অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

किरातार्जुनीय

किरातार्जुनीय

अभिजात संस्कृत पंचमहाकाव्यांपैकी एक. कर्ता भारवी. भारवीविषयी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही.  दंडीच्या अवंतिसुंदरीकथेत भारवीविषयी काही माहिती आलेली आहे; परंतु ती ऐतिहासिक पुराव्यांनी समर्थित झालेली नाही. ऐहोळे येथे सापडलेल्या ६३४ सालच्या एका शिलालेखात भारवीचा कालिदासाच्या बरोबरीने उल्लेख आलेला आहे.  भारवी ५५० च्या सुमारास होऊन गेला असावा, असे ए. बी. कीथसारख्या विद्वानांचे मत आहे.

किरातार्जुनीयाचे अठरा सर्ग असून, विविध वृत्तांत रचिलेले एकूण १,०३९ श्लोक आहेत. त्याचा आरंभ ‘श्री’काराने झालेला असून प्रत्येक सर्गाच्या अखेरच्या श्लोकात ‘लक्ष्मी’ हा शब्द योजिलेला आहे. यावरून ह्या महाकाव्याला लक्ष्मीपदांक असेही म्हणतात. ह्या महाकाव्याचा नायक अर्जुन, प्रधान रस वीर आणि अर्जुनाला प्राप्त झालेले पाशुपतास्त्र हे फळ.

किरातार्जुनीयाचा कथाभाग थोडक्यात असा : बारा वर्षांचा वनवास भोगीत असलेले पांडव द्वैतवनात असताना, दुर्योधनाचा राज्यकारभार कसा चालला आहे, हे जाणून घेण्यासाठी युधिष्ठिर एक हेर हस्तिनापुराला पाठवतो; पण दुर्योधन आपले राज्य उत्तम प्रकारे चालवीत असून लोकादरास पात्र झाला असल्याची वार्ता हा हेर आणतो. हे ऐकून द्रौपदीला अत्यंत क्रोध येऊन ती तीव्र शब्दांत कौरवांशी त्वरित युद्ध सुरू करण्याचा युधिष्ठिराला आग्रह करते. भीमाचा तिला पाठिंबा मिळतो; परंतु युधिष्ठिर ह्या बाबतीत अनुकूल नसतो. हे चालू असतानाच व्यासमुनी तेथे येतात आणि युद्ध अत्यावश्यक असले, तरी सामर्थ्यवान कौरवांचा पराभव करण्यासाठी अर्जुनाने हिमालयात तपस्या करून इंद्राचा अनुग्रह संपादन केला पाहिजे, असा सल्ला देतात. व्यासमुनी अंतर्धान पावल्यावर एक यक्ष प्रकटतो आणि तो अर्जुनाचा मार्गदर्शक होतो. अर्जुन आणि यक्ष निघून जातात. अर्जुनाला इंद्रकील पर्वतावर (महाभारतात हा हिमालयाचा एक उपपर्वत म्हणून आलेला आहे) तपस्या करण्यास सांगून यक्ष अदृश्य होतो. अर्जुनाच्या कठोर तपश्चर्येमुळे इंद्रकीलावरील यक्ष भयभीत होतात आणि इंद्राला मदतीसाठी आवाहन करतात. अर्जुनाचा तपोभंग करण्यासाठी तो गंधर्वांना आणि अप्सरांना पाठवतो; पण हा प्रयत्न विफल होतो.  नंतर एका तापसाच्या वेषात स्वतः इंद्र अर्जुनासमोर येतो. युद्धाच्या हेतूने तपस्या करणे अनुचित आहे, असा युक्तिवाद करून तो अर्जुनाला तपापासून परावृत्त करू पाहतो; पण अर्जुनाचा निश्चय अढळ राहिलेला पाहून तो स्वतःचे खरे रूप प्रकट करतो आणि अर्जुनाला शिवाची आराधना करावयास सांगतो. शिवाच्या अनुग्रहासाठी अर्जुन आपले तप अधिक प्रखरपणे करू लागतो.  त्याच्या तपाच्या तेजाने कृष्णपक्षातील रात्रीही प्रकाशमय होऊ लागतात. ते उग्र तेज असह्य होऊन हिमालयावरील काही तपस्वी शंकराला शरण जातात.  तथापि अर्जुन हा नरनारायणांपैकी नराचा अवतार असल्याचे सांगून शंकर त्यांची समजूत घालतो.  त्याच वेळी मूक नावाचा एक राक्षस रानडुकराचे रूप घेऊन शंकर आपल्या किरातवेषधारी अनुचरांसह अर्जुनाच्या रक्षणार्थ निघतो. अर्जुन आणि शंकर एकाच वेळी त्या रानडुकरावर बाण सोडतात आणि ते त्याला एकाच वेळी लागून तो गतप्राण होतो.  अर्जुन आपला बाण त्या रानडुकराच्या शरीरातून खेचून काढण्याठी जातो, तेव्हा तेथे उभा असलेला एक किरात त्याला अडवतो आणि तो बाण आपल्या राजाचा असून त्याला अर्जुनाने हात लावू नये असे सांगतो.  त्यामुळे कलह उत्पन्न होऊन सर्व किरातसेना अर्जुनावर चालून येते; पण अर्जुन तिला समर्थपणे तोंड देतो. त्यानंतर किराताचे रूप घेतलेला प्रत्यक्ष शंकर अर्जुनाशी लढावयास उभा राहतो. शस्त्रास्त्रांचे युद्ध झाल्यानंतर ते दोघे मल्लयुद्ध करतात आणि अर्जुनाच्या धैर्याने आणि शौर्याने संतुष्ट होऊन शंकर आपल्या मूळ स्वरूपात अर्जुनासमोर प्रकट होतो. आपण प्रत्यक्ष शंकराशी युद्ध केले ह्याची जाणीव होऊन अर्जुन विनम्रपणे शंकराची क्षमा मागतो आणि त्याची स्तुती करून आपणास विजय मिळावा, अशी प्रार्थना करतो.  शंकर आनंदाने अर्जुनाला आपले पाशुपतास्त्र देऊन टाकतो.

किरातार्जुनीयाची कथा महाभारताच्या अरण्यपर्वात आली आहे; परंतु ती आपल्या महाकाव्यात आणताना भारवीने तीत अनेक महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत. उदा., युधिष्ठिराच्या हेराच्या आगमनाने महाकाव्याचा केलेला आरंभ नाट्यपूर्ण आणि कथाविकासाला उपकारक ठरलेला आहे. पुढे दुर्योधनाशी युद्ध करण्याच्या विचारातून उद्‌भवलेल्या राजनैतिक चर्चेलाही तो सर्वस्वी अनुकूल ठरलेला आहे. तथापि अर्जुन यक्षाबरोबर इंद्रकील पर्वताकडे जात असताना कवीने केलेली शरद ऋतू, हिमालय, चंद्रोदय इत्यादिकांची वर्णने, पुढे अर्जुनाचा तपोभंग करण्यासाठी आलेल्या गंधर्वाप्सरांच्या विलासक्रीडा; किरातार्जुनयुद्धाचे अनेक सर्गांत केलेले चमत्कृतिजनक वर्णन इ. भाग अनेकांना अनाठायी वाटतो.  भारवीच्या समर्थ कसव्यशैलीचा प्रत्यय मात्र त्यातून येतो.  ती प्रौढ आणि ओजस्वी आहे.  भारवीच्या भाषेतील अर्थगौरवाची प्रशंसा रसिकांनी केलेली आहे. मनोवेधक निसर्गवर्णने; उद्बोधक, चटकदार सुभाषिते; सूक्ष्म, मार्मिक अवलोकने; पांडित्य आणि अलंकार ह्यांनी हे काव्य नटलेले आहे.  परंतु अनेक स्थळी - विशेषतः पंधराव्या सर्गातील चित्रबंधामुळे - त्याची रचना क्लिष्टही झालेली आहे. कदाचित यामुळेच मल्लिनाथाने किरातार्जुनीयाला ‘नारिकेलपाक’ म्हटले आहे.

कालिदासाची महाकाव्ये हीच भारवीची प्रेरणा असली पाहिजे.  भारवीने एवढे एकच महाकाव्य रचले असले, तरी उत्तरकालीन महाकाव्यांच्या रचनेचे नियम विशेषेकरून किरातार्जुनीयाच्याच रचनेवरून बांधले गेले असावेत.  ह्या महाकाव्यावर वीस टीका लिहिल्या गेल्या आहेत.  यावरून त्याची लोकप्रियता उघड होते.

लेखक: अरविंद मंगरूळकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 2/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate