অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

परिचारिका करिअर यशाचा राजमार्ग

आरोग्य क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. डॉक्टरांबरोबरच अनेकजन या क्षेत्रात कार्यरत असतात. मानवसेवा ही भूमिका घेऊन करिअर करू इच्छित असणाऱ्यांसाठी परिचारिका (नर्सिंग) हा उत्तम पर्याय होऊ शकतो. गरजवंताचे संगोपन करणे, संवर्धन करणे, पोषण करणे तसेच त्यांना शिक्षण देण्याचे कार्य जी व्यक्ती करते, तिला 'परिचारिका' असे ढोबळ मानाने म्हणतात. सामाजिक आरोग्यसेवा पुरविणे, माता-बाल सेवा पुरविणे तसेच नर्सिंगसंबंधीचे प्रशासन तसेच व्यवस्थापन विषयक कामे पाहणे रुग्ण व नातेवाईकांना आरोग्य सल्ला देणे अशी कामे त्यांना करावी लागतात. अलिकडे समुपदेशनाचे कार्यही परिचारिका करीत आहेत. हे क्षेत्र तरुणींसाठी जास्त सुरक्षित असल्याचे मानले जाते. केरळ व इतर दक्षिणेतील तरुणींचा या क्षेत्राकडे जास्त ओढा असल्याचे दिसून येते. परदेशातही नोकरीच्या अनेक संधी आता सहजरीत्या उपलब्ध होत आहेत. देशातही रुग्णालयांची संख्या वाढते आहे आणि उपलब्ध मनुष्यबळाची आवश्यकता भासत आहे. अधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या या क्षेत्रात करिअर करतानाचे अचूक टप्पे कोणते याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत. 

पात्रता आणि प्रवेशप्रक्रिया



दहावी नंतर एएनएम (Auxiliary Nurse Midwifery) हा कोर्स पूर्ण करता येतो याचा कालावधी दीड वर्षाचा असतो तसेच जीएनएम (General Nursing & Midwifery) हा कोर्स बारावी नंतर करता येतो यासाठी भौतिक, रसायन आणि जीवशास्त्र या विषयात किमान चाळीस टक्के गुणांनी उत्तीर्ण असायला हवे. तसेच या क्षेत्रात येण्यासाठी पदवी कोर्स म्हणजे बीएस्सी इन नर्सिंग हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. बारावी विज्ञान शाखेत जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विषय घेतलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. हा अभ्यासक्रम बहुतेक सर्व शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहे. प्रवेश परीक्षा घेऊन प्रवेश दिला जातो. 

कामाच्या संधी


बीएस्सी नर्सिंग हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पदव्युत्तर पदवी स्तरावर स्पेशलायझेशन करता येते. हे स्पेशलायझेशन कार्डिओ थोरॅसिक नर्सिंग, क्रिटिकल केअर नर्सिंग, इमर्जन्सी अ‍ॅण्ड डिझास्टर नर्सिंग, निऑनॅटल नर्सिंग, न्युरो नर्सिंग, नर्सिंग एज्युकेशन अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, ऑन्कॉलॉजी नर्सिंग, ऑपरेशन रूम नर्सिंग, ऑर्थोपेडिक अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन नर्सिंग, सायकियाट्रिक नर्सिंग अशा क्षेत्रांमध्ये करता येते. या क्षेत्रात काम करताना हॉस्पिटल्स नर्सिंग होम्स, औद्योगिक घरे, संरक्षण सेवा, संशोधन नर्स, पुरवणी परिचारिका आदी ठिकाणी नोकरीस्वरुपात काम करता येते. तसेच अनेक शासकीय रुग्णालयात देखील नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात. तसेच नर्सिंग कौन्सिलशी नोंदणीकृत झालेल्या नर्सेस स्वत:ची नर्सिंग ब्यूरो स्थापन करू शकतात व गरजू रुग्णांना स्वतंत्र नर्सिंग सेवा देऊ शकतात. आपल्या देशातील नर्सिंग शिक्षण हे जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त असल्याने आपल्या देशातील परिचारिकांना विदेशात प्रचंड मागणी आहे.

प्रशिक्षण संस्था


नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ या संस्थेमार्फत बीएस्सी इन नर्सिंग, बेसिक बीएसस्सी इन नर्सिंग, फेलोशिप कोर्स इन ऑर्थोपेडिक अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन इन नर्सिंग, फेलोशिप कोर्स इन ऑपरेशनरूम नर्सिंग, पोस्ट सर्टिफिकेट इन बीएस्सी इन नर्सिंग, सर्टिफिकेट इन बीएस्सी इन नर्सिंग हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

इंदोर येथील बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग या संस्थेच्या बीएस्सी इन नर्सिंग या अभ्यासक्रमाला ४० विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो. प्रवेशपरीक्षेतील यशस्वी उमेदवारांना अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. पत्ता- बॉम्बे हॉस्पिटल, रिंगरोड, इंदोर- ४५२०१०. अधिक माहिती www.bombayhospitalindore.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (अभिमत विद्यापीठ) या संस्थेच्या बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाला देशस्तरीय सामायिक प्रवेश चाचणी एआयईटी, या परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. एकूण जागा ५० असतात. ही परीक्षा मे महिन्यात नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, हैद्राबाद, नवी दिल्ली या केंद्रांवर घेतली जाते. पत्ता- ८६९, ई कसबा बावडा, कोल्हापूर- ४१६००६. ई मेल- info@dypatilunikop.org

कऱ्हाड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेकडून कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (अभिमत विद्यापीठ) अंतर्गत बॅचलर ऑफ नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशस्तरीय सामायिक प्रवेश चाचणी मे महिन्यात मुंबई, नागपूर, पुणे या शहरांमध्ये घेतली जाते. या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांला बारावी विज्ञान परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी या विषयांमध्ये सरासरीने ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. पत्ता- कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस युनिव्हर्सिटी कराड. वेबसाइट- www.kimsuniversity.in

भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नर्सिग (सांगली, पुणे आणि नवी मुंबई) येथे बीएस्सी इन नर्सिंग हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. पत्ता- भारती विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ, भारती विद्यापीठ भवन, दुसरा मजला, सीईटी डिपार्टमेंट, एलबीएस मार्ग, पुणे- ४११०३०. वेबसाइट- www.bharatividyapeethuniversity.net

कोकिलाबेन धीरुभाई अंबानी कॉलेज या संस्थेने बीएस्सी इन नर्सिंग हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. येथे ५० विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो. निवडीसाठी शासनाच्या सामायिक प्रवेश चाचणी किंवा खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या असोसिएट सीईटीमधील गुणांचा आधार घेतला जातो. पत्ता- कोकिलाबेन हॉस्पिटल, चार बंगला, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००५३. 

खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंग अभ्यासक्रम - असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ अनएडेड प्रायव्हेट मेडिकल अ‍ॅण्ड कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र या संस्थेमार्फत मेडिकल सामायिक प्रवेश चाचणीसाठी सीईटी साधारणत: मे महिन्यात घेतली जाते. या परीक्षेद्वारे ५३ नर्सिग महाविद्यालयांतील २२४० जागा भरण्यात येतात. (दरवर्षी यात वाढ होऊ शकते.) पत्ता- असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ अनएडेड प्रायव्हेट मेडिकल अ‍ॅण्ड कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र, एएमयूपीएमडीसी ऑफिस, श्रीजी हाऊस, ७५, मिंट रोड, फोर्ट, मुंबई- ४००००१. 

अमृता विद्यापीठम या संस्थेच्या स्कूल ऑफ नर्सिंगमार्फत बॅचलर ऑफ नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मे महिन्यात अमृतापुरी, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोची, कोलकाता, कोझिकोड, नवी दिल्ली, थिरुवनंतपूरम या ठिकाणी प्रवेश परीक्षा घेतली जाते. अर्हता- बारावी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा जैवरसायनशास्त्र या विषयांमध्ये सरासरी ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. पत्ता- द अ‍ॅडमिशन, को-ऑर्डिनेटर, ऑफिस ऑफ द अ‍ॅडमिशन्स, अमृता इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, एआयएमएस- पोनेक्करा, पोस्ट ऑफिस- कोची- ६८२०४१ केरळ. वेबसाइट- www.amrita.edu

इतर महाविद्यालये

  1. कस्तुरबा नर्सिंग कॉलेज, वर्धा (अभ्यासक्रम- बीएस्सी इन नर्सिंग)
  2. सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, कोल्हापूर (अभ्यासक्रम- बेसिक बीएस्सी इन नर्सिग)
  3. बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे (अभ्यासक्रम- बीएस्सी इन नर्सिग)
  4. सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ नर्सिग, पुणे (अभ्यासक्रम- पोस्ट बेसिक बीएस्सी इन नर्सिंग)
  5. मेट्रोपोलिटन एज्युकेशन ट्रस्टचे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, विलेपार्ले, मुंबई (अभ्यासक्रम- बीएस्सी इन नर्सिंग)
  6. गुरुनानक इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन वांद्रे, मुंबई (अभ्यासक्रम- जनरल नर्सिग अ‍ॅण्ड मिडवाइफरी कोर्स)
  7. लीलाबाई ठाकरसी कॉलेज ऑफ नर्सिंग, मरीन लाइन्स, मुंबई (अभ्यासक्रम- एमएस्सी इन नर्सिंग)
  8. जी.एस. मेडिकल कॉलेज, परळ, मुंबई (अभ्यासक्रम- डायलेसिस अ‍ॅण्ड ट्रान्सप्लान्टेशन फॉर नर्सेस)
  9. टेहमी ग्रँट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिग एज्युकेशन, बंड गार्डन, पुणे (अभ्यासक्रम- बेसिक बीएस्सी इन नर्सिग)
  10. श्रीमती बकूळ तांबट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, कर्वे रोड, पुणे. (अभ्यासक्रम- बीएस्सी इन नर्सिंग)
  11. आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे (अभ्यासक्रम- बीएस्सी इन नर्सिंग)
  12. एम.जी.एम. युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्स, नवी मुंबई (अभ्यासक्रम - बीएस्सी इन नर्सिग)
  13. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसीन अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन, महालक्ष्मी, मुंबई (अभ्यासक्रम - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रिहॅबिलिटेशन फॉर नर्सेस)
  14. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मातृसेवा संघ नर्सिंग कॉलेज (महाल मॅटर्निटी होम, कोठी रोड महाल, नागपूर- ४४०००२

या संस्थेत एएनएम हा पदविका अभ्यासक्रम चालविला जातो. प्रवेश अर्हता- दहावी उत्तीर्ण), विद्याशिक्षण प्रसार मंडळाचे कॉलेज ऑफ नर्सिंग अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, दिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर- ४४००१० या उपलब्ध ठिकाणी परिचारिका(नर्सिंग) या क्षेत्राचे व्यावसायिक शिक्षण दिले जाते. 

विज्ञान तंत्रज्ञानाचा या क्षेत्रातील वाढता वापर लक्षात घेता नवनवीन संज्ञा, शाखा उदयास येत आहेत. यासाठी कुशल प्रशिक्षित मनुष्यबळाची नितांत गरज भासते आहे. आकर्षक वेतन आणि पूरक सोयीसुविधा उपलब्ध होत असल्याने या क्षेत्रात करिअर करणे हा यशाचा राजमार्ग ठरू शकतो. 

लेखक - सचिन पाटील

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 6/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate