অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मंगोल साहित्य

प्रस्तावना

यूरोपातील तुर्कस्तानापासून पूर्वेकडील समुद्राकडे आणि चीनच्या उत्तर सरहद्दीपलीकडे समुद्रापर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण प्रदेशात पसरलेल्या भाषाकुटुंबाला अल्ताइक हे नाव आहे. यात तुर्की, मंगोल व मांचु-तुंगूझ शाखांचा समावेश होतो.

मंगोलच्या उपशाखा

मंगोलच्या तीन उपशाखा आहेत : पश्चिमेकडील बोली, खाल्खा व बुर्यात. भौगोलिक दृष्टीने मंगोल भाषा स्वतःच्या मंगोलिया या मूळ प्रदेशापासून पश्चिम आशियात फार दूरवर पसरल्या आहेत. मंगोलियन लोक लढाऊ वृत्तीचे व आक्रमक असून तेराव्या शतकात तर त्यांनी चंगोझखान याच्या नेतृत्वाखाली एक विस्तीर्ण साम्राज्य स्थापले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांच्या लहानमोठ्या वसाहती अजूनही आढळतात.

मंगोल भाषांच्या लिपीला ’कितान’ हे नाव आहे.

मंगोल भाषांची स्वररचना अतिशय समृद्ध आहे. त्यात जवळजवळ वीस स्वर आहेत. प्राचीन ग्रांथिक भाषेत न सापडणारे दीर्घ स्वर बहुतेक सर्व बोलीत आहेत आणि ऱ्हस्वदीर्घत्व अर्थनिर्णायकही होऊ शकते.

मृदुतालव्य क कंठ्य स्वराआधी घर्षक बनतो. कंठ्य ग व घ दोन स्वरांच्या मधे आल्यास लोप पावतात. तालव्य व दंत्य अर्धस्फोटक विपुल प्रमाणात आढळतात. ग्रांथिक मंगोलमध्ये आद्यस्थानी र व ल हे द्रववर्ण येत नाहीत, तर अंत्यस्थानी च व ज हे आद्यस्फोटके, तसेच व हा दंतौष्ठ्य वर्ण येत नाही.

मंगोलमधे लिंगभेद नाही, पण प्राचीन भाषेत तो असावा, असे दिसते. अनेकवचनाचे पुष्कळ प्रत्यय या भाषेत आहेत. एकंदर विभक्ती आठ आहेत.

ग्रांथिक मंगोलमधे प्रथम व द्वितीय पुरूष सर्वनाम नाही. तृतीय पुरूष सर्वनामाच्या जागी दर्शक विशेषण वापरले जाते.

क्रियापदांच्या रूपांच्या बाबतीत मात्र मंगोल भाषा अतिशय समृद्ध आहेत.

बहुतेक शब्द दोन किंवा तीन अवयवांचे आहेत. एकावयवी शब्द फार क्वचित आढळतात.

भौगोलिक परिस्थितीमुळे या भाषांतर आजपर्यंत चिनी भाषेचा बराच मोठा प्रभाव पडलेला आहे. अलिकडे मात्र रशियनचा प्रभाव वाढत्या प्रमाणात आहे.

साहित्य

‘सिक्रेट हिस्टरी ऑफ द मंगोल्स’ (इं.शी.) ह्या तेराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या इतिवृत्तापासून मंगोल भाषेतील लिखित साहित्याची परंपरा सुरू होते, असे दिसते. चंगीझखानाचे जीवन, त्याचे वारस आणि त्याचा काळ हा ह्या इतिवृत्ताचा विषय. त्याआधी मौखिक परंपरेनेही ह्या भाषेतील बरेचसे साहित्य जपले गेले. त्यात काही महाकाव्यांचा समावेश होतो. शूरांच्या साहसकथांवर ही महाकाव्ये रचिली गेली असून त्यांत योजिलेल्या शब्दकळेत लक्षणीय सारखेपणा आहे. चंगीझखान, गेसरखान, एंके बोलोड खान हे काहीमहाकाव्यांचे नायक होत. मँगस हा राक्षस ह्या महाकाव्यांतून दिसणारा खलनायक असून नायकांकडून तो नेहमीच पराभूत केला जातो. सोळाव्या शतकाच्या आरंभी बौद्ध धर्माचा प्रभावस्रोत मंगोल साहित्यात शिरला. बौद्ध धर्मग्रंथाची भाषेत झाली. अठराव्या-एकोणिसाव्या शातकांत काही अद्भुतरम्य चिनी कादंबऱ्यांचे मंगोल अनुवाद झाले. टी. झाम्ट सारानो हा विसाव्या शतकाच्या आरंभीचा एक उल्लेखनीय साहित्यिक. एडगर ॲलन पो, एच्. जी. वेल्स ह्यांसारख्या काही पश्चिमी साहित्यकांचे ग्रंथ त्याने मंगोलमध्ये अनुवादिले. दामदिन सुरून हा श्रेष्ट आधुनिक साहित्यिक होय. १९२४ मध्ये मंगोलियन प्रजासत्ताकाची स्थापना झाल्यानंतर वारस्तववादी साहित्याच्या निर्मितीस जोरदार चालना मिळाली आणि सोव्हिएट साहित्य हा ह्या साहित्याचा आदर्श होता.

संदर्भ : Cohen, M.; Meillet, A. Ed. Les Langues du Monde, Paris. 1952.

लेखक: ना. गो. कालेलकर; अ. र. कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate