অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फाउस्ट

फाउस्ट

जगद्‍‌विख्यात जर्मन महाकवी गटे(जर्मन गोएथ) ह्याने रचिलेले नाट्यकाव्य. ह्या नाट्यकाव्याचे दोन भाग आहेत. पहिला भाग १८०८ मध्ये प्रसिद्ध झाला. दुसऱ्या भागाचे लेखन गटेने १८३१ मध्ये पूर्ण केले. तथापि गटेच्या इच्छेनुसार हा भाग गटेच्या मृत्यूनंतर १८३२ मध्ये प्रसिद्ध झाला. गटेच्या जीवनाचा जवळजवळ संपूर्ण सर्जनशील काळ ह्या नाटकाच्या निर्मितीला वाहिला गेला होता.

एका सदैव अतृप्त राहणाऱ्या माणसाची कल्पना गटेच्या मनात नेहमी घोळत असे. त्याच कल्पनेचे वाङ्‍मयीन रूप फाउस्टमधून साकारले. कृतिप्रवण माणसातील अतृप्ततेचा हा आद्य संघर्ष त्याच्या जीवनाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर चालू असतो. अशा माणसाचे वर्णन "सामान्य ऐहिक जीवनाच्या मर्यादांनी अस्वस्थ व अधीर झालेला, सर्वश्रेष्ठ ज्ञान आणि सर्वोत्तम सौंदर्य यांच्या प्राप्तीनेही आपली जीवनाकांक्षा तृप्त करू न शकणारा, आणि सर्व दिशांमध्ये परिभ्रमण करूनही पुन्हा अधिक असमाधानी अवस्थेत परत येणारा असा एक तळमळणारा आत्मा" असे गटेने एके ठिकाणी केले आहे. अशा माणसाच्या मनोभूमिकेवर आधारलेले फाउस्ट हे ‘आधुनिक काळाची शोकात्मिका’ समजले जाई. ह्या शोकात्मिकेमागील तात्त्विक सूत्र गटेने एका सुभाषितात मांडले आहे : "या मर्यादित जगामध्ये अमर्यादाचा ध्यास असणे हेच सर्वात करूणास्पद दृश्य होय."

ह्या नाट्यकाव्याचे संविधानक ज्या माणसाच्या व्यक्तित्व-जीवनाभोवती गुंफले गेले आहे तो फाउस्ट, सोळाव्या शतकात, यूरोपमध्ये एक शास्त्रज्ञ आणि मांत्रिक म्हणून हयात होता;तो अनेक प्रकारचे रासायनिक प्रयोग गावोगावी दाखवून लोकांना थक्क करीत असे; त्याच्या मृत्यूनंतर त्याच्याबद्दल अनेक लोककथा यूरोपात पसरल्या. १८५७ साली फ्रँकफुर्ट येथील श्पीस नावाच्या प्रकाशकाने फाउस्टची कथा Historia Von D. Johann Faustenह्या नावाने प्रसिद्ध केली. फाउस्ट-बुक ह्या नावाने हे पुस्तक ओळखले जाते. त्यात फाउस्ट आणि मेफिस्टॉफलीझ (सैतान) ह्यांच्यामध्ये एक करार झालेला दाखविण्यात आला होता. ऐहिक सुखाच्या शोधासाठी सैतानाबरोबर झालेल्या कराराच्या अनेक गोष्टी यूरोपीय साहित्यात मध्ययुगापासून चालत आल्या आहेत. परंतु फाउस्ट-बुकमधील फाउस्ट हा विश्वाच्या अस्तित्वशक्यतेचे आद्य कारण आणि त्यामागील अंतिम हेतू जाणून घेण्याच्या धडपडीतून संतानाशी करार करतो. ही ज्ञानतृष्णा भागविण्यासाठी इतर सर्व प्रयत्न तोकडे पडल्यामुळे निरूपायाने सैतानाचे साहाय्य घेण्याचा हा मार्ग त्याला पतकारावा लागतो. कराराच्या अटीप्रमाणे फाउस्ट आपला आत्मा सैतानापाशी गहाण ठेवतो व शेवटी सैतानाचा गुलाम बनतो. विख्यात इंग्रज नाटककार  क्रिस्टोफरमार्लो (१५६४-९३) ह्याने दट्रॅजिकलहिस्टरीऑफडॉक्टरफॉस्टस (१६०४) ही आपली नाट्यकृती फाउस्ट-बुकच्या इंग्रजी अनुवादाच्या आधारे लिहिली. मार्लोचा फाउस्ट सैतानाच्या मदतीने इहलोकीचा ईश्वर बनण्याची आकांक्षा बाळगतो आणि अखेरीस पश्चात्तापाने विनाश पावतो. फाउस्ट-बुकामधील फाउस्टप्रमाणेच मार्लोचा फाउस्टही आपल्या पापकृत्यांमुळे आणि सैतानाशी केलेल्या अधार्मिक दोस्तीमुळे शापदग्ध राहतो. परंतु गटेने आपल्या नाट्यकृतीत, फाउस्टच्या जीवनाभोवती मानवतावादी विचारांची गुंफण करून, माणसाचा मूल्यविवेक शेवटी त्याला सत्यं, शिवं, सुंदरम्‌चे उदात्त दर्शन घडवितो, असे दाखवून दिले आहे.

ह्या नव्या हेतुगर्भतेला विशाल रूप देण्यासाठी गटेने ह्या नाट्यकाव्याच्या सुरुवातीलाच संविधानकाची चौकट, एक खास प्रारंभक (प्रलॉग) योजून विश्वव्यापी केलेली आहे, असे दिसून येईल. परमेश्वराच्या स्वर्गलोकातील दरबारात परमेश्वर आणि सैतान मेफिस्टॉफलीझ ह्यांच्यात संभाषण घडून येते. ह्या संभाषणातून गटेने फाउस्टच्या संविधानकाचा विश्वव्यापी आशय, तसेच नाट्यकाव्यातील घटनांची दिशा आणि त्याचा शेवट पूर्वसूचित केला आहे. मनुष्याच्या स्वभावप्रवृत्तीबाबत परमेश्वर आणि मेफिस्टॉफलीझ ह्यांच्यात मतभेद होतात. जगातील प्रत्येक वस्तू मूल्यहीन आहे असे मानणाऱ्या मेफिस्टॉफलीझचा मानवी प्रयत्नशीलतेकडे, मुक्तीसाठी चालणाऱ्या त्याच्या धडपडीकडे पाहण्याचा दृष्टिकोण पूर्णतः नकारात्मक असतो. ह्याच्या उलट, मानवाची सदसद्‍‌विवेकबुद्धी हा त्याच्या चैतन्यशक्तीचा मूलस्त्रोत असून कर्मरत जीवनात माणसाला त्याचा कधी विसर पडला, तरी जोवर त्याच्यापासून माणूस दूर होत नाही, तोपर्यंत मुक्तीची द्वारे त्याला खुलीच राहतील, अशी परमेश्वरी भूमिका असते. विश्वाचा आद्य हेतू व जीवनाचा अंतिम अर्थ शोधून काढण्याचा ध्यास घेणारा वयोवृद्ध ज्ञानवंत फाउस्ट म्हणजे मानवी आकांक्षा, प्रयत्नशीलता आणि धडपड ह्यांचे जिवंत प्रतीक. ईश्वरी भूमिकेला आव्हान देऊन ह्या फाउस्टचेच नैतिक स्खलन घडवून आणण्याची आणि पर्यायाने "मानवी चैतन्यशक्तीला तिच्या मूलस्रोतापासून खंडित करण्याची" मुभा तो ईश्वराकडे मागतो. मानवाच्या प्रयत्नशीलतेला अशी आव्हाने असलीच पाहिजेत, अशा भूमिकेतून ईश्वर मेफिस्टॉफलीझला तशी परवानगी देतो. परंतु त्याच वेळी असेही बजावतो, की,

"चांगला मनुष्य आपल्या अंधारमय भ्रांत परिक्रमणेतही

नाही विसरणार सदाचरणाचा आपला मार्ग."

त्यानंतर मेफिस्टॉफलीझ पृथ्वीवर येऊन फाउस्टला त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे व इहलोकी त्याचा सेवक बनण्याचे वचन देतो. ह्या बदल्यात फाउस्टने स्वतःच्या मृत्यूनंतर परलोकी आपली सेवा करावी, अशी अट मेफिस्टॉफलीझ घालतो. पण फाउस्ट त्याला बजावतो, की साध्यासुध्या सुखांनी मी तृप्त होणार नाही. ज्याला

"थांब जरासा, इतका आहेस तू विलोभनीय, थांब जरासा,"

असे म्हणावे, इतका सुखाचा उत्तुंग क्षण जर तू मला देऊ शकलास, तर त्याच क्षणाला तू माझा आत्मा ताब्यात घे, "तुझ्या प्राणांतक साखळदंडांनी” बांधून घ्यावयास मी तयार आहे. "

ह्या कराराच्या अंमलबजावणीच्या रूपाने दोन शक्तींमधला एक संघर्ष उभा राहतो. फाउस्टसारख्या ज्ञानवंताला त्याच्या–आणि पर्यायाने मानवच्याच–मर्यादा दाखवून देण्याचा चंग मेफिस्टॉफलीझने बांधलेला असतो, तर फाउस्ट त्याला अस्वस्थ करणाऱ्या ऐहिक जीवनाच्या मर्यादा ओलांडून जाण्यासाठी मेफिस्टॉफलीझच्या अद्‍भुत शक्तीचा उपयोग करून घेऊ पाहत असतो. मेफिस्टॉफलीझ फाउस्टला अमर्याद सुखलोलुपतेत आणि विषयवासनेत मश्गुल ठेवण्याचा प्रयत्न करतो. वयोवृद्ध फाउस्टचे रूपांतर तो एका देखण्या तरूणात घडवून आणतो. कायाकल्प झालेला फाउस्ट मार्गारेथ नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडतो; परंतु मार्गारेथची आई आणि तिचा भाऊ व्हॅलेंटाइन ह्या दोघांच्या मरणामुळे ह्या प्रेमप्रकरणाला शोकात्म वळण मिळते. ह्या दोघांचे मृत्यू मेफिस्टॉफलीझच घडवून आणतो. रात्री आईला गाढ झोप लागावी आणि फाउस्टची चोरटी भेट घेता यावी म्हणून मार्गारेथ फाउस्टच्या सल्ल्याने, फाउस्टनेच तिच्यापाशी दिलेले झोपेचे औषध आपल्या आईला देते; परंतु त्यात मेफिस्टॉफलिझने जहाल विष मिसळून ठेवलेले असल्यामुळे मार्गारेथची आई मरण पावते. मार्गारेथ प्रेमप्रकरण नापसंत असलेला तिचा भाऊ आणि फाउस्ट ह्यांच्यात द्वंद्वयुद्ध घडवून आणून मेफिस्टॉफलीझ फाउस्टच्याच हातून त्याचा वध करवितो. पुढे मार्गारेथला फाउस्टपासून झालेल्या आपल्या अपत्याचा खून केल्याच्याआरोपातून देहान्ताची सजा सुनावली जाते. मेफिस्टॉफलीझच्या मदतीने तिला सोडविण्यासाठी फाउस्ट तुरुंगात येतो; परंतु पश्चात्तापदग्ध मार्गारेथ फाउस्टबरोबर बाहेर यायला तयार होत नाही. भ्रमिष्टासारखी आपल्याशीच बडबडत राहते. फाउस्ट तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो; परंतु ती ऐकत नाही; फक्त परमेश्वराच्या कृपेची याचना करते. मार्गारेथच्या सुटकेसाठी मेफिस्टॉफलीझने दिलेली वेळ संपते. मार्गारेथ मरते. "वरून येणारा एक आवाज" "तिचा उद्वार झाला आहे" असे अभिवचन देतो. या ठिकाणी नाट्यकाव्याचा पहिला भाग संपतो.

मार्गारेथच्या मृत्यूनंतर सावरलेल्या फाउस्टची सर्व प्रकारचे अनुभव घेण्याची अभिलाषा, ह्या नाट्यकाव्याच्या दुसऱ्या भागाच्या आरंभी, कायम असल्याचे दिसून येते. मेफिस्टॉफलीझकडून तो अनेक अद्‍भुत गोष्टी घडवून आणतो. ग्रीक पुराणांतील हेलनसारख्या सौंदर्यवतीला जर्मन सम्राटाच्या दरबारात येण्याचे आवाहन करतो आणि हेलनचे दर्शन होताच तिच्याबद्दलचे त्याचे आकर्षण अनावर होऊन तो तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो, पण ती अदृश्य होते; फाउस्ट बेशुद्ध पडतो. फाउस्टचा जुना सहकारी वॅगनर ह्याने आपल्या प्रयोगशाळेत एक चिन्मानव (होमन्‌क्यूलस) तयार केलेला असतो. त्याच्या मदतीने स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून फाउस्ट ग्रीसमध्ये येऊन हेलनला भेटतो. त्यांच्या समागमातून त्यांना यूफोरिअन नावाचा मुलगा होतो; पण फाउस्टप्रमाणेच त्याच्यापाशीही संयम नसतो. उंच उडण्याच्या प्रयत्नात खाली कोसळून तो मरतो, तेव्हा हेलन अंतर्धान पावते.

फाउस्टच्या इच्छा अजूनही अतृप्तच राहिलेल्या असतात. त्याची दुर्दम्य कृतिप्रवणता त्याला स्वस्थ बसू देत नाही. जर्मन सम्राटाकडून त्याला मिळालेल्या एका किनारपट्टीवर समुद्र हटवून वसाहतीसाठी नवी भूमी निर्माण करण्याच्या प्रयत्नाला तो लागतो. त्या कामी त्याला पुन्हा मेफिस्टॉफलीझची मदत घ्यावी लागते. मेफिस्टॉफलीझ नेहमीप्रमाणेच फाउस्टच्या प्रत्येक विधायक संकल्पाला विध्वंसक वळण देतो. फाउस्टने मिळविलेल्या भूमीवर वसती करून असलेल्या दोन वृद्ध माणसांना तेथून घालवून त्यांचे अन्यत्र पुनर्वसन करावे, असे फाउस्ट ठरवतो; पण मेफिस्टॉफलीझ त्या म्हाताऱ्या माणसांचे खून पाडतो.

ह्या सर्व गोष्टींचा फाउस्टला वीट येतो. मेफिस्टॉफलीझने देऊ केलेल्या कुठल्याही सुखाचे किंवा अनोख्या अनुभवाचे त्याला आकर्षण राहत नाही. त्याची मदत ह्यापुढे कधीही घ्यायची नाही, असाच तो निश्चय करतो. परंतु फाउस्टची जीवनशक्ती आता संपुष्टात आलेली असते. तो आंधळा होतो; परंतु त्याच्या अंतःचक्षूपुढे मानवाच्या क्रियाशील भविष्याचा सुंदर चित्रपट उभा राहतो. जीवनातल्या प्रत्येक क्षणी रचनात्मक कार्य करणारा; दुसऱ्याच्या उपयोगी पडणारा माणूसच आपले आणि स्वातंत्र्य सार्थकी लावू शकतो, हे त्याला जाणवते. एकमेकांसाठी जगणाऱ्या स्वतंत्र माणसांच्या स्वतंत्र भूमीचे स्वप्‍न तो पाहू लागतो. ह्या भूमीच्या रूपाने सुखाचे खरे नंदनवन जेव्हा फुलेल तोच क्षण ‘थांब जरा’ असे म्हणण्याच्या पात्रतेचा असेल, हे त्याला समजते. त्या क्षणाच्या निव्वळ कल्पनेनेच आपणाला त्याचे सुख प्राप्त झाले आहे, असे फाउस्टला वाटत असतानाच त्याचा आत्मा शरीर सोडून जातो. त्या आत्म्यावर कब्जा करण्यासाठी मेफिस्टॉफलीझ पुढे येतो; परंतु देवदूत तो त्याला मिळू देत नाहीत. कराराच्या अटीप्रमाणे फाउस्टचा आत्मा आपल्याला मिळावा, म्हणून तो देवदूतांशी हुज्जत घालतो; परंतु स्‍निग्ध स्मित करीत देवदूत फाउस्टच्या आत्म्याला घेऊन स्वर्गात जातात.

मेफिस्टॉफलीझला फाउस्टचा आत्मा मिळू शकत नाही, ह्याचे कारण फाउस्टला गवसलेला परमोच्च आनंदाचा क्षण मेफिस्टॉफलीझने त्याला दिलेला नसतो; फाउस्टच्या सृजनशीलतेतून व मानवतावादी भावनेतून हा क्षण निर्माण झालेला असतो. सृष्टीतील संवादशील सुसंगतीचा प्रतीकात्मक बोध घडविणारा हा क्षण असतो. फाउस्टच्या आंतरिक वेदनेला तो अर्थ देतो.

गटेच्या फाउस्टकडे निरनिराळ्या दृष्टिकोणांतून पाहिले जाते. ऑस्वल्ड स्पेंग्‌लरसारख्या संस्कृतिवेत्त्यांना तो आधुनिक यूरोपच्या आत्म्याचा प्रतिनिधी वाटतो. फाउस्टमध्ये काही अभ्यासकांना विरोधविकासतत्त्वाचे दर्शन घडते; कारण मेफिस्टॉफलीझ हा "अशा एका शक्तीचा अंश" आहे, की "जिला हवे असते नुसते पाप; आणि तरीही निर्मिते पुण्य". ह्या विरोधविकासतत्त्वाचाच आविष्कार परमेश्वर व मेफिस्टॉफलीझ ह्यांच्या प्रतिकात्मक विरोधभासात झालेला आहे. ह्याच तत्त्वाचा आविष्कार ह्या नाट्यकाव्यात मानवी आणि सामाजिक स्तरांवर ठिकठिकाणी झाला आहे आणि त्यातूनच मानवी मनाच्या आणि समाजाच्या विकासाचा प्रगल्भ अर्थ साकारला आहे.

गटेच्या ह्या नाट्यकाव्यात 'स्वर्गातील प्रारंभका' खेरीज 'नाट्यगृहातील प्रारंभक' असाही एक प्रारंभक असून त्यात त्याने सूत्रधारांची योजना केली आहे. कालीदासकृत शाकुंतलाच्या प्रभावातून हा प्रारंभक त्याने लिहिला. आपल्या साहित्यनिर्मितीसाठी अन्य भाषांतील श्रेष्ठ साहित्यकृतींतून जे इष्ट ते स्वीकारण्याची गटेची दृष्टी त्यातून दिसून येते.

साने गुरूजींनी लिहिलेल्या 'नदी शेवटी सागराला मिळेल' ह्या रूपांतरित कथेत ह्या नाट्यकाव्याच्या दोन्ही अंकांचा आशय रसाळपणे व्यक्त झाला आहे. विंदा करंदीकर ह्यांनी फाउस्टच्या पहिल्या भागाचा मराठी पद्यानुवाद फिलिफ वेनकृत इंग्रजी अनुवादावरून केला असून तो साहित्य अकादेमीने प्रसिद्ध केला आहे (१९६५). ह्या नोंदीतील सर्व अवतरणे आणि काही परिभाषा-उदा., चिन्मानव-ह्या पद्यानुवादातून आणि फाउस्टचे एक जर्मन भाष्यकार एरिक ट्रुंझ ह्यांनी ह्या पद्यानुवादासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेतून (प्रस्तावनेचा मराठी अनुवाद) घेतलेला आहेत.

गटेच्या फाउस्टचा परिणाम अनेक लेखक-कलावंतांवर झालेला दिसतो. फ्रेंच कवी पॉल व्हालेरी ह्याने Mon Faust ह्या आपल्या नाटकात तसेच जर्मन कादंबरीकार टोमास मान ह्याने Doktor Faustus (१९४७) ह्या आपल्या कादंबरीत फाउस्टचा विषय हाताळला आहे. मानने त्याला एका आधुनिक गायकाचे रूप दिले. शार्ल गोनाँ ह्या फ्रेंच संगीतकाराने फाउस्टच्या पहिल्या भागाचे एका संगीतिकेत रूपांतर केले, तर फ्रेंच चित्रकार अझेअन दलाक्रवा वा ह्याने फाउस्ट ह्या विषयावर कोरीव चित्रे रेखाटली.

संदर्भ : 1. Alkins.Smari. Goethe's faust. Literary Analysis, Cambridge, Mass., 1969.

2. Gilles, Alexander, Goethe s. Faust and Interpretation, New York, 1957.

3. Jantz, Harold, Goethe's Faust as a Renaissance Man, Princeton, 1951.

४. करंदीकर, विंदा (अनु.), जर्मनमहाकविगटेह्याचेफाउस्ट, भाग पहिला, नवी दिल्ली, १९६५.

लेखक: प्रमोदतलगेरी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate