অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिलप्पधिकारम्

शिलप्पधिकारम्

प्राचीन, अभिजात तमिळ महाकाव्य.  इळंगो अडिगळ या कवीने ते सु. दुसऱ्या शतकात रचले. इळंगो अडिगळ हा शेंगुट्टवन या चेर राजाचा धाकटा भाऊ. त्याने तरुणपणापासूनच जैन संन्याशाचे आयुष्य व्यतीत केले. शिलप्पधिकारम म्हणजे ‘नूपुराची गाथा’. या महाकाव्याचे कथानक एका नूपुराभोवतीच मुख्यतः फिरत राहते. कण्णगी ह्या महापतिव्रता साध्वीची करुण कहाणी त्यात आहे.

या महाकाव्याचे एकूण तीन भाग व तीस सर्ग आहेत. पहिल्या भागात चोल राजवंशाची राजधानी पुहार येथील कोवलन हा धनाढ्य व्यापारी व त्याची पत्नी कण्णगी यांचे जीवन रंगविले आहे. कोवलन हा माधवी या राजनर्तकीच्या नादी लागून पत्नीचा त्याग करतो. कालांतराने पश्चात्तापदग्ध होऊन तो आपल्या पत्नीसह नशीब अजमावण्यासाठी पांड्य घराण्याची राजधानी मदुराई येथे जातो. महाकाव्याच्या दुसऱ्या भागात कोवलन मदुराई येथे व्यापारउदीम करण्यासाठी भांडवल हवे, म्हणून आपल्या पत्नीचे एक नूपुर बाजारात विकण्यासाठी घेऊन जातो; तथापि तेथील पांड्य राजाच्या राणीचे मुक्तानूपुर चोरल्याचा खोटा आळ येऊन त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात येते. ही वार्ता ऐकून दुःख व संताप यांनी बेभान झालेली कण्णगी राजाकडे जाऊन आपल्याजवळचे दुसरे नूपुर राजाला दाखवते व आपला पती कोवलन निरपराध व घरंदाज असल्याचे सिद्ध करते. आपली भयंकर चूक उमगताच राजा पश्चात्तापदग्ध होऊन मूर्च्छित होतो व मरण पावतो. राणी सती जाते. पण तेवढ्याने कण्णगीचा क्रोध शमत नाही. तिच्या शापाने सारी मदुराई नगरी आगीत जळून भस्मसात होते. महाकाव्याच्या तिसऱ्या भागात कण्णगी शेजारच्या चेर देशात जाऊन एका डोंगरावर राहते व एका विमानातून आपला पती कोवलन याच्यासह स्वर्गात जाते, असा कथाभाग आलेला आहे. चेर राजाला ही हकीकत कळताच तो कण्णगीच्या स्मरणार्थ सतीचे मंदिर बांधतो. कण्णगी ही महान पतिव्रता व सती म्हणून देवतारूपाने तमिळनाडू व श्रीलंका येथे पूजिली जाते.

प्राचीन तमिळ पंचमहाकाव्यांपैकी शिलप्पधिकारम् हे आद्य व सर्वोकृष्ट महाकाव्य मानले जाते. एका लहानशा लोककथेला अद्भुतरम्य व अतिमानवी घटनांची जोड देऊन हे भव्य महाकाव्य साकारले आहे. कण्णगीच्या कथेच्या अनुशंगाने कवीने तत्कालीन समाजाच्या चालीरीती, आचारविचार, सवयी, व्यापारउदीम, विविध धर्मीयांचे जीवन इत्यादींचे दर्शन घडविले आहे. त्या काळातील नृत्य-संगीताचे विविध प्रकार तपशिलाने त्यात येतात. लोकगीते व लोकनृत्ये यांचेही बारकावे कवीने टिपले आहेत. कवीच्या कलाविषयक जाणकारीचे व प्रभुत्वाचे ते निदर्शक आहेत. इतिहास, राजनीती, धर्म, तत्त्वज्ञान यांचाही ऊहापोह या महाकाव्यात आढळतो. थोडक्यात, हे महाकाव्य म्हणजे तत्कालीन समाजजीवनाच्या माहितीचा मोठा खजिनाच आहे. मोक्षसाधनेची महतीही त्यात वर्णिली आहे. कवीचा मानवतावादी दृष्टिकोण व त्याने वर्णिलेले सद्गुणांचे माहात्म्य यांचे विलोभनीय प्रत्यंतर या महाकाव्यातून येते.

शिलप्पधिकारम् ची व्ही. आर्. रामचंद्र दीक्षितरकृत (१९३६), अ‍ॅलन दान्येलूकृत (१९६५) व का. ना. सुब्रह्मण्यकृत (१९७७) अशी तीन इंग्रजी भाषांतरे उपलब्ध आहेत. अ‍ॅलन दान्येलूने त्याचे फ्रेंचमध्येही भाषांतर केले आहे.

लेखक: वरदराजन् मु. (इं.); श्री. दे. (म.) इनामदार

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate