অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मानवी संस्कृतीच्या विविध अंगांशी पुराणकथांचा संबंध

मानवी संस्कृतीच्या विविध अंगांशी पुराणकथांचा निकटचा संबंध असतो, हे पुढील विवेचनावरून स्पष्ट होईल.पुराणकथा आणि धर्म व संस्कृती : पुराणकथा हे धर्माचे एक महत्त्वाचे अंग असल्यामुळे आणि विशिष्ट समाजाचे धार्मिक विचार हे त्याच्या पुराणकथांतून व्यक्त होत असल्यामुळे, पुराणकथांचा धर्माशी अत्यंत निकटचा संबंध आहे. पुराणकथा स्वतः धर्मभावनेतून जन्मलेल्या असतात आणि त्या धर्मभावनेला पुष्टही करतात. त्याचप्रमाणे, पुराणकथा हा आजपर्यंतच्या विज्ञानयुगपूर्व मानवी संस्कृतीचा एक मूलभूत व अविभाज्य घटक असून त्यांच्या अभ्यासामुळे मानवी संस्कृतीचा इतिहास समजावयास मदत होते. पुराणकथा या त्यांच्या नायक-नायिकांचा इतिहास सांगत नाहीत, तर कथानिर्मात्याच्या मनाचा इतिहास सांगतात, असे म्हटले जाते. कारण ज्यांनी या कथा निर्माण केल्या आणि पिढ्यानपिढ्या जपल्या, त्या लोकांचे आचारविचार, जीवनपद्धती, आशा-आकांशा इ. त्या कथांतून प्रतिबिंबित झाल्या आहेत, असे दिसते. तात्पर्य, एखाद्या समाजाची प्राचीन काळातील सांस्कृतिक अवस्था काय होती, हे त्याच्या पुराणकथांवरून कळते. कला, धर्म, कर्मकांड, यातुक्रिया इत्यादींना उत्तेजन देऊन संस्कृतीला समृद्ध करण्यामध्ये पुराणकथांचा वाटा मोठा असतो. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात सांस्कृतिक एकात्मता निर्माण करण्यामध्ये पुराणकथांचा वाटा फार मोठा आहे.

पुराणकथा व विज्ञान

आधुनिक मानवाप्रमाणेच आदिम मानवाच्या मनातही विश्वाच्या स्वरूपाविषयी जिज्ञासा होती. पाऊस कसा पडतो, ग्रहणे का होतात, जग कोणी निर्माण केले इ. प्रश्नांची उत्तरे शोधण्याची त्या मानवाचीही धडपड चालू होती. सत्याचा शोध घेता घेता त्याने पुराणकथेतून या प्रश्नांना उत्तरे दिली असल्यामुळे पुराणकथा हे आदिम मानवाचे विज्ञान होते, असे एक मत आहे. परंतु आदिम मानवाच्या पुराणकथांना त्याचे विज्ञान मानणे , ही मानवी संस्कृतीच्या अभ्यासातील एक घोडचूक आहे, असे बी. मॅलिनोस्कीने म्हटले आहै. कर्मकांड, श्रद्धा, नैतिक आचरण आणि सामजिक संस्था यांना मान्यतेची सनद प्राप्त करून देणे,  म्हणजेच त्यांच्यासाठी एक पूर्वोदाहरण घालून देणे, हे पुराणकथांचे स्वरूप  असते; प्रश्नांची उत्तरे  वा स्पष्टीकरणे देणे हे त्यांचे उद्दिष्ट नसते; म्हणूनच त्यांची विज्ञानाशी तुलना करता येणार नाही, असे त्याचे मत आहे. पुराणकथांचा धर्माशी असलेला संबंध पाहता त्याच्या मतात बरेचसे तथ्य आहे, हे नाकारता येत नाही. कारण, पुराणकथा व विज्ञान या दोहोंचा प्रवास अत्यंत भिन्न दिशांनी चाललेला असतो. पुराणकथेत एक वैश्विक व अंतिम असे सत्य शाश्वत काळासाठी व्यक्त झाले आहे, असे मानून त्या पुराणकथेतील घटनेत काहीही बदल न करता तिचीच तंतोतंत पुनरावृत्ती करीत रहाणे, हे पुराणकथेत आभिप्रेत असते. याउलट, पूर्वी सापडलेल्या सत्यातील दोष व अपूर्णता दूर करून त्याला सदैव नवे रूप देत जाणे, हे विज्ञानाचे स्वरूप असते. दोहोंतील या भेदामुळेच पुराणकथा या विज्ञानाच्या प्रगतीला खीळ घालू शकतात.

पुराणकथा व तत्त्वज्ञान

पुराणकथा म्हणजे आदिम मानवाचे प्राथमिक तत्त्वज्ञान होते, असेही म्हणता येते. तत्त्वज्ञानात जसा वैश्विक सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न असतो, तसाच पुराणकथांतूनही आढळतो. पुराणकथांतील सत्य हे आध्यात्मिक असते आणि त्यात सत्, असत्, आभासात्मक इ. शब्द आढळत नसले, तरी त्यात शब्दांमागचा आशय मात्र उपस्थित असतोच, असे मीर्शा ईलिआने म्हटले आहे. परंतु हे भारतीय पुराणकथांना लागू नाही. ऋग्वेदात ‘सत्य व अनृत’ वा ‘सत् व असत्’ ही द्वंद्वे याच शब्दांनी सांगितली आहेत. धर्म व तत्त्वज्ञान यांतील बहुसंख्य सिद्धांतावर आधारलेल्या वा त्या सिद्धांतानांच नाट्यरूप देऊन तयार झालेल्या अनेक पुराणकथा असतात. या कथांमुळे त्या सिद्धांताला पुष्टी मिळते आणि ते जनमानसात रूजतात.उदा., पुनर्जन्म, कर्मसिद्धांत, देवक, पाप-पुण्य, पितर, स्वर्ग-नरक, देवासुरांची रूपे, अखेरचा निवाडा इ. विषयांवर असंख्य पुराणकथा निर्माण झाल्याचे आढळते. शिवाय, तत्त्वज्ञानातील हे आणि इतर अनेक सिद्धांत स्वरूपतः पुराणकथात्मकच असतात. उदा., भारतीय वेदान्तात जगाचे कारण म्हणून मानलेले ब्रह्म म्हणजे पुराणकथेतील एक भव्य संकल्पनाच होय.

पुराणकथा व कला

निर्मिती, विषय, अभिव्यक्तीची पद्धत इ. अनेक दृष्टींनी विविध कलांचा व पुराणकथांचा घनिष्ठ संबंध असून  पुराणकथा हे कलांचे अक्षय प्रेरणास्थान आहे. पुराणकथांमुळे कलांची निर्मिती होण्यास मदत झाली आणि उलटपक्षी कलांमुळे पुराणकथांचे अस्तित्व प्रभावी झाले, असे म्हणणे शक्य आहे. पुराणकथा व कला याचा हा संबंध अजूनही पूर्णपणे खंडित झालेला नसून , आजही पुराणकथांचा आशय घेऊन श्रेष्ठ कलाकृती निर्माण होत आहेत. ग्रीक पुराणकथांचा कर्मकांडाशी असलेला संबंध तुटलेला असूनही साहित्यकृती व इतर कलाकृतींमुळे त्या शेकडो वर्षे टिकून राहिल्या आहेत. पुराणकथा प्रारंभीच्या काळात मौखिक परंपरांनी आलेल्या असल्या तरी, त्या काळातही त्यांच्यामध्ये  आनुषंगिक म्हणून का होईना, कथेचे आणि रंजकतेचे तत्त्व होतेच. त्यामुळे पुराणकथांचा प्रथमपासूनच साहित्य़ाशी संबंध होता. होमरची ओडिसी व इलिअड ही महाकाव्ये, भारतातील रामायण, महाभारत ही आर्ष महाकाव्ये, कालिदासाचे रघुवंश, भारवीचे किरातार्जुनीय इत्यादींवरून पुराणकथा व साहित्य यांचा संबंध किती निकटचा होता, हे दिसून येते. महाकाव्यातील नायकनायिकांच्या चरित्रांत पुराणकथांतील देवदेवींची प्रतिबिंबे आढळतात, यावरूनही हा संबंध स्पष्ट होतो.

कल्पनाविलास, प्रतीकात्मकता ,सूचकता, अतिशोयक्ती इ. तत्त्वे काव्य व पुराणकथा या दोहोंतही असल्यामुळे दोहोंचा संबंध घनिष्ठ असल्याचे स्पष्ट होते. नाट्यकलेवर विषय आणि तो सादर करण्याची पद्धत या दोन्ही दृष्टींनी पुराणकथांचा फार मोठा प्रभाव होता. टेओडोर गास्टर या अमेरिकन विचारवंताने पूर्व भूमध्य समुद्रालगतच्या देशांतील प्राचीन संस्कृतींचा अभ्यास करून पुराणकथा व कर्मकांड यांच्या संबंधातून नाटक निर्माण झाले, असे मत मांडले आहे. प्राचीन काळी देवांनी स्वर्गात जी कृत्ये केली, ती नाट्याच्या रूपाने पृथ्वीवर दाखविण्याच्या प्रयत्नातून प्रारंभीची नाट्यकला निर्माण झाली, असे दिसते. ग्रीक शोकांतिका, जपानमधील ‘नो’ नाटके व जावामधील ‘वायांग’ नाटके ही पुराणकथांतूनच निर्माण झाली.  भारतातील भास, कालिदास इत्यादींच्या नाटकांचे विषय व वातावरण पुराणकथांशी संबद्ध होते. विशिष्ट घटना नाट्यात्मक शैलीत मांडण्याच्या पद्धतीमुळेही पुराणकथांचा नाट्याकलेशी संबंध  येतो.

नृत्यकलेचा प्रारंभ शंकर, पार्वती इ. देवतांपासून झाला, या अर्थाच्या हिंदू पुराणकथा असून आदिम मानव कर्मकांडाच्या वा समारंभाच्या प्रसंगी केल्या जाणार्‍या नृत्यांतून पुराणकथांचाच आशय व्यक्त  करीत असे. इंद्राने पाऊस पाडावा म्हणून जेव्हा यज्ञ केला जाई, तेव्हा कुमारिका डोक्यावर घट घेऊन अग्नीभोवती नृत्य करीत असत. पशूंचे चर्म वा मुखवटे धारण करून जी नृत्ये केली जातात, त्यांतून पुराणकथांतील वातावरणाची निर्मिती केली जाते. संगीताचा नृत्याशी असलेला संबंध, ऑपेरासारख्या संगीतप्रकारातून असलेले पुराणकथात्मक विषय, यक्षगंधर्वादींचे संगीतप्रेम इ. मार्गांनी संगीत हे पुराणकथांशी निगडित असते.  स्थापत्यकला, शिल्पकला, मूर्तिकला, चित्रकला, वास्तुकला इत्यादींची समृद्धी तर  पुराणकथात्मक विषयांमुळेच झाली आहे. इतकेच नव्हे, तर पुराणकथांच्या अध्ययनाखेरीज या कलांचे अध्ययनच पूर्ण होऊ शकत नाही. इमारतीचा पाया खोदताना तो पृथ्वी धारण करणार्‍या शेषादींच्या मस्तकावर आणण्याचा प्रयत्न करणे वा स्वर्गीय मंदिराची प्रतिकृती म्हणून पृथ्वीवर मंदिर तयार करणे इ. असंख्य प्रकार पुराणकथा व उपरिनिर्दिष्ट कला यांचा संबंध दर्शविणारे आहेत.

पुराणकथा व समाजशास्त्र

पुराणकथांचा अभ्यास करताना त्यांचा सामजिक संदर्भ अत्यंत महत्त्वाचा असतो आणि पुराणकथा म्हणजे अस्तित्वात असलेल्या सामाजिक संस्थांच्या दृष्टीने मान्यतेची सनदच असते, असे बी. मॅलिनोस्कीने म्हटले आहे. भाषा, विज्ञान, धर्म इत्यादींचा आणि समाजाचा जसा परस्परसंबंध असतो, तसाच पुराणकथांचा व समाजाचाही निकटचा संबंध असतो. पुराणकथांचा समाजरचनेवर परिणाम होतो, तर समाजव्यवस्थेचे प्रतिबिंब पुराणकथांतून दिसू शकते. पुराणकथांच्या प्रभावाने मानवाच्या मनात विशिष्ट श्रद्धा निर्माण होतात आणि त्यातूनच तो विविध कृती करतो.  उदा., मानवामध्ये व्रतांचे आचरण करण्याची व निषिद्ध कृत्ये वर्ज्य करण्याची प्रवृत्ती दृढमूल होण्यास पुराणकथांचे साहाय्य होते.

पुराणकथांचे सामर्थ्य जसे त्यांच्या धार्मिक गूढतेत असते, तसेच विविध सामाजिक संस्था, कला, आर्थिक व्यवहार इत्यादींवर होणार्‍या त्यांच्या परिणामातही असते. शिकार, पशुपालन, कृषी, मद्यपान, स्त्रियांचा दर्जा, नरमांसभक्षणप्रथा, कर्मकांड, यातुक्रिया, ,नीतिकल्पना, आशाआकांक्षा, पितृपूजा , राजा-प्रजादींचे परस्परसंबंध आणि अनेक प्रकारच्या चालीरीती, रूढी व परंपरा यांचे ज्ञान पुराणकथांवरून होते, उदा., हिंदू समाजातील अत्यंत महत्त्वाची अशी जी वर्णव्यवस्था, ती पुरुषसूक्तातील पुराणकथेशी निगडित आहे. मानवशास्त्राच्या अभ्यासाखेरीज पुराणकथांचा अभ्यास निष्फळ आहे, असे जे क्लोद लेव्ही-स्ट्रोउसने म्हटले आहे, तेही महत्त्वाचे आहे.

पुराणकथा व इतिहास

इतिहास (विशेषतः प्राचीन इतिहास) आणि पुराणकथा या दोहोंमध्ये भूतकालीन घटनांचे निवेदन  असल्यामुळे त्या दोहोंचे वेगळेपण  दाखविणे अवघड असते. शिवाय इतिहासाच्या अभ्यासकांना इतिहास जितका सत्य वाटतो, तितक्याच, किंबहुना त्याहून अधिक प्रमाणात श्रद्धाळू लोकांना पुराणकथांची सत्यता पटत असल्यामुळेही काही अडचणी निर्माण होतात. अर्थात अभ्यासकांच्या दृष्टीने इतिहासात वास्तवाचे व पुराणकथेत कल्पिताचे दर्शन घडते, हा फरक असतोच. शिवाय, भूतकाळातील घटनांचे अचूक ज्ञान प्राप्त करणे, हा इतिहासाचा उद्देश असतो, तर पूर्वोदाहरणानुसार कर्म करणे हा पुराणकथांचा उद्देश असतो. ज्ञान हा त्यांचा उद्देश नसतो. मानवजातीने दीर्घकाळपर्यंत इतिहासाविना आपला प्रवास केला आहे; परंतु तिने पुराणकथांची सोबत मात्र नेहमीच घेतली आहे. असे असले, तरी व्यवहारात भूतकाळातील घटनांची अचूक वास्तवता निश्चित करणे, हे अवघड असते. कारण, एकीकडे अलौकिकतेमुळे काही  ऐतिहासिक घटनांना व अलेक्झांडर, कृष्ण इ. पुरुषांच्या जीवनांना पुराणकथांचा रंग प्राप्त होतो, तर दुसरीकडे देवविषयक काही कल्पित पुराणकथा समाजात इतक्या जिवंतपणे रूजलेल्या असतात, की त्या कथा म्हणजे वीरांची ऐतिहासिक चरित्रे, असे वाटू लागते.

काही वेळा एकाच घटनेच्या निवेदनात इतिहास व पुराणकथा यांचे मिश्रण झालेले दिसते. ऐतिहासिक घटनांचे पुराणकथांत रूपांतर होताना कोणत्या प्रक्रिया घडतात, याविषयी मीर्शा ईलिआने केलेले विवेचन महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते कोणतीही ऐतिहासिक घटना दीर्घकाळापर्यंत जशीच्या तशी लोकांच्या स्मरणात राहू शकत नाही. त्यांच्यापुढे ईश्वर, पूर्वज वा एखादा वीर यांनी प्राचीन काळात केलेल्या महकृत्यांचे आदर्श वा मूलबंध (आर्किटाइप्स) असतात. लोक हळूहळू ऐतिहासिक घटनेचा प्रवाह त्या मूलबंधाशी एकरूप करून टाकतात. मग ता वीरपुरुष वा त्याचे महत्कृत्य स्वतःच्या ऐतिहासिक स्वरूपात शिल्ल्क न राहता, त्या मूलबंधाशी सुसंगत अशी व्यक्ती वा घटना बनून लोकांच्या स्मरणात राहते. कृष्णाला वा शिवाजीला मानव न मानता विष्णूचा वा शिवाचा अवतार मानण्यात हीच प्रवृत्ती दिसते,  असे म्हणता येईल.

सर्व पुराणकथांचे मूळ ऐतिहासिक घटनांमध्ये असते, असे मत इ.स.पू. ३०० च्या सुमारास होऊन गेलेल्या यूहेमरस या ग्रीक विद्वानाने मांडले होते. मूळचे मानव असलेले झ्यूस वगैरे लोक आपल्या  महत्कृत्यामुळे देव मानले गेले, संस्कृतीला उत्तेजन देणारा झ्यूस हा राजा, क्रीट येथे मरण पावल्यावर तेथे त्याची कबर बांधलेली आढळते. प्रॉमीथिअस मातीतून स्त्री-पुरुष निर्माण करीत होता, याचा अर्थ तो प्रत्यक्षात मातीच्या मूर्ती तयार करीत होता इ. विचार त्याने व त्याच्या अनुयायांनी मांडले होते. आधुनिक काळात हर्बर्ट स्पेन्सरने या मताला काहीशी प्रतिष्ठा मिळवून दिली; तथापि हे मत आता मागे पडले आहे. त्याच्या आधी काही काळ ईजिप्तमधील  हेकॅटेउसने क्रोनस, रीया, झ्यूस, हेरा या ग्रीक

देवता आणि इसिस व ओसायरिस या ईजिप्ती देवता मूळच्या मानव असल्याचे मानले होते.

भारतातही वैदिक देवतांचे स्वरूप स्पष्ट करताना ‘वृत्र हा त्वष्ट्याच्या पुत्र होता’, अशा पद्धतीने विवेचन करणारे ऐतिहासिक होते, असे निरुक्तात म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र, पुराणकथांना इतिहास मानल्यामुळे पुराणकथा व इतिहास दोहोंपैकी कशाचेच यथार्थ ज्ञान होत नाही. तसेच, एका व्यक्तीला जो पवित्र इतिहास वाटतो, ती दुसर्‍याला कल्पित कथा वाटण्याची शक्य़ता असल्यामुळे पुराणकथेला इतिहास व इतिहासाला पुराणकथा म्हटले जाण्याचा धोका संभवतो.

पुराणकथा व मानसशास्त्र

 

कार्ल युंग या स्विस मानसशास्त्रज्ञाच्या मते पुराणकथांतील सत्य हे मानसशास्त्रीय असते. त्याच्या मते पुराणकथा म्हणजे मनाचे स्वरूप स्पष्ट करणारा विशिष्ट आविष्कार होय. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, चंद्राच्या कला, सूर्योदय , सूर्यास्त इ. निसर्ग घटनांविषयीच्या पुराणकथा या त्या निसर्गघटनांचे स्पष्टीकरण करण्यार्‍या नसतात, तर त्या कथा मानवाच्या अबोध अंतर्मनात चाललेल्या नाट्याचे प्रतीकात्मक आविष्कार असतात; म्हणजेच, मानवी भावनांचे निसर्गघटनांवर प्रक्षेपण झालेले असते किंवा त्या निसर्गघटनांत मानवी भावना प्रतिबिंबित झालेल्या असतात. त्याच्या मते, आदिम मानवाचे मन पुराणकथा निर्माण करीत नव्हते, तर ते पुराणकथा जगत होते. पुराणकथा हे आदिम जमातींचे भावनिक जीवनच होय. त्या  जीवनाला पुराणकथांचा मिळणारा वारसा नाहीसा झाला,तर ते जीवन नष्ट होऊन जाते. सिग्मंड फ्रॉइडच्या आधीचे अभ्यासक पुराणकथांच्या सांस्कृतिक इतिहासाला महत्त्व देत होते; परंतु फ्रॉइडने या अभ्यासात मानवाच्या जैविक रचनेला महत्त्व दिले.

मनोविश्लेषण करणारा शास्त्रज्ञ रूग्णांच्या स्वप्नांचा उलगडा करताना ज्याप्रमाणे अनुभवांची पुन्हा रचना करतो, त्याप्रमाणेच पुराणकथांच्या अभ्यासकाला अनुभवांची पुन्हा रचना करावी लागते, असे त्याने मानले होते. त्याच्या मते रुग्णांच्या स्वप्नांवरून त्यांच्या दडपलेल्या परंतु अत्यंत महत्त्वाच्या अशा लहानपणीच्या अनुभवांची पुन्हा रचना करताना ज्याप्रमाणे मूळ अनुभवात विपर्यास झाल्याचे आढळून येते, त्याप्रमाणेच ऐतिहासिक घटनांतून पुराणकथा तयार होताना मूळ घटनांत विपर्यास झाल्याचे आढळते. तसेच,त्याच्या मते कोणत्याही पुराणकथेच्या आशयावरून आपण अंतिम सत्याकडे जाऊ शकतो. उदा., ग्रीक पुराणकथेनुसार ऑलिंपस पर्वतावर असलेले झ्यूसचे निवासस्थान, ही सत्य घटना आहे, असे नव्हे. परंतु झ्यूस व हेरा यांच्या कथेवरून ग्रीकांना काय व्हावे असे वाटत होते, त्यांना कोणत्या गोष्टीविषयी निराशा वाटत होती आणि ते झ्यूसच्या प्रतिमेत कशाचे प्रक्षेपण करीत असत, यांचा अभ्यास करता येतो. लूत्स्यान लेव्ही ब्र्‍यूल या फ्रेंच तत्त्ववेत्त्याने पुराणकथांचा संबंध तर्कपूर्व मनःस्थितीशी (प्रिलॉजिकल मेंटॅलिटी) जोडला आहे.

मनोविश्लेषणाच्या आधारे पुराणकथांतून काही सत्ये स्पष्ट होतात, हे थीओडोर राइकने स्पष्ट केले आहे. उदा., बायबलच्या ‘जुन्या करारा’तील आदमच्या बरगड्यांपासून ईव्हची निर्मिती झाली, ही कथा स्त्रीला पुरुषापेक्षा कमी लेखले जात असल्याची द्योतक आहे.

पुराणकथा व भाषा

पुराणकथांची निर्मिती व अभ्यास यांमध्ये भाषेचाही मोठा वाटा असतो. उदा., भाषेच्या व्याकरणानुसार शब्दांना असलेल्या लिंगांचा पुराणकथांतील देवादिकांच्या  स्वरूपावर प्रभाव पडतो. कारण, पदार्थाचे मानवीकरण व दैवतीकरण करताना व्याकरणातील लिंगाचा विचार करावाच लागतो. ज्या लोकांनी सूर्याला पुरुष मानले त्यांच्या भाषेत सूर्य या अर्थाचा शब्द पुल्लिंगी होता आणि ज्यांनी सूर्याला स्त्री मानले त्यांच्या भाषेत तो शब्द स्त्रीलिंगी होता, असे दिसते. देवादिकांची नावे आणि पुराणकथांतील इतर शब्दांच्या  व्युत्पत्तींवरून पुराणकथांचे मूळ आणि स्वरूप समजायला मदत होते. पुराणकथा व भाषा ही दोन्ही विशिष्ट आशयाचे निवेदन करणारी संदेशवहनाची साधने असल्यामुळेही त्यांचा निकटचा संबंध आहे. तुलनात्मक भाषाशास्त्रातून तुलनात्मक पुराणकथाविद्येचा जन्म झालेला आहे. माक्स म्यूलरच्या मते संस्कृतमध्ये प्रारंभी सूर्य, पर्जन्य, उषा इ. शब्द होते. परंतु पुढे ती भाषा रोगयुक्त बनून या शब्दांचे मूळचे अर्थ विस्मृत झाले आणि ते शब्द देवतावाचक मानून त्यांच्याभोवती पुराणकथा गुंफण्यात आल्या. म्हणून त्याच्या मते पुराणकथा म्हणजे भाषेचा रोग होय.

पुराणकथा व साहित्यप्रकार

इतर साहित्यिक कथांप्रमाणेच पुराणकथांतही कथानक, व्यक्तिचित्रण, मनोरंजन इ.वाङ्‌मयीन तत्त्वांना स्थान असते. पुराणकथांमध्ये असे तत्त्व असल्यामुळेच त्यांतून विविध प्रकारच्या ललित साहित्याला प्रेरणा मिळते. परंतु या दोन प्रकारच्या कथांमध्ये आढळणारे हे साम्य वरवरचे व गौण असून त्यांमध्ये असणारे भेद मात्र अत्यंत मूलगामी व महत्त्वाचे आहेत. पुराणकथा पवित्र मानल्या जात असल्यामुळे स्त्रिया , मुले इ. अदीक्षितांना त्या सांगितल्या जात नाहीत. एवढेच नव्हे, तर त्यांच्या उपस्थितीत त्या दीक्षित व पात्र व्यक्तींनाही सांगितल्या जात नाहीत. त्या विधिपूर्वक व विशिष्ट प्रसंगीच सांगितल्या जातात. इतर कथा मात्र पवित्र मानल्या जात नसल्यामुळे त्या केव्हाही व कोणालाही सांगितल्या जातात.

पुराणकथांच्या बाबतीतील निषिद्धे त्यांना लागू पडत नाहीत. पुराणकथा सांगणारे व ऐकणारे लोक त्या कथांना अंतिम सत्य म्हणून स्वीकारतात; याउलट इतर कथांच्या बाबतीत मात्र त्या कल्पनेने निर्मिलेल्या असत्य कथा आहेत, याची जाणीव असते. एखादी कथा आनंददायक असूनही जर जी कल्पित आहे असे जाणवत असेल, तर ती पुराणकथा ठरत नाही. उदा., पंचतंत्र, हितोपदेश, इसापच्या कथा, अरबी भाषेतील सुरस गोष्टी इ. पुराणकथा नव्हेत. पुराणकथा कर्मकाडांशी निगडित असतात, इतर कथांचा कर्मकाडांशी संबंध नसतो. पुराणकथांत मनोरंजन असले, तरी ते आनुषंगिक व गौण तत्त्व असते. इतर कथांत मात्र त्यालाच प्राधान्य असते. पुराणकथांना जशी एक अधिकृतता असते, तशी ती इतर कथांना नसते.

पुराणकथा व लोककथा यांचे विषय अनेकदा एकच असतात. दोन्ही कथा परंपरागत असतात; परंतु दोहोंपैकी कोणाची निर्मिती आधी झाली आणि कोणी कोणाच्या विषयांची उसनवारी केली, हे ठरविणे अवघड असते. दोहोंतील सीमारेषा आखणेही अवघड असते. काही लोककथा म्हणजे तयार होत असलेल्या पुराणकथा असतात, तर काही लोककथा या भग्न पुराणकथांचे अवशेष असतात. पुराणकथा व परीकथा या दोहोंत असामान्य घटना व व्यक्ती यांचे वर्णन असते. परंतु पुराणकथेची सुरुवात ‘विश्वाच्या प्रारंभी’ अशा शब्दांत होत असल्यामुळे ती मानवी अनुभवकक्षेत न येणार्‍या प्राचीन काळातील घटनांचे वर्णन करीत असते. परीकथेची सुरुवात मात्र ‘एकदा’ या शब्दात होत असल्यामुळे ती इतक्या प्राचीन घटनांचे वर्णन करत नाही.

पुराणकथांतील पात्रे व घटना घेऊन मनोरंजनार्थ परीकथा तयार केल्या गेल्या असण्याची शक्यता आहे. बोधकथांप्रमाणे पुराणकथांमधूनही संदेश मिळू शकतो; परंतु बोधकथा सत्य मानल्या जात नाहीत. उदा. इसापच्या बोधकथा कल्पित आहे, याची जाणीव असते. वीरगाथा वा ‘सागा’ या पुराणकथांप्रमाणेच सत्यकथन करण्याचा प्रयत्न करतात. वारगाथांतील घटनांचे स्थलकाल निश्चित असतात. महाकाव्य आणि आख्यायिका यांतील घटनांचा काळही निश्चित असतो. पुराणकथांतील घटनांच्या बाबतीत मात्र तसे आढळत नाही.एखाद्या दीर्घ व अनेकदा सांगितल्या गेलेल्या कथेत सर्व कथातत्त्वांचे मिश्रण झाल्याचेही आढळू शकते.

संदर्भ  : 1 Aldington, Richard; Ames, Delano; Trans. New Larousse Encyclopaedia of Mythology, Mythology, London, 1975.

2.Bolle, K. W. The Freedom of Man in Myth,Mashhville, Tenn. 1968.

3. Campbell, y3wuoeph, The Masks of God, 4 Vols. London,1959-68.

4. Dandekar, R.N.Vedic Religion and Mythology, Poona, 1965.

5 Dent, J. M ;Dutton, E. p. Everyman’s Dictionary of Non- Classical Mythology, New York, 1952.

6. Eliade,Micera; Trans. Myth and Reality, New York,1963.

7. Frazer,J.G.The Golden Bough, New York, 1922

8. Gray, L. H. Ed. The Mythology of all  Races, 13 Vols., Boston 1925-36.

9. Hackin ,J.; Huart Clement & other, trans , Atkinson, F, M, Asiatic mythology, London, 1967.

10. Hooke, S.H. Ed. Myth and Ritual, New York, 1933.

11. Ions, Veronica, Indian Mythology, London, 1967.

12. James, e.o Prehistoric, Religions London, 1957.

13. Jensen, a,e Trans. Myth and Cult among Primitive Peoples, New York, 1963.

14.  Jung, C.G. Kerenyi, K. Trans. Essays on a Science of Mythology, New York, 1950.

15.  Kramer, S.H. Ed ,Mythologies of the Ancient World , Creation, New York 1961.

16. Long C.H.Alpha : The Myths of Cretion, new York, 1963.

17. Malinowaski, Bronislaw Magic, Science and Religion and other Essays, Bosyon, 1948.

18. Malinoyaski Bronislaw Sex, Culture and Myth  ,London 1963.

19. Middleton, John, Myth and Cosmos: Readings in Mythology and Symbolism New York, 1967.

20. Picard, B.L Ed. The Enclcopadia of Myth & Lagends of All Nations, London 1962.

21. Savill, Sheila Ed. Barker Mary: Cook, Christopher Pears Encyclopaedia of Myth and Lagends, 4. Vols., London, 1976-78.

लेखक: आ. इ. साळुंखे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate