेठेचा अंदाज घेऊन विक्रीचे नियोजन
  • आठवडा बाजारात विक्री केली जात असल्याने आडत, हमाली यांसारख्या खर्चात बचत
  • दुग्ध व्यवसायाद्वारे पूरक उत्पन्न
  • दरवर्षी सोयाबीन बीजोत्पादन. एकरी सुमारे सात ते दहा क्विंटल उत्पादन घेतले जाते, त्याला किलोला 60 ते 70 रुपये दर मिळाला आहे. यंदाही बीजोत्पादनाचे नियोजन.
  • पीक संरक्षणात घरच्याघरी स्टिकी ट्रॅप (चिकट सापळे) तयार केले जातात. पिवळ्या कागदावर ग्रीस लावून तो शेतात लावला जातो.
  • लागवडीच्या सुरवातीपासून पिकाचे उत्पादन व खर्चाची सर्व टिपणे ठेवली जातात.

अर्थशास्त्र

सुमारे 12 गुंठे क्षेत्रास रोपे, नांगरट, रोटर, बेड तयार करणे, ठिबक सिंचन सेट, मल्चिंग पेपर, शेणखत, सूक्ष्म अन्नद्रव्ये, गांडूळ खत, रासायनिक खते व मजुरी असा एकूण सुमारे 35 हजार रुपये खर्च झाला. मार्चपासून तोडे सुरू झाले. आठवड्यातून दोन तोडे होतात. सुरवातीच्या तोड्यास किलोला 20 रुपये दर मिळाला, त्यानंतर किमान 10 ते कमाल 30 रुपये दर प्रति किलो मिळाला. आतापर्यंत चार टनांपर्यंत उत्पादन मिळाले आहे. सरासरी 15 रुपये दराप्रमाणे 60 हजार रुपये मिळाले आहेत. अजूनही दोन टनांपर्यंत उत्पादन मिळेल असा अंदाज आहे. सध्या प्रति किलो 25 रुपये दर आहे. एकूण हंगामात वांग्यापासून सुमारे 30 ते 35 हजार रुपयांचा नफा मिळशेटे यांना अपेक्षित आहे.
त्यांच्याकडे तीन गाई व चार कालवडी आहेत. दररोज 12 ते 14 लिटर दूध परिसरातील संघाला दिले जाते. या व्यवसायातून महिन्याला सात हजार रुपयांपर्यंत मिळकत होते, शिवाय शेणखत उपलब्ध होते. त्याचा वापर शेतीसाठी तसेच बायोगॅस म्हणूनही होतो. अळूच्या विक्रीतून दर आठवड्याला 100 ते 150 रुपये मिळतात. 

बाजारपेठेचा अभ्यास

मिळशेटे आपला माल मोठ्या बाजारपेठेत नेऊन विकण्यापेक्षा आठवडा बाजारातच विकण्याचा प्रयत्न करतात. बहुतांशी मालाची विक्री उंब्रजला होते. आठवडा बाजाराच्या दिवशी स्वतः हातविक्री करतात, अन्य दिवशी बाजारात फिरून दराचा अंदाज घेतला जातो. तेथील किरकोळ व्यापाऱ्यांना मालाची विक्री केली जाते. अशा प्रकारे विक्री केल्याने आडत, हमाली यासारख्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते. सातत्याने पैसे येत असल्याने कुटुंबाला आर्थिक हातभार लागतो. सध्या शाळू व कांद्याची विक्री घरातच वजन काटा लावून केली जाते.

मल्चिंगविषयीची माहिती ठरली उपयोगी

"ऍग्रोवन'मधील मल्चिंगविषयीची माहिती अत्यंत उपयुक्त ठरली, ती वाचूनच वांग्यामध्ये त्याचा प्रयोग केला. 
शेतकऱ्यांच्या यशोगाथा तसेच लेखांची कात्रणे ठेवतो. तालुका कृषी अधिकारी शिवप्रसाद मांगले यांनी वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन केले. शेतीत पत्नी सौ. रोहिणी व मुलांची मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
संपर्क - सुनील मिळशेटे - 9765790955

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate