অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पीकिंग विद्यापीठ

पीकिंग विद्यापीठ

चीनमधील प्रसिध्द विद्यापीठ. याचे मूळ चिनी नाव बैजिंग दास्युए (पीकिंग महाविद्यालय) असे आहे. व्यवहारात बै-दा या संक्षिप्त नावानेच त्याचा उल्लेख केला जातो. या विद्यापीठाची स्थापना १८९८ साली अमेरिकन धर्मोपदेशकांनी केली. चिनी लोकांना आधुनिक शिक्षण द्यावे या हेतूने अमेरिकन धर्मोपदेशकांनी या विद्यापीठाबरोबरच इतरही अनेक संस्था स्थापन केल्या. त्यांपैकी येनजिंग विद्यापीठ हे आणखी एक विद्यापीठ  होय.

पीकिंग विद्यापीठ हे पीकिंग शहराच्या पश्चिमेला ‘मे शान’ नावाच्या टेकडीवर वसलेले आहे. तिच्या उत्तरेस चिनी सम्राटासाठी बांधलेल्या उन्हाळी राजवाड्याजवळच्या एका उद्यानात येनजिंग विद्यापीठ उभरण्यात आले. हे उद्यान दृ शन् नावाच्या एका श्रीमंत अधिकाऱ्याच्या मालकिचे होतें. त्या अधिकाऱ्यावरील भ्रष्टाचाराचा आरोप सिध्द होऊन ते विद्यापीठ सरकारजमा करण्यात आले.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पीकिंग व येनजिंग ही विद्यापीठे खाजगी विद्यापीठे या सदरात मोडत; परंतु १९४९ साली देशात कम्युनिस्ट  पक्षाची राजवट स्थापन झाल्यावर ती सरकारी झाली. पुढे १९५२ साली ही दोन्ही विद्यापीठे एकत्र करुन त्यांच्या समूहाला पीकिंग विद्यापीठ हे नाव देण्यात आले. विलिनीकरणानंतर पीकींग विद्यापीठाची वाढ झापट्याने झाली. चीनमध्ये क्रांतीकारी वातावरण असल्यामुळे शिक्षणक्षेत्रात अनेकदा धोरण बदलले गेले. त्यामुळे पीकिंग विद्यापीठाचा शिक्षणक्रम, प्रवेशनियम, अभ्यासक्रम, पदव्या, परिक्षा, संशोधनासंबंधीचे धोरण यांत वेळोवेळी आमूलाग्र बदल झालेले आहेत.

संक्रमणकाळात काही वर्षे विद्यापीठ केवळ नाममात्र अस्तित्वात होते. चीनमध्ये कम्युनिस्ट शासन सत्तारूढ झाल्यावर इतर क्षेत्रां-प्रमाणे शिक्षण – क्षेत्रातही रशियाचे अनुकरण करण्यात आले. पीकिंग विद्यापीठात पाठ्यपुस्तके, शिक्षणपध्दती, पदव्या इ. सर्व गोष्टी रशियन धर्तीवर योजण्यात आल्या. विद्यापीठातील अभ्यासक्रमाची मुदत पाच–सहा वर्षे असे. मात्र वैद्यकीय अभ्यासक्रमाला थोडा जास्त कालावधी दिला जाई. वर्गात उपस्थित राहणे सक्तीचे असे. बहुतांश विद्यार्थी वसतिग्रहात नि:शुल्क राहत असत. मात्र काही विद्यार्थ्यांना जेवण, कपडे, पुस्तके यांचा खर्च स्वत:च्या जबाबदारीवर करावा लागे.

पीकिंग विद्यापीठात त्यावेळी १८ विभाग होते. विज्ञान कक्षेत ८ आणि मानव्य कक्षेचे १० अशी त्यांची विभागणी होती. विज्ञान कक्षेत गणित, भौतिकी, रसायनशास्त्र, भूगोल, जीवविज्ञान, दुरसंचारण, अणुकेंद्रीय भौतिकी हे विभाग होते. वाङ्मय कक्षेत चिनी भाषा आणि वाङ्मय, इतिहास, अर्थशास्त्र, प्रशासन, ग्रंथालयशास्त्र, विधी, पौर्वात्य भाषा पाश्चिमात्य भाषा आणि रशियन भाषेचा स्वतंत्र विभाग इत्यादींचा समावेश होता.

दोन्ही कक्षांच्या अभ्यासक्रमांत मार्क्सवाद, लेनिनवाद या विषयांचा सामावेश असे. शारीरिक शिक्षणावरही भर दिला जाई. विद्यापीठात प्रवेश मिळण्यासाठी परीक्षा द्यावी लागे आणि पदवी मिळविण्यासाठी वार्षिक परीक्षा द्यावी लागत. उन्हाळ्याच्या सुटीत मात्र विद्यार्थ्यांना शेतावर जाऊन काम करावे लागे. हा नियम रशियात नसला, तरी चीनमध्ये रुढ होता.

अध्यक्ष माओने १९५८-५९ च्या सुमारास मोठ्या आगेकूचीचे (ग्रेट लीप फॉरवर्ड) धोरण जाहीर केल्यावर पीकिंग विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला. वर्गशिक्षणाचे महत्व कमी करुन प्रात्यक्षिक कामाचे महत्व वाढविण्यात आले. विद्यार्थ्यांना शेतावर आणि कारखान्यात सक्तीने काम करण्यास पाठविण्यात आले. अभ्यास आणि उत्पादनकार्य यांचा समन्वय म्हण़जेच खरे शिक्षण असे पुरस्कृत करण्यात आले. या नव्या धोरणामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या व परिणामतः शैक्षणिक धोरण पुन्हा बदलले. उत्पादनकार्यावरील भर कमी होऊन वर्गशिक्षणावर पुन्हा भर देण्यात आला;

परंतु पुढे सांस्कृतिक क्रांती ही मोहीम सुरु झाल्यामुळे शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडून आले. पीकिंग विद्यापीठ हे सांस्कृतिक क्रांतीचे केंद्र ठरले. सर्व वेळ राजकीय घडामोडींत जात असल्यामुळे अध्ययन – अध्यापनकार्य जवळजवळ स्थगित झाले. काही काळानंतर ‘लाल रक्षक’ (रेड गार्डस) या नात्याने सर्व विद्यार्थ्यांनी राजकारणात प्रवेश केला. मात्र विद्यार्थिवर्गात फूट पडल्यामुळे दंगे व विध्वंसक कारवाया वाढल्या आणि विद्यापीठ बंद करावे लागले.

विद्यापीठाचे कार्य १९७० साली पुन्हा हळूहळू सुरु झाले. प्रवेश-परीक्षा न घेता गरीब शेतकरी, कामगार आणि सैनिकांच्या मुलांनाच प्रवेश देण्याचे धोरण जाहीर झाले. सांस्कृतिक  क्रांतीच्या काळात पूर्वी अस्तित्वात असलेली सर्व पाठ्यपुस्तके रद्द करण्यात आल्यामुळे आणि शिक्षकवर्गावर कडाडून टीका झाल्यामुळे विद्यापीठाचे काम रेंगाळतच राहीले. १९७३ साली पीकिंग विद्यापीठात २,१३३ शिक्षक आणि फक्त ३,००० विद्यार्थी होते. अभ्यासक्रम त्रोटक म्हणजे २ किंवा जास्तीत जास्त ३ वर्षाचा करण्य़ात आला. परीक्षापध्दत रद्द करुन त्याऐवजी सामुदायिक चर्चा हे विद्यार्थ्यांची प्रगती ठरविण्याचे साधन बनले. विद्यापीठाने नेमलेले शिक्षक डावलून कारखान्यांतून अनुभवी कामगार व अनुभवी शेतकरी शिक्षक म्हणून नेमण्यात आले.

अध्यक्ष माओच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ज्यांग च्यींग आणि त्यांचे तीन साथीदार यांना सत्ताभ्रष्ट करण्यात आले. त्याचबरोबर शिक्षणक्षेत्रात पुन्हा एकदा आमूलाग्र बदल घडून आला. १९७८ साली पीकिंग विद्यापीठाच्या कामाला नव्याने सुरुवात झाली. प्रवेश परीक्षा पुन्हा सुरु झाल्या. शिक्षकांचे स्थान मानाचे झाले. अभ्यासातील प्रगतीचे महत्व वाढले आणि राजकारणाचे महत्व कमी झाले. अभ्यासक्रमाची व्याप्ती व कालमर्यादा वाढवण्यात आली.

पीकिंग विद्यापीठ हे चीनच्या राजकीय चळवळीत नेहमीच अग्रेसर राहिले. ४ मे ची (१९१९) चळवळ या विद्यापीठानेच सुरु केली. नंतर चीन-जपान युध्दामध्ये या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय संघटनाकार्यात पुढाकार घेतला. सांस्कृतिक क्रांती या विद्यापीठातूनच माओने सुरु केली.

पीकिंग विद्यापीठाची स्थापना जरी मानव्यविद्यांच्या अभ्यासासाठी झाली असली, तरी सध्या विज्ञान कथा हे त्याचे मुख्य अंग बनले आहे. गेल्या काही वर्षांत विज्ञान, भौतिकी, इलेक्ट्रॉनिकी, अणुकेंद्रीय भौतिकी असे नवे विभाग स्थापन करण्यात आले आहेत. मध्यंतरी विद्यार्थ्यांचा अभाव असल्यामुळे या विभागात संशोधनकार्यच केले जाई आणि त्यातही अनेक अडचणी येत असत. १९७८ पासून या सर्व अडचणी दूर करण्याचे धोरण चिनी सरकारने जाहीर केले आहे.

पीकिंग विद्यापीठाचे ग्रंथालय चीनमधील सर्वांत मोठे मानले जाते. त्यात २८ लाख ग्रंथ उपलब्ध आहेत. यांत काही अत्यंत दुर्मिळ ग्रंथ आहेत.

१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला पीकिंग विद्यापीठाने एक शेत आणि ९ कारखाने चालविण्याचे उत्पादनकार्य हाती घेतले. शेतातून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना लागणारे अन्नादी पदार्थांचे उत्पादन केले जाते. विद्यापीठाच्या कारखान्यांत निरनिराळ्या यंत्रांचे उत्पादन होत असे व त्याच्या विक्रीवर विद्यापीठाचा खर्च चालत असे. १९७८ च्या नव्या धोरणामुळे अशा उत्पादनकार्याचे महत्त्व कमी झाले असण्याची दाट शक्यता आहे.

लेखक: गि. द. देशिंगकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/6/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate