অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मालविकाग्नि मित्र

मालविकाग्नि मित्र

कविकुलगुरू कालिदासकृत सुखात्म संस्कृत नाटक, त्याचे पाच अंक आहेत. ह्या नाटकाचा रचनेचा काळ निश्चित सांगता येत नसला, तरी कालिदासाचे हे पहिले, त्याने आपल्या तरूण वयात लिहिलेले, नाटक असावे, असे सामान्यतः मानले जाते.

ह्या नाटकाचे संविधानक थोडक्यात असे : विदिशेचा राजा अग्निमित्र ह्याच्या धारिणीनामक राणीकडे, वीरसेन नावाच्या तिच्या भावाने, मालविका नावाची एक तरूण, सुंदर मुलगी भेट म्हणून पाठविलेली असते. धारिणीच्या परिवारासमवेत काढलेले मालविकेचे चित्र पाहून राजाला तिच्या प्रत्यक्ष दर्शनाची ओढ लागते; परंतु धारिणी मात्र मालविका राजाच्या दृष्टीस पडू नये, म्हणून काळजी घेत असते. राजाला मदत करण्यासाठी विदूषक गौतम एक युक्ती योजितो : धारिणीचा आश्रित गणदास ह्याच्याकडे मालविका नृत्यगायन शिकत असते आणि राजाचा आश्रित हरदत्त हा राजाची धाकटी राणी इरावती हिला त्याच शास्त्रांचे धडे देत असतो. गणदास व हरदत्त ह्या दोन नाट्याचार्यात विदूषक भांडण लावून देतो. उभयतांत श्रेष्ठ कोण, ह्याचा निर्णय करण्यासाठी दोघांनीही आपापल्या शिष्यांची कला सादर करून परीक्षा घ्यावी, असे ठरते. त्या निमित्ताने राजाला मालविकेला प्रत्यक्ष पाहता येते. राजा आणि मालविका परस्परांवर अनुरक्त होतात. राणी इरावतीच्याही हे लक्षात येते. ती धारिणीकडे ह्याबाबत तक्रार करते. धारिणी मालविकेला आणि तिला मदत करणारी तिची सखी बकुलावालिका हिला एका तळघरात डांबते; परंतु धारिणी राणीची सर्पमुद्रांकित अंगठी युक्तीने मिळवून तिच्या आधारे विदूषक त्या दोघींची मुक्तता करतो. नंतर विदूषक राजाची आणि मालविकेची गाठ घालून देतो. ही भेट चालू असताना, बाहेर, एका शिलातलावर बसलेल्या विदूषकाला झोप लागते आणि झोपेत तो काही बरळल्यामुळे इरावतीला सर्व प्रकार कळून चुकतो. राजावर नामुष्कीचा प्रसंग येतो; परंतु एका वानराने राजकन्या वसुमती (धारिणीची लहान मुलगी) हिला भिवविल्याची वार्ता येते व तिला धीर देण्यासाठी म्हणून राजा तेथून निघून जातो. मध्यंतरी प्रमदवनातील सुवर्णाशोकाला फुलांचा बहर यावा, म्हणून त्यावर लत्ताप्रहार करण्यासाठी धारिणीने-तिचा स्वताःचा पाय दुखावला असल्यामुळे मालविकेला पाठविलेले असते आणि पाच रात्रींच्या आत तो वृक्ष बहरल्यास तुझी इच्छा मी पूर्ण करीन, असे वचनही तिला दिलेले असते. नाटकाच्या अखेरच्या अंकात, त्या सुवर्णाशोकाला फुले आल्यामुळे धारिणीने राजाच्या व मालविकेच्या विवाहाला संमती दिल्याचे दाखविले आहे. विदर्भ देशाचा राजा यज्ञसेन ह्याच्या चुलतभावाची–माधवसेनाची- मालविका ही बहीण असल्याचेही उघड होते.

ह्या नाटकात विदर्भ देशाचा राजा यज्ञसेन आणि त्याचा चुलतभाऊ माधवसेन ह्यांच्यातील विदर्भाच्या गादीसंबंधीचा कलह, यज्ञसेनाने माधवसेनाला कैदेत टाकणे, त्यावरून अग्निमित्राने विदर्भावर स्वारी करण्याचा आपल्या सेनापतीला हुकूम देणे, विदर्भाधिपतीचा पराभव, नंतर विदर्भाचे दोन भाग पाडून यज्ञसेन आणि माधवसेन ह्यांना एकेक भाग देणे, आग्निमित्र आणि धारिणी ह्यांचा पुत्र वसुमित्र ह्याने अश्वमेध यज्ञाचा घोडा अडवणाऱ्या यवनांना पराभूत करणे इ. घटना पार्श्वभूमीसारख्या आलेल्या आहेत.

कालिदासाच्या ह्या नाटकाचा नायक ऐतिहासिक आहे. शेवटच्या मौर्य सम्राटाला ठार मारून त्याच्या गादीवर बसणारा त्याचा सेनापती पुष्पमित्र ह्याचा अग्निमित्र हा पुत्र. सेनापती पुष्पमित्राने अश्वमेधयज्ञ केला होता. वसुमित्राने यवनांचा केलेला पाडाव, विदर्भाच्या राजाचा पराजय, त्याच्या राज्याची वाटणी, त्याच्या घराण्यातील राजकन्येशी अग्निमित्राचा विवाह होणे, ह्या घटना ऐतिहासिक दिसतात. नाटकासाठी आवश्यक त्या ऐतिहासिक घटनांची माहिती कालिदासाला काही पद्यमय प्रबंधांवरून झाली असणे शक्य आहे. ऐतिहासिक घटनांचे वर्णन करणारे पद्यमय प्रबंध भारतात प्राचीन कळापासून रचिले जात होते.

ह्या नाटकाचे संविधानक थोडे गुंतागुंतीचे असले, तरी त्याची मांडणी कालिदासाचे नेटकेपणाने केलेली आहे. शृंगार हा नाटकातला मुख्य रस आहे. वैचित्र्यपूर्ण प्रसंग निर्माण करून नाटकाची रंगत वाढवीत नेलेली आहे. नाटकातील घटनांचा काळ अल्प–म्हणजे ७–८ दिवसांचाच असल्यामुळे त्यातील व्यक्तिरेखांच्या विकासाला फारसा अवकाश मिळालेला नाही. ह्या नाटकातील विदूषक अत्यंत चतुर, मुत्सद्दी आणि कालिदासाच्या अन्य नाटकांतील विदूषकांपेक्षा वेगळा आहे. नाटकांतील घटनांवर त्याचा प्रभाव स्पष्टपणे पडलेला आहे.

संदर्भ : १. कंगले, र. पं. कालिदासाची नाटके, मुंबई, १९५७.

२. मिराशी, वा. वि. कालिदास, मुंबई, १९७५.

लेखक: गो. ह. जोशी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate