অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मुक्तक

मुक्तक

एकश्लोकी स्वतंत्र रचना म्हणजे मुक्तक. दंडी, विश्वनाथ ह्या साहित्यशास्त्रकारांनी तसेच अग्निपुराण ह्या ग्रंथात मुक्तक ही संज्ञा  योजण्यात आली आहे, तर भामह, वामन, हेमचंद्र यांनी 'अनिबद्ध काव्य' ही संज्ञा वापरली आहे. दंडी मुक्तकादींना 'सर्गबन्धांशरूप' मानतो (काव्यदर्श १·१३). भामहाला ही रचना 'वक्रस्वभावोक्तियुक्त' कविप्रतिभेने स्फुरलेली, विदग्ध वाणीने प्रकटलेली अशी अभिप्रेत आहे (काव्यालङ्‌कार १·३०). अग्निपुराणातील व्याख्येप्रमाणे (३३७–३६) मुक्तक 'चमत्कारक्षम' आहे. या कल्पनांचा आशय असा की, मुक्तक एकश्लोकी असले, तरी काव्यत्वात उणे नसते.

दीर्घ काव्यातील विस्तार, घटनासंगती किंवा कथाप्राधान्य मुक्तकामध्ये अभिप्रेत नाही. एखादी काव्यकल्पना, मनोभाव किंवा चमकदार विचार मुक्तकात येतो आणि तोही दोन किंवा चार ओळींच्या पद्यात. मुक्तक एकश्लोकी खरे; पण ते अपुरे नसते. अत्यंत मर्यादित स्वरूपातही मुक्तकातील विचार किंवा भाव स्वयंपूर्ण असतो. अनेक आकृती आणि रंग वापरून भरगच्च रंगविलेला चित्रफलक आणि कुंचल्याच्या चार दोन कुशल फटकाऱ्यांनी सजीव केलेली रेखाकृती, या दोहोंत जो फरक तोच महाकाव्य आणि मुक्तक यांत आहे. मुक्तक लघुचित्रासारखे (मिनिॲचर पेटिंग) आहे. विचार किंवा भावप्रतिमा येथे मोजक्या शब्दांत आणि ओळींत प्रकट झालेली असते.

ब्राह्मणग्रंथातील गाथा, प्राकृत वाङ्‌मयातील वज्‍जा (व्रज्या) परंपरेने चालत आलेली सूक्ती-सुभाषिते इ. मुक्तकरचनेची प्राचीन उदाहरणे होत. महाकाव्यांत आणि नाटकांतही अशा स्वयंपूर्ण श्लोकांचा आढळ होतोच. मुक्तकांची रचना स्वतंत्रपणे होणे काव्यप्रपंचात स्वाभाविक आहे. अशा रचनेचे शतकरूप किंवा स्तोत्ररूप संग्रह हे मुक्तकांचे ग्रांथिक रूप.

सुट्या मुक्तकाचे एक भावपूर्ण उदाहरण म्हणजे रात्री कमलकोषात अडकलेल्या भ्रमराचे स्वप्न आणि त्याचा दारुण अन्त. गाहा सत्तसई आणि आर्यासप्तशती यांत ग्रामीण आणि नागर प्रणयभावनेची अनेक स्वयंपूर्ण चित्रे आहेत, तर भर्तृहरीची शतके विचारने नटलेली आहेत. या रचना दीर्घ असल्या, तरी मुळात एकेक श्लोक स्वयंपूर्ण असल्याने त्या मुक्तकातच मोडतात. कविस्पर्शाने मुक्तकाला केवढी काव्यात्मकता येऊ शकते ते अमरूशतकांवरून दिसते. आनंदवर्धनाने निर्वाळा दिला आहे, की अमरूच्या मुक्तकाला प्रबन्धाची योग्यता आहे.

लेखक: गो. के. भट

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate