অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लाल भोपळा

लाल भोपळा

लाल भोपळा

(तांबडा भोपळा; हिं. कद्दू, विलायती कद्दू; इं. कॉमन गोर्ड, रेड गोर्ड, स्क्वाश गोर्ड, यलो गोर्ड, स्पॅनिश गोर्ड, टर्बन गोर्ड, ट्रू स्काश, विंटर स्काश, ग्रेट पंपकिन, मेलॉन पंपकिन, रेड पंपकिन; लॅ. कुकर्बिटा मॅक्सिमा; कुल-कुकर्बिटेसी). हा भोपळा इतिहासपूर्वकाळातही लागवडीत होता, असे मानावयास जागा आहे. रेड इंडियन लोकांच्या थडग्यांतील अवशेषांवरून इ. स. पू. २००० वर्षे भोपळ्याचा खाद्यपदार्थ म्हणून वापर होत असावा असे दिसते.

कु. मॅक्सिमा या जातीच्या मूलस्थानाविषयी निश्चित माहिती नाही; परंतु ती मूळची आशियातील असावी असे मानतात. तिची वेल जमिनीवर सरपटत किंवा घरांची छप्परे अथवा मांडव यांवर वाढते. खोड जवळजवळ लंबगोलाकृती, केसाळ अथवा अल्प प्रमाणात ताठर केसरयुक्त असून त्यावर मोठी, साधी, एकाआड एक, गोलाकार अथवा मूत्रपिंडाकृती, केसाळ पाने असून ती पाच गोलाकार उथळ खंडयुक्त अथवा खंडविरहित असतात. तळाशी ती हृदयाकृती असून त्यांची किनार दातेरी असते. पानांचे देठ जवळजवळ पानांच्या लांबीचे असून त्यांवर ताठर केस नसतात.

पुं-पुष्पे व स्त्री – पुष्पे मोठी, एकाच वेलीवर परंतु स्वतंत्र वाढणारी, पिवळी व घंटेच्या आकाराची असून पानांच्या बगलेत येतात. पुं-पुष्पांचे देठ सु. १० सेंमी. लांब आणि स्री-पुष्पांचे देठ सु. ४ सेंमी. लांब असतात. पुष्पमुकुटाची नलिका वरपासून खालच्या टोकापर्यंत सारख्याच व्यासाची असते. पाकळ्या मोठ्या, मऊ, रुंद पसरणाऱ्या अथवा बाहेरच्या बाजूला वळलेल्या अथवा लोंबत्या असतात. संदले कुंतसम (भाल्यासारखी) ते रेषात्मक असतात .

मृदुफळे विविध आकारमानाची, जाड व कठीण सालीची असून त्यांचे देठ जाड, गोलाकार अथवा गदाकृती, गुळगुळीत व सच्छिद्र असतात व त्यावंर कंगोरे नसतात. ते फळाशी जेथे जोडलेले असतात तेथील त्यांचा भाग ठळकपणे दिसून येण्यासारखा पसरट नसतो. फळांचा आकार गोल किंवा लंबगोल असून त्यांवर उथळ कंगोरे व खोबणी असतात; रंग पिंगट पिवळा असून पिकल्यावर त्यात गोडसर, पिवळट किंवा लालसर रवाळ (सूक्ष्मकणयुक्त) मगज (गर) असतो.

बिया अनेक, मोठ्या, सपाट, पांढऱ्या किंवा पिंगट ते गर्द तपकिरी असून त्यांची किनार तशाच रंगाची असते. या जातीच्या काही प्रकारांची फळे फार मोठी (सु. २.१ ते २.४ मी. घेराची व सु. १००-१५० किग्रॅ. वजनाची) असतात व ती ⇨कुकर्बिटेसी कुलातील (कर्कटी कुलातील) फळांत सर्वांत मोठी असतात. इतर सामान्य लक्षणे कुकर्बिटेसी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

पाने, फुले व फळे भाजीसाठी वापरतात. फळातील मगज मिठाई बनविण्यासाठी वापरतात. भाजल्यामुळे झालेल्या जखमा व दाह यांवर त्याचा वापर करतात. बियाही खाद्य असून त्यांचा वापर मिठाईत केला जातो; तसेच त्या पौष्टिक, मूत्रल (लघवी साफ करणाऱ्या) व पट्टकृमिनाशक आहेत. बियांतील स्थिरतेल तंत्रिका तंत्रास (मजासंस्थेस) पौष्टिक असते. फळे बरेच दिवस टिकतात.

भाजीसाठी लागवडीत असलेल्या व भोपळा या सर्वसाधारण नावाने परिचित असलेल्या फळाच्या निरनिराळ्या प्रकारांचा कुकर्बिटावंशातील पुढील तीन जातींत समावेश होतो

(१) कु. मॅक्सिमा (लाल भोपळा), (२) कु. मोशाटा (काळा भोपळा) व (३) कु. पेपो . या सर्व वर्षायू (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण होणाऱ्या), कमीजास्त प्रमाणात केसाळ, आरोही (आधाराने वर चढणाऱ्या) किंवा सरपटणाऱ्या वेली असून त्यांना तारेसारखे लांब ताणे (तणावे) असतात. या तीन जातींच्या इंग्रजी व भारतीय स्थानिक नावांमध्ये मुळीच एकसूत्रीपणा दिसून येत नाही; परंतु त्यांच्यामध्ये वानस्पतिक भेद स्पष्ट असून त्यावरून त्या ओळखणे शक्य होते. तीन जातींतील ठळक भेद पुढे दिले आहेत कु. पेपो या जातीच्या वेलावरील केस सर्वांत जाड व टोचणारे असतात.

त्या खालोखाल कु. मोशाटा व त्यानंतर कु. मॅक्सिमाचा याबाबतीत क्रमांक लागतो. कु. मोशाटाच्या पानांवर पांढरट ठिपके असतात; इतर दोन जातींत ते नसतात. कु. मोशाटाच्या स्त्री-पुष्पाच्या संवर्ताचे खंड मोठे व पानासारखे असतात. इतर दोन जातींत ते आराकृती (काहीसे लंबगोलाकृती व टोकाकडे निमुळते) असतात. कु. मोशाटाच्या फळांचा देठ तळाशी पसरट असतो, तसा तो इतर दोन जातींत नसतो. तसेच त्या जातीच्या फळांवरील मृदुलक (हिरव्या-निळ्या रंगाचे नाजूक मखमली आवरण) वैशिष्ट्यपूर्ण असते. कु. मॅक्सिमाच्या पुष्पमुकुटाची नलिका वरपासून खालपर्यंत सारख्या व्यासाची असते. इतर दोन जातींत ती खालून वर रुंद होत जाते.

लाल भोपळ्याचा अर्का सूर्यमुखी हा सुधारित प्रकार उपलब्ध असून त्याची फळे लहान (सु. १ किग्रॅ. वजनाची), गोल व दोन्ही बाजूंना चपटी असतात. सालीचा रंग गर्द नारिंगी अथवा पिवळा असतो. आतील मगजाला चांगला स्वाद असून तो घट्ट आणि भडक नारिंगी असतो. हा प्रकार फळमाशीला प्रतिकारक आहे. हेक्टरी उत्पादन सु. २४,५०० किग्रॅ. मिळते व फळे १०० दिवस टिकतात. याखेरीज या भोपळ्याचे अनेक प्रकार भारतात व इतरत्र लागवडीत आहेत. काही प्रकारांची फळे मोठी (२.२ ते २.४ मी. परिघाची व ९० ते १३५ किग्रॅ. वजनाची) असतात.

लागवडीचे तपशील, रोग व किडी इ. काळ्या भोपळ्याप्रमाणे असता.

फळात ९२.६% जलांश, १.४% प्रथिने, ०.१% वसा (स्निग्ध पदार्थ) व ५.३% कार्बोहायड्रेटे असतात.

 

संदर्भ : 1. Chauhan, D. V. S. Vegetable Production in India, Agra, 1972.

2. Choudhury, B. Vegetables, New Delhi, 1967,

3. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, Delhi, 1950.

लेखक -  ब. ग. क्षीरसागर / शं. आ. परांडेकर / वा. पु. गोखले

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate