অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इराकची शिल्पकार गर्ट्युड बेल

इराकची शिल्पकार गर्ट्युड बेल

इराक अस्तित्वात येत असताना त्या देशाला आकार देण्यासाठी धडपडणारी गर्ट्युड बेल ही मूळची ब्रिटीश लेखक, प्रवासिनी आणि पुरातत्व संशोधक. ब्रिटीश सरकारची हेर म्हणूनही तिने पुढे काम केलं. ब्रिटीश साम्राज्याने अरब देशांतील तिच्या प्रवासाचा, अरब संस्कृती-अरब जनतेविषयीच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला, पण उल्लेखनीय बाब ही की ब्रिटीश साम्राज्याची प्रतिनिधी असलेल्या गर्ट्युड बेलवर अरबांनी प्रेम केलं आणि ती त्यांच्या स्मरणात कायम राहिली. इराक आपला देश आहे असंच मानून त्या देशाची घडी बसवण्यासाठी झटलेल्या एका कर्तृत्ववान स्त्रीची ही कथा.

२००३ मध्ये अमेरिकेने इराकवर हल्ला केला आणि जेमतेम ८ दिवसात अमेरिकेच्या सैन्याने बगदादपर्यंत धडक मारली. अमेरिकेने सर्वात आधी तेलमंत्रालयावर कब्जा केला. त्यानंतर पाश्‍चात्य सैनिक प्रशस्त चौकात उभ्या असलेल्या सर्वेसर्वा सद्दाम हुसेनच्या पूर्णाकृती भव्यदिव्य पुतळ्याकडे वळले. तो त्यांनी आडवा पाडताच बघ्यांनी आनंद साजरा केला. संपूर्ण जग इराकमधल्या हुकूमशाही राजवटीचा अंत अचंबित होऊन बघत होतं, तेव्हाच त्याच्या जवळच्या वस्तुसंग्रहालयात दिवसाढवळ्या लुटालूट चालली होती. अमेरिका आणि तिच्या मित्रांच्या दृष्टीने तेलमंत्रालय जास्त महत्त्वाचं होतं. त्याच्या सुरक्षेची काळजी घेताना बगदादचं राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय वार्‍यावर सुटलं होतं. नाही म्हणायला अमेरिकेचे इनमीन दोन सैनिक दोन रणगाडे घेऊन पहारा देत इथे उभे होते. परंतु त्यांना न जुमानता लोकांनी हजारो वर्षांचा मौल्यवान ऐवज हातोहात या इमारतीतून लुटून नेला.

सुमेरियन, मेसापोटेमियन, बॅबिलोनियन, बायझंटीन, ऑटोमन संस्कृतीचा वारसा सांगणारा हा अनमोल खजिना. धातूचे पुतळे, सुमेरियन लिपीतले शिलालेख, वेलबुट्टीने सजलेली पुष्पपात्रं, दागिने, हत्यारं, नाणी, एक प्राचीन पात्र तर सोन्याचं... हा सगळा ऐवज जगभर विकला गेला. अमेरिकेत पोहोचला, इंटरनेटवरुनही त्याची खरेदी विक्री झाली. अलिकडे तो ऐवज पुन्हा मिळवून इराकच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्याचा द्रविडी प्राणायम चाललाय. या खजिन्यातलाच एक धातूचा अर्धाकृती पुतळा लोकांनी पळवला. तो होता या संग्रहालयाच्या संस्थापकाचा, गर्ट्युड बेल हिचा.
गर्ट्युड बेल ही ब्रिटिश स्त्री. या वस्तुसंग्रहालयाचीच काय, खरं तर इराक या देशाचीच ही जन्मदात्री. या देशाचा नकाशा चातुर्याने घडवणारी, या देशाला अस्तित्वात आणण्यासाठी झटणारी एक हुशार स्त्री. अलिकडे इराकमधल्या तैग्रीस आणि युफ्रेटिस या नद्यांच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, पण तरीही प्रत्येक इराकीच्या मनात तिच्याबद्दलचा आदर टिकून आहे. आजही इराकमधली इतिहासाची पाठ्यपुस्तके तिच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होत नाही.

गर्ट्युड बेल हिचाच समकालीन टी. ई. लॉरेन्स. हा इजिप्तच्या परिसरात उत्खनन करण्यात मग्न असताना ब्रिटिश सरकारने त्याला सैन्यात पाचारण केलं. पहिल्या महायुद्धाच्या काळात अरब लोकांशी मैत्री करुन त्यांना तुर्कांविरुद्ध लढायला भाग पाडलं म्हणून त्याचा गवगवा झाला. नंतर त्याच्यावर ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हा चित्रपट निघाल्यावर तर तो भलताच प्रसिद्ध झाला. पण अशी प्रसिद्धी गर्ट्युड बेलच्या नशिबी आली नाही. अलिकडे इराकचा भडका उडाल्यावर तिची आठवण पुन्हा लोकांना होऊ लागली आहे. या काळातले तिचे लेखन आता पुन्हा धुंडाळले जात आहे, तिच्या इराकबाबतच्या निरीक्षणांचा अभ्यास केला जातो आहे.

गर्ट्युड बेल हिची ओळख इराकींसाठी इराकची राणी अशी. त्यांच्या देशाची निर्माती म्हणून ती त्यांच्यासाठी आदरणीय व्यक्ती. तिनेही इराकवर भरभरुन प्रेम केलं. इराक हीच तिची कर्मभ्ाूमी. शेवटच्या काही वर्षांमध्ये आजाराने ती खंगली होती. ब्रिटनला परत गेलं तर पुन्हा इराकला यायला मिळण्याची शाश्‍वती नव्हती, म्हणून तिने शेवटचा श्‍वासही ठरवून इराकमध्येच घेतला. मृत्यूनंतरही आपल्या देहाला इराकच्या भ्ाूमीतच स्थान मिळावं. अशी तिची इच्छा होती. त्याप्रमाणे सगळं झालंही. शेकडो ब्रिटिश आणि पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या शेकडो भारतीय सैनिकांनी जिथे चिरनिद्रा घेतली, तिथेच गर्ट्युड बेलनेही.

गर्ट्युड ही व्हिक्टोरियन समाजात जन्मलेली आधुनिक विचारांची स्त्री.अतिशय प्रखर बुद्धिमत्ता आणि प्रचंड उर्जा असलेली. हिचा रस मैदानी खेळात, गिर्यारोहणात, नवनवीन प्रांतांना भेटी देण्यात.एकोणिसाव्या शतकाचा शेवटचा काळ. व्हिक्टोरियन मनोवृत्तीचा.स्त्रियांना पदवी मिळवण्याचा हक्क नाही म्हणून ऑक्स्फर्डच्या परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवूनही तिला पदवी कधी मिळाली नाही, अशी स्थिती. त्यात पुन्हा स्त्रियांना शिकण्याजोगे मोजके विषय ठरवून दिलेले. विज्ञान आणि गणित हे शिकायला राणीच्या देशात स्त्रियांना परवानगी नव्हती म्हणून हिने १९ व्या वर्षी पदवी परीक्षा दिली ती इतिहासात. या इतिहासावरच्या प्रेमानेच पुढे ती वाळवंटाकडे धावली.

पदवी मिळाली, पण त्यानंतर करायचं काय, हा तिला भेडसवणारा प्रश्‍न होता. मुळात ती एका अतिशय श्रीमंत घरातली. वडिलांकडे वंशंपरंपरेने आलेलं कोळशाच्या खाणीचं आणि लोखंड उद्योगाचं प्रचंड मोठं उद्योगविश्‍व. पण हिला चारचौघींसारखं श्रीमंतीचं कौतुक नव्हतं. वडिलांकडून मिळालेली स्वतंत्र विचारांची आणि भ्रमंतीची देणगी तिला स्वस्थ बसू देईना. लंडनमधल्या उच्चभ्रू स्त्रियांच्या वर्तुळात वावरणं हे तिला अशक्यच होतं. त्यांचा वेळ घालवण्याच्या हेतूने चालणार्‍या उद्योगांमध्ये हिला रस वाटायचा नाही आणि हिचे स्वतंत्र परखड विचार कुणाला रुचायचे नाही. त्यामुळे हिच्याशी विवाह करायला कुणी तयार होणंही कठीणच होतं. गर्ट्युडची आई ती ३ वर्षांची असतांनाच मृत्यू पावली होती. नंतर सावत्र आईने मात्र तिची उत्तम जडणघडण केली. लहानपणापासून आईवडिलांना सर्व गोष्टी सांगण्याची आणि त्यांच्यापासून दूर असताना बारीकसारीक गोष्टीही पत्राद्वारे सतत कळवत राहण्याची गर्ट्युडची सवय होती.

तिची सावत्र आई देखील कोळसा कामगारांसाठी काम करणारी आणि विशेष म्हणजे, त्यावेळी जोरात असलेल्या स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळवा म्हणून झगडणार्‍या सफ्रजेट चळवळीची विरोधक. स्वतंत्र विचाराच्या गर्ट्युडचाही या चळवळीला विरोध होता. तिच्या मते स्त्रियांना जोपर्यंत या मतदानाच्या हक्काचा अर्थ कळत नाही, त्यांची स्वतंत्र निर्णयक्षमता विकसित होत नाही, तोपर्यंत त्यांना हा हक्क मिळायला नकोच!

लंडनमध्ये तिची घ्ाुसमट होत असताना योगायोगाने गर्ट्युडला मावशीबरोबर पर्शिया म्हणजे इराणला जाण्याची संधी मिळाली. मावशीच्या यजमानांकडे तेव्हा पर्शियाचा कारभार होता. नव्या प्रांतात जाण्याच्या विचाराने ती हरखली. लगेच तिने पर्शियन भाषा शिकायला सुरुवात केली. ह्या व्हिक्टोरियन मनोवृत्तीच्या समाजातून सुटका होणार याचा तिला प्रचंड आनंद झाला होता. नवा प्रदेश, वेगळी संस्कृती, काही काळ का होईना नवीन आयुष्य...हा तिच्या आयुष्यातला उत्साहपूर्ण काळ होता. पर्शियात गेल्यावर नवी संस्कृती समजून घेणं, भ्रमंती करणं आणि पर्शियन कवी हाफीजच्या कवितांचं भाषांतर करणं यात ती रमली. तिला दिसलेलं इराण तिने ‘सफरनामे’ या फारसी शीर्षक असलेल्या इंग्रजी पुस्तकात शब्दबद्ध केलं. परंतु आयुष्यभर प्रसिद्धीपासून दूर राहण्यासाठी धडपडणार्‍या गर्ट्युडने हे पुस्तक नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर प्रकाशित केलं.

पर्शियाचा हा प्रवास तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. इथे असताना ब्रिटिश दूतावासात काम करणार्‍या एका अधिकार्‍याच्या ती प्रेमात पडली. वडिलांपासून काहीही न लपवण्याचा तिचा स्वभाव. त्यानुसार हे प्रेमप्रकरणही तिने त्यांना कळवलं. पण त्या अधिकार्‍याचा सरकारी सेवेतला हुद्दा होता खालच्या दर्जाचा. हे तिच्या वडिलांना पटलं नाही आणि त्यांनी तिला पर्शियातून ताबडतोब घरी यायला सांगीतलं. तिने ते निमूटपणे मान्य केलंही.लेकीला या प्रेमापासून तोडणारे वडील तिच्या या भेटीत फुललेल्या पश्‍चिम आशिया वरच्या प्रेमाला मात्र रोखू शकले नाहीत.

गर्ट्युड पर्शियातून परत आल्यावर पुन्हा गिर्यारोहणाकडे वळली. स्वित्झर्लंडमधल्या आल्प्सच्या पर्वतरांगेतली शिखरं सर करण्याचं तिने ठरवलं.आल्प्सच्या पर्वतरांगेतल्या सात शिखरांवर जाणारी ती पहिली गिर्यारोहक. तिच्या नावावरुन एका शिखराला नाव दिलं गेलं, ‘गर्ट्युडस्पाइत्झ’ असं. या पर्वतारोहणानंतर तिला पुन्हा पूर्वेकडचं रखरखीत वाळवंट खुणावू लागलं.

पश्‍चिम आशियातल्या वाळवंटातली भटकंती ही तिला ब्रिटिश उच्चभ्रू समाजात वावरण्यापेक्षा जास्त सुखदायी वाटणारी. ती इकडे भ्रमंतीला निघाली. जेरुसलेम, दमास्कस, जॉर्डन आणि त्यांच्या अवतीभवतीचा सगळा पट्टा तिने पिंजून काढला. त्यावरही एक पुस्तक लिहिलं. यावेळी मात्र तिने नावासह पुस्तक छापायला परवानगी दिली. या पश्‍चिम आशियातल्या भ्रमंतीने तिला मेसापोटेमिया म्हणजे आजच्या इराककडे खेचून नेलं. मैलोन्मैल पसरलेल्या वाळूच्या पसार्‍यात पुरातन वस्तूंचा शोध घेत ही शिडशिडीत बांध्याची हिमतीची स्त्री मैलोन्मैल भटकू लागली. सोबतीला दोनचार माणसं, तंबू उभारण्यासाठीचं आणि खाण्यापिण्याचं थोडंफार सामान एवढाच लवाजमा. कधी कडक उन्हाचा तडाखा तर कधी हाडं गोठवणारी थंडी सहन करत ती नेटाने काम करत होती.

तेव्हा इराक या अस्तित्वात न आलेल्या देशात अनेक टोळ्यांचं राज्य होतं. हा कट्टर विचारांचा मध्ययुगात जगणारा समाज. पण गर्ट्युड अतिशय आत्मविश्‍वासाने टोळ्यांच्या शेखांशी संवाद साधायची. एरवी स्त्रियांना काळ्या कापडात गुंडाळणारी अरब संस्कृती. पण बुद्धिमत्तेचा एक प्रकारचा गर्व चेहर्‍यावर मिरवणारी गर्ट्युड त्यांच्या तंबूंमध्ये जाऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करायची. या ब्रिटिश स्त्रीचं अरबी, फारसी आणि तुर्की भाषेवरचं प्रभूत्व, त्यांच्या संस्कृतीची तिला असलेली जाण यामुळे अरबही तिच्याशी अदबीने वागायचे. त्यांच्यासाठी ती होती एक आदरणीय स्त्री, ‘खातून’.

पहिल्या महायुद्धाचे रागरंग दिसत होते त्यादरम्यान गर्ट्युड पुन्हा प्रेमात पडली. तिचं प्रेम जडलं होतं एका विवाहित लष्करी अधिकार्‍यावर. यावेळेस देखील तिच्या नशिबी प्रेमातली सफलता नव्हती. त्याच्याशी केलेला पत्रव्यवहार एवढीच तिच्या प्रेमाची कहाणी. त्यात महायुद्ध सुरु झालं. तुर्कस्थान हा ब्रिटनच्या शत्रू गोटातला. त्याला धडा शिकवण्यासाठी ब्रिटिश सैन्य चालून आलं. पण गॅलीपोलीच्या लढाईत ब्रिटिश सैन्याला तुर्कांचा गनिमी कावा फारच महाग पडला. यात लाखो ब्रिटिश सैनिक मृत्युमुखी पडले. त्या सैनिकांमधलाच एक गर्ट्युडचा हा प्रियकर.

गॅलीपोलीच्या लढाईतल्या मानहानीकारक पराभवानंतर ब्रिटीश सरकारने चाल खेळली. ती होती अरब प्रांतांमधल्या तुर्की ऑटोमन साम्राज्याला सुरुंग लावण्याची. हे काम फत्ते करण्यासाठी त्यांना अरब लोकांशी सख्य करणं भाग होतं. त्यासाठी ब्रिटिश सरकार अरबी जाणणार्‍या, अरबांची मनं जिंकणार्‍या ब्रिटिश लोकांच्या शोधात होतं.

टी. ई. लॉरेन्स हा गर्ट्युडसारखा इजिप्तमध्ये उत्खनन करणारा. ब्रिटिश सरकारने त्याच्यावर जबाबदारी सोपवली ती आजच्या सौदी अरेबियातल्या अरब टोळ्यांशी संधान साधण्याची. अरब लोकांशी सलगी करुन या ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ने त्यांना तुर्कांविरुद्ध उठाव करायला लावला. त्यासाठी तो पक्का अरबी झाला. अरबी भाषा तर अवगत होतीच, अरबी वेषही धारण केला.मक्केहून निघालेल्या अरब टोळ्यांनी त्याच्या नेतृत्वाखाली तुर्कांची आधीच खिळखिळी झालेली व्यवस्था नेस्तनाबूत केली.

ब्रिटिश सरकारला अजून एका प्रांताची काळजी होती. तो प्रांत म्हणजे मेसोपोटेमिया. इथून तुर्कांना हाकलून लावून शेजारच्या पर्शियातलं नुकतंच घावलेलं तेल त्यांना जपायचं होतं. त्या तेलावर ब्रिटनचं लष्कर युद्धकाळात धावत होतं. अशा वेळी ब्रिटिश अधिकार्‍यांना सुगावा लागला तो गर्ट्युड बेलचा. ही स्त्री या प्रदेशाचा, तिथल्या लोकांच्या खाचाखोचा जाणते, इतकंच नाही तर बिनधोकपणे भटकते, तिथल्या सतत लढण्या झगडणार्‍या टोळ्यांशी सख्य ठेवते हे कळल्यावर त्यांनी तिला ताबडतोब कैरोला येण्याचं आमंत्रण धाडलं. गर्ट्युडचा प्रवास आता राजकारणाच्या दिशेने सुरु झाला. तिच्या तल्लख बुद्धीला साजेसं काम तिची वाट पाहत होतं. ती झाली ब्रिटिश सरकारची अधिकृत हेर. ज्या अरबस्तानात स्त्रियांना दुयमत्व दिलं जातं, त्याच भागाचा इतिहास आणि भूगोल ही स्त्री घडवणार होती.

महायुद्धाच्या दरम्यान गर्ट्युडवर जबाबदारी होती ती भारतातून आलेल्या ब्रिटिश सैन्याला मेसोपोटेमियातल्या वाळवंटात रस्ता दाखवण्याचं. सर पर्सी कोक्स हा ब्रिटिश अधिकारी फौज घेऊन इराकच्या दक्षिणेकडे असलेल्या बसरा या बंदरात उतरला. या फौजेला बसरापासून बगदादपर्यंतचा रस्ता दाखवण्याचं गर्ट्युडचं काम होतं. तुर्कांनी या प्रांतात ब्रिटिश फौजेला बराच त्रास दिला, पण शेवटी हा सगळा प्रांत ब्रिटिशांच्या ताब्यात आला.

महायुद्धादरम्यान ब्रिटिश सरकारने अनेक लटपटी खटपटी केल्या होत्या. कठीण समयी मदत मिळवण्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळी वचनं देऊन ठेवली होती. त्यातीलच एक अरब लोकांचा नेता असलेल्या मक्केच्या शरीफांना दिलेलं वचन. तुर्कांविरुद्ध उठाव केल्याचं बक्षीस म्हणून ब्रिटिश सरकार त्यांना मोठं राज्य बहाल करणार होतं. पण महायुद्ध संपलं आणि वचनपूर्तीची वेळ आल्यावर ब्रिटनची मोठी गोची झाली. याला कारण होतं ते महायुद्ध सुरु असतानाच सर मार्क्स साईक्स नावाचा ब्रिटिश अधिकारी आणि पिकोते नावाचा फ्रेंच अधिकारी यांनी आपापल्या देशांमध्ये हे प्रदेश वाटून घेतले होते. या साईक्स - पिकोते कराराने अरब जगाच्या आज असलेल्या सीमारेषा निश्‍चित झाल्या. महायुद्धानंतर फ्रान्स ब्रिटनला म्हणू लागलं, तुम्ही अरब लोकांना वेगळी वचनं दिली असतील तर त्याच्याशी आमचं काही घेणंदेणं नाही. आम्हाला करारानुसार अरब प्रांत मिळायला हवेत. परंतु तिकडे ब्रिटनला मदत करणारे मक्केचे शरीफ हुसेन मोठ्य साम्राज्याची आस लावून बसलेले. त्यांना आजच्या इस्त्रायलपासून इराकपर्यंतच्या प्रचंड मोठ्य भूभागावर राज्य करण्याची स्वप्नं पडत होती.

महायुद्धानंतर पॅरिसच्या शांतता परिषदेत गर्ट्युड बेल आणि लॉरेन्स हे दोन्ही अरबमित्र अरब लोकांच्या बाजूने किल्ला लढवत होते. या परिषदेला आलेली गर्ट्युड ही एकमेव महिला राजकीय अधिकारी. तिच्या हाती एका नवीन जन्माला येणार्‍या देशाचं भवितव्य होतं. या भागाला जाणणारं तिच्याशिवाय दुसरं कुणीही नव्हतं. ती घडवत होती तो देश तीन मुख्य भागात विभागलेला. उत्तरेकडचा मोसूलचा भाग. कुर्द वंशीय लोकांचा. हा तेलसमृद्ध असल्याचा सुगावा एव्हाना ब्रिटिशांना लागला होता. त्यामुळे तो त्यांनी फ्रेंचांकडून जबरदस्तीने मागून घेतला होता. मधल्या भागात सुन्नी अरब लोकांचं प्रमाण जास्त, तर दक्षिणेकडे शिया अरब लोकांचं प्राबल्य. गर्ट्युडचा या तिन्ही प्रांतांच्या भूगोल, धर्मकारण, सामाजिक व्यवस्था या सगळ्याचा सखोल अभ्यास. तिच्या मते हे तीन पट्टे एकत्र जोडून स्वतंत्र देशाची निर्मिती करायला हवी होती. तिचं हे स्वतंत्र देश घडवून त्याची सूत्र अरब लोकांच्या हातात देण्याचं मत अरब जगाचा नकाशा गुपचुपपणे घडवण्याचं महत्कार्य करणार्‍या सर मार्क्स साईक्सला मान्य नव्हतं. या महाशयांनी गर्ट्युडवर अतिशय कठोर शब्दात टीका करणं चालवलं होतं. पण गर्ट्युड पूर्णपणे इराकमय झाली होती. या देशाला घडवणं हे तिचं ध्येय बनलं होतं. एका नवीन देशाची निर्मिती करण्यातला आनंद तिच्या पत्रांमधून व्यक्त होतो.

इराकचा नकाशा गर्ट्युडने कागदावर आणला.त्यासाठी मैलोन्मैल कधी घोडेस्वारी करत, तर कधी पायी चालत ती इराकच्या सीमा गाठायची. टोळी जीवनात रममाण असलेल्या, वाळूच्या ऐसपैस पसार्‍यावर भटकणार्‍या अरब लोकांना तिचं हे काम अनाकलनीय होतं. ती काय करतेय, हे त्यांना उमजतच नव्हतं. पण ती करत असलेलं काम आपल्या भल्यासाठीच असेल असा त्यांना विश्‍वास होता. त्यामुळे तिला हवं ते सहकार्य करायला ते तयार असत. मेहनतीने तिने तुर्कस्थान, सिरिया, अरबस्तानाच्या तेव्हाचा कुणाच्याही ताब्यात नसलेल्या भागांच्या सीमा ठरवल्या. अशा प्रकारे, इराकच्या शेजार्‍यांबरोबरच्या सीमा निश्‍चित झाल्या.

आता प्रश्‍न होता या देशावर राज्य कुणाचं? इराक म्हणजे अनेक पंथांचा आणि धर्मांचा गोतावळा. उत्तरेकडचे कुर्द वंशीय अरबांपेक्षा वेगळे असले तरी हे इस्लाममधले सुन्नीपंथीय. सुन्नी कुर्द, सुन्नी अरब आणि शिया अरब यांच्याशिवाय इराणी शिया, ख्रिश्‍चन, ज्यू असं अनेकांचं वास्तव्य. त्यात यांच्यातल्या काहींमध्ये पूर्वापारपासूनचं वितुष्ट. गर्ट्युड बेलचा या सार्‍यांशी संपर्क दांडगा. त्यांच्यातल्या गुणदोषांचं तिला पूर्ण आकलन झाल होतं. तिने ब्रिटिश सरकारला सुन्नी पंथीयांच्या हातात सत्ता देण्याचं आणि त्यासाठी घटनात्मक राजेशाही आणण्याचं सुचवलं. वडिलांना लिहिलेल्या पत्रात ती म्हणते, शिया लोकांवर धर्मगुरूंच्या कडव्या विचारांचा पगडा असल्याने त्यांच्या हातात सत्ता देणं सध्या तरी योग्य ठरणार नाही.

पॅरिसच्या परिषदेत बर्‍याच प्रयत्नांती मक्केच्या शरीफांच्या थोरल्या मुलाला, फैसलला सिरियाचं राज्य मिळालं. पण साइक्स पिकोतेच्या करारानुसार सिरियावर ताबा होता फ्रेंचांचा. त्यांनी या राजाला सिरियातून अक्षरश: हाकलून लावलं. औट घटकेच्या या सिरियाच्या राजाचं कसं समाधान करावं हे ब्रिटिशांना उमजेना. शेवटी त्यांनी त्याला इराकच्या गादीवर बसवलं. तोपर्यंत इराकींना हे फैसल महाराज कोण आहेत, हेदेखील ठाऊक नव्हतं. गर्ट्युड बेल ही या आयात केलेल्या राजाची सल्लागार. तिच्या भरवशावर हे राजे राजपदी आरुढ झाले. गर्ट्युडच्या सल्ल्याने आणि इतर ब्रिटिश अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली त्यांचा राज्यकारभार चालत होता. हळूहळू त्यांनी राज्यावर पकड बसवली आणि स्वतंत्रपणे कारभार सुरु केला. त्यानंतर मात्र गर्ट्युडने राजकारणातून अंग काढून घेतलं. एव्हाना तिच्या सोबतचे ब्रिटिश अधिकारी मायदेशी परतले होते. इराकच्या राजकारणातली तिची ऐतिहासिक भ्ाूमिका संपली होती.

इराकच्या निर्मिताच्या काळात गर्ट्युड अतिशय व्यस्त होती. वडिलांना ती लिहिते, नव्या देशाची घडी बसवणं हे काम खूप कठीण आहे. पोलिस, लष्कर, चलन, संपूर्ण व्यवस्था उभारणं अशा शेकडो कामांचा व्याप मोठा होता आणि त्यात ती पूर्णपणे गुंतली होती. परंतु राजकारणातून अंग काढून घेतल्यावरही तिची मायदेशी परत जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. बगदाद शहराच्या रस्त्यावरुन फिरताना लोक तिला मानाने वागवत. इथल्या लोकांमध्ये राहणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांना सल्ला देणं यातच तिला आनंद होता. आठवड्यातून एकदा अरब स्त्रियांना सकाळी चहापानासाठी बोलवून त्यांच्याशी गप्पा मारण्याचा तिचा नियम होता. इराकच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक जीवनातल्या प्रत्येक घडामोडीवर तिची बारकाईने नजर असायची.

राजकीय भ्ाूमिका संपल्यावर ती शांतपणे पुन्हा तिच्या मूळ कामाकडे, पुरातत्वशास्त्राकडे वळली. तिच्याकडे पुरातन वस्तुंचा संग्रह होताच, त्याला अजून समृद्ध करण्याचा तिने ध्यास घेतला. मनात आणलं असतं तर हा अनमोल संग्रह ती ब्रिटनला सहज पाठवू शकली असती. जगभरातून ब्रिटिशांनी वाहून नेलेल्या वस्तूंमध्ये अजून भर पडली असती. पण गर्ट्युडने इराकलाच आपला देश मानलं होतं. तिने या वस्तूंसाठी राजाकडे जागा मागितली आणि बर्‍याच प्रयासाने तिचं वस्तुसंग्रहालय आकाराला आलं.

या कामादरम्यान गर्ट्युड आजारपणाने त्रासली होती. दिवसेंदिवस खंगत जाणारी प्रकृती आणि हाती घेतलेली काम संपल्यामुळे आलेलं रिकामपण याने तिला ग्रासलं. तरुणपणीचा सळसळता उत्साह संपला होता. सात भाषा पारंगत असणारी ती विदुषी. स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतराजीत जाऊन शिखरं सर करणारी, देशोदेशी एकटीच हिमतीने भ्रमंती करणारी, तळपत्या सूर्याचा तडाखा सहन करत वाळवंट पायदळी तुडवणारी, राजा, कडवे धर्मगुरू, शेख, सामान्य स्त्रिया या सर्वांशी चर्चा करणारी. पण आता तिचा जीवनातला रस संपला होता. तिच्यासमोर दोन पर्याय उरले होते, आजाराने खंगत इराकमध्ये मरणं किंवा ब्रिटनला कायमचं परत जाणं. तिने यातून स्वत:च मार्ग शोधला. तो होता १९२६ सालच्या कडक उन्हाळ्यातल्या एका रात्री झोपेच्या गोळ्या घेण्याचा. दोन दिवसांवर तिचा ५८ वा वाढदिवस होता. पण त्याआधीच तिने जीवनप्रवास संपवला.

शेवटच्या काळात वडिलांना लिहिलेल्या एका पत्रात ती म्हणते, ‘आम्ही बागेतून परत येत होतो, तेव्हा लोक मला नमस्कार करत होते, मला ओळखत होते. हे बघून नूरी सैद (हे इराकचे दीर्घकाळ पंतप्रधान होते.) मला म्हणाले, ‘तू यांची एकमेव ‘खातून’ आहे. शेकडो वर्षं ते घोडेस्वारी करणार्‍या या खातूनला स्मरणात ठेवतील.’ मलाही वाटतं, नक्कीच हे लोक मला विसरणार नाहीत.’
----
विशाखा पाटील
pvishakha@gmail.com

स्त्रोत: मिळून साऱ्याजणी

अंतिम सुधारित : 7/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate