অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोर्तुगीज साहित्य

आदिकाळ

बारावे ते पंधरावे शतक

अगदी आरंभीचे पोर्तुगीज साहित्य बाराव्या-तेराव्या शतकांतले असून त्यात विविध प्रकारच्या भावकवितांचा आणि धार्मिक व ऐतिहासिक गद्याचा समावेश होतो. 'कांतीगश द आमीगु' (प्रियकराने प्रेयसीला उद्देशून म्हटलेली प्रेमगीते), 'कांतीगश द आमोर' (प्रेमगीते) आणि 'कांतीगश द इश्कार्निउ इ मालदिझेर' (उपरोधप्रचुर गीते) हे काही गीतप्रकार होत. ही भावकविता आयबेरियन द्वीपकल्पाच्या वायव्येच्या गॅलिशिया प्रांतात बहरली. प्रॉव्हांसाल भाषेतील कवितेचा प्रभाव तिच्यावर होता. विशेषतः कांतीगश द आमोर आणि कांतीगश द इश्कार्निउ इ मालदिझेर यांच्यावर प्रॉव्हांसाल भावकवितेचा प्रभाव दिसून येतो. ही विविध प्रकारची भावकविता तीन संग्रहांत संकलित करण्यात आलेली आहे. ‘कांसिऑनैरुश’ अशी सामान्य संज्ञा आहे. कांसिऑनैरुश द बिब्लिओतेक द आजूद हा त्यांतील सर्वांत जुना गीतसंग्रह आणि कांसिऑनैरुश द व्हातिकान द कांसिऑनैरुश द बिब्लिओतेक नासियॉनाल ही अन्य दोन संग्रहांची नावे. पोर्तुगीज भावकवींचे तीन प्रकार होते : (१) त्रोव्हादोरिश (उच्चवर्गीय कवी); (२) सेग्रेइश (तुलनेने हलक्या कुळात जन्मलेले आणि अर्थार्जनासाठी कविता करणारे); (३) जोग्राइश (अगदी हलक्या कुळातील चारण). पोर्तुगालचा राजा दिनीश (१२६१–१३२५) आणि बार्सीलुशचा काउंट प्रिन्स पेद्रु (१२८५–१३५४) हे काही उत्कृष्ट भावकवी होते. दिनीश हा राजा तिसऱ्या आफोंसूचा (१२१०–७९) पुत्र. तिसऱ्या आफोंसूने १३ वर्षे फ्रान्समध्ये घालवली होती आणि पोर्तुगालला परतताना तेथून काही कवीही सोबत आणले होते. वाङ्‌मयाला उदार आश्रय देण्याचे त्याचे धोरण होते. त्यामुळे काव्यनिर्मितीला उत्तेजक असे वातावरण निर्माण झाले होते. लेऑन व कॅस्टील ह्या स्पेपमधील प्रदेशांचा राजा-विद्वान लेखक, कवी- दहावा आल्फॉन्सो (१२२१–८४) ह्याच्या विद्या व वाङ्‌मय ह्यांसंबंधीच्या आस्थेचा आदर्श दिनीशपुढे होता. १२९० मध्ये दिनीशने लिस्बन येथे पोर्तुगालमधील पहिल्या विद्यापीठाची स्थापना केली. हे विद्यापीठ पुढे कोईंब्रा येथे हलविण्यात आले. स्पॅनिश, लॅटिन आणि अरबी भाषांतील श्रेष्ठ ग्रंथांचे पोर्तुगीज भाषेत अनुवाद व्हावेत ह्यासाठी दिनीशने प्रयत्न केले; लेओन, कॅस्टील आदि ठिकाणांहून येणाऱ्या कवींना आश्रय दिला; स्वतःही दर्जेदार काव्यलेखन केले. आरंभीच्या पोर्तुगीज गद्यात दिनीशने करून घेतलेल्या पोर्तुगीज अनुवादांबरोबरच ख्रिस्ती मठांतून निर्माण झालेल्या धार्मिक साहित्याचा समावेश होतो. कोईंब्रा आणि आल्कुबासा ही गद्य-निर्मितीची मुख्य केंद्रे होती. मठांचे नियम, संतांची चरित्रे, 'क्रॉनिकाँइश' अथवा ऐतिहासिक इतिवृत्ते, 'नोबिलिआरिउश' म्हणजे पोर्तुगालमधील सरदारघराण्यांची वंशवृत्ते हे पोर्तुगालमधील सुरुवातीचे गद्यलेखन होय. शिलेदारी कादंबऱ्याही लिहिल्या गेल्या. त्यांना पोर्तुगालमध्ये मोठी लोकप्रियता लाभली. आमादिश दे गोल ही आज केवळ स्पॅनिशमध्येच उपलब्ध असलेली विख्यात कादंबरी मुळात पोर्तुगीज भाषेत लिहिली गेली होती, असे एक मत आहे. बार्सीलुशचा काउंट प्रिन्स पेद्रु ह्याने लिव्ह्‌रु द लिन्याजेंश (इं. शी. बुक ऑफ जिनिऑलॉजी) ह्या नावाने संकंलित केलेली सरदारघराण्यांची बखर महत्त्वाची आहे. पोर्तुगीज गद्यसाहित्याने काही नमुने तीत गवसतात.

पंधराव्या शतकात आव्हीजच्या नव्या राजघराण्याचा संस्थापक झ्युआंउ (पहिला झ्युआंउ) ह्याची वाङ्‌मविषयक आस्था पोर्तुगीज साहित्याच्या विकासाला उपकारक ठरली. दाँ दुआर्ती ह्या पहिल्या झ्युआंउच्या पुत्राने लेआल काँसेल्येरू (सु. १४३० इं. शी. लॉयल ॲडवाय्‌झर) हा नैतिक उद्‌बोधनात्मक ग्रंथ लिहिला. फॅर्नांउ लॉपिश (१३८० ? – १४६० ?) हा पोर्तुगालचा पहिला थोर इतिहासकार. पोर्तुगालच्या राजअभिलेखागाराचा (रॉयल अर्‌काइव्ह्‌ज) प्रमुख म्हणून त्याची नेमणूक झाली होती. पोर्तुगीज राजांचा इतिहास अगदी आरंभापासून राजा पहिला झ्युआंउ ह्याच्या कारकीर्दीपर्यंत त्याने लिहिला; तथापि ह्यांतील काहीच इतिवृत्ते आज उपलब्ध आहेत. आझुरारा आणि रुइ द पीना हे अन्य दोन उल्लेखनीय पोर्तुगीज इतिहासकार होत. आझुराराच्या इतिवृत्तांत व्यासंगनिर्देशक उद्‌धृतांची रेलचेल आढळते. रुइ द पीनाची शैली साधी पण प्रभावी आहे. त्याने आपल्या इतिवृत्तांतून काढलेली पोर्तुगीज राजांची व्यक्तिचित्रे वेधक आहेत. चौदाव्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगीज भावकवितेला एक प्रकारच्या अवनतावस्थेतून जावे लागले; नाव घेण्यासारखे कवी झाले नाहीत. तथापि पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र तिला पुन्हा बहर आला. ह्या भावकवितेवर प्रभाव होता स्पॅनिश आणि इटालियन कवितेचा. दान्ते आणि पीत्रार्क हे पोर्तुगीज कवींचे आदर्श बनले. पंधराव्या शतकातील बरीचशी पोर्तुगीज कविता गार्सीअ द रॅझॅन्द (१४७० ?–१५२६ ?) ह्याने कांसिऑनैरुश झ्यॅराल (१५१६; इं. शी. जनरल साँग बुक) ह्या नावाने संकलित केलेली आहे. २८६ कवींच्या मिळून एकूण १,००० कविता ह्या संकलनात अंतर्भूत आहेत. प्रेमविषयक, उपरोधपर आणि सुभाषितवजा अशा ह्या कविता आहेत.

सोळावे शतक

पोर्तुगीज साहित्येतिहासातील 'अभिजात युग' म्हणून हे शतक ओळखले जाते. इटलीतून प्रबोधनाच्या प्रेरणा पोर्तुगालने घेतल्या. ह्या प्रबोधनाचा साक्षात्कार घडविणाऱ्या आरंभीच्या साहित्यिकांत सा द मिरान्दा (१४८१–१५५८) ह्या कवीचा अंतर्भाव होतो. इटलीत त्याचे सहा वर्षे वास्तव्य होते. दान्तेने 'नवीन सुमधुर' म्हणून गौरविलेली इटालियन काव्यशैली, अभिजात छंद, आणि सुनीत, कांझोने ह्यांसारखे काव्यप्रकार मिरान्दाने इटालियन साहित्याच्या प्रभावातून पोर्तुगीज साहित्यात आणले. अभिजात इटालियन शैलीत त्याने उश इश्त्रांझ्यैरुश (१५२७, इं. शी. द स्ट्रेंजर्स) आणि व्हिल्याल्पान्दुश (१५३८, इं. शी. ब्लस्टरर्स) ह्या दोन सुखात्मिकाही लिहिल्या. अँतॉन्यू फॅर्रैरा (१५२८–६९) ह्याने उत्कृष्ट सुनीते रचिली. त्याच्या ओडरचनेवर (उद्देशिका) हॉरिसचा प्रभाव दिसून येतो. अभिजात आदर्श समोर ठेवून काश्त्रु (१५८७) ही शोकात्मिकाही त्याने लिहिली. बॅर्नार्दीं रिबैरु (१४८२–१५५२) आणि क्रिश्तॉव्हांउ फाल्कांउ (१५१८–५७) हे ह्या कालखंडातील अन्य दोन उल्लेखनीय कवी. बॅर्नार्दीं रिबैरु हा गोपगीते रचणारा पहिला पोर्तुगीज कवी. त्याने लिहिलेल्या पाच गोपगीतांनी पोर्तुगीज गोपगीतरचनेला एक निश्चित वैशिष्ट्यपूर्ण असे स्थान प्राप्त करून दिले. कामाँइशसारख्या (१५२४–८०) श्रेष्ठ कवींनी रिबैरूच्या गोपगीतांचा आदर्श समोर ठेविला होता. क्रिश्तॉव्हांउ फाल्कांउ ह्याचे क्रिश्फाल (१५५४) हे गोपकाव्य प्रसिद्ध आहे. काही अभ्यासक बॅर्नार्दींला ह्या काव्याचा कर्ता मानतात. कामाँइशकृत लुझीअड्स (१५७२) हे राष्ट्रीय महाकाव्य म्हणजे ह्या कालखंडात घडून आलेले सर्वांत मोठे वाङ्‌मयीन कर्तृत्व होय. दहा सर्गांच्या ह्या महाकाव्यात वास्को द गामाचे जलपर्यटन आणि त्याचे भारतातील आगमन ह्या विषयाच्या चौकटीत पोर्तुगालच्या एकूण इतिहासातील उज्ज्वल क्षण जिवंतपणे चित्रित केलेले आहेत. ह्या महाकाव्याचा एक विशेष म्हणजे त्याचे नायकत्व कोणा एका विशिष्ट व्यक्तीकडे नाही, तर पोर्तुगाल हे सबंध राष्ट्रच ह्या महाकाव्याचे नायक बनले आहे. झ्यील व्हिसेंत (१४७१ ?–१५३७ ?) ह्या नाटककाराचे कर्तृत्व ह्याच शतकातले. त्याने एकूण ४४ नाटके लिहिली. त्यांतील काही स्पॅनिश भाषेत आहेत, तर काहींत पोर्तुगीज आणि स्पॅनिश अशा दोन्ही भाषांचे मिश्रण आढळून येते. इनेश पेरैरा (१५२३) ही सुखात्मिका त्याची सर्वश्रेष्ठ नाट्यकृती होय. आव्तु द आल्मा (१५१८, इं. शी. द सोल) ही त्याची आणखी एक उल्लेखनीय नाट्यकृती. ती रूपकात्मक आहे. तत्कालीन समाजाचे नैतिक उद्‌बोधन घडवून आणण्याच्या आस्थेतून उमटणारा उपरोध त्याच्या नाट्यकृतींतून अनेकदा प्रत्ययास येतो. त्याची भाषा आर्ष असली, तरी समृद्ध, प्रवाही आणि औचित्यपूर्ण अशी आहे. एक प्रकारची उत्स्फूर्त भावगेयताही त्याच्या नाट्यकृतींत आढळते. पोर्तुगीज रंगभूमीचा जनक म्हणून त्याचा गौरव केला जातो.

सोळाव्या शतकातील गद्यकृतींत इतिहासलेखन विशेष ठळकपणे नजरेत भरते. झ्युआंउ द बार्रुश (१४९६ ?–१५७० ?), दामिआंउ द गॉइश (१५०२–७४), दिओगु द कौतु (१५४२–१६१६), गाश्पार कुरैआ (१४९६–१५६१?) ही नावे ह्या संदर्भात उल्लेखनीय आहेत. बार्रुश हा सोळाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ इतिहासकार. दॅकादाश द आझिआ (४ खंड, १५५२, १५५३, १५६३ आणि १६१५, इं. शी. डेकेडस् ऑफ एशिया) हा त्याचा प्रमुख ग्रंथ. साम्राज्यसंपादन, नौकानयन, व्यापार अशा क्षेत्रांत पोर्तुगालने आशियाच्या भूमीवर कोणती कामगिरी बजावली हे साध्या पण जोमदार शैलीत बार्रुशने निवेदिले आहे. विख्यात रोमन इतिहासकार लिव्ही ह्याचा आदर्श बार्रुशने स्वतःसमोर ठेवला होता. महाकवी कामाँइशवर बार्रुशच्या ह्या ग्रंथाचा मोठा प्रभाव होता. क्रॉनिका दू इंपॅरादोर क्लारिमुन्दू (१५२०, इं. शी. क्रॉनिकल ऑफ एंपरर क्लारिमुन्दू) हा त्याने लिहिलेला रोमान्स. ह्या ग्रंथाखेरीज कार्तीन्या पारा आप्रेन्देर अ लेर (१५४०, इं. शी. ए प्रायमर फॉर टीचिंग टू रीड), ग्रामातिका द लींग्वा पोर्तुगेझा (१५३९, इं. शी. ग्रॅमर ऑफ पोर्तुगीज लँग्वेज) अशी शैक्षणिक स्वरूपाची पुस्तकेही त्याने लिहिली. दामिआंउ द गॉइश ह्याने राजा इमॅन्युएलचे इतिवृत्त लिहिले (१५६६). दिओगु द कौतु ह्याने लिहिलेल्या दॅकादाश ४–१२ (१६०२–१५, इं. शी. डेकेड्स ४–१२) ह्या ग्रंथात बार्रुशकृत दॅकादाशमधील इतिहासकथन पुढे चालविले आहे. सॉल्दादु प्रातिकु (प्रकाशित १७९०, इं. शी. प्रॅक्टिकल सोल्जर) ह्या ग्रंथात कौतु ह्याने पूर्वेकडील पोर्तुगीज साम्राज्याच्या ऱ्हासाची मीमांसा केली आहे. गाश्पार कुर्रैआने पोर्तुगीज साम्राज्याचा उत्कर्ष पाहिलेला होता. लॅन्दश द ईन्दिआ (प्रकाशित १८०९, इं. शी. लेजंड्स ऑफ इंडिया) ह्या ग्रंथात पोर्तुगीज साम्राज्यविस्ताराचा इतिहास दिला आहे. भारतातील चालीरीतींचे चित्रमय गद्यातील केलेले वर्णन त्यात आढळते.  ह्या काळात उत्तम प्रवासवर्णनेही लिहिली गेली. फॅर्नाव मेंदिश पींतु (१५१०?–८३) ह्या साहसी प्रवाशाने पेरेग्रिनासाउं (प्रकाशित १६१४, इं. शी. पिल्‌ग्रिमेज) हा ग्रंथ लिहून अरेबिया, भारत, ब्रह्मदेश, जपान ह्यांसारख्या पूर्वीय देशांतील आपले विविध अनुभव कथन केले आहेत. ह्या ग्रंथाला फार मोठी लोकप्रियता लाभली. सतराव्या शतकात निरनिराळ्या भाषांमधून त्याच्या १९ आवृत्त्या निघाल्या. द व्हॉएजिस अँण्ड अड्व्हेंचर्स ऑफ फॅर्नाव मेंदिश पींतु अ पोर्तुगाल ह्या नावाने ह्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद १६६३ मध्ये प्रसिद्ध झाला. १५५२ ते १६०४ ह्या कालखंडात पोर्तुगालची जी जहाजे समुद्रात बुडाली, त्यांचे वृत्तांत इश्ताँरिय त्राजिको - मारितिम ह्या नावाने १७३५–३६ मध्ये मुद्रित करण्यात आले. ह्या संकलनातील काही वृत्तांतांनी लुझीअड्स मधील काही करुणोत्कट पद्यांना प्रेरणा दिली आहे.

पोर्तुगालचा श्रेष्ठ भावकवी बॅर्नार्दीं रिबैरु ह्याने मेनीना इ मोसा ओउ साउदादिश (१५२४, इं. शी. यंग मेड ऑर यर्निंग्‌ज) ही कादंबरी लिहून पोर्तुगीज साहित्यात गोपकादंबरी (पास्टोरल नॉव्हेल) आणली. रोमान्सच्या वळणाने लिहिलेल्या ह्या कादंबरीतील निवेदनाचा एकंदर सूर कारुण्याचा-एखाद्या विलापिकेसारखा - आहे. त्यानंतर केल्या गेलेल्या रोमान्सलेखनात फ्रांसीश्कु द मॉराइश (१५००–७२) ह्याचा पाल्मैरी द इंग्लातॅर्रा (१५६७, इं. शी. पाल्मैरीन ऑफ इंग्लंड) हा रोमान्स विशेष उल्लेखनीय आहे. संपन्न कल्पनाशक्ती आणि प्रत्ययकारी लेखनशैली ही ह्या रोमान्सची वैशिष्ट्ये.

फ्रेइ येइतोर पींतु (१५२८? –८४) आणि फ्रेइ तॉमॅ द झ्येझूश (१५२९–८२) ह्या गूढवाद्यांनीही अनुक्रमे इमाझ्यँ द व्हीदा क्रिश्तां (१५७२, इं. शी. इमेज ऑफ क्रिश्चन लाइफ) व त्राबाल्युश द झ्येझूश (१६०२, इं. शी. जिझसीस वर्क्स) हे ग्रंथ लिहून पोर्तुगीज गद्यात मोलाची भर घातली.

सतरावे शतक

पोर्तुगीज साहित्याचा हा अवनतकाल. १५८० मध्ये स्पेनचा राजा दुसरा फिलिप ह्याने पोर्तुगालची राजसत्ता बळकावली. दुसरा फिलिप हा कट्टर रोमन कॅथलिक असून धर्मन्यायपीठे (इंक्विझिशन) उभारण्यात त्याने पुढाकार घेतला होता. ह्या धर्मन्यायपीठाने अभ्यवेक्षणाचे (सेन्सॉरशिप) कडक नियम जारी केल्यामुळे ग्रंथनिर्मितीवर विपरित परिणाम घडून आला. कवितेच्या क्षेत्रात स्वतंत्र प्रतिभेचा प्रत्यय देणाऱ्या कवीपेक्षा स्पॅनिश कवितेचे-विशेषतः लूइस दे गोंगोरा इ आरगोते ह्याच्या कवितेचे–अनुकरण करणारे कवी ह्या काळात प्रामुख्याने दिसून येतात. फ्रांसीश्कु रोद्रीगिश लोबु (१५७९–१६२२) हा ह्या शतकातील एक विशेष उल्लेखनीय कवी. बॅर्नार्दीं रिबैरूच्या गोपगीतरचनांची परंपरा त्याने पुढे चालविली. एक्लॉगश (१६०५) हा त्याने लिहिलेल्या गोपगीतांचा संग्रह प्रसिद्ध आहे. लोबूने प्रिमाव्हॅरा (१६०१) हा गोप रोमान्स (पास्टोरल रोमान्स) आणि कोर्ति ना आल्दैआ (१६१९, इं. शी. व्हिलिज कोर्ट) हा ग्रंथही लिहिला. हा ग्रंथ लिहिताना इटालियन साहित्यिक बाल्दास्सारे कास्तील्योने (१४७८–१५२९) ह्याच्या  इल लीब्रो देल कोर्तेजियानो (इं.शी. द. बुक ऑफ द कोर्टियर) ग्रंथाचा आदर्श लोबूपुढे होता. दाँ फ्रांसीश्कु मानुयॅल द मॅलु (१६०८–६६) ह्याने शंभर सुनीते आणि तीन गोपगीते लिहिली. त्याच्या गद्यकृतींत कार्ता द गीआ द काझादुश (१६५०, इं. शी. ए गाइड फॉर द मॅरीड) आणि आपॉलॉगुश दिआलॉगाइश (१६५४–५७, इं. शी. अपॉलॉग्ज इन डायलॉग्ज) ह्यांचा समावेश होतो.

ह्या शतकात झालेल्या गद्यलेखनात फ्रेइ बॅर्नार्दु द ब्रीतु (१५६९–१६१७) व अन्यांनी लिहिलेल्या मॉनार्कीआ लुझिताना (१५९७–१७२७, इं. शी. पोर्तुगीज मॉनर्की) ह्या इतिहासग्रंथाचा उल्लेख आवश्यक आहे. फ्रेइ बॅर्नार्दु द ब्रीतु ह्याच्या इतिहासलेखनात आख्यायिकांचे प्रमाण अधिक आहे; चिकित्सक वृत्तीचा प्रत्ययही त्याच्या लेखनातून फारसा येत नाही; तथापि एक श्रेष्ठ शैलीकार गद्यलेखक म्हणून त्याची प्रतिमा ह्या ग्रंथातून मनावर ठसते. फ्रेइ बॅर्नार्दु द ब्रीतु ह्याच्या इतिहासलेखनाचे कार्य ज्यांनी पुढे नेले, त्यांतील अँतॉन्यू ब्रांदाऊ ह्याचा उल्लेख आवश्यक आहे. इतिहासलेखनाची योग्य ती जाणीव ठेवून त्याने आफोंसू आंरीक (१११२–८५) ह्या पोर्तुगालच्या पहिल्या राजापासून दुसऱ्या झ्युआंउ (१४५५–९५) पर्यंतचा इतिहास लिहिला. फ्रेइ लुईश द सोव्झा (१५५५–१६३२) ह्याने लिहिलेले फ्रेइ बार्तोलोमेउ दुश मार्तिरिश ह्याचे चरित्र उत्कृष्ट भाषाशैलीचे एक लक्षणीय उदाहरण होय. मारिआना आल्कोफॉरादु (१६४०–१७२३) ह्या जोगिणीने एक फ्रेंच सरदारास लिहिलेली प्रेमपत्रे त्यांच्या वाङ्‌मयीन गुणवत्तेमुळे उल्लेखनीय ठरतात. मानुयॅल बॅर्नार्दिश (१६४४–१७१०) ह्या धर्मोपदेशकाच्या प्रवचनांत पोर्तुगीज भाषेची संपन्नता व लालित्य दिसून येते, तर अँतॉन्यू व्हियैरा (१६०८–९७) ह्या धर्मोपदेशकाच्या गद्यग्रंथांतून प्रभावी वक्तृत्वगुणांचा प्रत्यय येतो. नाटयालेखनाच्या क्षेत्रात मात्र फारशी मोलाची कामगिरी घडून आल्याचे दिसत नाही.

अठरावे शतक

ह्या शतकात गद्यग्रंथांची निर्मिती प्रामुख्याने झाली; ज्ञानजिज्ञासा वाढली व परिणामतः रॉयल अकॅडमी ऑफ हिस्टरी (१७२०); पोर्तुगीज अर्काडिया (१७५६); रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स (१७८०) आणि न्यू अर्काडिया (१७९०) अशा ज्ञानसंस्थांची स्थापना झाली. इतिहासग्रंथांची निर्मिती; भाषा-साहित्याबाबतची आस्था; विद्याव्यासंगी व्यक्तींना एकत्र आणण्याची धडपड ह्या या शतकातील लक्षणीय प्रवृत्ती होत्या. पोर्तुगीज साहित्याने स्पॅनिशच्या साहित्याने स्पॅनिशच्या प्रभावातून बाहेर पडून आपले स्वतंत्र सत्त्व प्रकट करावे, ह्यासाठी क्रूज इ सील्व्हा (१७३१–९९) सारख्या कवींनी प्रयत्न केले. क्रूज इ सील्व्हाने उद्देशिका, सुनीते आदी काव्यरचना केली. उ  इस्सॉप (इं. शी. द हायसप) ह्या वीरविडंबनात्मक (मॉक-हिरॉइक) काव्याचा कर्ता म्हणून तो आज मुख्यतः ओळखला जातो. कुर्रैआ गार्सांउ (१७२४–७२) हा आणखी एक उल्लेखनीय कवी. हॉरिससारख्या अभिजात रोमन कवींचा आदर्श त्याच्या समोर होता. क्रूज इ सील्व्हा आणि गार्सांउ हे दोघेही पोर्तुगीज अर्काडियाचे क्रियाशील सदस्य होते. पोर्तुगीज अर्काडियाच्या रेंइश कीता (१७२८–७०) ह्या सदस्याने गोपकवी म्हणून लौकिक मिळविला. त्याने काही नाटकेही लिहिली. तॉमाश अँतान्यू गोंझागा (१७४४–१८१०) ह्याने लिहिलेल्या उत्कृष्ट प्रेमकविता मारिलिआ ह्या नावाने संगृहीत करण्यात आल्या आहेत. ज्युझॅ आनास्ताझिउ द कून्या (१७४४? –८७), ज्युझॅ आगोश्तीन्यु द मासेदु (१७६१–१८३१), निकॉलाउ तॉलेन्तीनु द आल्मैदा (१७४०–१८११) आणि बार्‌बॉझाद्यू बुकाज्य (१७६५–१८०५) हे न्यू अर्काडियाचे काही विशेष उल्लेखनीय असे सदस्य होत. द कून्या ह्याने गणितीय तत्त्वांचे विवेचन करणारा ग्रंथ (प्रकाशित १८११) लिहिला. मासेदूने पुस्तपत्रकार म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याच्या काळातील वाङ्‌मयीन आणि राजकीय वातावरण समजून घेण्याच्या दृष्टीने त्याची पुस्तपत्रे मोलाची आहेत. निकॉलाउ तॉलेन्तीनु द आल्मैदा हा प्रभावी उपरोधकार. तत्कालीन समाजातील विविध दोषांचे आणि विसंगतींचे चित्र त्याने आपल्या कवितांतून रंगविले आहे. श्रेष्ठ सुनीतकार म्हणून बार्‌बॉझाद्यू बुकाज्य ख्याती पावला. प्रेम, नीती, तत्त्वज्ञान, शौर्य अशा विविध विषयांवरील पावणेचारशेंहून अधिक सुनीते त्याने लिहिली. विलापिका, उद्देशिका (ओड) ह्यांसारखे काव्यप्रकारही त्याने समर्थपणे हाताळले. फ्रांसीश्कु मानुयॅल नाशसिमेंतू (१७३४–१८१९) हा अठराव्या शतकातील एक श्रेष्ठ पोर्तुगीज कवी; तथापि सनातन धर्ममताला विरोध असल्याच्या आरोपावरून त्याला धर्मन्यायपीठापुढे खेचण्याचे ठरविले गेल्यामुळे तो फ्रान्सला पळाला आणि आमरण तेथेच राहिला. त्याची बरीचशी कविता निर्यमक असून स्वातंत्र्य आणि देशभक्ती हे तिचे प्रमुख विषय आहेत. सत्तांधता, धर्मन्यायपीठे आणि उमरावशाही ह्यांविरुद्ध त्याने आपल्या कवितेतून आवाज उठविला.

एकोणिसावे शतक

ह्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगीज साहित्यात स्वच्छंदतावाद अवतरला. आल्मैदा गार्‌रॅ (१७९९–१८५४) हा ह्या चळवळीचा अध्वर्यू. राजकीय कारणांसाठी गार्‌रॅ ह्याला पोर्तुगालमधून हद्दपार करण्यात आले होते. हद्दपारीच्या काळात इंग्लंड आणि फ्रान्स ह्या देशांत त्याचे वास्तव्य होते आणि तेथेच स्वच्छंदतावादाचा प्रभाव त्याच्यावर पडला. कामाँइश (१८२५) आणि दॉना ब्रांका (१८२६) ही त्याची स्वच्छंदतावादी प्रकृतीची काव्ये पॅरिसमध्ये प्रसिद्ध झाली. पोर्तुगीज स्वच्छंदतावादाचा आरंभ ह्या दोन काव्यांनी झाला, असे मानले जाते. फोल्यश काईदश (१८५३, इं. शी. फॉलन लीव्ह्‌ज) हे त्याचे अखेरचे आणि सर्वश्रेष्ठ काव्य. फ्रेइ लुईज द सौझ (१८४४, इं. शी. फादर लुईज द सौझा) ही त्याची नाट्यकृतीही स्वच्छंदतावादी पोर्तुगीज रंगभूमीचे एक भूषण समजली जाते. पोर्तुगालमध्ये मागे पडलेल्या नाट्यलेखनकलेचे पुनःप्रवर्तनही गार्‌रॅच्या ह्या नाट्यकृतीने घडून आले; राष्ट्रीय रंगभूमीचे गार्‌रॅने पुनरुज्जीवन केले. व्हिआझ्येंश ना मीन्या तॅर्रा (१८४६, इं. शी. ट्रॅव्हल्स इन माय लँड) आणि उ आर्कु द सान्तान (२ खंड, १८४५; १८५०, इं. शी. द बो ऑफ सांत आना) ह्या त्यांच्या कादंबऱ्या उ आर्कु... वर वॉल्टर स्कॉटच्या कादंबरीलेखनाचा प्रभाव जाणवतो. पोर्तुगीज साहित्यात स्वच्छंदतावाद आणण्याचे श्रेय गार्‌रॅबरोबरच  आलेशांद्रि येर्कुलानो (१८१०–७७) ह्यालाही देण्यात येते. इतिहासलेखन, कादंबरी आणि काव्य अशा तीन क्षेत्रांत त्याने कर्तृत्व केले; परंतु इतिहासकार म्हणून त्याने केलेली कामगिरी विशेष महत्त्वाची मानली जाते. इतिहासाच्या तात्त्विक चिकित्सेची आधुनिक पद्धत अवलंबिण्याचा त्याने प्रयत्न केला. इश्तॉरिअ द ओरीजँ इ इश्ताबेलेसिमॅन्तु द इंकिझिसांउ एँ पोर्तुगाल (१८५४–५९, इं. शी. हिस्टरी ऑफ द ऑरिजिन अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंक्विझिशन इन पोर्तुगाल) हे त्याचे इतिहासग्रंथ विख्यात आहेत. पोर्तुगीज भाषेतील ऐतिहासिक कादंबरी आणि गोपकादंबरी त्याने आकारास आणली. येउरीकु (१८४४) आणि माँझ्यि द सिस्तॅर (१८४८, इं. शी. सिस्टर्शन मंक) ह्या त्याच्या ऐतिहासिक कादंबऱ्या आणि ऊ पारॉकु द आल्दैआ (१८४४, इं. शी. द पॅरिश प्रीस्ट) ही त्याची गोपकादंबरी उल्लेखनीय आहे. लुईश आउगुश्तु रेबेलु द सील्व्हा (१८२२–७१) हा इतिहासकार व ऐतिहासिक कादंबरीकार. अँतॉन्यू फेलिसिआनु द काश्तील्यु (१८००–७५) ह्याचे अ प्रिमाव्हॅरा (१८२२, इं. शी. द स्प्रिंग) आणि आमोर इ मॅलांकोलीअ (१८२८, इं. शी. लव्ह अँड मेलॅन्‌कली) हे दोन काव्यसंग्रहही उल्लेखनीय आहेत. मात्र काश्तील्यूच्या कवितेत स्वच्छंदतावादी प्रवृत्ती असल्या, तरी त्या क्षीणच आहेत; त्याच्या मनावरील अभिजातवादाची पकड कधीच पूर्णतः सुटली नाही. ग्रीक-लॅटिन साहित्यकृतींची त्याने भाषांतरे केली, तसेच मध्ययुगातील पोर्तुगीज वीरांची चरित्रेही लिहिली. काश्तील्यूने महत्त्वाच्या अशा काही वाङ्‌मयीन-सांस्कृतिक नियतकालिकांचे संपादन केले. पोर्तुगीज वाङ्‌मयविश्वावर काश्तील्यूचा मोठा प्रभाव होता. झ्युआंउ द लॅमुश (१८१८–९०; ह्याने उ त्रॉव्हादोर - इं. शी. त्रूबदूर- हे कवितेला वाहिलेले नियतकालिक काढले); सुआरिश द पास्सुश (१८२६–६०; नोइव्हादु सेपूल्क्रु–इं. शी. सिपल्क्रल वेडिंग–ह्या काव्यकृतींचा कर्ता); तॉमाश रिबैरु (१८३१–१९०१;'दाँ झ्याइमि' ह्या उत्कट देशभक्तिपर कवितेचा कर्ता) हे काश्तील्यूच्या प्रभावाखालील कवी होत. पाकीता (१८६६) हे दीर्घकाव्य लिहिणारा बुल्यांउ पातु हा आणखी एक स्वच्छंदतावादी कवी. काश्तेल्यूचा प्रभाव त्याच्यावरही थोड्याफार प्रमाणात जाणवतो.

पोर्तुगीज स्वच्छंदतावादाला पहिला धक्का  आंतेरु द क्यँताल (१८४२–९१) आणि तिऑफिलु ब्रागा (१८४३–१९२४) ह्यांनी दिला; एक नवा वाङ्‌मयीन दृष्टिकोण प्रस्थापित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दोघेही कोईंब्रा विद्यापीठातले. क्यँतालने लिस्बनमध्ये स्वच्छंदतावादाविरुद्ध व्याख्यानमाला आयोजित केली होती. तो तात्त्विक प्रवृत्तीचा कवी होता. पारंपरिक धर्मश्रद्धेपासून शून्यवादी तत्त्वज्ञानापर्यंत आणि अखेरीस आध्यात्मिक आशावादाकडे तो झुकला. सोनेतुश काँप्लेतुश (१८८६, इं. शी. कंप्लीट सॉनेट्स) हा त्याचा सुनीतसंग्रह ह्या संदर्भात लक्षणीय आहे. ऑदिश मॉदेर्नाश (१८६५, इं. शी. मॉडर्न ओड्स) हा त्याच्या तात्त्विक उद्देशिकांचा संग्रह. ब्रागानेही काव्यरचना केली; परंतु त्याने विशेष उल्लेखनीय कार्य वाङ्‌मयीन, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय अशा विविध विषयांवरील लेखनाचे आहे. ऑग्यूस्त काँतच्या प्रत्यक्षार्थवादी तत्त्वज्ञानाचा ब्रागावर प्रभाव होता. त्याचा प्रत्यय त्याच्या लेखनातून येतो. समग्र पोर्तुगीज साहित्याचा इतिहास लिहिण्याचा पहिला प्रयत्न ब्रागाने केला; पोर्तुगीज लोकविद्या, लोकगीते आणि बॅलड ह्यांचे संकलन केले; पोर्तुगीज स्वच्छंदतावादाचा इतिहास त्याने लिहिला.झ्युआंउ द देउश (१८३०–९६) ह्या प्रेमकवीची रचना साधी, उत्स्फूर्त आहे. क्रांतिकारक आणि मूर्तिभंजक वृत्तीचा गॅर्रा झ्युंकैरू (१८५०–१९२३) हा मूळचा स्वच्छंदतावादी; परंतु पुढे तो वास्तववादाकडे वळला. प्रचलित नैतिक कल्पनांवर आणि धर्माच्या नावाखाली माजलेल्या दांभिकतेवर त्याने कठोर आघात केले. गाँमिश लिआल (१८४८–१९२१) ह्या क्लारिदादिश दु सूल (१८७५, इं. शी. ब्राइट लाइट्स ऑफ द साउथ) हा काव्यसंग्रह उल्लेखनीय आहे. गाँसाल्व्हिश क्रॅश्पु (१८४६–८३) हा पोर्तुगीज साहित्यातील पहिला कलावादी किंवा पार्‌नॅशन म्हणता येईल. मिनिआतूराश आणि नोक्‌तूर्नुश ह्या त्याच्या काव्यकृती म्हणजे रेखीव, कलात्मक रचनांचे आदर्शच होत. अँतॉन्यू फेइझ्यॉ (१८६०–१९१७) हा आणखी एक कलावादी कवी. सॅझारिउ व्हेर्दी (१८५५–८६) ह्या कवीच्या कविता संख्येने थोड्याच असल्या, तरी त्यांतून आपल्या अकृत्रिम शैलीने दैनंदिन जीवनातील क्षण त्याने प्रभावीपणे टिपले आहेत. अँतॉन्यू नोब्रि (१८६७–१९००) ह्याच्या कवितेत पोर्तुगीज लोकविद्येशी संबंधित असे विषय, संपन्न प्रतिमा आणि कल्पनारंजित स्वप्ने ह्यांचे एक विलक्षण मिश्रण आढळते.  येउझ्यॅनिऊ द काश्त्रु (१८६९–१९४४) हा फ्रेंच प्रतीकवादाने प्रभावित झालेला कवी होता. पोर्तुगीज कवितेला त्याचे नवे वळण दिले. तीत प्रतीकवाद आणला. वैविध्यपूर्ण आणि अनेकदा विक्षिप्त वाटणारी शब्दकळा त्याने वापरली; कवितेच्या घाटाबाबत अधिक स्वातंत्र्य घेतले. तेइशेइरा द पाश्कोआइश (१८७७–१९५२) हा काश्त्रूप्रमाणेच एकोणिसाव्या आणि विसाव्या अशा दोन्ही शतकांतील कवी आहे. 'साउदोझिश्मु' ह्या नावाने ओळखला जाणाऱ्या वाङ्‌मयीन चळवळीचा तो प्रमुख प्रतिनिधी. 'साउदाद' म्हणजे उत्कट ओढ. 'निखळ, मधुर व वेदनामय दुःख' अशा आशयाची साउदादची व्याख्या, पोर्तुगीज महाकवी लुईज द कामाँइश ह्याने केली होती. प्रेम आणि वियोग ह्यांमुळे हे दुःख अधिकच उत्कट होते. पोर्तुगीजांचे आपल्या मायदेशावर अपार प्रेम. परंतु साहस आणि प्रवास ह्यांच्या आवडीमुळे त्यांना अनेकदा मायभूमी व प्रिय व्यक्ती ह्यांपासून दूर राहावे लागे. त्यामुळे साउदादचा अनुभव त्यांना येई. साउदोझिश्मु ह्या चळवळीला देशात त्या वेळी अस्तित्वात असलेल्या नैराश्यमय अशा राजकीय परिस्थितीचाही संदर्भ होता. ह्या नैराश्याबाहेर पडण्यासाठी निसर्ग व मानव ह्यांचे अध्यात्मीकरण करणे आणि साउदादची जोपासना करणे हे मार्ग तेइशेइरा ह्याने सुचविले होते. चराचरात ईश्वर पाहणे हेही ह्या चळवळीचे एक लक्षणीय वैशिष्ट्य होते. असा चराचरेश्वरवादी दृष्टिकोण तेइशेइराच्या कवितेतून प्रत्ययास येतो.

कादंबरीक्षेत्रात लक्षणीय स्वरूपाची कामगिरी घडून आली. कादंबरीच्या संदर्भात येर्कुलानूने केलेल्या कार्याचा उल्लेख आधी आलेलाच आहे. कामीलू काश्तेलू ब्रांकू (१८२५–९०), झ्यूलिउ दिनीश (१८३९–७१) आणि यॅसा द कैरॉज (१८४५–१९००) हे ह्या शतकातील विशेष उल्लेखनीय असे कादंबरीकार होते. काश्तेलू ब्रांकूच्या सामाजिक कादंबऱ्या, त्याच्या उत्कट शैलीमुळे आजही वाचल्या जातात. दिनीश का स्वच्छंदतावाद आणि वास्तववाद ह्यांच्यामधील संधिकालाचा प्रतिनिधी, आणि कैरॉज हा वास्तववादाचा पुरस्कर्ता. आन्तॅरु द फिगैरेदु (१८६७–१९५३) ह्याने ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या.  रामाल्यू ओर्तिगांऊ (१८३६–१९१५) हाही वास्तववादी. कैरॉजच्या सहकार्याने त्याने एक कादंबरी लिहिली; परंतु मुख्यतः प्रवासवर्णनकार आणि समीक्षक म्हणून त्याची प्रतिमा ठसठशीतपणे पुढे येते. अ ऑलान्दा (१८८३, इं. शी. हॉलंड) हे त्याने लिहिलेले उत्कृष्ट प्रवासवर्णन आणि अश फार्पाश ह्या नियतकालिकातून पोर्तुगीज जीवनाच्या वाङ्‌मयीन, सामाजिक, नैतिक इं. विविध अंगांवर त्याने केलेले उपरोधप्रचुर लेखन उल्लेखनीय आहे. फिआल्यु द आल्मैदा (१८५७–१९११) आणि त्रिन्दाद कुयेल्यु (१८६१–१९०८) ह्यांनी कथालेखन केले. उ पाईश दश ऊव्हाश (१८९५, इं. शी. कंट्री ऑफ ग्रेप्स) हा आल्मैदाचा आणि उश मेउश आमोरिश (१९०१, इं. शी. माय लव्ह) हा कुयेल्यूचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे.  झ्यूलिउ दान्ताश (१८७६–१९६२) हा एक श्रेष्ठ नाटककार. अ सैआ दुश कार्दिआइश (१९०२, इं. शी. द कार्डिनल्स सपर) ह्या त्याच्या नाटकाला आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली. इतिहासलेखनाच्या संदर्भात येर्कुलानोनंतर जी नावे पुढे येतात त्यांत  ओलिव्हैरा मार्तीश (१८४५–९४) ह्याचे नाव विशेष उल्लेखनीय आहे. पोर्तुगाल काँतेपोरानिउ (१८८१, इं. शी. कंटेपररी पोर्तुगाल) ह्या त्याच्या ग्रंथाचा समावेश एकोणिसाव्या शतकातील श्रेष्ठ इतिहासग्रंथांत होतो.

विसावे शतक

पोर्तुगाल हा एक लहानसा देश. पुरेसे सांस्कृतिक संचितही त्याच्यापाशी नाही. अशा परिस्थितीत स्वतंत्र, मौलिक सर्जनशीलतेच्या दृष्टीने अनुकूल ऐतिहासिक परिस्थिती लाभलेल्या अन्य यूरोपीय राष्ट्रांच्या बौद्धिक प्रभावाखाली त्यास नेहमीच राहावे लागले आहे. पोर्तुगीज समाजाच्या उत्क्रांतीची वाटचालही अत्यंत संथ अशी होती. विसाव्या शतकात विचारस्वातंत्र्यावर बंधने लादणारी हुकूमशाही राजवट त्याला दीर्घकाळ सहन करावी लागली. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीमुळे साहित्याच्या सहजप्रवाहात अडथळा आला आणि त्याच्या अवनतावस्थेत भर पडली. अशी प्रतिकूलता असूनही काही वाङ्‌मयीन घटना आणि उल्लेखनीय साहित्यिक दिसतात. जॉन स्टाइनबेक, अर्नेस्ट हेमिंग्वे, अर्स्किन कॉल्डवेल ह्यांच्यासारख्या विख्यात अमेरिकन साहित्यिकांच्या प्रभावामुळे ह्या शतकातील पोर्तुगीज साहित्यात वास्तववादी प्रवृत्ती वाढीस लागल्या. वास्तववादी साहित्यदृष्टीने ग्रामीण आणि प्रादेशिक जीवनाचा शोध घेतला जाऊ लागला. उल्लेखनीय साहित्यिकांत फॅर्‌रैरा  द काश्त्रु (१८९८– ) व मिगेल तॉर्गा (१९०७– ) ह्यांचा अंतर्भाव होतो. फॅर्‌रैरा द काश्त्रु हा कादंबरीकार. एमिग्रान्तिश (१९२८, इं. शी. एमिग्रंट्स) आणि तॅर्रा फ्रीअ (१९३५, इं. शी. कोल्ड अर्थ) ह्या त्यांच्या कादंबऱ्यांतून पोर्तुगीज वास्तववादाचे दर्शन घडते. सामाजिक समस्यांची अभ्यासपूर्ण चिकित्सा करण्याचा प्रयत्न त्यांत आहे. मिगेल तॉर्गा ह्याने काव्य, कथा आणि नाटक ह्या तिन्ही क्षेत्रांत कर्तृत्व गाजविले. मानवी जीवनाच्या मूलाशयाला स्पर्श करणारे विषय आणि मनोविश्लेषण ही त्याच्या लेखनाची लक्षणीय वैशिष्ट्ये.  आकिलीनु रिबैरू (१८८५–१९६३) ह्याच्या कादंबऱ्यांतही मनोविश्लेषणाची प्रवृत्ती दिसते. फॅर्नान्दु नामॉरा (१९१९– ) ह्याच्या उ त्रीगु इ उ ज्योइउ (१९५४, इं. शी. व्हीट अँड वीड) ह्या सामाजिक प्रश्नांची चिकित्सा करणाऱ्या कादंबरीत प्रादेशिकतेवर विशेष भर दिलेला आढळून येतो. अन्य काही साहित्यिक असे : ज्युझॅ रॅझ्यिउ (१९०१– ) हा कवी, कादंबरीकार व नाटककार. व्हितोरीनु नॅमॅझिउ (१९०१– ) हा कवी. त्याने कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. काझाइश मोन्तैरु (१९०८– ) हा भावकवी. रूइ सिनाती (१९१५– ) हा आदर्शवादी कवी. बॅस्सा लुईश (१९२२– ) हिची उश इंकुरावेइश (१९५६, इं. शी. द इन्‌क्यूरेबल) ही कादंबरी उल्लेखनीय आहे. येउझ्यॅनिउ द आन्द्राद (१९२३– ) हा अतिवास्तववादी कवी. ‘आतॅ आमान्या’ (१९५६, इं. शी. टिल टुमारो) हे त्याचे काव्य.

पोर्तुगीज वसाहतींतील साहित्य

आशिया, आफ्रिका आणि द. अमेरिका ह्या खंडांत पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या. ह्या वसाहतींपैकी ब्राझील आणि गोवा येथे लक्षणीय अशी पोर्तुगीज साहित्यनिर्मिती घडून आली. ब्राझीलमध्ये पोर्तुगीजांची सत्ता १५०० ते १८२२ पर्यंत, तर गोव्यात १५१० ते १९६१ पर्यंत राहिली.

ब्राझील

ब्राझीलमध्ये आजही पोर्तुगीज भाषा बोलली जाते. जवळजवळ सव्वातीनशे वर्षांच्या पोर्तुगीज अमलाच्या काळात ब्राझीलमध्ये जे उल्लेखनीय असे लेखक आणि कवी होऊन गेले, त्यांतफादर ज्युझॅ द आंशियॅता (१५३३–९७) ह्याचा अंतर्भाव करावा लागेल. ब्राझीलचा तो अपॉसल समजला जातो. ज्युझॅ द आंशियॅता ह्याने ग्वारानी ह्या दक्षिण अमेरिकन इंडियन भाषेचे पहिले व्याकरण लिहिले (ग्वारानी ही पॅराग्वायच्या इंडियनांची भाषा. ब्राझीलच्या काही भागांत ती बोलली जाते.) काही कविता आणि नाट्यकृतीही ज्यूझॅ द आंशियॅताने रचल्या आहेत. बँतु तेइशेइरा (सतरावे शतक) ह्याच्या प्रॉजॉपोपेया (१६०१) ह्या महाकाव्याचाही निर्देश करावयास पाहिजे. सतराव्या शतकात ग्रेगॉर्यु द मातुश गॅर्रा (१६३३–९६) ह्याने बोका दु इंफॅर्नु (इं. शी. माउथ ऑफ द हेल) नावाची एक उपरोधिका लिहिली. तथापि ह्या सर्व साहित्यातून खास ब्राझीलियन अशा वैशिष्ट्यांचा प्रत्यय येत नव्हता. ज्याला  अस्सल ब्राझीलियन म्हणता येईल असे साहित्य अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात निर्माण होऊ लागले. त्यातून राष्ट्रवादी आणि पोर्तुगीज वसाहतवादविरोधी भावना प्रकट होऊ लागल्या. अँतॉन्यू ज्युझॅ द सील्व्हा (१७०५–३९), सांता रीता दुरांऊ (१७२२–८४), क्लाउदिउ मानुयॅल दा कॉश्ता, इनासियु ज्युझॅ द आल्वारँगा पेइशोतु (१७४४–९३), मानुयॅल इनासियु दा सील्व्हा आल्वारँगा (१७४९–१८१४), फादर अँतॉन्यू पेरेयरा द सोउजा कालदाश (१७६२–१८१४) ह्यांच्यासारख्या साहित्यिकांचा ह्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडात समावेश होतो. अँतॉन्यू ज्युझॅ द सील्व्हा ह्याने अनेक सुखात्मिका आणि उपरोधिका लिहिल्या. सांता रीता दुरांऊने कारामुरु (१७८१) हे वीरकाव्य लिहिले. क्लाउदिउ मानुयॅल दा कॉश्ता (१७२९–८९) हा कवी व नाटककार. बीला रीका (१८३९–४१, इं. शी. रिच व्हिला) हे वीरकाव्य म्हणजे त्याची सर्वोत्कृष्ट साहित्यकृती होय. इनासियु ज्युझॅ द आल्वारँगा पेइशोतु ह्याने नाटके, सुनीते आणि प्राचीन ग्रीक कवी आनाक्रेऑन ह्याच्या धर्तीवर काही भावकविता लिहिल्या. मानुयॅल इनासियु दा सील्व्हा आल्वारँगा याने अनेक सुनीते आणि उद्देशिका लिहिल्या. ‘द डेझर्टर ऑफ लेटर्स’ अशा इंग्रजी शार्षकार्थाचे त्याचे एक काव्य प्रसिद्धआहे. फादर अँतॉन्यू पेरेयरा द सोउजा कालदाश ह्याने धार्मिक विषयांवर सुंदर उद्देशिका लिहिल्या. अँतॉन्यू गाँसाल्विश दीयाश (१८२३–६४) हा स्वातंत्र्योत्तर काळातील श्रेष्ठ ब्राझीलियन साहित्यिक. ब्राझीलचा तो राष्ट्रकवी मानला जातो. साध्यासुध्या घाटांच्या भावकवितांतून त्याने आपली उत्कट देशभक्ती प्रभावीपणे व्यक्तविली आहे. ब्राझीलमधील इंडियन, निग्रो आणि गोरे ह्या साऱ्यांबद्दल, ब्राझीलच्या सांस्कृतिक जीवनातील एक घटक म्हणून त्याने सहानुभूती बाळगली. त्याचे साहित्य सहा खंडांत प्रसिद्ध झालेले आहे (१८६८–६९). ज्यूझॅ द आलँकार (१८२९–७७) हा स्वच्छंदतावादी वृत्तीचा कादंबरीकार. ब्राझीलियन साहित्यातील पहिला श्रेष्ठ गद्यशैलीकार म्हणून तो ओळखला जातो. दीयाशचे जे कवी म्हणून स्थान आहे, तेच आलँकारचे गद्यलेखक म्हणून आहे. माशादु द आसीज (१८३९–१९०८) ह्याला जागतिक कीर्ती प्राप्त झाली. कथा, कादंबरी, कविता असे विविध साहित्यप्रकार त्याने समर्थपणे हाताळले. पोर्तुगीज भाषेतील सर्वोत्कृष्ट कथांत त्याच्या कथांचा अंतर्भाव होतो. दाँ काजमुर्रु ही त्याची सर्वश्रेष्ठ कादंबरी. सील्व्हिउ रॉमॅरु (१८५१–१९१४) ह्याने ब्राझीलियन साहित्याचा इतिहास लिहिला. कुयेयल्यु नेतु (१८६४–१९३४) हा चतुरस्र साहित्यिक. त्याने कथा, कादंबऱ्या आणि नाटके लिहिली. ऑलावु बिलाक (१८६५–१९१८) हा पार्‌नॅशियन किंवा कलावादी प्रवृत्तीचा कवी. आफ्रानिउ पेइशोतु (१८७६–१९४७) ह्याची फ्रुता दु मातु (इं. शी. वाइल्ड फ्रूट) ही सर्वोकृष्ट कादंबरी. मोंतेयरु लॉबातु (१८८६–१९४९) ह्या कथालेखकाने गोरगरीबांच्या जीवनावर प्रभावी कथालेखन केले.

गोवा

विकसित आणि समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या गोव्यातील लोकांना, पोर्तुगीजांचा त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर, पोर्तुगीज भाषा आत्मसात करणे अवघड गेले नाही. पोर्तुगीज साहित्याची निर्मिती गोव्यातही झाली.

ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या धार्मिक-नैतिक साहित्याचा अंतर्भाव गोव्यातील आरंभीच्या पोर्तुगीज साहित्यात होतो. फादर फ्रांसीश्कु दु रेगु (मृ. १६८६), फादर अँतॉन्यू झ्युआंउ द फ्रीयाश (१६६४–१७२७), माँसेजोर लॅऑना रदु पायिश (१६६२–१७१५), फादर लूकाश द लीमा (१६५४–१७१७) ह्यांनी अशा प्रकारचे लेखन केलेले आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी गोव्यात पोर्तुगीज साहित्यनिर्मितीला विशेष चालना मिळाली. पोर्तुगीज भाषेतील पत्रेही उदयास आली. २२ डिसेंबर १८२१ रोजी गाजेता द गोआ हे पत्र निघाले. त्यानंतर उ ऊल्त्रामार (१८५९–१९४१, इं. शी. द ओव्हरसीज); अ ईन्दिया पुर्तुगेजा (१८६१, इं. शी. द पोर्तुगीज इंडिया); उ ॲराल्दु (१९००– ) अशी पत्रेही निघाली. उ ॲराल्दु हे गोव्यातील पहिले दैनिक वृत्तपत्र होय. लुईश द मिनेझिश ब्रांगासा (१८७८–१९३८) हा गोव्याचा थोर पत्रकार. विचारस्वातंत्र्याचा महामंत्र त्याने आपल्या लेखनातून दिला. फ्रेदेरीकु दिनीज दायाला (१८६०–१९२३) ह्या पत्रकाराने इतिहासविषयक लेखनही केलेले आहे. गोवा आंतीगा इ मुदॅर्ना (इं. शी. गोआ ओल्ड अँड मॉडर्न) हा त्याचा प्रसिद्ध ग्रंथ.

इतिहासलेखनाच्या संदर्भात दोन ग्रंथ विशेष उल्लेखनीय आहेत. ए. बी. ब्रागांसा पेरेयरा (१८८३–१९५५) ह्याचा ॲतनॉग्राफीया दा ईन्दिया पुर्तुगेजा (इं. शी. एथ्‌नॉग्राफी ऑफ पोर्तुगीज इंडिया) आणि डॉ. आल्बेर्तु कार्लुश जॅरमानु सिल्व्हा कुर्रेया (१८८८–१९६७) ह्याने लिहिलेला इश्तॉरिया दा कोलोनिजासांऊ पुर्तुगेजा ना ईन्दिया (इं. शी. हिस्टरी ऑफ पोर्तुगीज कॉलनायझेशन इन इंडिया).

फेर्नांदु लिआल (१८४६–१९१०) हा कवी. लिव्ह्‌रु द फॅ – मराठी अर्थ, धर्मग्रंथ – ह्या त्याच्या काव्यसंग्रहात धर्मविषयक उत्कृष्ट कविता आहेत. महाभारतातील काही कथांना त्याने दिलेली पद्यरूपेही त्यात अंतर्भूत आहेत. माँसिग्नोर सेबाश्तियांव रोदोल्फु दाल्गादू (१८५५–१९२२) हा प्राच्यविद्याविशारद. पाउलीमु दीअश (१८७४–१९१९) हा गोव्याचा श्रेष्ठ कवी. गोव्यानेच त्याच्या कवितेचे रंगरूप घडविले आहे. नु पाईश दु सूर्य – मराठी अर्थ, सूर्याच्या देशात – हा त्याचा कवितासंग्रह. त्यातील वातावरण पूर्णतः भारतीय असून कवितांतून पुराणकथांचा वैपुल्याने उपयोग केलेला आहे. नाशसिमॅन्तु मॅन्दॉस (१८८४–१९२६) ह्याच्या काव्यातही भारतीय परंपरेचे दर्शन घडते. अ मॉर्त - मराठी अर्थ, मृत नारी - ह्या त्याच्या खंडकाव्यात रामायणातील एक कथा गुंफली गेली आहे. एका सुंदर गणिकेचे एका ऋषीवर बसलेले उत्कट प्रेम हा वत्सला ह्या खंडकाव्याचा विषय आहे. आदॅऑदातु बार्रेतु (१९०५–३७) हा ऐन तारुण्यात कालवश झालेला कवी आणि इतिहासकार. त्याच्या लिव्ह्रु द व्हीद – मराठी अर्थ, जीवनग्रंथ – ह्या काव्यसंग्रहात मायभूमीविषयीची आत्यंतिक ओढ दिसून येते. त्याच्या काव्याची शैली अत्यंत जोमदार असून त्यातील प्रतिमासृष्टीही प्रभावी आहे. सिविलिजासांऊं इंदू (इं. शी. हिंदू सिव्हिलिझेशन) हा त्या ग्रंथही प्रसिद्ध आहे.

गियल्यॅरमी मोनीझ बार्रेतु (१८६५ ? –९६ ?) हा तर पोर्तुगीज साहित्यसमीक्षेचा अग्रदूत मानला जातो. अँसायुश द क्रीतिका (१९४४, इं. शी. एसेज ऑफ क्रिटिसिझम) हे त्याचे पुस्तक उल्लेखनीय आहे.

फ्रांसीश्कु लुईश गॉमिश (१८२९–६९) हा अर्थशास्त्रज्ञ, कादंबरीकार, पत्रकार आणि वक्ता. फ्रेंच व पोर्तुगीज अशा दोन्ही भाषांत त्याने लेखन केले आहे. ऊश ब्रामानिश (इं. शी. द ब्रॅह्‌मिन्स) ही त्याची कादंबरी.  फ्रांसीश्कु झ्युआउ उ कॉश्ता (१८६४–१९०१) ह्याने आपल्या ज्याकॉ इ दूलसि (इं. शी. जेकब अँड दूलसि) ह्या कादंबरीतून बोलभाषेचा उपयोग करून गोव्यातील जीवनाचे मिश्किल वृत्तीने चित्रण केले आहे.  माँसिग्नोर सॅबाश्‌तियांव रोदोल्फु दाल्गादु हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा प्राच्यविद्याविशारद. पौर्वात्य आणि पश्चिमी भाषांच्या तौलनिक अभ्यासाच्या दृष्टीने त्याने केलेले संशोधन यूरोपीय भाषाशास्त्रज्ञांच्या प्रशंसेस पात्र झालेले आहे. गोव्याच्या मुक्तीनंतर तेथील पोर्तुगीज साहित्याची निर्मिती झपाट्याने मंदावत आहे.

लेखक: एल. ए. रॉड्रिग्ज; अ. र. कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate