অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बालवाङ्मय चित्र-सजावट

बालवाङ्मय चित्र-सजावट

नव्यानेच अक्षरओळख झालेल्या मुलाला शब्दात गुंफलेला आशय केवळ शब्दातूनच आकलन होणे कठीण असते. अशावेळी आकलनाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी असे, चित्राचे दृश्य-माध्यमच परिमाणकारक ठरते. मुलांच्या मनावर कथात्मक आशय परिमाणाकारकपणे ठसविण्यासाठी शब्दांपेक्षाही चित्रेच अधिक उपकारक ठरतात. म्हणून बालवाङ्मय सचित्र असावे लागते. चित्रे बोलकी असतात व ती शब्दांवाचूनही आशय कथन करू शकतात. या सूत्राचा आविष्कार पाश्चात्त्य लेखक-प्रकाशकांनी अनेकविध प्रकारे केलेला दिसतो. त्यामध्ये एक प्रकार मोठा मजेशीर असतो. पुस्तक उघडताच त्यातील कोरीव फर्म्याच्या (स्टेन्सिल) तंत्राने घडी करून ठेवलेले घटना-दृश्य पुस्तकाच्या मध्यावर उलगडून उभे राहते व आशय जिवंत होतो. या प्रकारच्या गोष्टींतील विविध प्रसंग चित्रमालिकेच्या साहाय्याने साकार करावे लागतात.

मुलांच्या वेगवेगळ्या वयोगटांनुसार जसे बालवाङ्मयाचे भिन्न भिन्न प्रकार संभवतात, तद्वतच चित्रसजावटही भिन्न भिन्न प्रकारे केली जाते. अगदी प्रारंभिक बालवाङ्मय म्हणजे संपूर्ण चित्रकथाच असतात. प्रत्यक्ष लिहिता-वाचता न येणाऱ्या शिशुंना बडबडगीते व चिमुकल्या गोष्टी यांची ओळख कथन, पाठांतररुपाने तसेच चित्रे दाखवून करून घ्यावी लागते. वर उल्लेखिलेली घडींची चित्रकथा-पुस्तके प्रामुख्याने दोन ते पाच या वयोगटातील शिशुंकरता असतात. साधारणपणे पाचव्या वर्षापासून मुलाच्या शालेय शिक्षणाला सुरुवात होते. या रुढ शिक्षणातही विशदीकरणासाठी चित्रांचा उपयोग करावा लागतो.  तथापि बालवाङ्मय आणि त्यातील चित्रेही प्रत्यक्ष जीवनानुभव बालापर्यंत पोहोचविण्यासाठीच काढलेली असतात. एक मोठे प्रसंगचित्र व खाली फक्त दोन-तीन ओळीत कथानिर्देश अशा पद्धतीने तयार केलेली पुस्तके साधारणपणे चार ते आठ या वयोगटातील शिशुंसाठी असतात. पऱ्यांची, पानाफुलांची गोड गाणी व पशुपक्ष्यांच्या मजेशीर गोष्टी या शिशुंना विशेष प्रिय असतात. बघताक्षणीच मुलाने पुस्तक आपणहून हातात घ्यावे व ते उघडून त्यात रमून जावे, इतक्या आकर्षकतेने या पुस्तकांची सजावट होणे आवश्यक असते.

बालवाड्मयाच्या लेखकाला जसे शब्द जिवंत करावे लागतात, तसेच चित्रकाराला रंग, रेषा, आकार व अवकाश जिवंत करावे लागतात. शिवाय लेखकाला शब्दांतून जे उभे करता येत नाही, ते चित्रकाराला चित्रांतून साकार करून दाखवायचे असते. प्रत्यक्ष ‘जसे दिसते’ तसे चित्रित न करता स्वत: ‘बाल’ होऊन हे चित्रण करावे लागते. शब्द आणि चित्र दोन्हीही बालसुलभ निरागसतेतून साकार व्हावे लागतात. गोष्टीतील वाघ हा ‘वाघाबा’ वाटेल असाच चित्रित करावा लागतो. गोष्टीतील प्राणी व वस्तू बालांचे सवंगडी बनून यावे लागतात. त्यांची शारीरिक जडणघडण मानवी अवयवांसारखी लवचिक दाखवावी लागते. ज्या वस्तूचा मुलाला अनुभव द्यावयाचा, तिच्याबद्दलचे कुतूहल वाढवून ती ‘विस्मयवस्तू’ बनावी लागते. त्यासाठी चित्रकाराला स्वत: ‘बाल’ बनून ते कुतूहल व विस्मय यांचा साक्षात अनुभव घ्यावा लागतो. अवांतर तपशील वगळून लयदार व ठळक रेषांनी आकलनसुलभ व स्वभावपरिपोषक चित्रण करावे लागते. उठावदार व टवटवीत रंग वापरून वस्तूचे वस्तूपण न घालवता तिला निरागस बनावायचे; एकीकडे वस्तुविश्वाचे ज्ञान तर द्यायचे पण उत्सुकता अधिकाअधिक वाढत जाण्यासाठी ते सुखद बनवायचे; हे सर्व कल्पनाजालातूनच (फँटसी) होणे शक्य असते. उदा., चंद्र हा एक ग्रह आहे, तो आकाशात भ्रमण करतो; वगैरे शास्त्रीय ज्ञान कोरडेपणाने न देता त्या ज्ञानाचे कल्पनाचित्रात रुपांतर करून मांडावे लागते. सहस्त्रयोजने दूर असलेल्याचंद्राला चिरेबंदी वाड्यात आणून परंपरेने ‘चांदोमामा’ बनवले, ते यामुळेच.

साधारण आठ ते बारा या वयोगटातील मुलामध्ये अद्भुताची ओढ जास्त असते. कारण तो बाह्य जगाचा कल्पनेने वेध घेऊ लागलेला असतो. ही अद्भुतता पंचतंत्र, इसापनीती इत्यादींमध्ये तसेच परंपरागत जादुगिरीच्या गोष्टींतून आढळून येते. सामान्यत: बारा ते सोळा हा वयोगट कुमार अवस्थेचा द्योतक असतो. या वयात अद्भुततेपेक्षा पराक्रमाने भरलेले व साहसी कथानक त्याला आवडू लागते व तो वास्तवाबद्दल जागरूक होऊ लागतो. याच वेळी जीवनातील खऱ्या वास्तवाचे भान त्याला येऊ लागते. या वास्तवाची ओळख त्याला कल्पनारम्यतेच्या अवगुंठनातून करून देणे आवश्यक असते. चित्रणातील तपशील वाढवून ते अधिक वर्णनात्मक करावे लागते. येथे वाड्मयीन तपशीलही वाढत जातो. या वयात नैतिक प्रेरणा, धैर्यशीलता, सहसवृत्ती व कारुण्याचे भान जोपासावे लागते. परंतु हे करीत असताना बालमनावर दडपण येण्याची शक्यता असते. तसे होऊ नये, म्हणून कल्पनाजालाचा आश्रय घ्यावा लागतो. त्याचा अनुभव सुखद असतो. त्यामुळे त्याच्याशी बालमन सहज एकरूप होते. कारण मानसशास्त्रीय दृष्टया कल्पनाजाल ही एक प्रकारे इच्छापूर्तीच असते. प्रत्यक्ष जीवनसंग्रामात इतकी सहज इच्छापूर्ती कधी होत नाही. यामुळे किशोरवयातील मुलांसाठी रंगवावयाच्या चित्रांत इच्छापूर्तीबरोबर हळूहळू चिंताही मिश्रित व्हावी लागते.

बालवाड्मय प्रौढांनाही आस्वाद्य होऊ शकते. बालवाड्मयाचे लेखक व चित्रकार कल्पनाजालातून मानवी मनाच्या निरागसतेचेच दर्शन घडविण्याचा प्रयत्न करीत असतात. या प्रयत्नातून कधी कधी चांगल्या कलाकृती जन्माला येतात. मराठीतील वेधक उदाहरण म्हणजे विंदा करंदीकरांचे एटू लोकांचा देश (१९६३). या पुस्तकाची सजावट चित्रकार वसंत सरवटे यांनी आशयाला अनुरुप व परिपोषक ठरावी, अशा प्रकारे केली आहे. अशी पुस्तके पाहताना व वाचताना प्रौढांनाही बालमनाशी एकरूप होऊन निरागसतेचा आनंद लुटता येतो.

आधुनिक सचित्र बालवाड्मय यूरोप-अमेरिकेतून आपल्याकडे आले. खास मुलांसाठी म्हणून तीनशे वर्षांपूर्वी यूरोपात ‘हॉरन बुक’ या नावाने ओळखली जाणारी पुस्तके निघू लागली. त्यानंतर छोटी ‘प्रायमर्स’ म्हणजे प्राथमिक पुस्तके लिहिली गेली. पुढे धार्मिक आणि बोधपर कथा आणि रोमांचकारी साहसकथा प्रसिद्ध होऊ लागल्या. मुलांना आवडणाऱ्या पुस्तकांचे निश्चित अंदाज लेखक-प्रकाशकांना येऊ लागले. आणि त्यातूनच बालवाड्मयाचे विस्मयकारक विश्व निर्माण झाले. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी नियतकालिकांतून चित्रकथांचा उदय झाला. त्यांत सामान्यत:व्यंगचित्रे छापली जात. त्यातच काही व्यक्तिचित्रांच्या गंमती देण्याच्या कल्पनेतून चित्रकथा अवतरल्या.

न्यूयॉर्क वर्ल्डने १८९६ च्या मार्चमध्ये अमेरिकेत रंगीत चित्रमालेची पुरवणी प्रसिद्ध केली. बालवाङ्मयातील हा पहिलाच चित्रकथेचा प्रयोग लोकप्रिय ठरला. या पुरवणीपासून रिचर्ड आउटकॉल्ट या चित्रकाराने लहान मुलांचे एक गंमतीदार पात्र न्यूयॉर्क वर्ल्डमध्ये रेखाटण्यास सुरुवात केली. ‘यलो किड’ नावाने हे पात्र प्रसिद्धीला आले. पिवळा झगा घातलेला हा छोकरा बोलत नसे; पण त्याचे हृद्गत त्याच्या पिवळ्या झग्यावर लिहिलेले असे. हा नवा प्रयोग कल्पनातीत लोकप्रिय ठरला. त्यानंतर हळहळू स्वतंत्र चित्रकथा हा प्रकार अनेक शाखांनी समृद्ध बनला.

मराठीमध्ये सचित्र बालवाङ्मय अलीकडेच सुरू झाले. ‘इंडिया बुक हाउस’ सारख्या संस्था सचित्र बालकथांचेच प्रकाशन प्रामुख्याने करतात. भारतातील अनेक प्रमुख भाषांतून त्याच्या आवृत्या प्रसिद्ध केल्या जातात. मात्र खास स्वतंत्र अशा सचित्र कथा मराठीमध्ये वाअन्य भारतीय भाषांमध्ये कमी प्रमाणात आढळतात. मूळ इंग्रजी भाषेतील कथा, त्यांतील मजकूर इतर भाषांत अनुवादित करून देण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळतो. स्वाभाविकच त्यातील चित्रमय वातावरण व भाषेची घडण यांत काहीसा परकेपणा जाणवतो. चांदोबा, आनंद, कुमार, किशोर यांसारख्या मराठी नियतकालिकांतून मराठी बालवाङ्मय विशेषत्वाने जोम धरू लागले आहे. तसेच साप्ताहिकांतून व दैनिकांतून खास बालांसाठी विभाग देण्याची प्रथाही अलीकडे दिसून येते. विलोभनीय सचित्र पुस्तकांची निर्मिती करावयाची, तर त्यासाठी मुद्रणखर्च फार होतो. प्रादेशिक बालवाङ्मयाचे विक्रयक्षेत्र त्यामानाने मर्यादित असल्याने, इंग्रजी भाषेतील बालवाङ्मयाच्या तुलनेत प्रादेशिक बालवाङ्मय अजूनही प्राथमिक अवस्थेतच आहे, असे म्हणावे लागेल.

संदर्भ :

१. Cameron, Elenor, The Green and Burning Tree: On the writing and Enjoyment of Children’s Books, Boston, 1969.

२. Doyle, Brian, The who’s Who of Children’s Literature, New York, 1968.

३. Hazard, Paul; Trans, Michell, Marguerite Books, Children and Men, Boston, 1960.

४. Hurlimann, Bettina; Trans. Crawford, Elizabeth D. Picture Book World, London, 1968.

५. Smith, Lilian H. The Unreluctant Year: A Critical Approach to Children’s Literature, New York, 1968.

६. दांडेकर, मालती, बालसाहित्याची रुपरेखा, मुंबई, १९६४.

७. दावतर, वसंत, संपा. आलोचना :वर्ष अठरावे, अंक चौथा-पाचवा, मुंबई, डिंसें. १९७९-जाने. १९८०

८. वागूल, देवीदास, बालवाङ्मय, पुणे.

९. बाळ, शरयू; सोहोनी, मा. के. बालमानसशास्त्र, पुणे, १९६४.

लेखिका: ज्योत्स्ना कदम

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 9/8/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate