অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गझल

गझल

गझल एक वृत्तप्रकार आहे, त्याचप्रमाणे तो एक काव्यप्रकार व गायनप्रकारही आहे. इस्लामी संस्कृतीकडून भारतीय संगीतास मिळालेल्या देणगीत या सुगम गायनप्रकाराचा समावेश होतो.

प्राचीन इराणमधील (पर्शियामधील) या प्रेमगीताचा प्रकार भारतात सूफी संतांच्यामुळे रुजला. ईश्वर-भक्ताचे नाते प्रियकर-प्रेयसीमधील संबंधाच्या परिभाषेत स्पष्ट करणाऱ्या या संतांनी आपली प्रार्थनागीते गझल या काव्यप्रकारात रचली आणि त्यांना सांगीतिक आकार देताना भारतीय रागतालांचा उपयोग केला. भारतातील संगीतपरंपरा आणि संगीत निषिद्ध मानणाऱ्या इस्लामचा विजय या दोन्हींचा परिपाक म्हणजे हा गायनप्रकार होय, तेराव्या शतकातील सूफी संत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती  व खल्जी आणि तुघलक साम्राज्यांचा राजकवी अमीर खुसरौ  यांच्यामुळे पुढे हा प्रकार फोफावला. अनेक मोगल बादशहांनीही पुढे या प्रकारास राजाश्रय दिला. शेवटचा मोगल बादशहा बहादूरशाह जफर याच्या पदरी गालिब  व जौक हे प्रसिद्ध गझलरचनाकार शायर असून स्वतः जफर एक प्रसिद्ध शायर होता.

गझलाचे अनेक चरण असून दर दोन चरणांच्या प्रत्येक खंडास ‘शेर’ म्हणतात. एका गझलात कमीत कमी पाच व अधिकात अधिक सतरा शेर असतात. पण यासंबंधी कोणताही काटेकोर नियम नसतो. शेरातील दोन सारख्या चरणांना मिळून ‘मिसरा’ म्हणतात. शेराच्या शेवटी येणाऱ्या सारख्या शब्दांना ‘रदीफ’ म्हणतात. यांचे यमकाशी साम्य आहे. या रदीफच्या आधी येणाऱ्या व सारखे ध्वनी असणाऱ्या शब्दांना ‘काफिया’ म्हणतात. यांचे अनुप्रासांशी साम्य आहे. ज्या शेराच्या दोन्ही मिसरांमध्ये रदीफ आणि काफिया सारखे असतात, त्या शेरास ‘मतला’ म्हणतात. गझलाच्या आरंभी बहुधा मतला असतोच.

गझलाच्या पहिल्या शेरास ‘स्थायी’ म्हणतात. उरलेल्या सर्व शेरांना ‘अंतरे’ म्हणतात. बहुधा सर्व अंतऱ्यांची चाल सारखी असते. ज्या रागांत ठुमरी  व टप्पा हे गायनप्रकार आविष्कृत होतात, त्यांचाच उपयोग गझलांच्या बाबतीतही बहुधा केला जातो. अर्थात रागविस्तार वा रागाची शास्त्रोक्तता यांवर भर नसतो. गझलाबरोबरचा ठेका दुसऱ्या शेरापासून किंवा पहिल्या शेराच्या चरणार्धापासून सुरू होतो. दादरा, रूपक, केरवा, पुश्तो हे ताल बहुधा वापरले जातात. पहिला शेर विलंबित लयीत आणि बाकीचे मध्य लयीत गाइले जातात.

गझल गाणाऱ्या गायकगायिकांत सुंदराबाई, गोहरजान, सहगल, नूरजहान, बेगम अख्तर, लता मंगेशकर, तलत महमूद इत्यादींचा समावेश होतो.

 

लेखक : अशोक रानडे

माहिती स्रोत:  मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate