অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मथुरा-मंगल

मथुरा-मंगल

भक्त चरणदास (१७८०-१८०५) या कवीने रचलेले प्रख्यात ओडिया काव्य. भक्त चरणदासाचा जन्म पूर्वीच्या रणपूर संस्थानातील (सध्याच्या पुरी जिल्ह्यातील) सुनाखला नावाच्या  गावी झाला. त्याचे मूळ नाव वैरागीचरण पट्टनायक होते; तथापि दीक्षा घेतल्यानंतर त्याने चरणदास हे नाव धारण केले. पंचसखा मताचा तो गृहस्थाश्रमी वैष्णव भक्त होता; म्हणून ‘भक्त चरणदास’ ह्या नावाने तो प्रसिद्ध आहे. चरणदास हा केवळ प्रतिभासंपन्न कवीच नव्हता, तर तत्त्वचिंतक व विद्वानही होता. ओरिसाच्या सांस्कृतिक जीवनात आपल्या कवित्वाने, दार्शनिक विचाराने आणि विद्वत्तेने त्याने चिरंतन स्थान निर्माण केले.

मथुरा-मंगल ह्या त्याच्या छंदोबद्ध काव्यात उद्धव कृष्णाला मथुरेस घेऊन जाण्यासाठी येतो या घटनेपासून कंसवधापर्यंतचे कृष्ण-चरित्र व कृष्णलीला वर्णिल्या आहेत. ह्या काव्यातील उद्धव आणि गोपी यांच्यातील संवादाचा भाग विशेष सरस उतरला आहे. राधा व गोपींच्या कृष्णविरहाचे व त्यातून निर्मांण झालेल्या व्यथा-वेदनेचे उत्कट वर्णन कवीने केले आहे. पारंपरिक रसनिर्मितीच्या दृष्टीने हे वर्णन विप्रलंभ शृंगार रसाचे ठरते. कृष्णचरित्रातील ह्या भागावर ओडियात अनेक काव्ये आहेत, पण त्यात तोचतोपणा आढळतो; भक्त चरणदासाने मात्र आपल्या काव्यात वेगळेपणाचा ठसा उमटविला आहे. कृष्णाला मथुरेस घेऊन जाणारा उद्धव व कृष्णाच्या विरहाने दुःखी झालेल्या गोपी यांच्यातील संवाद हृदयस्पर्शी आहे. उद्धव गोपींना वेदान्तातील मायावादाचा आश्रय घेऊन ऐहिक सुखदुःखे, मीलन-विरह इ. सगळेच कसे निरर्थक, भ्रममय असल्याचे पटवू पाहतो; पण साध्याभोळ्या गोपींना हे असंबद्ध तत्त्वज्ञान पटत नाही. त्या त्यांच्या लाडक्या कृष्णाची त्याला मागणी करतात; कारण कृष्ण हा त्यांच्या जीवनाचे सारसर्वस्व आहे. कवीने ह्या दोन सर्गांत ईश्वरी साक्षात्कारासाठी ज्ञानाहून भक्तीची श्रेष्ठता प्रतिपादन केली आहे. उद्धव-गोपीसंवादातील ही तात्त्विक चर्चा कोठेही शुष्क, निरस झालेली नाही. कवीचे संपन्न व्यक्तिमत्त्व, भक्तीची सखोल अनुभूती, समर्पक छंदोरचना आणि रसाळ शब्दकळा यांचा मनोज्ञ प्रत्यय या काव्यातून येतो. ओरिसातील वैष्णवांमध्ये  तसेच आबालवृद्ध स्त्रीपुरूषांमध्ये हे काव्य  अत्यंत लोकप्रिय असून ओरिसातील सांस्कृतिक जीवनाचा तो अमोल ठेवा आहे. मुकुटधारी पांडे यांनी मथुरा-मंगलचा हिंदीत अनुवाद केला आहे तसेच आर्तवल्लभ महांती यांनी मथुरा-मंगल काव्याचे चिकित्सकपणे   संपादन करून १९४२ मध्ये ते प्रसिद्धही केले आहे.

मनबोध चौतिसा ही भक्त चरणदासाची दुसरी महत्त्वपूर्ण रचना होय. ओडियातील सर्वच ‘चौतिसा’ प्रकारच्या काव्यांत हा चौतिसा  अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. वैराग्यपर व नीतिपर उपदेश त्यात उत्कृष्ट काव्यरूप घेऊन अवतरला आहे. ओरिसात मनबोध चौतिसा अत्यंत लोकप्रिय आहे. साध्या एकतारीच्या साथीवर आजही ओरिसात अनेकजण हा चौतिसा गातात. संसाराचे असारत्व, माया-  मय जग, आध्यात्मिक सत्य इ. विषय त्यात आले आहेत. मधुर शब्द-योजना, प्रत्ययकारी प्रतिमा आणि संथ लयीतील गेयानुकूल ओळी यांमुळे श्रोत्यांच्या मनात शांतरस उदित होतो. ह्या दोन्ही काव्यांमुळे भक्त चरणदासाला ओडिया साहित्यात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले  आहे.

लेखक: कुंजविहारी दास; नरेंद्र मिश्र ; भा. ग. सुर्वे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate