অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

संघम् साहित्य

संघम् साहित्य

प्राचीन तमिळ वाङ्‍‌मयातील साहित्यकृतींचा एक विशिष्ट वर्ग. संघम् साहित्य हे उपलब्ध असलेले सर्वांत प्राचीन तमिळ साहित्य असून, त्याचा काळ इ. स. पू. सु. ४०० ते इ. स. २०० असा सर्वसाधारण मानला जातो; तथापि त्याविषयी विव्दानांत मतभेद आहेत. ‘  संघम् ’ (  विव्दानांची संस्था ) ही संज्ञा बौद्ध व जैन यांनी मूळ ‘ कूडल ’ या तमिळ शब्दाच्या जागी कर्णमधुर उच्चरासाठी रूढ केली असावी, असे दिसते. साहित्यनिर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी व निर्माण झालेले साहित्य वाङ्मयीन कसोटयंवर पारखून घेण्यासाठी तमिळनाडूच्या पांडय राजांनी कवी व विव्दानांचे एक मंडळ (संघम् ) स्थापन केले. प्राचीन काळी तमिळनाडूमध्ये असे तीन संघम् एका मागोमाग एक स्थापन झाले व ते पांडयांच्या राज्यात भरभराटीस आले. पांडय राजांनी त्यांस राजाश्रय दिला. या संघमांनी तमिळ साहित्याच्या अभिवृद्धीस मोठा हातभार लावला. या तिन्ही संघम्‌ची पारंपरिक संक्षिप्त माहिती इरईयानारलिखित अहप्पोरूल या गंथाच्या  नक्कीररकृत  भाष्यात आढळते. पहिले ‘ संघम् ’ वा कविमंडळ ‘ तल्लेचंगम् ’ ह्या नावाने ओळखले जाई. ‘इडैचंगम् ’ हे दुसरे संघम् इ. स. पू. ४०० मध्ये स्थापन झाले; तर तिसरे कविमंडळ इ. स. दुसऱ्या शतकाच्या सुरूवातीस उत्तर मदुराईत स्थापन झाले. पहिल्या दोन संघम् काळात निर्माण झालेले वाङ्‍मय फारसे उपलब्ध नाही; मात्र दुसऱ्या संघम् काळातील एकमेव उपलब्ध रचना म्हणजे  तोल्काप्पियम्  नामक तमिळ व्याकरणगंथ होय. हा व्याकरण व साहित्यशास्त्रविषयक गंथ असला, तरी त्याचे विश्र्वकोशीय स्वरूप पाहता, त्यात अनेक विषयांची माहिती आढळते.

संघम्‌चे कार्य म्हणजे त्या काळी निर्माण झालेल्या प्रत्येक गंथाचे कठोर परीक्षण करून त्या कसोटीवर उतरेल त्याचे प्रामाण्य उद्घोषित करणे होय. संघम्‌चे सदस्य हे त्या त्या काळातील प्रतिभावंत कवी व व्युत्पन्न पंडित होते. अशा विद्वानांनी पुरस्कृत केलेल्या गंथांना समाजात आदराचे स्थान लाभत असे व त्यांना तत्कालीन राजदरबारात इनामे देऊन गौरविले जाई.

‘तल्लेचंगम् ’ हा पहिला संघम् दक्षिण मदुराईत अगस्त्य (अगत्तियनर) ऋषींच्या आधिपत्याखाली इ. स. पू. सु. सहाव्या शतकात स्थापन झाला. ह्या पहिल्या संघम्‌चे ५४९ सदस्य होते. या संघम्पुढे ४,४९९ लेखक-कवींनी आपापल्या रचना परीक्षणार्थ पाठविल्या आणि त्यांस मान्यता मिळविली. या संघम्‌ला ८९ राजांनी आश्रय दिला. त्यांपैकी सात राजे स्वत: कवी होते. या काळातील प्रमाणभूत गंथ म्हणजे अकत्तियम (अगस्त्यम), परिपदाल, मुदुनारई, मुदुकुरूकू आणि कलरिआविराई हे होत. त्यांचे प्राचीन मदुरा हे प्रमुख स्थान हिंदी महासागरात बुडाले व त्यांची एकही साहित्यकृती उपलब्ध झाली नाही.

‘इडैचंगम्’ हा दुसरा संघम् नीलंतरू तिरूवीर ह्या पांडय राजाने कपाट-पुरम् येथे स्थापन केला. ३,७०० कवींनी दुसऱ्या संघम्कडे आपापली काव्ये परीक्षणार्थ पाठविली. त्यांना संघम्ने अनुमती दिली. मापुरानम् , इसायी--नुनुक्कम्, भूत-पुराणम् ,कालि, कुरूकू, वेंदाळी  इ.त्यांतील काही अभिजात गंथ होत. ५९ राजांनी या संघम्चे संरक्षण केले. त्यांपैकी पाच राजे स्वत: कवी होते. या संघम्‌मधील एक मान्यवर व्याकरणकार व कवी तसेच अगस्त्य मुनींचा शिष्य तोल्काप्पियर किंवा तोल्काप्पियनर याने तोल्काप्पियम् (इ. स. पू. सु. तिसरे शतक) हा व्याकरणगंथ रचला. तो दुसऱ्या संघम्‌चा प्रमाणगंथ मानला जातो. या संघम्‌च्या गंथालयात सु. ८,१४९ पुस्तके होती. कपाटपुरम् ( अलयिवाई ) हे त्याचे पीठ नष्ट पावल्यावर हा संघम्‌ही संपुष्टात आला.

इ. स. पू. १५० च्या सुमारास उत्तर मदुराई येथे नक्कीरर ह्या अध्यक्ष व कवीच्या आधिपत्याखाली तिसरा संघम् स्थापन झाला. त्याचे कार्य इ. स. दुसऱ्या शतकाच्या अखेरपर्यंत चालू होते. या संघाचे ४९ सदस्य होते. पण ४४९ कवींनी आपल्या रचना संघाकडे परीक्षणार्थ व मान्यतेकरिता पाठविल्या. या संघाला ४९ राजांनी आश्रय दिला. नक्कीरर, इरयीयनार, कपिलर, परनर, सीत्तळई सात्तनर आणि पांडय राजा उग हे या काळातील अध्वर्यू कवी होत. तमिळ साहित्याच्या विकासाच्या दृष्टीने हा तिसरा संघम् काळ फार महत्त्वपूर्ण मानला जातो. या काळातील नेदुंथोकई, कुरूंथोकई, नत्रिनाई, आईंकुरूनुरू, पदित्रूप्पाट्टु, नूत्रईंबथू , परि-पादल, कूथू , वरी, पेरिसाई  आणि सित्रिसाई  ह्या प्रमुख साहित्यकृती असून, त्यांपैकी बहुतेक नष्ट झाल्या आहेत. काही सुदैवाने उपलब्ध आहेत.

तिसऱ्या संघम् काळातील काही गोपगीतसंगह ( लघुकाव्यसंगह )  डॉ. स्वामिनाथन् अय्यर यांनी परिश्रमपूर्वक प्रकाशात आणले आहेत. त्यांतील एट्टूत्तोगै (नत्रिनाई; आठ संग्रह ), पत्तुप्पाट्टु ( दहा लघुकाव्ये ) व पदिनेन्‌कीलकणक्कू (अठरा नीतिपर कविता ) हे तीन गंथ विशेषत्वाने प्रसिद्धीस आले. ते गदयपदय-पुष्पसमुदायाच्या स्वरूपाचे आहेत.

एट्टुत्तोगै मध्ये पुढील आठ संगहगंथ अंतर्भूत आहेत : कलिथोकई, परि-पादल, ऐनकुरूनूरू, पदित्रूप्पाट्टु, अहनानूरू, पुरनानूरू, नत्रिनाई  व कुरूंथोकई. कलिथोकई मधील १५० प्रेमविषयक गीते सुनीताच्या स्वरूपाची आहेत. परिपादल हा दीर्घ अवडंबरयुक्त ७० गीतांचा संगह आहे; परंतु त्यांतील फक्त २४ गीते उपलब्ध आहेत. त्यांत काही ईशस्तुतीची स्तोत्रे आहेत.  ऐनकुरूनूरू व पदित्रूप्पाट्टु या दोन संगहांत मुख्यत्वे चेर राजवंशाची प्रशस्ती आहे. ऐनकुरूनूरू  हा पाच कवींनी रचलेल्या ५०० प्रेमकवितांचा संगह आहे. तोल्काप्पियर याने प्रेमाच्या मीलन, विरहावस्था, प्रतीक्षा, ताटातूट आणि मनातल्या मनात कुढणे, अशा पाच अवस्था वर्णिल्या आहेत. तसेच नैसर्गिक पार्श्वभूमीचे वर्णन केले आहे. त्यांतील काव्य हे प्रेम, भक्ती, नीती, शौर्य अशा भावभावनांनी संपन्न आहे. या पदयरचना बव्हंशी मुक्तक या प्रकारच्या आहेत. पदित्रूप्पाट्टु या काव्यसंग्रहात प्रत्येकी दहा कडव्यांच्या दहा दीर्घकाव्यांचे संकलन आहे. ही वेगवेगळ्या आठ कवींनी रचली आहेत. या काव्याला ऐतिहासिक मूल्य असून, त्यांतील राजांच्या उल्लेखांवरून हे काव्य इ. स. दुसऱ्या-तिसऱ्या शतकांत परनर, कपिलर, पलई, कौथम्नार, काक्कई पादिनिआर कवींनी रचले असावे. सामाजिक इतिहासाच्या दृष्टीनेही यात काही मनोरंजक माहिती मिळते. उदा., स्त्रिया पाच पेडांची वेणी घालीत, सैनिक पुष्पमाला धारण करीत, मृत व्यक्तीस रांजणात झाडाखाली पुरत इत्यादी. एम्. श्रीनिवास आय्यंगार यांच्या मते पदित्रूप्पाट्टु   हे काव्य म्हणजे अपरिचित शब्द व पदावल्या, आर्ष व्याकरणविषयक रूपे व प्रत्ययरूपे, प्राचीन तमिळांच्या रूढी आणि चालीरीती यांचे जणू संग्रहालयच होय. पाचव्या काव्यात थोर चेर राजा सेंगुत्तुवन याचा उल्लेख आहे, तर सहावे काव्य काक्कई पादिनिआर या कवयित्रीने लिहिले आहे. १,८०० ओळींच्या या काव्यात फक्त १२ संस्कृत शब्द आढळतात. अहनानूरू हा चारशे प्रेमपर भावगीतांचा संगह असून, ही गीते परनर आणि मामूलनार यांनी रचली आहेत. यांत विरहदर्शक भाव व्यक्त करणाऱ्या कविता अधिक असून, प्रणयाचे वर्णन करणाऱ्या रोमांचकारी कविता थोडया आहेत. पुरनानूरू या काव्यसंग्रहात प्राचीन काव्यातून निवडलेले सु. ४०० वेचे असून, त्यात सु. १५० कवींनी काव्यलेखन केले आहे. या काव्यसंग्रहाचे वैशिष्टय असे, की त्यात दोन हजार वर्षांपूर्वीच्या तमिळांच्या दैनंदिन जीवनाची माहिती मिळते. त्यामुळे सामाजिक इतिहासाचे ते एक साधन म्हणता येईल. कुरूंथोकई हे ४०० श्लोकांचे प्रणयकाव्य असून, ते दोनशे वेगवेगळ्या कवींनी रचले आहे. परि-पादल या काव्यसंग्रहात ७० कविता होत्या, त्यांपैकी फक्त २४ उपलब्ध आहेत. त्याबरोबरच मयुराच्या नृत्याचे वर्णन त्यात डोकावते.

पत्तुप्पाट्टु   या दहा लघुकाव्यसंगहांतील दोन लघुकाव्यसंगह नक्कीरर याने, दोन रूद्रन कन्ननार याने आणि उर्वरित सहा संगह मरूथनार, कन्नयार, कपिलर आदी  सहा कवींनी रचले आहेत. ते करिकाल चोल, नेडुं-जेळीयन पांडय या राजांना अर्पण केले आहेत. ही सर्व काव्ये प्रशस्तिपर असून, निसर्गसान्निध्याच्या पार्श्र्वभूमीवर बेतली आहेत. नक्कीररच्या दोन लघुकाव्यांपैकी तिरूमुरूगर्रूप्पदै या संग्रहात भगवान मुरूग अर्थात कार्तिकेय याची स्तुती तसेच त्याच्या सहा मंदिरांची वर्णने आहेत. तमिळनाडूमधील शैव पंथी या गंथाला धर्मगंथ मानतात. नेटुनलवदै  या संग्रहात नक्कीररने रचलेली गीते प्रातिनिधिक मानली जातात. त्यांत पांडय राजा नेडुं-जेळीयन याची प्रशंसा आढळते. तो दीर्घकाळ युद्धभूमीवर गुंतून पडल्याने त्याची राणी राजवाडयात विरहाने तळमळत असल्याचे वर्णन प्रस्तुत काव्यात आहे. रूद्रन कन्ननारचे पेरूम्पानात्त्रूपदै हे काव्य पाचशे कडव्यांचे असून, त्यात कांचीपुरम्चे संस्मरणीय वर्णन आढळते. त्याच्या पत्तिनप्पालै या संग्रहात मनाला चटका लावणारे प्रणयकाव्य आहे. त्यात नायकाच्या मदनपीडित मनात युद्धभूमीवर जायचे की, प्रियतमेच्या सान्निध्यात राहायचे, असा संभम निर्माण होतो व अखेर तो प्रियतमेजवळ राहण्याचाच निर्णय घेतो, असे वर्णन आले आहे. या कवितेत प्रसंगोपात्त चोल वंशाच्या पुहार या राजधानीचे वर्णन आढळते.

उर्वरित सहा काव्यांपैकी मरूथनारच्या मदुरैक्कांची काव्यसंग्रहात पांड्य राजाची प्रशंसा असून, त्यातून प्राचीन तमिळ संस्कृतीचे दर्शन घडते. नप्पुथनारच्या मुल्लेप्पाट्टु काव्यातील सु. शंभर कडव्यांत युद्धावर गेलेल्या आपल्या पतिराजांच्या विरहाने झुरणाऱ्या राणीच्या व्यथा वर्णिल्या आहेत. ती राजाला भेटण्यास अतिशय आतुर, अस्वस्थ झाली असून, अनेक अशुभ भाकितांची, अपशकुनांची भक्ष्य बनली आहे. अखेर विरहाची दीर्घ रात्र संपते; राजाच्या आगमनाच्या दुंदुभी वाजतात आणि त्यांचे मीलन होते. अशीच पण थोडी वेगळी प्रेमकथा कपिलरच्या कुरिंचिप्पाट्टु काव्यात डोकावते. तीत एक अनुपम लावण्यवती एका पहाडी प्रदेशातील प्रमुखाला पाहता-क्षणीच त्याच्या प्रेमात पडते आणि अनेक अडथळे पार करून दोघे अखेर विवाह करतात. कौसिकनारच्या मलैपदुकदाम या सु. सहाशे कडव्यांच्या दीर्घकाव्यात सुंदर निसर्गवर्णनांच्या जोडीनेच नृत्यकलेविषयीचे चिकित्सक वर्णन आहे. एकूण या दहा लघुकाव्यांत निरनिराळे राजे, त्यांचे औदार्य, व्यापार, युद्धसामर्थ्य, लोकजीवन, पर्वतराजी यांची वर्णने आहेत. ही दहा लघुकाव्ये (गोपगीते) अतिशय संपन्न व परिपक्व अशा अभिजात शैलीत लिहिलेली वर्णनात्मक काव्ये असून, त्यांत मनोहर निसर्गचित्रणे आढळतात. तव्दतच त्यांत जीवनमूल्यांचे संयत चित्रणही आढळते. या गीतांतील सर्वांत लहान गीत १०३ ओळींचे, तर सर्वांत मोठे ७८२ ओळींचे आहे.

पदिनेन्‌कीलकणक्कू   हा अठरा नीतिपर कवितांचा संग्रह असून, ह्या रचना संस्कृत सुभाषितांप्रमाणे आहेत. या अठरांतील अकरा बोधपर, एक युद्धविषयक व उर्वरित सहा प्रेमविषयक काव्ये होत. तिरूवळ्ळुवर कवीचा  तिरूक्कुरळ  हा विश्र्वविख्यात अभिजात काव्यगंथ तिसऱ्या संघम्मधील अठरावा गंथ असून, त्याला ‘तमिळवेद ’ असे गौरवाने संबोधिले जाते. त्यात मुख्यत्वे धर्म, अर्थ व काम ह्या तीन पुरूषार्थांबाबतचे सूत्रवचनांच्या रूपातले चिंतन असल्याने त्याला ‘ मुप्पाल ’ ( त्रिवर्ग ) असेही म्हटले जाते. तमिळ साहित्यातील एक उत्कृष्ट नीतिगंथ म्हणून तो सर्वत्र गौरविला जातो. त्याची अनेक भारतीय व यूरोपीय भाषांत भाषांतरे झाली आहेत. ह्या गंथात एकूण १,३३० व्दिपदया असून त्यांतून तमिळ भाषेचे सामर्थ्य व समृद्घी प्रत्ययास येते. जैनमुनींनी रचलेल्या नालडियार  या नीतिपर काव्यगंथात प्रत्येकी चार ओळींचा एक असे ४०० श्लोक आहेत.

संघम् कवींच्या काव्याचा प्रेम हा प्रमुख विषय होता. त्याचबरोबर युद्धभूमीवरील वीरांचे पराक्रमही त्यांनी गौरवाने वर्णिले आहेत. धीरोदात्तता व प्रतिष्ठा या वर्तनगुणांनी युक्त अशा वीरवृत्तीचे गौरवपूर्ण चित्रण अनेक काव्यांत आढळते; दिलेले वचन पाळताना प्राणाचीही पर्वा न करणे, हा गुण त्यात आढळतो. राजाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या तसेच प्रजेचे हक्क यांची वर्णने त्यांच्या काव्यात आढळतात. राजाची कृत्ये जर जनहिताच्या आड येत असतील, तर त्यांविरूद्ध जाऊन जनतेच्या हक्कांच्या बाजूने उभे राहण्याचे धैर्यही कवींनी त्या काळात दाखविले. प्रणयभावनांच्या वेगवेगळ्या आविष्कारांना अनुरूप ठरणारी निसर्गवर्णने पार्श्वभूमीदाखल त्यांनी चित्रित केली. काव्यातले प्रेम हे वेगवेगळ्या निसर्गदृश्यांच्या वा भूवर्णनांच्या पार्श्वभूमीवर वर्णिले जाते. प्रेमाच्या वेगवेगळ्या अवस्थांशी व भावजीवनाशी निगडित, अशा ह्या पार्श्वभूमी आहेत. हे संघम् प्रणयकाव्याचे अनन्यसाधारण वैशिष्टय होय. तत्कालीन समाजजीवनातील वेगवेगळ्या स्तरांतील लोकांच्या राहणीमानाचे चित्रणही ह्या कवींनी आपल्या काव्यातून केले.

संघम् साहित्यात भाषेचा नेमकेपणा, अचूक व अर्थपूर्ण शब्दांची निवड, तसेच शब्दांची काटकसर, अभिव्यक्तीचा मनाला थेट भिडणारा सरळपणा, सुबोध व सुस्पष्ट अर्थवत्ता इ. वैशिष्टये आढळतात.

संघम्‌च्या तीन वाङ्‌मयीन कालखंडांपैकी पहिल्या दोन संघम्‌चा वृत्तांत, त्यांचा अमर्याद कालनिर्देश, देव व अगस्त्यासह अन्य सभासद आणि या संघम्‌चा नाश आदी गोष्टी सकृतदर्शनी अनैतिहासिक वाटतात; केवळ हा कल्पनाविलास असावा, असे दिसते. तथापि पौराणिक परंपरा,  देवसदृश कीर्तिमान पुरूषांना दिलेली देवांची नावे आणि उत्तरकालीन गंथांतील वाङ्‌मयीन उल्लेख, तसेच तीन स्वतंत्र राजधान्या यांवरून ही परंपरा अखंडित असावी, असे काही विव्दानांचे मत आहे. असे असले, तरी तमिळ साहित्यातील या कालखंडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या काळात प्रचंड काव्यरचना झाली. ज्ञानाच्या सर्व शाखांवर लेखन झाले. याशिवाय राष्ट्रीय जागृती झाली आणि विविध कला तसेच शास्त्रे यांची अभिवृद्घी होऊन परिणामत: तमिळांचे वैभव वाढले आणि सत्ताही दीर्घकाळ टिकली. त्यामुळे या काळास ‘संघम् युग ’ ही सार्थ उपाधी लाभली.

संदर्भ : 1. Dikshitar, V. R. R. Studies in Tamil Literature and History, London, 1930.

2. Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Unity, Bombay, 1990.

3. Pillai, M. S. Purniligam, Tamil Literture, Tinnenelly, 1929.

लेखक: श्री. दे. इनामदार; सु. र. देशपांडे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate