অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ट्यूटॉनिक पुराणकथा

ट्यूटॉनिक पुराणकथा

ट्यूटॉन लोकांना इंडो-यूरोपियन पूर्वजांकडूनच पुराणकथांचा वारसा मिळाला होता. हे लोक जर्मनी, बाल्टिक समुद्रातील बेटे, तसेच आईसलँड, नॉर्वे, डेन्मार्क व स्वीडन या देशांनी बनलेल्या स्कँडिनेव्हियन प्रदेशातील होत. गॉथ, ट्यूटॉन, जर्मन व अँग्लो-सॅक्सन लोकांचे ते पूर्वज होते. या प्रदेशातील लोकांच्या पुराणकथांत खूपच विविधता असून कित्येकदा एका ठिकाणी अत्यंत प्रसिद्ध असलेली देवता दुसऱ्या ठिकाणी अज्ञातही असे. ज्यांच्याकडून या पुराणकथांची माहिती मिळाते ते लेखक स्वतः ख्रिस्ती असल्यामुळे या कथांवर ख्रिस्ती प्रभावही आढळतो. स्कँडिनेव्हियन लोकांनी मात्र ख्रिस्ती धर्म पतकरल्यानंतरही मूळच्या कथा जपण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला दिसतो. लॅटिन व ग्रीक ग्रंथांतूनही या पुराणकथाची माहिती मिळते. पश्चिम व उत्तर जर्मनीतील ग्रंथांतूनही बरीचशी माहिती मिळते. प्रारंभी पोकळीतून ढग, नद्या इत्यादींची निर्मिती झाल्यावर ईमीर हा मानवी रूपातील ‘जायंट’ निर्माण झाला. तो जायंटलोकांचा पूर्वज होता.

जायंट हे देवांच्याही आधीचे होत. भूकंप, वादळे, ज्वालामुखी इत्यादींचे मानवीकरण करून जायंट ही कल्पना निर्माण केली होती, असे दिसते. ईमीरच्या डाव्या काखेतील घामापासून एक स्त्री निर्माण झाली. पुढे बरी नावाचा एक प्राणी प्रकट झाला. त्याचा मुलगा बॉर होय. त्याच्यापासून बास्टला नावाच्या जायंटकन्येला ओडिन, व्हीली आणि व्हे हे तीन देव झाले. नंतर देवांनी वृद्ध ईमीरला मारले. त्याच्या मृतदेहापासून विश्वनिर्मिती झाली. त्याच्या प्रेतातील किड्यांपासून ‘बुटके’ पुरुष निर्माण झाले. गुप्त खजिन्यांचे रक्षण करणारे कुरूप बुटके हे सोनार व लोहार होते. देवांची शस्त्रे व देवींचे दागिने त्यांनीच बनवले. नंतर ओडिन, होनीर आणि लोडूर हे देव एकदा फिरायला गेले असताना, त्यांनी वृक्षाचा निर्जीव बुंधा पाहून त्यात प्राण भरले आणि त्याला मानव बनवले. त्या मानवाला आश्क आणि त्याच्या पत्नीला एंबल म्हटले जाई. त्यांच्यापासून मानवी वंश सुरू झाला. विश्वनिर्मितीच्या इतरही परंपरा आढळतात. एसीर आणि व्हनीर असे दोन प्रकारचे देव होते.

थॉर अथवा डॉनर हा ट्यूटॉन लोकांचा एक प्रमुख देव होता. गुरुवार या अर्थाचा ‘थर्सडे’ हा शब्द त्याच्या नावावरूनच बनला आहे. यर्ट म्हणजे पृथ्वी ही त्याची आई आणि वैवाहिक निष्ठेचे प्रतीक असलेली सिफ ही त्याची पत्नी मानली जाई. माग्नी म्हणजे बल आणि मोडी म्हणजे क्रोध हे त्याचे वारस पुत्र होत. तो अनेक कथांचा नायक असून मेघनाद व युद्ध यांचा देव होता. एका बुटक्या पुरुषाने तयार केलेला हातोडा हे त्याचे प्रसिद्ध शस्त्र असून ते शत्रूवर प्रहार करून पुन्हा त्याच्या हातात येत असे. त्याच्या वाहनाला दोन बोकड  जुंपलेले असत. भूक लागली की तो त्यांना मारून खाई; परंतु त्यांच्या कातड्याला हातोडा लागला, की ते पुन्हा जिवंत होऊन त्याचे वाहन ओढत असत. एकदा थ्रिम या जायंटने त्याचा हातोडा चोरला. लोकी हा देव जादूचे वस्त्र परिधान करून तो हातोडा आणण्यासाठी गेला असता जायंटने फ्रेया ही देवी मला दिली, तरच हातोडा परत देईन असे सांगितले. तेव्हा थॉरने फ्रेयाचे आणि लोकीने तिच्या दासीचे रूप घेतले आणि ते दोघे त्या जायंटकडे गेले. हातोडा हातात येताच थॉरने सर्वांचा धुव्वा उडवला. थॉरच्या अद्‍भुत पराक्रमाच्या अशा अनेक कथा आहेत.

बुधवार या अर्थाचा ‘वेन्स्डे’ हा शब्द ज्याच्या नावावरून बनला तो ओडिन हा एक प्रमुख देव होय. मानवी समाजाला त्याने नियमबद्ध केले. जायंट मीमीर हा त्याचा मामा त्याचा सल्लागार होता. एका डोळ्याच्या मोबदल्यात ओडिनने मामाकडून विद्येच्या झऱ्यातील पाणी घेतले होते. एसीर व व्हनीर यांच्या युद्धांत मीमीर मारला गेला; परंतु ओडिनने त्याचे डोके मसाल्यात ठेवून मंत्र म्हटले व त्यामुळे ते डोके ओडिनला गूढ गोष्टींची उत्तरे देत राहिले. ओडिन हा फ्रिग म्हणजेच फ्रायजा या देवीचा पती होता. तो विद्वत्ता व काव्य यांचाही देव होता.संस्कृत द्यौस् आणि ग्रीक झ्यूस या नावांशी संबंधित अशा टीयूझ या देवाला टिवू, टीर, ट्‌सीऊ इ. नावे होती. मंगळवार या अर्थाचा ‘टयूझडे’ हा शब्द त्याच्या नावापासून बनला आहे. द्वंद्वयुद्धांत ज्याच्यावर त्याची कृपा होई, तो विजयी होत असे. काही जण त्याला ओडिनचा, तर काही जण हीमीर या जायंटचा पुत्र मानतात. जायंट लांडगा फेन्‍रीर हा देवांचा शत्रू होता.

देवांचा लाडका असलेला प्रकाशदेव बाल्डर हा ओडिन आणि फ्रिग यांचा मुलगा होता. मूळचा अग्निदेव असलेला लोकी व ओडिन यांनी मैत्री व बंधुत्वाची शपथ घेतली होती. लोकीने काही वेळा देवांना सहाय्य केले असले, तरी त्याची बरीचशी कृत्ये आसुरी स्वरूपाचीच होती. एकदा त्याने थॉरची बायको सिफ हिचे सुंदर केस कापले. संतापलेल्या थॉरने त्याला मुठीत पकडून त्याच्या हाडांचा चुराडा करण्यास सुरुवात केली. तेव्हा बुटक्याकडून तिच्यासाठी सोनेरी केस आणण्याचे वचन देऊन त्याने आपली सुटका करून घेतली.

स्कँडिनेव्हियामध्ये एसीर या देवाखेरीज शांत व उपकारक असे व्हनीर हे देवही मानले जात. एसीर आणि व्हनीर या देवांचे युद्ध आणि भारतातील अश्विनीकुमारांचा देवतासमूहात समाविष्ट होण्याचा प्रयत्न यांविषयीच्या कथांचे मूळ इंडो-यूरोपियन पुराणकथांत असल्याचे अभ्यासक मानतात. एकदा एसीर देवांनी सोने मिळविण्यासाठी गलवेइग या व्हनीर देवीला छळले. तेव्हा भक्तांनी दिलेल्या आहुती प्राप्त करण्याचा समान दर्जा व्हनीरांनी एसीरांकडे मागितला . युद्धानंतर त्यांना तो दर्जा मिळाला. ब्राघी या काव्यदेवाच्या जिभेवरच अक्षरे कोरली होती, असे म्हणतात. स्कँडिनेव्हियन लोकांत पुरुष असलेला न्यॉर्ड हा देव जर्मन लोकांत नेर्थिस नावाची देवी मानला जात होता. कदाचित ही मूळची उभयलिंगी देवता असावी. मृतांच्या अधोलोकातील देवीला हेल म्हटले जाई. जलदेवतांना मानवी रूप घेता येई. अत्यंत सुंदर असलेल्या निक्सी या त्यांपैकीच होत. युद्धात कोणाला यश द्यायचे हे ठरविणाऱ्या, हंसी बनणाऱ्या आणि पाहुण्यांचे आतिथ्य करणाऱ्या ओडिनच्या सहचरी स्त्रिया म्हणजे व्हल्कीरीझ या होत. यांखेरीज नवजातांचे भविष्य ठरविणार्‍या नॉर्न नावाच्या अतिमानवी स्त्रियाही होत्या. फ्रिग या देवीच्या नावावरूनच शुक्रवार या अर्थांचा ‘फ्रायडे’ हा शब्द तयार झाला. ती विवाहांचे रक्षण करीत असे; पण स्वतः मात्र एकनिष्ठ नसे.

विकारवशतेमुळे देवांचा नाश झाला. त्यांनी त्यांच्यासाठी महाल बनविणार्‍या जायंटला फसवले, गलवेइगला छळले आणि तेव्हापासूनच सर्व उदात्त तत्त्वांचा नाश होऊन दुर्गुणांचे थैमान माजले. जे देव विकारवश झाले नव्हते ते वाचले.  थॉरचे माग्नी व मोडी हे पुत्र, ओडिनचे व्हीडार आणि वह्‌ली हे दोन पुत्र व दोन पुतणे आणि होनीर हे देव वाचले. परंतु बहुतेक देव नष्ट झाल्यामुळे मानव संकटात सापडले. सुर्टर ह्या जायंटने पृथ्वीला आग लावली. तारे पृथ्वीसह कोसळू लागले. सर्व काही जळून गेल्यावर सर्वत्र पाणी येऊन पुन्हा नव्या जगाची सुरुवात झाली. बाल्डरचा पुन्हा जन्म झाला. नवे देव आले. सूर्यपुत्र नवा सूर्य बनला. धान्य आले आणि पवित्र वृक्षाच्या लाकडात लपल्यामुळे वाचलेल्या मानवांपासून नवा मानववंश सुरू झाला.

संदर्भ  : 1 Aldington, Richard; Ames, Delano; Trans. New Larousse Encyclopaedia of Mythology, Mythology, London, 1975.

2.Bolle, K. W. The Freedom of Man in Myth,Mashhville, Tenn. 1968.

3. Campbell, y3wuoeph, The Masks of God, 4 Vols. London,1959-68.

4. Dandekar, R.N.Vedic Religion and Mythology, Poona, 1965.

5 Dent, J. M ;Dutton, E. p. Everyman’s Dictionary of Non- Classical Mythology, New York, 1952.

6. Eliade,Micera; Trans. Myth and Reality, New York,1963.

7. Frazer,J.G.The Golden Bough, New York, 1922

8. Gray, L. H. Ed. The Mythology of all  Races, 13 Vols., Boston 1925-36.

9. Hackin ,J.; Huart Clement & other, trans , Atkinson, F, M, Asiatic mythology, London, 1967.

10. Hooke, S.H. Ed. Myth and Ritual, New York, 1933.

11. Ions, Veronica, Indian Mythology, London, 1967.

12. James, e.o Prehistoric, Religions London, 1957.

13. Jensen, a,e Trans. Myth and Cult among Primitive Peoples, New York, 1963.

14.  Jung, C.G. Kerenyi, K. Trans. Essays on a Science of Mythology, New York, 1950.

15.  Kramer, S.H. Ed ,Mythologies of the Ancient World , Creation, New York 1961.

16. Long C.H.Alpha : The Myths of Cretion, new York, 1963.

17. Malinowaski, Bronislaw Magic, Science and Religion and other Essays, Bosyon, 1948.

18. Malinoyaski Bronislaw Sex, Culture and Myth  ,London 1963.

19. Middleton, John, Myth and Cosmos: Readings in Mythology and Symbolism New York, 1967.

20. Picard, B.L Ed. The Enclcopadia of Myth & Lagends of All Nations, London 1962.

21. Savill, Sheila Ed. Barker Mary: Cook, Christopher Pears Encyclopaedia of Myth and Lagends,       4. Vols., London, 1976-78.

लेखक: आ. इ. साळुंखे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/20/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate