অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठी लोकसाहित्यविषयक अभ्यास

मराठी लोकसाहित्यविषयक अभ्यास

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी लोकसंस्कृतिविषयक अभ्यासाचा पाया घातला. राजवाडे यांच्या अभ्यासक्षेत्रात संस्कृतिविषयक अभ्यासाचा भाग खूप व्यापक आहे. त्यांच्या बुद्धिनिष्ठ प्रणालीनुसार लोकसंस्कृतीच्या क्षेत्रातील विषयांसंबंधी त्यांचे मत अत्यंत प्रतिकूल असले, तरी सांस्कृतिक अभ्यासाच्या दृष्टीने त्यांचे महत्त्वही त्यांना मान्य होते. जीवनाच्या चिकित्सक अभ्यासकाच्या दृष्टीने अनभ्यसनीय कोणतेच क्षेत्र नसते, असे ते मानीत. लोकसंस्कृतीच्या क्षेत्रातील बाबी म्हणजे त्यांच्या दृष्टीने अभ्यासाची भ्रांत साधने होत. कारण ही साधने विकारमय आहेत, असे त्यांचे मत होते. तरीही मंत्रतंत्र, जादू-तोडगे, पिशाच-भूत-प्रेतादीविषयी समज, अंगात येणे, तांत्रिक चित्रकला यांचबरोबर मंत्रभाषा, मंत्रगान, तोडग्यांची सरळ व वक्ररेषाकृती, यंत्रे, स्वस्तिके; डौर व कुडबुडे यांसारखी वाद्ये, कळसूत्र, लोकदेवतांचे पूजोपचार, पूजासाधने अशा अनेक बाबींचा चिकित्सक विचार त्यांनी मराठीच प्रथमच साक्षेपाने केलेला आहे.

साधारणपणे १९२५ ते ३८ या काळात त्यांनी लेखनाद्वारा हे विचार मांडले. आदिधर्म, लोकधर्म आणि त्यातून उत्क्रांत झालेला उच्च धर्म यांचा अनुबंध राजवाडे यांनीच प्रथम स्पष्ट केला. त्यांच्या याच भूमिकेचा साधार विस्तार डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या चिकित्सक संशोधनामध्ये झालेला दिसतो, उच्च संस्कृतीच्या प्रामाणिक विश्लेषकांना लोकधर्माचा विवेचक अभ्यास व विचार केल्याखेरीज पुढे जाता येणार नाही, याचे भान राजवाडे यांनी प्रथम आणून दिले.डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी सामाजिक दृष्टीतून केलेले समाजाचे, इतिहासाचे विश्लेषणही लोकसांस्कृतिक भूमिकेचा पाठपुरावा करणारे आहे. येथील विविध मानवसमूह, त्यांच्या भाषा त्यांचे आचार, भारतीय कला, स्त्रीजीवन, विविध मानवसमूहांचे श्रद्धाविश्व यांचा विचार डॉ. केतकर यांनी समाजशास्त्रीय भूमिकेतून केला आहे.

याच परंपरेचा वारसा पुढे ना. गो. चापेकर व चि. ग. कर्वे यांनी समृद्ध केलेला दिसतो. ना. गो. चापेकर यांचे १९३३ मधले आमचा गांव (बदलापूर) ... हे पुस्तक एका गावाच्या लोकतत्त्वीय अभ्यासाचा उत्कृष्ट नमुना असून सामाजिक-सांस्कृतिक दृष्टिकोणातून एखाद्या भूप्रदेशाचा लोकतत्त्वीय अभ्यास किती समृद्ध करता येतो, याचा आदर्श आहे. तसेच चित्पावन (१९३८) हा ग्रंथ एका जातीचा अभ्यास लोकतत्त्वीय पार्श्वभूमीवर किती व्यापकपणे करता येतो, याचा नमुना आहे. कोशकार शं.ग. दाते आणि चि.ग, कर्वे यांनी विविध कोशांना लिहिलेल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना म्हणजे लोकतत्त्वीय भूमिकेतून केलेल्या भाषिक अभ्यासाचे नमुनादर्श आहेत.

याच काळात लोकसंस्कृतिविषयक आस्थेने भारलेली राष्ट्रभक्तांची एक पिढी लोकसंस्कृतीकडे वळलेली दिसते. साने गुरुजी हे त्यांचे प्रतिनिधी होत. पारंपारिक मौखिक कथा-गीतांच्या संकलनाची एक लाट या काळात उसळलेली दिसते. लोकसंस्कृतीच्या चिकित्सेचा मात्र या परंपरेत अभाव आहे. परंपरेच्या आणि लोकजीवनाच्या भाबड्या प्रेमातून यांपैकी अनेक संकलने झालेली आहेत. महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागांतील स्त्रियाही ओवीगीतांच्या व स्त्रीगीतांच्या संकलनात आघाडीवर होत्या.

डॉ. ना.गो. नांदापूरकर यांनी याच भूमिकेतून मराठवाड्यात स्त्रीगीतांच्या संकलनाचे काम मिशनरी वृत्तीने केलेले दिसते. ओवीरचनेची चिकित्सा ऐतिहासिक भूमिकेतून त्यांनी केलेली आहे. केवळ रामसीताविषयक ओव्यांचे त्यांचे संकलनही प्रचंड आहे. त्या ओव्यांचे संपादन डॉ. उषा जोशी यांनी मऱ्हाटी स्त्रीरचित रामकथा (१९९०) या शीर्षकाने ग्रंथरुपात प्रसिद्ध केले आहे. त्याला प्रदीर्घ विवेचन प्रस्तावनाही त्यांनी लिहिली आहे.लोकसाहित्याच्या संकलकांमध्ये आणखी काही उल्लेख आवश्यक आहेत. काका कालेलकर, दत्तो वामन पोतदार, वामनराव व कमलाबाई चोरघडे हे पतीपत्नी, आनंदीबाई शिर्के, मालतीबाई दांडेकर, यमुनाबाई शेवडे, अनुसूयाबाई भागवत, न.शं. पोहनेरकर, दा. गो. बोरसे, सरोजिनी बाबर, ना. रा. शेंडे, नरेश कवडी, विमला थत्ते, कमलाबाई देशपांडे सुलोचनाबाई सप्तर्षी, इरावती कर्वे, डॉ. सविता जाजोदिया ही मराठी लोकसाहित्यसंकलकांची काही प्रमुख नावे होत.

डॉ. सरोजिनी बाबर ह्यांनी लोकसाहित्याच्या संकलनाला आपले आयुष्य वाहिले. मराठी लोककथा (१९५७), लोकसंगीत (१९६२), लोकसाहित्य : भाषा आणि संस्कृति (१९६३), जनलोकाचा सामवेद (१९६५), फोक लिटरेचर ऑफ महाराष्ट्र (१९६८), भोंडला भुलाबाई (१९७७), मराठी फोकलोअर ही त्यांनी लिहिलेली-संपादिलेली काही विशेष उल्लेखनीय पुस्तके होत. मराठीत दुर्गाबाई भागवत यांनी लोकसाहित्याच्या सैद्धांतिक अभ्यासाचा पाया घातला. त्यांचा लोकसाहित्याची रुपरेखा (१९५६, आवृ. दुसरी-१९७७) ही सैद्धांतिक विवेचन करणारा मराठीतील लोकसाहित्यविषयक पहिला ग्रंथ होय. त्यांचे धर्म आणि लोकसाहित्य (१९७५) हे पुस्तकही या संदर्भात महत्त्वाचे आहे.

तसेच समग्र सिद्धार्थजातकाचे त्यांनी भाषांतर केले आहे, त्याची विवेचन प्रस्तावना व तळटीपा त्यांच्या लोकसांस्कृतिक सखोल व व्यापक अभ्यासाची जाण आणून देणारी आहे. भारतातील काश्मीर, पंजाब, दख्खन (महाराष्ट्र), बंगाल, आसाम, गुजरात, संथाळ, उ. प्रदेश, तमिळनाडू, मध्यप्रदेश अशा अनेक प्रदेशांतील लोककथांची भाषांतरे त्यांनी केली, तसेच त्यांना चिकित्सक प्रस्तावना लिहिल्या. अलीकडचे अस्वल हे त्यांचे पुस्तक एका प्राण्याच्या लोकसांस्कृतिक अभ्यासाचा नमुनादर्श आहे. मराठीतील लोकसाहित्यविषयक प्रकाशित साहित्याची १९६७ प्रयंतची त्यांची साहित्यसूचीही प्रसिद्ध झाली आहे.

दुर्गाबाई भागवतांनंतर सैद्धांतिक मांडणी करणारे मराठीतील लोकसाहित्याचे अभ्यासक म्हणजे डॉ. प्रभाकर मांडे होत. लोकसाहित्याचे अंत:प्रवाह (१९७५), लोकसाहित्याचे स्वरुप (१९७८, आवृ. दुसरी-१९८९) हे त्यांचे सैद्धांतिक मांडणी करणारे सुप्रसिद्ध ग्रंथ आहेत. ॲस्पेक्ट्स ऑफ फोक कल्चर (१९८४) हा त्यांचा इंग्रजी ग्रंथही अभ्यासपूर्ण आहे. त्यानंतर त्यांचे गावगाड्याबाहेर (१९८३) हे भटक्या-विमुक्त जमातींविषयीचे अभ्यासपूर्ण पुस्तक प्रसिद्ध झाले. सांकेतिक आणि गुप्त भाषा : परंपरा व स्वरुप (१९८५) हे याच जमातींच्या गुप्त भाषांचे स्वरुप स्पष्ट करणारे पुस्तक असून अशा प्रकारचे ते मराठीतले पहिले आणि एकमेव पुस्तक आहे. यांखेरीज लोकरंगकला आणि नागर रंगभूमी, गिरिवनातील रंगधारा, मांग आणि त्यांचे मागते ही त्यांची १९९०-९१ मध्ये प्रसिद्ध झालेली पुस्तके आहेत. डॉ. प्रभाकर मांडे यांच्यापुढे पाश्चिमात्य अभ्यासकांच्या सैद्धांतिक मांडणीचा नमुनादर्श असून त्यानुसार त्यांचे लेखन झाले आहे.

डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे हे मराठी लोकसांस्कृतिक अभ्यासक्षेत्रात लोकविलक्षण दृष्टीने विपुल लेखन करणारे एक प्रतिभावंत संशोधक आहेत. गेल्या चाळीस वर्षात त्यांनी व्रतस्थ निष्ठेने संशोधनपर लेखन केले असून, त्यांच्या ग्रंथांची संख्या जवळपास शंभर भरेल. इंग्रजी वाङ्‌मयाची सैद्धांतिक बैठक असूनही संपूर्ण देशी भान व देशी सामुग्री यांवर त्यांचे संशोधन उभे आहे. भरभक्कम सैद्धांतिक आधारावर उभे असलेले त्यांचे लोकसांस्कृतिक संशोधनपर लेखन हे उपयोजित सैद्धांतिक लेखनाचा अनोखा नमुना आहे. लोकसंस्कृतीक पूर्णपणे काहीच नष्ट होत नाही. संस्कृतीच्या अगदी आदिम अवस्थेपासूनचे अवशेष या ना त्या स्वरुपात प्रगत अवस्थेतही टिकून असतात, या सिद्धांतानुसार महाराष्ट्रातील लोकसंस्कृती, इतिहास, प्राचीन वाङ्‌मय, संतसाहित्य यांची चिकित्सा त्यांनी केली आहे.

धर्म व लोकश्रद्धा आणि तदंतर्गत देवतोपसना हा संस्कृतीच्या अध्यनातील अपरिहार्य भाग आहे. त्यांचा शोध हा मानवी मनाच्या तद्‌विषयक धारणांचा शोध असतो आणि त्या धारणांचा शोध साहित्य, आचारधर्म, उपासनाविधी इत्यादींच्या आधारे घेता येतो. या सैद्धांतिक भूमिकेतून त्यांनी लेखन केले. खंडोबा (१९६१), मराठी लोकसंस्कृतीचे उपासक (१९६४), संत आणि समाज (१९६४), लोकसंस्कृतीची क्षितिजे (१९७१), चक्रपाणि (१९७७), लज्जागौरी (१९७८), संतसाहित्य आणि लोकसाहित्य : काही अनुबंध (१९७८), श्रीविठ्ठल : एक महासमन्वय (१९८४), लोकसाहित्य : शोध आणि समीक्षा (१९९०), प्राचीन मराठी वाङ्‌मय : शोध आणि संहिता (१९९१) ही त्यांची पुस्तके म्हणजे लोकसांस्कृतिक अभ्यासाचे मानदंड आहेत. चिकित्सा आणि रसाळपणा यांमुळे डॉ. ढेरे यांचे लेखन व संशोधन मराठीत वेगळेपणाने उठून दिसते.

वरील तज्ञ व व्यासंगी व्यक्तींच्या तसेच ‘लोकसाहित्य संशोधन मंडळ’ या संस्थेच्या प्रेरणेमुळे व मार्गदर्शनामुळे लोकसाहित्याच्या नवीन अभ्यासकांना नवनव्या दिशा लाभल्या व त्यांचे कार्य जोमाने पुढे चालू राहिले. डॉ. गंगाधर मोरजे यांचे लोकसाहित्य : एक स्वतंत्र अभ्यासक्षेत्र हे पुस्तक महत्त्वाचे आहे. तसेच विदर्भातील आदिवासी जीवनाचा अभ्यास करणारे डॉ. मधुकर वाकोडे यांनी विविध स्फुट लेखांतून लोकसंस्कृतिक संशोधन प्रसिद्ध केले आहे. मराठवाड्यातील डॉ. तारा परांजपे यांचे सीमाप्रदेशांतील भावगंगा हे तेलंगण-महाराष्ट्र सीमाप्रदेशातील लोकसाहित्याची वेध घेणारे पुस्तक व अलीकडेच आंध्र-महाराष्ट्र : सांस्कृतिक अनुबंध (१९९१) हे आंध्र-महाराष्ट्राचा सांस्कृतिक संबंध स्पष्ट करणारे पुस्तक महत्त्वाचे आहे. पश्चिम महाराष्ट्रात डॉ. तारा भवाळकर यांनी लोकसाहित्य, लोककला यांविषयी सैद्धांतिक उपयोजित दोन्ही प्रकारचे विपुल लेखन ग्रंथरुपाने व स्फुट स्वरुपात केले आहे.

महाराष्ट्रातील पौराणिक नाटकांच्या संदर्भात एकूणच नाट्योदयाची एक सैद्धांतिक भूमिका मांडणारे मिथक आणि नाटक (१९८८) हे पुस्तक, कर्नाटकातील यक्षगान व मराठी नाट्यपरंपरा (१९७९, आवृ. दुसरी-१९९०)  हे  यक्षगान व मराठी नाट्यपरंपरा  यांचा अनुबंध स्पष्ट करणारे छोटे पुस्तक, १९२० नंतरचा लोकरंगभूमी व नागररंगभूमी यांचा अनुबंध स्पष्ट करणारे लोकनागर रंगभूमी (१९८९), दक्षिणेतील कला व साहित्य यांच्या आधारे त्यांतील महामातृत्वाचा सांस्कृतिक शोध घेणारा महामाया (१९८८) हा डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या सहयोगाने सिद्ध झालेला ग्रंथ, लोकसंचित (१९८९) हा लोकसांस्कृतिक विविध विषयांवरील लेखांचा संग्रह, लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमा (१९८६) हा आधुनिक स्त्रीवादी समीक्षादृष्टीतून पारंपारिक स्त्रीसाहित्याची समीक्षा करण्याचा या क्षेत्रातला पहिला प्रयोग असलेले पुस्तक अशी विविध पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.

औरंगाबादचे शरद व्यवहारे यांची लोकसाहित्य

  1. उद्‌गम आणि विकास (१९८७)
  2. लोकसाहित्य : रंग आणि रेखा (१९९०)
  3. मराठी लोकगीत : स्वरुपविशेष (१९९०)
  4. लोकधर्मी नाट्याची जडणघडण (१९९०)
  5. लोकवाङ्‌मय : रुप-स्वरुप (१९९१)
  6. मराठी स्त्रीगीते  (१९९१)

ही पुस्तके महत्त्वाची आहेत. रा. वि. मराठे संपादित गावगाडा शब्दकोश (१९९०) हा लोकसाहित्यविषयक महत्त्वाचा कोश आहे. द. ग. गोडसे यांच्या ग्रंथांमध्ये कला आणि लोकसंस्कृती यांच्या अनुबंधांतून लोकधाटीचा शोध घेण्याचा प्रयत्न जाणवतो.

  1. पोत (१९६३)
  2. ऊर्जायन (१९६५)
  3. शक्तिसौष्ठव (१९७२)
  4. गतिमानी (१९७६)
  5. लोकघाटी (१९७९)
  6. मातावळ (१९८१) हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ होत.

मराठीतील लोकसांस्कृतिक संशोधनविषयाचा हा अगदी धावता व त्रोटक आढावा आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासाविषयी सामप्रयाने अद्याप लेखन झालेले नाही. लोकसाहित्याच्या स्वरुपाविषयी व व्याप्तीविषयीही मराठी साहित्याभ्यासक अद्याप उदासीनच आहेत. हल्ली त्यात थोडा बदल दिसतो. आहे. केवळ संकलनाच्या व भाबड्या आस्वादाच्या कक्षेबाहेर लोकसाहित्याचे अभ्यासक येत आहेत. संस्कृती, इतिहास, समाज, प्राचीन साहित्य, संतसाहित्य, समाजमानस इत्यादींचा शोध घेण्यासाठी लोकसांस्कृतिक समग्र दृष्टिकोण हा महत्त्वाचा व अपरिहार्य आहे, याचे भान अभ्यासकांना हळूहळू येत आहे.लोकसाहित्य व लोकसंस्कृती यांमध्ये सर्वच बावी गौरवयोग्य व स्पृहणीय नसतात. त्यामुळे त्याविषयीच्या भाबड्या गौरवाच्या भावनेतून बाहेर येऊन चिकित्सक दृष्टिकोण स्वीकारण्याचा इशारा दुर्गाबाई भागवतांनी अभ्यासकांना दिलेला आहेच. त्यामुळे लोकसाहित्यविषयक भूमिका अधिक व्यापक होत आहे.

साहित्यसमीक्षाक्षेत्रातील आदिबंधात्मक समीक्षा हा प्रवाह लोकसांस्कृतिक व लोकमानसशास्त्रीय भूमिकेवर उभा असून तो समीक्षाक्षेत्रात नव्याने रुढ होत आहे. मराठीत प्रा.गंगाधर पाटील (समीक्षेची नवी रुपे), डॉ. म. सु. पाटील (आदिबंधात्म समीक्षा), डॉ. अरुणा ढेरे (काळोखाचे कवडसे, नागमंडल) हे अभ्यासक आदिबंधात्मक समीक्षेचा मार्ग प्रशस्त करीत आहेत. लोकसाहित्याच्या कथा-गीते इ. शाब्द आविष्कारांसंबंधी, फार तर प्रयोगात्म लोककलांसंबंधीच आतापर्यंत लिहिले गेले आहे. त्यापलीकडे जाण्याचे काही प्रयत्नही तुरळक प्रमाणात का होईना, होत आहेत. त्यांचा उल्लेखही आवश्यक आहे. पुणे विद्यापीठातील डॉ. थिटे यांचे लोकवैद्यकाची चिकित्सा करणारे लेखन प्रसिद्ध आहे.

डॉ. अशोक दा. रानडे यांचे लोकसंगीतविषयक चिंतन-लेखन, तसेच डॉ. ग. ह. तारळेकर यांचे लोकवाद्ये या विषयावरील लेखन (भारतीय वाद्यांचा इतिहास) महत्त्वपूर्ण आहे. मुंबईच्या ‘इंडियन नॅशनल थिएटर’ च्या लोककला विभागाने दशावतार, जागरण, वासुदेव, गोंधळ या विषयांवर संशोधनपर पुस्तिका प्रसिद्ध केल्या आहेत. शिवाय या कलाविष्कारांचे प्रयोगही सादर केले आहेत. गोवा कला अकादमी दर वर्षी लोकनृत्य व लोककला महोत्सव आयोजित करते व तत्संबंधित पुस्तिका प्रकाशित करते. पश्चिम महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या वतीनेही लोककलांच्या महोत्सवांचे आयोजन केले जाते.

एकूण कलाक्षेत्रात लोकपरंपरांतून चैतन्यस्वीकाराची प्रक्रिया वारंवार पुनरावृत्त होताना दिसून येते. १९७० नंतर एकूणच भारतीय कलाजीवनात आलेली स्थितिशीलता आणि मरगळ झटकून टाकण्यासाठी कलावंत पुन्हा पारंपारिक लोककलांचा नव्याने शोध घेऊ लागले आहेत. विविध प्रकारच्या हस्तकला, संगीतक्षेत्रात अभिजात लोकसंगीताचे प्रयत्न (उदा., कुमार गंधर्व), चित्रकलेत लोकचित्रकलेचा आविष्कार (उदा., हेब्बर), लोकवैद्यकाचा आयुर्वेदाच्या आधारे शोध घेण्याची प्रवृत्ती, लोकनृत्यांविषयीचे वाढते आकर्षण, नाट्याविष्कारामध्ये विविध लोकशैलींचे उपयोजन ही सर्व चिन्हे लोकसंस्कृतीविषयी नवे भान जागृत झाल्याची निर्दशक आहेत. लोकसंस्कृतीमधील अनौपचारिकता, लवचिकता, भावात्मकता यांचे आकर्षण औद्योगिक विकासात भौतिक सुखांच्या राशीवर लोळत असूनही एकाकी झालेल्या माणसाला वाटते आहे की काय ? असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. एकूणच जीवनाचा विचार सुटासुटा न करता सामग्र्याने व्हावा, असे वाटणारा एक वर्ग आहे. तो लोकसाहित्याच्या अभ्यासाकडे अधिककरून वळतो आहे.

स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीमुक्ती हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात परवलीचे शब्द आहेत. पश्चिमेकडे स्त्रीवादी समीक्षादृष्टीची सध्या लाट आली आहे. ते सिद्धांत जसेच्या तसे भारतीय जीवनाला लागू पडतात, की ओढूनताणून चिकटवावे लागतात ? स्त्रीविषयक पाश्चिमात्य भूमिकेपेक्षा आपली भूमिका वेगळी, तरीही परंपरेपेक्षा भिन्न कशी असावी ? या प्रश्नांचा भारतीय लोकसाहित्य व लोकसंस्कृती यांच्या संदर्भात डॉ. तारा भवाळकर यांनी लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा या पुस्तकातून प्रथमच शोध घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील स्त्रीवादी विचार करणारी मंडळी या वेगळ्या लोकसंस्कृतिक स्त्रीभूमिकेकडे वळत आहेत. लोकसाहित्य हे जुन्या ग्रामीण जीवनाशीच संबंधित आहे, हा समज वरील सर्व कारणांनी बाजूला पडला असून प्रगत नागरी जीवनाची चिकित्सा करण्यासाठी त्याचा अभ्यास उपयुक्त असल्याचे भान आले आहे.

संदर्भ : 1. Danieis, C. L.; Stevans, C. M. Ed. Encyclopedia of Superstitions, Folklore, and the Occult Sciences of the World, London, 1971.

2. Dorson, Richard, Ed. Folklore : Selected Essays, Bloomington, 1972.

3. Leach, Maria, Ed. Dictionary of Folklore, Mythology qnd  Legend, New York, 1949.

4. Reaver, J. Russell; Boswell, George W. The Fundamentals of  Folk Literature, London, 1962.

5. Thompson, Stith, Motif-Index of Folk- Literature Bloomington,  1955-58.

६. अग्रवाल, वासुदेवशरण, प्राचीन भारतीय लोकधर्म, अहमदाबाद, १९६४.

७. गोडसे, द. ग. लोकघाटी, मुंबई, १९७९.

८. जोशी, लक्ष्मणशास्त्री, संपा. राजवाडे लेखसंग्रह, दिल्ली, १९५८.

९. ठाकुर, रवींद्रनाथ, अनु. व संपा. भागवत, दुर्गा, लोकसाहित्य, मुंबई, १९६७.

१०. ढेरे, रा. चि. लोकसंस्कृतीची क्षितिजे, पुणे, १९७१.

११. ढेरे, रा. चि. लोकसंस्कृतीचे उपासक, पुणे, १९६४.

१२. ढेरे, रा. चि. लोकसाहित्य : शोध आणि समीक्षा, पुणे १९९०.

१३. ढेरे, रा. चि. संतसाहित्य आणि लोकसाहित्य : काही अनुबंध, पुणे, १९७८.

१४. दाते, शं. ग. लोककथा, भाग १ व २, पुणे १९२९.

१५. परांजपे, तारा, आंध्र-महाराष्ट्र : सांस्कृतिक अनुबंध, औरंगाबाद, १९९१.

१६. बाबर, सरोजिनी, संपा. लोकसाहित्य : भाषा आणि संस्कृति, पुणे, १९६३.

१७. भवाळकर, तारा, लोकनागर रंगभूमी, पुणे १९८९.

१८. भवाळकर, तारा, लोकसंचित, पुणे १९९०.

१९. भवाळकर, तारा, लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा, पुणे, १९८६.

२०. भागवत, दुर्गा, लोकसाहित्याची रुपरेखा, पुणे, १९७७.

२१. मराठे, रा. वि. संपा. गावगाडा शब्दकोश, मुंबई, १९९०.

२२. मांडे, प्रभाकर, लोकसाहित्याचे अंत:प्रवाह, पुणे, १९७५.

२३. मांडे, प्रभाकर, लोकसाहित्याचे स्वरुप, औरंगाबाद, १९८९.

२४. मोरजे, गंगाधर, लोकसाहित्य : एक स्वतंत्र अभ्यासक्षेत्र, पुणे, १९८५.

२५. व्यवहारे, शरद, लोकसाहित्य : उद्‌गम आणि विकास, नागपूर, १९८७.

लेखिका: तारा भवाळकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate