অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विनोद

विनोद

हास्यामध्ये पर्यवसित होणाऱ्या जीवनविषयक सुखात्म जाणिवेची प्रतीती देणारा धर्म म्हणजे विनोद असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. विनोदाला समानार्थी ‘ह्यूमर’ हा इंग्रजी शब्द मुळात लॅटिन असून त्याचा अर्थ आर्द्रता वा द्रव असा होतो. संस्कृत ‘विनोद’ या संज्ञेची फोड ‘वि+नुद्’ (आनंद देणे. रिझवणे; किंवा घालवणे, दूर करणे म्हणजे दुःख, निराशा इ. घालवणे) अशी केली जाते. विनोदाच्या अर्थाने ह्यूमर ही संज्ञा प्रथमतः अठराव्या शतकात वापरात आली. तुच्छता, निंदाव्यंजकता वा टवाळखोरपणा ह्यांहून वेगळा असा प्रसन्न, आनंददायी. भावरूपात्मक विनोद ‘ह्यूमर’ या संज्ञेने सूचित केला गेला.

विनोद हा जसा साहित्यातून आविष्कृत होतो, तसाच तो चित्रातून दृश्यरूपाने प्रकटतो; नाटकामधून अभिनीत होतो; सर्कशीतून, तमाशातून कृतिरूपाने प्रकट होतो. विनोद हा केवळ कलाप्रकारातूनच प्रकट होतो असे नव्हे; तर प्रत्यक्ष जीवनातही घडत असतो व तो साधारणतःसर्वांना प्रिय व आस्वाद्य वाटतो. विनोदाला प्रत्यक्ष जीवनामध्ये स्थान असल्यामुळे विनोदाचा विचार केवळ साहित्याचा वा कलाविष्काराचा भाग म्हणून न होता, जीवनानुभवाच्याही अंगाने होणे स्वाभाविक आहे. अनेक कलाप्रकारांशी निगडित असलेल्या आणि प्रत्यक्ष जीवनातही सातत्याने प्रकटणार्याअ विनोदाचा विचार बराच गुंतागुंतीचा ठरतो. विनोदाची निर्मिती कशी होते, हे सांगणाऱ्याउपपत्ती जशा जीवनाच्या अनुषंगाने मांडल्या जातात, तशाच त्या कलेच्या अनुरोधानेही मांडल्या जातात. शब्द या माध्यमाचा उपयोग करून वाङ्मयातून प्रकट होणारा विनोद स्वाभाविकपणे विविध रूपे धारण करून प्रकट होतो. म्हणून वाङ्मयीन विनोदाच्या विचाराला महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. विनोद या संकल्पनेचे स्वरूप ध्यानात येण्यासाठी विनोदाची निर्मिती का व कशी होते, हे सांगणाऱ्याउपपत्तींचा परामर्श घेणे उपयुक्त ठरते. विनोदाची संकल्पना ही गुंतागुंतीची असल्यामुळे तिचे स्वरूप विशद करण्याच्या दृष्टीने प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेकविध नवनवीन उपपत्ती तत्त्वज्ञ, मानसशास्त्रज्ञ, प्रतिभावंत लेखक, समीक्षक आदींनी मांडलेल्या आहेत. ह्या उपपत्ती विनोदाच्या स्वरूपावर काही एक प्रकाश टाकत असल्याने, त्यांचा परामर्श घेऊन विनोदाचे स्वरूप उलघडता येईल.

विनोदाची निर्मिती कशी होते याबद्दल काही उपपत्ती आशयाला महत्त्व देऊन, तर काही उपपत्ती अभिव्यक्तिवैशिष्ट्याला अथवा तंत्रविशेषांना महत्त्व देऊन मांडल्या गेल्या आहेत. आशयाला महत्त्व देऊन मांडल्या गेलेल्या बहुतेक उपपत्ती ह्या व्यंगकल्पना, आक्रमणकल्पना व क्रीडावृत्ती ह्या कल्पनांच्या अनुरोधाने मांडल्या गेल्या आहेत. ह्या उपपत्ती विनोदाच्या निर्मितिप्रक्रियेवर व स्वरूपावर कितपत यथार्थ प्रकाश टाकतात, हे पाहता येईल.

कोणतीही साहित्यकृती अपरिहार्यपणे मानवी जीवनातील अनुभवाचे चित्रण करीत असते. साहित्यातून आविष्कृत होणारा हा जीवनानुभव म्हणजेच कलाकृतीचा आशय होय. अनुभवाच्या मूलभूत स्वरूपावरून वाङ्मयकृतीत चित्रित होणाऱ्या अनुभवांचे शोकात्म आणि सुखात्म असे दोन प्रकार पडतात व ते वाचकांच्या ठिकाणी शोकात्म वा सुखात्म स्वरूपाची जाणीव निर्माण करतात. काही अनुभव संमिश्र असतील, काही अनुभव एकच एक विशिष्ट भावनिक परिणाम साधत नसतील, तरीही शोकात्म आणि सुखात्म असे जावनाविषयक अनुभवाचे दोन मूलभूत प्रकार आहेत, असे विधान करावे लागते. कारण हे दोन्ही मानवी जीवितप्रेरणेशी निगडीत असतात. माणसाची जीवनेच्छा, जीवितप्रेरणा जेव्हा पराभूत होते, जीवनच विनाशाकडे अपरिहार्यपणे जाते, जीवनविरोधी शक्ती प्रबळ होतात असे चित्रण केले जाते, तेव्हा जीवनविषयक शोकात्म जाणिवेची प्रतीती येते. उलट जेव्हा माणसाची जीवन जगण्याची इच्छा अथवा जीवितप्रेरणा चित्रित केली जाते, त्याच्या ईप्सितांची प्राप्ती, इच्छांची परिपूर्ती चित्रित होते, तेव्हा जीवनविषयक सुखात्म स्वरूपाची जाणीव निर्माण होते. म्हणून जीवनविषयक शोकात्म आणि सुखात्म अनुभव हे मूलभूत स्वरूपाचे वर्गीकरण मानावे लागते. या अनुभववैशिष्ट्याने वाचकाच्या ठिकाणी निर्माण होणारी जाणीव शेकात्म की सुखात्म, हे ठरते. ही जाणीव निर्माण करणारा अनुभव हा कालकृतींचा आशय होय.

आशयाला महत्त्व देऊन मांडल्या गेलेल्या विनोदनिर्मितिविषयक उपपत्तींमध्ये व्यंगकल्पना ही एक प्रभावी कल्पना असल्याचे दिसून येते. विनोदाची निर्मिती ही कोणत्या ना कोणत्या तरी व्यंगाचे दर्शन झाल्याने, चित्रण केल्याने होते, असे व्यंगकल्पनेला महत्त्व देऊन मांडल्या गेलेल्या विनोदविषयक उपपत्तीचे सूत्र दिसून येते. काही उपपत्ती ह्या सामान्य स्वरूपात व्यंग हे विनोदनिर्मितीचे कारण असल्याचे सांगून विनोदनिर्मितीची प्रक्रिया विशद करतात.

ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो हा माणसाच्या ठिकाणी असणारा मत्सर, अडाणीपणा आणि गर्विष्ठपणा यांच्या साहाय्याने हास्यस्पदाची कल्पना स्पष्ट करतो. सौंदर्य, शहाणपणा आणि संपत्ती यांच्या खोट्या गर्वातून अज्ञान प्रकट होत असते. आपल्या ठिकाणी अमुक एक गुण आहेत, असा खोटा गर्व असणाऱ्या सर्वांच्या दोन वर्गे असतात:सत्ता आणि बळ असणारे मूर्ख आणि ते नसणारे मूर्ख. यांपैकी जे दुबळे असतात व त्यांना हसल्यावर हसणाऱ्यावर सूड उगविण्यास असमर्थ असतात, त्यांना आपण यथार्थपणे ‘हास्यास्पद’ म्हणू शकतो, असे प्लेटचे प्रतिपादन आहे. सामर्थ्यवान व्यक्तींचे अज्ञान हे इतरांना त्रासदायक होत असल्यामुळे तिरस्कारही आणि मयप्रद ठरते, असेही तो नमूद करतो. प्लेटोने लौकिक जीवनाच्या संदर्भात ‘हास्यास्पदा’चा विचार केलाआहे, तर ॲरिस्टॉटल ‘हास्यास्पदा’चे विवरण सुखात्मिकेच्या अनुरोधाने करतो. त्याच्या भूमिकेनुसार सुखात्मिका ही खालच्या दर्जाच्या व्यक्तींची अनुकृती असते. हास्यास्पदता हा कुरूपतेचाच एक पोटभाग आहे, हास्यास्पदता ही दुःखद किंवा विनाशक नसणाऱ्या एखाद्या दोषात अथवा कुरूपतेत अंतर्भूत असते. ॲरिस्टॉटलच्या या भूमिकेमध्येही खालच्या दर्जाच्या व्यक्तींची अनुकृती ह्या शब्दप्रयोगातून त्याला व्यंगच अभिप्रेत आहे असे दिसते. मात्र तो प्लेटोप्रमाणे विशिष्ट व्यंगाचा निर्देश करीत नाही. हास्यास्पदाचा विचार तो वाङ्मयीन भूमिकेवरून करतो, हेही त्याचे प्लेटोहून वेगळेपण आहे. सुखात्मिकेत हास्यास्पद गोष्टींचे नाट्यीकरण केलेले असते, असेही ॲरिस्टॉलने म्हटले आहे.

भरतमुनींनी नाट्याच्या संदर्भात केलेला हास्यविचार हाच आपल्याकडील प्रारंभिक विनोद-विचार होय. त्यांना अभिरप्रेत आहे तो नाट्यामुळे निर्माण होणाऱ्याव प्रतीत होणाऱ्याहास्यरसाचा विचार. रंगभूमीवर कशाचे दर्शन घडल्याने हास्यनिर्मिती होते, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते ‘विपरीत अलंकार, विकृत आचार, भाषा, वेध, अंगविक्षेप यांच्या दर्शनाने निर्माण होतो तो हास्यरस’. व्यवहारातील लोकस्वभाव रंगभूमीवर अभिनित होत असतो, ही नाट्यविषयक भूमिका त्यांनी येथेही गृहीत धरलेली आहे. हास्याला कारणीभूत होणाऱ्यावृत्तिप्रवृत्ती ह्या विपरीत्व व अनौचित्य यांच्या दर्शनातून प्रकट होतात, असे भरतमुनींच्या कल्पनेनुसारही हास्याचा उगम व्यंगदर्शनात असतो, हाच निष्कर्ष निघतो.

सतराव्या शतकातील टॉमस हॉब्ज (१५८८-१६७९) या इंग्रज तत्त्ववेत्त्याने हास्यनिर्मितिविषयक मांडलेली उपपत्ती इतर तत्त्ववेत्यांपेक्षा वेगळी दिशा दाखवणारी असली, तरी व्यंगकल्पनेचा आधार घेऊनच त्याने ती मांडली आहे. ‘आपल्यामधील काही एक श्रेष्ठत्वाची आकस्मिक प्रतीती येण्यातून हास्याची प्रेरणा प्रकट होते’, हे त्याच्या विचाराचे मुख्य सूत्र आहे. ही आत्मश्रेष्ठत्वाची प्रतीती दुसऱ्यांमधील वैगुण्याने येईल, अथवा आपल्यामधील पूर्ववैगुण्यांच्या तुलनेने येईल. मागील काळातील आपल्या मूर्खपणाचे आकस्मिक स्मरण झाल्यावरही माणसे हसतात; मात्र ती गोष्ट वर्तमानकाळातील प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारी नसावी लागते, असे हॉब्जने प्रतिपादले आहे. हॉब्जने व्यापकपणे हास्यकारणासंबंधी ही उपपत्ती मांडलेली आहे. आपण काय पाहून हसतो यापेक्षा आपण का हसतो,या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न हॉब्जच्या ह्या ज्ञातृसापेक्ष, मानसशास्त्रीय भूमिकेमध्ये आढळून येतो.

आपल्यारकडील विचारवंतांनी केलेल्या विनोदविषयक विचारामध्येही व्यंगकल्पनेला महत्त्व दिलेले दिसून येते. हास्यनिर्मितिविचार म्हणजेच विनोदविचार ही भूमिका घेऊन वा. ल. कुळकर्णी यांनी पाश्चात्य विवेचकांच्या आधारे आपली विनोदविषयक भूमिका विशद केली आहे. जीवनव्यवहारात तसेच वाङ्मयात जी हास्यनिर्मिती होते. तिच्या मुळाशी औचित्यविसंगतीची वा असंबद्धतेची जाणीव असते, असे त्यांनी प्रतिपादले आहे. रा. श्री. जोग हे विनोदनिर्मितीकडे वस्तुनिष्ठ भूमिकेतूनच पाहतात. त्यांच्या मते, जीवनात हास्यकारक भागाच्या मुळाशी असणारी औचित्यविसंगती मूर्खपणाच्या स्वरूपाची असल्यास (मात्र तिचे परिणाम मर्यादित स्वरूपाचे असावेत) तीमधून हास्य निर्माण होते. रा. श्री. जोगांच्या विचाराचे मुख्य सूत्र प्लेटोच्या विचाराशी जुळणारे आहे.

व्यंगकल्पनेला महत्त्व देऊन अगदी आजही विनोदाचा विचार केलेला दिसून येतो. ऑस्कर मॉडेल या विचारवंताने ‘दुःखद भावनेपासूनपूर्वमुक्त अशा मनाने प्रमाणितापासून ढळण्याचे आकस्मिकपणे केलेले आकलन म्हणजे विनोदात्मता होय’, अशी विनोदात्मतेची व्याख्या केली आहे (द अँटीऑक रिव्ह्यू, स्प्रिंग, १९७०). प्रमाणितापासून ढळणे, या नवीन वाटणाऱ्या कल्पनेचा मँडेलने केलेला उपयोग व्यंगकल्पनेचाच एक आविष्कार आहे. कारण प्रमाणितापासून ढळणे हे व्यंगच ठरते.

व्यंगदर्शक हा विनोदाचा प्रमुख आशय असतो, असे प्रतिपादणाऱ्या ह्या प्रमुख उपपत्ती होत. कोणत्या तरी व्यंगाचे चित्रण हा विनोदाचा आशय ठरू शकतो काय? काही उपपत्ती विशिष्ट व्यंगाचा निर्देश करतात. उदा., प्लेटो अडाणी गुणहीनांचा बढाईखोरपणा, तर रा.श्री. जोग मूर्खपणा हा विनोद-निर्माणक समजतात. परंतु ह्या व्यंगाव्यतिरिक्त अन्य व्यंगांचे चित्रणही विनोदात्म ठरू शकते. भावबंधन या नाटाकतील धुंडीराजाच्या, अथवा साष्टांग नमस्कारमधील रावबहादुरांच्या चित्रणामध्ये विनोदनिर्मिती घडते. ती धुंडीराजाच्या गोष्टीवेल्हाळपणाचे चित्रण केल्याने, अथवा रावबहादुरांच्या छांदिष्टपणाचे चित्रण केल्यामुळे घडते. बडाईखोरपणाचे अथवा मूर्खपणाचे चित्रण केल्याने विनोदनिर्मिती होऊ शकते; परंतु याउलट चातुर्याचे चित्रणही विनोदात्म ठरू शकते; चातुर्यावर आधारलेल्या अनेक लोककथा, तसेच चिं.वि. जोशी यांची ‘प्रधानकन्येचे चातुर्य’ ही कथाही याची ठळक उदाहरणे होत. याचा अर्थ विशिष्ट व्यंग हा विनोदाचा आशय असतो, असे नव्हे. औचित्यविसंगतीची कल्पना सर्व विनोदाच्या मुळाशी असते अशी भूमिका जेव्हा मांडली जाते; तेव्हा व्यंगकल्पनाच विस्तारित स्वरूपात मांडली जात असते. भरतमुनींनी अथवा ॲरिस्टॉटलने ही व्यंगकल्पनाच व्यापक स्वरूपात विनोदनिर्मितीचे कारण म्हणून प्रतिपादली आहे. टॉमस हॉब्जच्या प्रतिपादनातील आत्मश्रेष्ठत्वाच्या प्रतीतीच्या मुळाशी परगत व्यंगप्रतीती, अथवा स्वतःच्या पूर्वकालीन व्यंगाची जाणीव गृहीत धरली आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे, की व्यंगदर्शनाशिवायही विनोदाची निर्मिती होऊ शकते. वास्तव स्वरूपाच्या चित्रणातून निर्माण होणाऱ्या केवल विनोदात तसेच कोटी (विट) या विनोदप्रकारात विनोदाचा आशय व्यंगदर्शन हो नसतो, हे उघडच आहे.

व्यंगकल्पनाधिष्ठित (त्याचप्रमाणे आक्रमणकल्पनेला महत्त्व देणाऱ्या) उपपत्ती दुसऱ्या एका कारणाने असमाधानकारक ठरतात. काय बघितल्याने विनोदाची निर्मिती होते ते ह्या उपपत्ती सांगतात; परंतु ही विनोदाची निर्मिती का होते याची कारणमीमांसा त्या करीत नाहीत, अथवा विनोदाचा म्हणून जो आपल्यावर परिणाम होतो तो का होतो, याचे स्पष्टीकरण देत नाहीत. याप्रकारचे स्पष्टीकरण त्यामध्ये अनुस्यूतही नसते, काय बघितल्याने अमुक एक परिणाम होतो हे सांगणे अनेकदा अचूक नसते. कारण आपले बघणे सदोष, अपुरे, अंधुक असण्याची शक्यता असते. जे असते ते पूर्णपणे आपण अनेकदा बघतच नसतो, अंशालाच आपण पूर्ण समजतो, अथवा आपले पाहणे वरवरचे असते, आंतरिक नसते. म्हणून काय बघितल्याने विनोदनिर्मिती होते हे सांगताना ती का होते, हे सांगणेही आवश्यक ठरते. व्यंगकल्पनाधिष्ठित आणि आक्रमणकल्पनाधिष्ठित उपपत्ती ह्या कशाचे चित्रण विनोदात्म असते, याबद्दल फक्त विधान करतात. या प्रकारचे चित्रण विनोदात्म का ठरावे, व्यंग बघून विनोदाचा आनंदरूप परिणाम का व्हावा, हे त्या सांगत नाहीत. व्यंगदर्शन दुःखानुभवाला कारणीभूत न होता विनोदाचा आनंदरूप परिणाम साधत असेल तर काहीतरी विपरीत घडते, असे म्हणावे लागेल. कलाकृती म्हणून कलात्मकतेच्या आकलनाने होणारा आनंद व कलाकृतीचा भावनिक परिणाम या दोन गोष्टी वेगवेगळ्या गृहीत धरलेल्या आहेत. एकच प्याला ही कलाकृती आपल्याला आनंद देते; परंतु या नाटकात दुःखात्म स्वरूपाचे चित्रण असल्याने भावनिक परिणाम शोकाचा होतो. व्यंगदर्शन हा जर विनोदाचा आत्मा असेल तर हे व्यंगदर्शन दुःखाचा, असमाधानाचा भावनिक परिणाम निर्माण करणारे ठरावयास पाहिजे. परंतु विनोदाचा परिणाम तर आनंदाचा, उल्हासाचा असतो- म्हणजे व्यंगदर्शनाने विनोदाची निर्मिती होते हे विधान अथवा उपपत्ती चुकीची असली पाहिजे, असा तर्क आपल्याला करावा लागतो. म्हणजे विनोदाची निर्मिती करणारे कारण व्यंगाच्या पलीकडे काहीतरी असले पाहिजे. व्यंगकल्पनाधिष्ठित उपपत्ती या आहे या स्वरूपात विनोदाचा आशय यथार्थपणे सांगू शकत नाहीत, असा निष्कर्ष काढावा लागतो.

विनोदाच्या आशयाच्या संदर्भात प्रभावी ठरणारी दुसरी कल्पना आक्रमणाची होय. सिग्मंड फ्रॉइडने (१८५६-१९३९) विरोधकोटीचा आशय आक्रमणाचा असतो, तर आर्थर केस्टलरने (१९०५-८३) सर्व प्रकारच्या विनोदाचा आक्रमण हा अपरिहार्य आशय असतो, असे ठामपणे प्रतिपादले आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (१८७१-१९३४) हेही विनोदाकडे ‘हल्ला करण्याचे साधन’ या दृष्टीने पाहत होते, असे दिसते. ते म्हणतात, ‘विनोद हे एक शस्त्र असून त्याचा उपयोग स्वरक्षणापेक्षा इतरांच्या व्यंगाचा स्फोट करण्याचेच कामी विशेषकरून होतो’. प्र. के.अत्रे यांनीही विनोदाचा अत्यंत सामर्थ्यवान शस्त्र, असा उल्लेख केला आहे. ते संपूर्ण विनोदाचे आकलन आक्रमणकल्पनेच्या साहाय्यानेच करताना दिसतात.

आक्रमणाचे चित्रण हा विनोदाचा आंशय ठरू शकतो काय? फ्रॉइडने आक्रमणाची म्हणून जी उदाहरणे दिली आहेत, त्यांचे विश्लेषण केले असता ती आक्रमणाची नसून प्रति-आक्रमणाची म्हणजेच एक प्रकारे आत्मसंरक्षणाची आहेत, असे ध्यानात येते (उदा., फ्रॉइडने दिलेले हे उदाहरण : एक राजपुत्र घोडयावर बसून चौकात गेलेला असतो. त्याला तेथे आपल्याच तोंडवळ्याचा एक तरुण दिसतो. सर्वासमक्ष या साम्याचा उल्लेख करून राजपुत्र त्या तरुणाला विचारतो, ‘तुझी आई राजवाड्यात कामाला होती का?’ तो तरुण्ण तात्काळ उत्तरतो, ‘आई नव्हती; वडील होते).’येथे विनोदाची निर्मिती जी होते, ती केवळ आक्रमणाच्या चित्रणाने होत नसून प्रति-आक्रमणाच्या चित्रणाने होते. आक्रमणाचे चित्रण हेच विनोदी वाङ्मयाचे इतर वाङ्मयाहून वेगळेपण असते, अशी आग्रही भूमिका केस्टलरने मांडलेली पाहावयास मिळते. आक्रमणाचा आशय विनोदात्म ठरू शकतो का? आक्रमणात प्रकट होणारी भावना चीड, तिरस्कार यांसारखी असते. या भावना निर्माण होतात, त्यावेळी माणसाचे मन ताणलेल्या अवस्थेत असते. या भावना हास्यासह प्रकट होत नाहीत. हास्याचा अथवा विनोदनिर्मित हास्याचा अनुभव घेत असताना मन ताणलेल्या अवस्थेत नसते; तेथे उलट मनाची निर्भर अशी अशी अवस्था असते. म्हणून आक्रमणभावनेचे चित्रण विनोदाचा आशय असतो, हे तत्त्व मान्य करता येत नाही.

क्रीडावृत्तीला विनोदाच्या आशयाचे स्थान देऊन काही विवेचकांनी विनोदाची उपपत्ती मांडलेल आढळून येते. जेम्स सली (१८४२-१९२३) हा मानसशास्त्रज्ञ हास्याची तसेच विनोदाची मीमांसा क्रीडावृत्तीच्या अनुरोधाने करतो. कोणत्या ना कोणत्या प्रकारे व्यंग, रूढी-नियम यांचा किरकोळ भंग यांकडे आपण क्रीडावृत्तीने बघू शकलो तर हास्यकारकता प्रत्ययाला येते; असे त्याचे मत. आपल्याकडील वामन मल्हारजोशी (१८८२-१९४३) यांनी विनोदाची व्याख्या ‘हास्योत्पादक गोष्टीचे प्रेमगर्भ व खेळकर वृत्तीने केलेले चिंतन’ अशी केली आहे. ह्या तत्त्वचिंतकाच्या विवेचनात क्रीडावृत्तीला, आनंदभावनेला महत्त्व दिलेले आहे. त्यांच्या मते लेखकाची मनोवृत्ती, दृष्टिकोन हाच जणू विनोदाचा आशय होय. ते विनोदात्म चित्रणाच्या वस्तुनिष्ठतेला महत्त्व देत नाहीत. विनोदात्मता निर्माण होते ती बघणाऱ्याच्या दृष्टीने; वास्तवातील वैशिष्ट्यामुळे नव्हे, अशीच ही भूमिका आहे. दृष्टीला महत्त्व दिल्यानंतर विनोदात्म वास्तव व विनोदात्म नसलेले वास्तव यांतील भेदच पुसून टाकला जातो. विनोदाचा ज्ञातृनिरपेक्ष, काही वेगळा आणि सखोल आशय असू शकतो, याची दखल या भूमिकेत घेतली जात नाही.

विनोदाची निर्मिती कशी होते, हे सांगणारी आंरी बेर्गसाँची (१८५९-१९४१) उपपत्ती महत्त्वाची आहे. त्याच्या मते चेतनावर यांत्रिकतेचे आवरण पडल्याची प्रतीती विनोदात्म ठरते. जिथे जिथे एक प्रकारचे दाढर्य, अवधानरहितता, लवचीकपणाचा अभाव आढळतो, तिथे तिथे एक प्रकारे चेतनावर यांत्रिकतेचे आवरण पडल्याचा प्रत्यय येत असतो. असा प्रत्यय त्याच्या मते विनोदात्म असतो. एखादा माणूस चालताचालता अडखळून पडला, एखाद्याचे हावभाव ठरावीक वेळानंतर ठरावीकपणेचे होत राहिले, तर तेथे अवधानरहितता, तोचतोपणा ही यांत्रिकतेची वैशिष्टये जाणवून विनोदनिर्मिती घडत असते. एखाद्याची जेव्हा नक्कल केली जाते, तेव्हा नकलेमध्ये येणारा त्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वातील तेवढा भाग यांत्रिक वाटत असतो. सारख्या चेहऱ्याची दोन माणसे एकदम बघितल्यानंतर अशीच यांत्रिकतेची प्रतीती येत असते. बेर्गसाँच्या प्रतिपादनाचे हे सूत्र आहे.

विनोदाचा आशय चैतन्यतत्त्वाशी निगडित असतो, हे भावरूप विधान बेर्गसाँ करीत नाही, उलट तो चेतनावर पडणाऱ्या यांत्रिकतेच्या आवरणाला, म्हणजे एक प्रकारे यांत्रिकतेच्या कल्पनेला महत्त्व देतो. त्याच्या उपपत्तीत चैतन्यतत्त्वाचे स्थान आपल्याला शोधावे लागते. विनोदनिर्मिती चैतन्याच्या प्रतीतीशी निगडित आहे, हे आपल्याला भावते. या दृष्टीनेच बेर्गसाँची उपपत्ती महत्त्वाची ठरते. सुसान लँगर (१८९५-१९८५) विनोदाचा व जीवितप्रेरणेचा निकटचा संबंध आहे हे महत्त्वाचे विधान करते खरी; परंतु हा संबंध विनोदाचे रूप कसे धारण करतो, याची कोणतीही मीमांसा ती करीत नाही. अर्थात विनोदाचा विस्ताराने विचार करणे, तिला तिच्या विवेचनात अभिप्रेतही नाही. नाटयरूपाचा विचार करीत असताना ‘कॉमिक र्हिदम’च्या संदर्भात तिने विनोदाबद्दल हे विधान केले आहे. मात्र तिने दाखविलेल्या दिशेने आपण वाटचाल करू शकतो.

विनोदनिर्मितीच्या संदर्भात मांडल्या गेलेल्या विविध उपपत्तींचे एक प्रमुख वैशिष्ट आपल्या ध्यानात येते, ते म्हणजे विनोदात्म अनुभूतीमध्ये दुःखवर्ज्य केलेले आहे. व्यंगकल्पनेला महत्त्व देणाऱ्या उपपत्तिकारांपैकी प्लेटो, ॲरिस्टॉटल हे हास्यास्पदात व्यंग असते, हे मानतात; परंतु हे दुःखद, विनाशक असू नये, असे सांगतात. औचित्य-विसंगतीचे खोलात जाऊन दर्शन घेतले तर ते शोकात्म ठरेल असे वा.ल. कुळकर्णी म्हणतात; म्हणजे विनोदात्मतेसाठी शोकात्म स्वरूपाची अनुभूती ते वर्ज्य मानतात. रा.श्री. जोग हे औचित्यविसंगतीचा परिणाम मर्यादित असावा, असे सांगतात. या समीक्षकांच्या प्रतिपादनात एक समान भाग आढळतो, तो म्हणजे विनोदाच्या अनुभवात दुःख वा हानिकारक असा भाग असू नये हा.

क्रीडावृत्तीला महत्त्व देणाऱ्या उपपत्तीही विनोदाची आनंदरूपता प्रतिपादतात. केवल रूपात आनंददायक असणाऱ्याच नव्हे, तर एऱ्हवी व्यंगयुक्त, असुखद वाटणाऱ्या गोष्टींकडे क्रीडावृत्तीने बघितले तर विनोदाची निर्मिती होते व आनंदाचा प्रत्यय येतो, असे प्रतिपादणाऱ्या या उपपत्तींमधून विनोद हा सुखात्म जाणिवेचा प्रत्यय देणारा असतो, हे वैशिष्ट्य निर्देशिले जाते. आक्रमणाचे चित्रण हा विनोदाचा आशय असू शकत नाही. विश्लेषणांती आक्रमणाची उदाहरणे ही प्रति-आक्रमणाची असतात आणि प्रति-आक्रमण हे आत्मसंरक्षणार्थ, चांगल्याच्या संरक्षणार्थ असल्याने सुखात्म जाणीव निर्माण करणारे असते, असेच म्हणावे लागते.

बेर्गसाँने मांडलेल्या उपपत्तीच्या अनुरोधाने असे म्हणता येईल, की चेतनावर यांत्रिकतेचे आवरण पडल्याने मूळच्या चैतन्यरूपाचाच उत्कटस्वाने प्रत्यय येतो व हा चैतन्याचा प्रत्यय सुखात्म जाणीव निर्माण करणारा असतो. सुसान लँगरने विनोदाचा आणि सुखात्म जाणिवेचा संबंध असतो, असे भावरूप विधान केले आहे. या सर्व उपपत्तींचा साकल्याने विचार केला असता सुखात्म जाणीव निर्माण करण्याचे सामर्थ्य असणे हा विनोदाचा आशय असतो, असे मान्य करावे लागते. याचे आणखी एक गमक पाहावयास मिळते. हास्य अथव स्मित हा विनोदाचा एक अपरिहार्य परिणाम असतो. सर्वसाधारणपणे पाहता हास्य हे आनंदरूप असून, ते माणसाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या सुखात्म जाणिवेतून प्रवृत्त होत असते. म्हणून विनोदाचे उगमस्थान सुखात्म स्वरूपाच्या अनुभवातच असले पाहिजे, हा निष्कर्ष आपण काढू शकतो आणि विनोदाचा संबंध जीवनविषयक एका जाणिवेशी आहे, सुखात्म जाणिवेशी आहे, असे विधान करू शकतो. ‘सुख’ या संज्ञेच्या विविध अर्थच्छटांचा- म्हणजेच संवेदनामुळे होणारे सुख, हर्षभरित मनोवस्था, प्रेरणासमाधानामुळे निर्माण होणारी सुखद मानसिक स्थिती इत्यादिकांचा समावेश ‘सुखात्म’ या जाणिवेत करता येतो. शिवाय या जाणिवेच्या आत्मरूपाचाही निर्देश करणे शक्य होते. यासाठी येथे सुखात्म ही अधिक व्यापक अर्थाची संज्ञा उपयोजिलेली आहे.

मात्र सुखात्म जाणीव निर्माण करणारा आशय असणे एवढेच वैशिष्ट्य विनोदाच्या निर्मितीला पुरत नाही असेही दिसते. बालकवींची ‘फुलराणी’ ही कविता सुखात्म जाणीव निर्माण करणारी निश्चितपणे आहे; मात्र तिला विनोदी कविता म्हणता येणार नाही. म्हणजेच आशयाच्या जोडीने दुसरे एक वैशिष्ट्य विनोदनिर्मितीसाठी आवश्यक असते; ते म्हणजे अभिव्यक्तीचे वैशिष्ट्य होय. त्या दृष्टीने गोविंदाग्रजांची ‘गुलाबी कोडे’ ही कविता विनोदी म्हणता येईल. या कवितेचा आशय पतिपत्नीमधी हृद्य शृंगाराचे चित्रण करून त्याद्वारा सुखात्म जाणीव निर्माण करणारा आहे. शिवाय ही सुखात्म जाणीव विनोदाच्या विशिष्ट अभिव्यक्तिवैशिष्ट्यासह प्रत्ययाला येते. विनोदाची निर्मिती होण्यास तंत्राला महत्त्वाचे स्थान असते, हे जाणवल्याने काही उपपत्तिकारांनी विनोदनिर्मिती ही तंत्रात्मक साधनांचा अवलंब केल्याने, अथवा अभिव्यक्तिवैशिष्ट्यामुहे घडते, या बाबीला महत्त्व देऊन उपपत्ती मांडल्या आहेत.

इमॅन्युएल कांट (१७२४-१८०४), फ्रॉइड, केस्टलर यांनी विनोदविषयक उपपत्ती मांडताना तंत्राला महत्त्व दिलेले आहे. विनोदात्म हास्यनिर्मितीच्या संदर्भात कांटने असे म्हटले आहे, की जेव्हा खूप ताणलेल्या अपेक्षेच्या पदरी अचानक भोपळा येतो, तेव्हा हास्यनिर्मिती होते. म्हणजे अपेक्षा ताणल्या जाणे व त्यातून काहीच निष्पन्न न होणे, हे कोटीचे तंत्रवैशिष्ट्य कांटने सांगितले आहे. फ्रॉइडने कोटीची निर्मितीप्रक्रिया व स्वप्ननिर्मितिप्रक्रिया यांमध्ये साम्य पाहिले व संक्षेपीकरण आणि स्थानांतर हे प्रमुख तंत्रविशेष सांगितले आहेत. कांट आणि फ्रॉइड यांनी सांगितलेले तंत्रविशेष हे विनोदाच्या एका प्रकाराला म्हणजे कोटीला लागू पडणारे आहेत. केस्टलरने ‘द्विसाहचर्यभाव’ (बायसोसिएशन) ही संज्ञा निर्माण करून नुसते कोटीचेच नव्हे, तर एकंदरीत विनोदाचेच तंत्रवैशिष्ट्य सांगितले आहे, आत्मसुसंगत परंतु परस्परांशी असंबंधित अशा दोन साहचर्य- ओघांचा आकस्मिकपणे विशिष्ट बिंदूवर होणारा परस्पराघात हे ते तंत्रवैशिष्ट्य होय. मात्र एकाच वेळी दोन आकलने प्रत्ययाला येत असतील आणि त्यांचा एकमेकांवर आघात होत नसेल, तर तेथे विनोदाचे अभिव्यक्तिवैशिष्ट्य निर्माण होत नाही. आकलनांचा परस्पराघात होणे, ही विनोदाच्या अभिव्यक्तिवैशिष्ट्याची आवश्यक अट आहे. उदा., श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या ‘याचक’ या लेखामध्ये, कोणत्या ना कोणत्या तरी नातेवाईकाचा मृत्यू झाल्याची सबब सांगून त्याच्या दफनासाठी पांडूतात्यांकडून पैसे उकळणाऱ्या हसनभाईला अखेरीस पांडूतात्या सांगतात, की ‘तुझ्या साऱ्या नातेवाईकांना पुरून उरण्याइतका आमच्यापाशी तर पैसा नाही’. येथे ‘पुरणे’ या शब्दावर कोटी आहे. या वाक्याचे एक आकलन तुझ्या सगळ्या नातेवाईकांना पुरेसा होईल इतका पैसा नाही हे, आणि दुसरे आकलन तुझ्या सगळ्या नातेवाईकांचा दफनविधी करण्याइतका पैसा नाही, असे आहे. या दोन आकलनांच्या परस्पराघातामुळे येथे विनोदाचा प्रत्यय येतो. उपहासपर आणि केवल विनोदाच्या निर्मितीमध्येही कोणत्या ना कोणत्या तरी तंत्रात्मक साधनाचा उपयोग केलेले अभिव्यक्तिवैशिष्ट अपरिहार्यपणे आढळते.

मात्र हे लक्षात घेणे आवश्यक आहे, की ह्या अभिव्यक्तिवैशिष्ट्याशिवाय जशी विनोदनिर्मिती होत नाही, त्याचप्रमाणे विनोदनिर्मितीस केवळ अभिव्यक्तिवैशिष्ट्य पुरेसे ठरत नाही. सॉफोक्लीझच्या ईडिपस रेक्स ह्या नाटकामध्ये ह्या अभिव्यक्तिवैशिष्ट्याचा उपयोग केला असून त्याचा आशय शोकात्म स्वरूपाचा असल्याने शोकात्म अनुभव तीव्र  स्वरूपात प्रत्ययाला येतो. तेथे विनोदनिर्मिती घडत नाही. तर ह्या अभिव्यक्तिवैशिष्ट्याच्या अभावी सुखात्म स्वरूपाचा आशय असणारी बालकवींची ‘फुलराणी’ ही कविता विनोदी ठरत नाही. गोविंदाग्रजांची ’गुलाबी कोडे’ ही कविता मात्र दुहेरी वैशिष्ट्यामुळे विनोदी म्हणून भावते. तेव्हा विनोदनिर्मितसाठी विशिष्ट प्रकारचा आशय व विशिष्ट प्रकारचे अभिव्यक्तिवैशिष्ट्य अपरिहार्य असते, हे ध्यानात घेऊन विनोदाची संकल्पना मांडावी लागते, ती अशी : वेगवेगळ्या पातळ्यांवरील दोन विभिन्न आकलनांचा परस्पराघात आकस्मितपणे प्रत्ययाला आणून हास्यामध्ये पर्यवसित होणाऱ्या जीवनविषयक सुखात्म जाणिवेची प्रतीती देणारा धर्म म्हणजे विनोद अथवा विनोदात्मता.

विनोदी वाङ्मयामध्ये सुखात्म जाणिवेचा आविष्कार वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. या आविष्कारभेदामुळेच विनोदाची तीन मूलभूत रूपे कल्पिता येतात. ही तीन रूपे अशी : मानवी जीवनेच्छेला, चांगले जगण्याला प्रतिरोधी ठरणाऱ्या गोष्टींवर टीका करण्याचे मानवी जीवनच्छेचे चांगुलपणाचे व मूल्यांचे प्रतिष्ठापन तसेच संरक्षण केले जाते. मानवी जीवनेच्छेवर, चांगुलपणावर होणाऱ्या आक्रमणाचा प्रतिकार हा प्रति-आक्रमण करून केला जातो. माणूस हा जगण्याला विरोधी ठरणाऱ्या गोष्टींवर मात करण्याचा प्रयत्न करतो. हा प्रयत्न वैयक्तिक जीवनात तसेच सामूहिक जीवनात केला जातो. युद्धाने मानवी अस्तित्वच धोक्यात येते. जीवन जगण्यात येणारा तो अडथळा असतो. म्हणून विनोदात्म लेखनात-सुखात्मिका या नाटयप्रकारात तसेच कथा-कादंबऱ्यांत-युद्धकल्पनेचाच उपहास केल्याचे आढळते. उदा., ॲरिस्टोफेनीसच्या (इ.स.पू.सु. ४४८-३८०) लिसिस्ट्राटा या सुखात्मिकेत युद्धकल्पनेचे उपहासपर चित्रण येते. द.मा. मिरासदारांच्या ‘लढाईची खुमखुमी’ या गोष्टीबाबतही हेच म्हणता येईल.

एखादे व्यंग जीवन जगण्यातील तोल बिघडवून टाकीत असते. अशा व्यंगाची तीव्र जाणीस केल्यानेच अव्यंग काय याची उत्कट प्रतीती येते. ही प्रतीती, मानवी जीवितप्रेरणेचा हा प्रत्यय सुखात्म जाणीस निर्माण करणारा असतो. उपहास (सटायर) या विनोदप्रकाराचा प्रत्यय अशा प्रकारे येतो.

माणसाची जीवितप्रेरणा ही स्त्री-पुरुष प्रेमातून, त्याचप्रमाणे इतर विविध मानवी नात्यांतील परस्परप्रेमातून प्रकट होत असते. अशा प्रेमपूर्ण व व्यंगरहित जीवनाचे प्रत्यक्षपणे केलेले चित्रण सुखात्म जाणिवेचा प्रत्यय देणारे ठरते. मात्र हे चित्रण असताना या प्रकारचे चित्रण हे व्यंगाचे चित्रण न करताही विनोदनिर्मिती करते. अशा व्यंगदर्शनरहित, जीवनाचे वास्तव व स्वाभाविक चित्रण वाटेल, अशा प्रकारच्या विनोदाला ‘केवल विनोद’ म्हणता येईल. उदा., चिं.वि. जोशी यांची ‘बोळवण’, वा.म. जोशी यांची ‘हे प्रेम वेडं म्हणावं की शहाणं’ यांसारख्या कथा.

विनोदाचे तिसरे एक रूप संभवते. त्यात वास्तवातील अनुभवाची मोडतोड करून तो ‘विक्षिप्त’ (वि+क्षिप्= विपरीत ठिकाणी ठेवणे) स्वरूपात मांडलेला असतो. त्यासाठी स्थानांतर व संक्षेपीकरण या तांत्रिक वैशिष्टयांचा उपयोग केला जातो. कोणत्याही प्रकारची बंधने, दडपणे आपल्यातील चैतन्याला गुदमरवून टाकत असतात. सामाजिक नियमने, रूढी, अधिसत्ता चैतन्यास प्रकट होऊ देत नाहीत. विचारपद्धतीततील कार्यकारणभावाचा असाच जाच आपल्याला सतत सहन करावा लागतो. ही दोन्ही प्रकारची बंधने झुगारल्यावर आपल्याला विमुक्ततेचा जो प्रत्यय येतो, तो सुखात्म स्वरूपाचा असतो, वग, प्रहसने यांत देव, राजा, बाप अशा अधिसत्तांबद्दलचा धाक, त्यांचे विपर्यस्त चित्रण केल्यानंतर नाहीसा झाल्यासारखा वाटतो व आपल्याला विमुक्ततेचा प्रत्यय येतो. काही लेखनात नेहमीची तार्किक चौकट उधळून टाकली जाते. या प्रकारच्या विनोदाला आपण कोटीरूप विनोद असे म्हणू शकतो. विनोदाच्या या प्रकारात तांत्रिक वैशिष्ट्यावर भर दिलेला असला, तरी त्याचा संबंध विमुक्ततेद्वारा जीवितजाणिवेशी-सुखात्मजाणिवेशी –काही एक प्रमाणात का होईना असतो.

प्रचलित विनोदविषयक समीक्षेत विनोदाचे म्हणून जे प्रकार कल्पिले जातात, त्यांचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. अनेकदा विनोदनिर्मितीची सामग्री विचारात घेऊन  तिच्यातील प्रधान घटकानुसार विनोदप्रकार कल्पिले जातात. स्टिफन लीकॉकने (१८६९-१९४४) शब्दनिष्ठ विनोद व कल्पनानिष्ठ विनोद आणि प्रसंगनिष्ठ विनोद व स्वभावनिष्ठ विनोद असे प्रकार कल्पून त्यांचा विचार केलेला आढळतो. मराठी समीक्षेताही अनेकदा हे विनोदप्रकार म्हणून विचारात घेतलेले दिसून येतात. सकृदर्शनीच हे लक्षात येते, की विनोदप्रकारांचे म्हणून केलेले हे वर्गीकरण मूलभूत स्वरूपाचे नाही. वस्तुतः हे विनोदप्रकार नसून या संज्ञांमुळे विनोदनिर्मितीच्या सामग्रीचाच निर्देश केला जातो, असे म्हणावे लागेल.

उपहास हा विनोदाचा एक मूलभूत प्रकार म्हणून आपण निर्देशिला आहे. इंग्रजी समीक्षेत ‘सॉरकॅझम’ व मराठीमध्ये ‘उपरोध’ या संज्ञेचा एक विनोदप्रकार म्हणून क्वचित निर्देश केला जातो. ‘सॉरकॅझम’ या संज्ञेचा विनोदप्रकार म्हणून इंग्रजी समीक्षेत फारसा उपयोग होताना दिसत नाही. कारण निर्भर्त्सना करणे, द्वेषभावना असणे, तिटकारा प्रकट करणे ही उपरोधाची वैशिष्ट्ये ‘उपहास’ या संज्ञेच्या आशयातच समाविष्ट केलेली दिसून येतात. विशिष्ट व्यक्ती वा संस्था यांच्याबद्दल तिटकारा प्रकट करणे, निर्भर्त्सना करणे, अवहेलना करणे ही वैशिष्टये जर एखाद्या लेखनात दिसून येत असतील, तर त्याचा साहित्यामध्ये समावेश करता येणे कठीण आहे. ते व्यावहारिक हेतूने पक्षपाती भूमिकेतून, काही वाचकवर्गाला आपल्या बाजूला फितवून, काही जणांच्या विरुद्ध भावनिक क्षोभ निर्माण करणारे लिखाण म्हणावे लागेल. मराठीतील उपहासाच्या चांगल्या उदाहरणांमध्ये चिं वि. जोशी यांचे लंकावैभव हे पुस्तक, तसेच वा.म.जोशी यांची ‘बायकांना उजव्या डोळ्यांनी दिसत नाही’, द.मा. मिरासदार यांची ‘माझी पहिली चोरी’ यांसारख्या कथा यांचा उल्लेख करता येईल. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा ‘सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट’ हा परीक्षणलेख हे उपरोधाचे उदाहरण मानावे लागेल. उपरोधाला विनोदप्रकाराचा दर्जा देता येणे कठीण आहे.

विडंबनाचा (पॅरडी) निर्देशही वाङ्मयप्रकार म्हणून केलेला आढळतो. वस्तुतः विडंबन हे विनोदनिर्मितीचे एक साधन आहे व प्राधान्याने त्याचा उपयोग उपहासनिर्मितीसाठी केलेला आढळतो. कोटीच्या रूपातही विडंबनाचा उपयोग केलेला दिसून येतो. विडंबन म्हणजे अनुकरण, विकृतानुमूलक थट्टा. केशवकुमार, ज.के. उपाध्ये इत्यादींनी पद्य विडंबने केली आहेत, तर चिं. वि. जोशी, पु.ल. देशपांडे इत्यादींनी गद्य विडंबने करून विनोदनिर्मिती साधलेली आढळते. ज्या वेळेला कोणत्याही प्रकारचे व्यंगदर्शन करण्याचा हेतू नसतो, तेव्हा विडंबनाच्या साहाय्याने केलेली विनोदनिर्मिती ही कोटीच्या स्वरूपाची विनोदनिर्मिती ठरते. माधव जूलियन् यांच्या ‘तेथे चल राणी’ या कवितेचे विडंबन राजा बढे यांनी ‘देणे थकल्यावर’ या शीर्षकाने केले आहे. त्यात स्थानांतर या तंत्रविशेषाचा अवलंब करून जो विनोद निर्माण केला आहे, तो कोटीच्या स्वरूपाचा म्हणावा लागेल. गूढान्वय (आयरनी) हासुद्धा विनोदप्रकार नसून विनोदनिर्मितीचे साधन आहे, असेच म्हणावे लागेल.

विनोदविचारामध्ये विनोद हा एक वाङ्मयप्रकार आहे काय, हा प्रश्न वादग्रस्त स्वरूपाचा ठरतो. काव्य, कादंबरी, नाटक, कथा हे वाङ्मयप्रकार आहेत, असे निःसंदिग्धपणे म्हटले जाते. विनोदाच्या बाबतीत मात्र अशी निःसंदिग्धता आढळत नाही. आकादेमिक अभ्यासक्रमात वा वाङ्मयाच्या इतिहासात कित्येकदा विनोदाची गणना एक वाङ्मयप्रकार म्हणून केली जात असली, तरी त्या वर्गीकरणाबाबत एक प्रकारची संदिग्धताही आढळते. स्थूलमानाने तो एक वाङ्मयविभाग आहे, अशी धारणा असल्याचेही आढळून येते. या संदिग्धतेवरून विनोदी लेखनाचा काही एक वेगळेपणा अभ्यासकांना जावणलेला असतो, वाङ्मयप्रकाराशी त्याचा काही संबंध असावा, असेही त्यांना वाटत असते; परंतु त्याच्या रूपाच्या वेगळेपणाची खात्री मात्र दिसून येत नाही.

प्रत्येक वाङ्मयप्रकारातील कलाकृतीला मूल्य प्राप्त करून देणारा एक विशिष्ट आंतरिक धर्म त्या त्या वाङ्मयप्रकाराच्या ठायी असतो व त्या धर्माच्या प्रकटीकरणासाठी त्या त्या वाङ्मयप्रकाराचे सकृदर्शनी दिसून येणारे रूपाचे बाह्य वैशिष्ट्य अथवा विशिष्ट परिवेष असावा लागतो. काव्यात्मता, नाट्यात्मता ही वाङ्मयीन आत्मतत्त्वे वा आंतरिक धर्म आहेत व या धर्मांना अनुक्रमे लयबद्ध शब्दयोजना, संवाद असा खास त्यांचा परिवेष आहे व असा आंतरिक धर्म व बाह्य परिवेष मिळून विनोदात्मता ह्या धर्माला आहे काय? –तर नाही असेच उत्तर द्यावे लागते. काव्यात्मता, नाट्यात्मता, कथात्मता अशा तत्त्वांचा उल्लेख केल्याबरोबर काव्य, नाटक, कथा, कादंबरी हे विशिष्ट वाङ्मयप्रकार नजरेसमोर येतात. विनोदात्मता म्हटल्यावर कोणताही बाह्य परिवेष धारण करणारा विशिष्ट वाङ्मयप्रकार नजरेसमोर येत नाही. सर्वच वाङ्मयप्रकारांमध्ये हे तत्त्व आविष्कृत होऊ शकते व त्यावेळी अशा साहित्यकृतींची गणना विनोदी वाङ्मयात केली जाते.

एखाद्या वाङ्मयप्रकाराचे आत्मतत्त्व ठरू शकेल, असा विनोदात्मता हा गुणधर्म आहे खरा; परंतु त्याच्या प्रकटीकरणासाठी त्याला स्वतःचा म्हणून जो बाह्य परिवेष असावा लागतो तो नसल्याने विनोद हा वाङ्मयप्रकार म्हणून गणता येत नाही. मात्र विनोदात्मतेचा मूलभूत मानवी प्रवृत्तींशी संबंध असल्याने तो विविध वाङ्मयप्रकारांतून वैपुल्याने प्रकटताना दिसतो. त्या दृष्टीने विनोदात्मता या धर्माने युक्त असणाऱ्या आणि विविध वाङ्मयप्रकारांतून आविष्कृत होणाऱ्या वाङ्मयाचा ‘विनोदी वाङ्मय’ असा स्वतंत्र विभाग कल्पिणे, हे मात्र सर्वार्थाने योग्य व आवश्यक ठरते.

संदर्भ : 1. Apte, Mahadev L. Humour and Laugher : An Anthropological Approach, New York, 1985.

2. Bergson, Henri; Brereton, Cloudesley; Rothwell, Fred, Laugher : An Essay on the Meaning of the Comic, London, 1911.

3. Chapman, A. J,.; Foot,H.C. Ed., It’s a Funny Thing, Humour, Oxford, 1977

4. Cooper, Lane, An Aristotelian Theory of Comedy, London, १९२२.

5. Eastman, Max, The Enjoyment of Laughter, New York, 1936

6. Freud., Sigmund; Trans, Strachey, James, Jokes and their Relation to the Unconscious, London, 1960.

7. Koestler Arthur, The Act of Creation, London, १९६४

8. Leacocks’ Stephen, Humour : Its Theory and Technique, 1935.

9. Sutherland, James, English Satire, Cambridge, 1962.

10. Sypher, Wylie, Ed. Comedy, New York, 1956.

११. केळकर, न.चिं. हास्यविनोदमीमांसा, पुणे, १९५८.

१२. गाडगीळ, वाळ, विनोद, तत्त्वज्ञान, पुणे १९९३

लेखक: गो.मा. पवार

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate