অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दैनंदिनी (डायरी)

दैनंदिनी (डायरी)

दैनंदिन अनुभवांची लिखित नोंद राखणारा एक लवचिक वाङ्‌मयप्रकार. मूलतः काही व्यावहारिक उद्दिष्टांतून निर्माण झालेल्या दैनंदिनीला पुढे काळाच्या ओघात तिच्या आशयप्रकृतिनुरूप वाङ्‌मयीन, सामाजिक, सांस्कृतिक, तत्त्वचिंतनात्मक अशी अनेक परिमाणे लाभत गेली. अनेकविध क्षेत्रांतील भिन्नभिन्न कर्तृत्वांच्या व्यक्तींना या प्रकारचे आकर्षण वाटत आले आहे.

आधुनिक काळात काही व्यावसायिक उद्दिष्टांतून छापील आकर्षक स्वरूपात दैनंदिन्यांच्या निर्मितीची व वाटपाची प्रथा रूढ झाली आहे. अशा दैनंदिन्यांमध्ये नोंदी व टिपणे ठेवण्यासाठी तारीखवार पृष्ठांची सोय असतेच; शिवाय नित्योपयोगी विविध स्वरूपाची माहिती, कोष्टके आदी संकलित केलेली असतात. अशा दैनंदिन्या सामान्यतः इंग्रजी कॅलेंडरनुसार किंवा काही हिंदू पंचांगानुसारही असू शकतात. या दैनंदिन्या शासकीय कचेऱ्यांतून तसेच खाजगी उद्योगधंद्यांतून त्यांच्या कर्मचाऱ्यांना वा ग्राहकांना पुरवल्या जातात. त्यांचा उपयोग रोजच्या कामाचा अहवाल, कार्यपद्धतीविषयीची टाचणे, स्मरणार्थ नोंदी अशा विविध प्रकारांनी होऊ शकतो. काही दैनंदिन्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये उपयुक्त ठराव्यात अशा हेतूनेच छापल्या जातात. उदा., प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यटक दैनंदिनी, लेखक व लेखन-प्रकाशनविषयक सर्व व्यवहारांची नोंद ठेवणारी प्रकाशन डायरी, गृहिणींसाठी आवश्यक व नित्योपयोगी माहिती संकलित करणारी स्त्री-सखीसारखी दैनंदिनी इत्यादी.

नूतन वर्षारंभी भेटीदाखल दैनंदिन्या पुरवणे, हा अलीकडे व्यावसायिक विश्वातील जाहिरातीची आणि ग्राहक-समाधानाचा एक आकर्षक प्रकार बनला आहे. दैनंदिन्यांचे सामान्यतः दोन प्रकार मानता येतात. घटनाप्रधान वस्तुनिष्ठ दैनंदिनीत पाहिलेल्या वा ऐकलेल्या घटनांच्या त्याच दिवशी केलेल्या सलग व संक्षिप्त नोंदी आढळतात. त्यांचा उपयोग मुख्यतः कालिक वृत्तान्त म्हणून व त्यांतील नोंदी साक्षेपाने पारखून घेतल्यास समाजशास्त्रीय, राजकीय अथवा आर्थिक इतिहास लिहिण्यासाठीही होऊ शकतो.

इतिहासकालीन वाकेनिविशी टिपणे, जॉर्ज फॉक्सचे (१६२४–९१)जर्नल Journal d’un bourgeois de Parisया नावाने प्रसिद्ध झालेली एका फ्रेंच अनामिकाची टिपणे (१४०९–३१) ही या प्रकारातील दैनंदिन्यांची काही उदाहरणे होत. सॅम्युएल पिपेसची १६६०–६९ या काळातील दैनंदिनी आंग्ल साहित्यातील या प्रकाराचा उत्कृष्ट नमुना होय. ललित साहित्यात समाविष्ट होणाऱ्या दुसऱ्या प्रकाराचा दैनंदिन्या वैयक्तिक भूतींच्या सादप्रतिसादांवरच लक्ष केंद्रित करून भावभावना, कल्पनातरंग, चिंतनमनन आणि विचारविकार यांचा सजीव व बोलका आलेख शब्दरूपात साकार करतात. प्रसिद्धीची अपेक्षा नसल्याने त्यांतून मानवी अनुमनाचा स्वच्छंद व मुक्त आविष्कार घडू शकतो. ललित निबंध व भावगीत या प्रकारांशी या दैनंदिनीचे निकटचे नाते जुळते. या नोंदी स्वान्तः सुखाय असल्याने परनिंदा, आत्मश्लाघा वा प्रतारणा यांना त्यांत वाव नसतो. त्यांतील मुक्त, प्रकट चिंतन वा निर्लेप आत्मपरीक्षण म्हणजे अप्रकट मनाचे रेखाचित्रच ठरते.

दैनंदिनीमध्ये पाल्हाळ वा तर्कवाद यांचे वावडे असल्याने त्यातील संक्षिप्त टिपणीवजा आणि आत्मनेपदी निवेदनाला ते प्रकाशित करताना विपुल तळटीपांची जोड देणे काही वेळा आवश्यक ठरते. काटेकोरपणाचा अभाव व स्वैर विस्कळितपणा ही दैनंदिनीची सर्वसामान्य लक्षणे ठरतात. एखादा भाकड दिवस नोंदीवाचून कोराही रहातो. खाद्यपेये, वस्त्रालंकार, शकुनापशकुन, रीतिभाती यांविषयींच्या नोंदींतून व्यक्तिमनाप्रमाणेच प्रादेशिक समष्टिमनाचेही दर्शन घडते. आधुनिक काळातील जर्नल ऑफ कॅथरिन मॅन्सफील्ड (१९२७), तसेच फ्रेंच वाङ्‌मयातील आंद्रे झीदची प्रख्यात जर्नल्स (१८८९–१९४९) ही साहित्यगुणांच्या दृष्टीने खास उल्लेखनीय होत.

अन फ्रँकची डायरी ऑफ अ यंग गर्ल (१९४२–४४) हा कलात्मक दैनंदिनीचा उत्कृष्ट आविष्कार होय. ज्यूद्वेषाच्या सामाजिक पार्श्वभूमीवरील व्यक्तिगत अनुभूतींचे तसेच विलक्षण मनोधैर्य आणि आत्मिक सामर्थ्य यांचे अत्यंत भावोत्कट दर्शन तीमधून घडते. संस्कृतात व प्राचीन मराठीत प्रकाशित दैनंदिन्यांचा जवळजवळ अभावच जाणवतो. ना. ग. गोऱ्यांची कारागृहाच्या भिंती (१९४५) ही दैनंदिनी त्यांच्या आदर्शनिष्ठ मनाचे उत्कृष्ट दर्शन घडविते. मराठी मनाच्या ध्येयवादी अनुभूतीचा हा आलेख फार वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. ग. वा. मावळंकरांची काही पाऊले (१९४८) व वा. शि. आपट्यांची रुखरुख (१९४८) हीही या प्रकारातील उल्लेखनीय उदाहरणे होत.

 

लेखक :  शैलजा करंदीकर

माहिती स्रोत :  मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/12/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate