অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुनीत

सुनीत

भावकवितेचा एक प्रकार. इंग्रजीतील ‘ सॉनेट ‘ ह्या काव्यप्रकाराचा ‘सुनीत’ हा मराठी अवतार आहे. सॉनेट या इंग्रजी काव्यप्रकाराचे मूळ इटालियन ‘सोनेत्तो’ (छोटे गीत) या गीतप्रकारात असून, हे गीत वाद्यसाथीसह  गायिले जाई. तेराव्या शतकात इटलीतील सिसिलियन काव्य संप्रदायातील कवींनी हा काव्यप्रकार निर्माण केला. जाकोमो दा लेंतीनो (सु. ११९५–१२४०) हा या काव्यप्रकाराचा जनक मानला जातो. त्याने सु. पंचवीस सुनीते रचली व हा काव्यप्रकार सफाईने हाताळून त्याचे तंत्र पूर्णत्वास नेले. चौदाव्या शतकात दान्ते (१२६५–१३२१) व पीत्रार्क  (१३०४– ७४) या कवींनी सुनीत या काव्यप्रकाराला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. विशेषतः पीत्रार्कने सुनीतरचनेचा नवा प्रकार निर्माण करून तो पूर्णत्वाला नेला. त्याच्या Canzoniere या भावगीत-संग्रहात त्याची ३१७ सुनीते आहेत. पीत्रार्कपद्घतीच्या सुनीतरचनेचे अनुकरण मोठ्या प्रमाणात केवळ इटलीतच नव्हे, तर पोर्तुगाल, फ्रान्स, स्पेन, इंग्लंड या देशांतही झाले. सोळाव्या शतकात इंग्रजी काव्यात इटालियन सोनेत्तोचा सॉनेट हा इंग्रजी अवतार मुख्यत्वे सर टॉमस वायट  (सु. १५०३–४२) आणि अर्ल ऑफ हेन्री हॉवर्ड सरी, (सु. १५१७– ४७)  या दोन कवींच्या प्रयत्नांतून उदयाला आला. पीत्रार्कची इटालियन सुनीते वायटने इंग्रजीत अनुवादिली व हा काव्यप्रकार इंग्रजीत आणला. सरीने इटालियन सुनीताच्या रचनाबंधात काही अंतर्गत बदल करून त्याला इंग्रजी वळण दिले. सरीच्या मृत्यूनंतर साँग्ज अँड सॉनेट्स  हे त्याच्या गीतांचे व सुनीतांचे संकलन रिचर्ड टॉटल या प्रकाशकाने प्रसिद्घ केले (१५५७); त्यात वायट याचीही काही सुनीते आहेत. टॉटल्स मिसेलनी  ह्या नावाने ते विशेष प्रसिद्घ आहे. सरीची नेटकी, नितळ सुनीतरचना इंग्रजी सुनीताच्या विकासात महत्त्वाची ठरली. सुनीताच्या रचनाबंधाच्या दोन पद्घती यातून विकसित झाल्या. मिल्टन (१६०८– ७४) आणि शेक्सपिअर   (१५६४–१६१६) हे या दोन रचनापद्घतींचे मुख्य पुरस्कर्ते मानले जातात. मिल्टनने इटालियन वा पीत्रार्क रचनापद्घतीचा अवलंब केला; तर शेक्सपिअरने सरीने रुढ केलेला सुनीताचा रचनाबंध वापरुन स्वतःची सुनीते लिहिली. शिवाय सुनीत या रचनाबंधाच्या विषयाची व्याप्तीही या दोघा कवींनी वाढवली. त्यामुळे सुनीत हा रचनाबंध पूर्वीच्या सुनीतांप्रमाणे केवळ प्रणयभावनेच्या आविष्कारापुरताच मर्यादित राहिला नाही. उदा., मिल्टनने राजकीय व धार्मिक विषयांवर सुनीते लिहिली. तसेच त्याने स्वतःच्या अंधत्वासारख्या व्यक्तिगत अनुभूतीवरही सुनीते लिहिली, तर जॉन डन (१५७२– १६३१) या इंग्रज कवीने धार्मिक सुनीते लिहिली. उत्तरोत्तर या काव्यप्रकाराच्या विषयांची व्याप्ती वाढतच गेली. काव्यमाध्यमातून व्यक्त होऊ शकणारे जवळजवळ सर्व विषय सुनीतरचनांतून पाश्चात्त्य कवींनी हाताळले. भावगर्भ व चिंतनशील, तसेच क्षणिक भावानुभूतींची आणि शाश्वत विषयांचीही अभिव्यक्ती सुनीतरचनेतून होत गेलेली दिसून येते. एकोणिसाव्या शतकातील एलिझाबेथ ब्राउनिंग (१८०६–६१) या कवयित्रीची सुनीते इंग्रजी साहित्यात विशेष प्रसिद्घ आहेत. सॉनेट्स फ्रॉम द पोर्तुगीज (१८४७) या तिच्या सुनीत संग्रहात एकूण ४४ सुनीते अंतर्भूत असून, तिचा पती रॉबर्ट ब्राउनिंग विषयीच्या तिच्या उत्कट प्रेमाची अभिव्यक्ती त्यांत आढळते. डँटी ग्रेबिएल रोसेटी  (१८२८– ८२) या इंग्रज कवीची बॅलड्स अँड सॉनेट्स (१८८१) या संग्रहातील सुनीतेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ‘द हाउस ऑफ लाइफ ‘ (१८७६) ही त्याची सुनीतमाला उत्कट प्रणयभावनेच्या आविष्काराच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय रचना मानली जाते. विसाव्या शतकातील या काव्यप्रकाराचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणून रायनर मारीआ रिल्के (१८७५–१९२६) या जर्मन भावकवीच्या डी सोनेट आन् ओर्फेउस (१९२३; इं. भा. सॉनेट्स टू ऑर्फीअस, १९४६) या सुनीतसंग्रहाचा निर्देश करता येईल. सारांश, पाश्चात्त्य काव्य वाङ्‌मयात सुनीत हा एक लोकप्रिय, प्रमुख व वैशिष्ट्यपूर्ण असा काव्यप्रकार मानला जातो. जवळजवळ पाच शतकांच्या प्रदीर्घ कालखंडातील ज्येष्ठ व प्रमुख पाश्चात्त्य कवींना या काव्यप्रकाराचे आवाहन व आकर्षण सतत खुणावत राहिले आहे.

सुनीत हा चौदा ओळींचा रचनाबंध असतो. त्यासाठी ‘ आयँबिक पेंटॅमिटर’ हे वृत्त इंग्रजीत वापरले जाते. इटालियन वा पीत्रार्क-रचनापद्घतीत ह्या चौदा ओळी आठ व सहा अशा विभागल्या जातात. अष्टकात (ऑक्टेव्ह ) दोन चतुष्पद्या व नंतरच्या सहा ओळींत ( सेस्टेट ) दोन त्रिपद्या असतात. पहिल्या आठ ओळींत एखादी समस्या मांडली जाते; एखादा प्रश्न उपस्थित केला जातो; किंवा कसला तरी भावनिक ताण प्रकट केला जातो. नंतरच्या सहा ओळींत त्या समस्येची सोडवणूक केली जाते, प्रश्नाचे उत्तर दिले जाते वा भावनिक ताण सैल केला जातो. ह्याला कलाटणी (टर्न) म्हणतात. सुनीतामध्ये यमकांचाही विशिष्ट पद्घतीचा क्रम असतो. इटालियन रचनापद्घतीत हा क्रम पहिल्या आठ ओळींसाठी ‘अ ब ब अ अ ब ब अ’ (a b b a a b b a) आणि नंतरच्या सहा ओळींसाठी ‘क ड इ क ड इ, क ड क क ड क किंवा क ड इ ड क इ’ (c d e c d e, c d c c d c, c d e d c e) असा असतो. शेक्सपिअर वा अन्य इंग्रजी पद्घतीच्या सुनीतरचनेत सुनीतामधल्या चौदा ओळींची विभागणी बारा व दोन अशी असते. पहिल्या बारा ओळींत ज्या विचाराचा, भावनेचा वा कल्पनेचा परिपोष करीत आणला असेल, त्याला शेवटच्या दोन ओळींत कलाटणी दिली जाते, शेक्सपिअर पद्घतीच्या सुनीतरचनेत यमकांचा क्रम ‘अ ब अ ब क ड क ड इ फ इ फ ग ग’ (a b a b c d c d e f e f g g) असा असतो.

सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.

मराठी सुनीतरचनेचा पाया केशवसुतांनी (१८६६–१९०५) घातला. त्यांनी चौदा ओळींच्या ह्या रचनाप्रकाराला ‘ चतुर्दशक ‘ असे नाव दिले. ‘मयूरासन आणि ताजमहाल’ हे त्यांचे पहिले स्वतंत्र सुनीत (१८९२) होय. कवी भा. रा. तांबे (१८७४–१९४१) यांनीही काही सुनीते लिहिली. गोविंदाग्रज, बालकवी आणि बी ह्या कवींनीही काही सुनीतरचना केल्या. मात्र सुनीताचा विशेष पुरस्कार आणि निर्मिती रविकिरण मंडळातील कवींनी केली. रविकिरण मंडळातील एक प्रमुख कवी माधव जूलियन् (१८९४–१९३९) यांची १०१ सुनीते त्यांच्या तुटलेले दुवे  (१९३८) या संग्रहात एकत्रित केलेली आहेत. १९४० नंतर सुनीतरचनेचे प्रमाण मराठी काव्यात कमी होत गेले.

सुनीतासाठी मराठीत शार्दूलविक्रीडित हेच वृत्त अधिक प्रचलित होते. ह्या वृत्ताचा वापर सुनीतलेखनासाठी मराठीमध्ये सर्वाधिक केला गेला. सॉनेटला प्रतिशब्द म्हणून सुनीत हा शब्द रविकिरण मंडळातील श्री. बा. रानडे व माधव जूलियन् या कवींनी रुढ केला. त्या आधी श्री. नी. चापेकर यांनी त्यासाठी ‘ स्वनितक ‘ असा शब्द सुचविला होता. त्याचप्रमाणे चतुर्दशपदी, गीतिका, स्वनित ही नावेही सुनीतरचनेसाठी सुचविली गेली; परंतु सुनीत हा शब्द सॉनेट ह्या शब्दाशी नाददृष्टया जास्त जवळचा आणि सुनीतामधील विशिष्ट सुविहित अर्थरचना व्यक्त करणारा म्हणून, तसेच सुनीतांची विपुल रचना करणाऱ्या रविकिरण मंडळाच्या पुरस्कारामुळे रुढ झाला असावा.

शेक्सपिअर पद्घतीच्या सुनीतरचनेत बारा व दोन अशी १४ ओळींची जी अर्थदृष्ट्या विभागणी होत असे, तीत पहिल्या बारा ओळींत ज्या विचाराचा परिपोष करीत आणला असेल, त्याला शेवटच्या दोन ओळींत कलाटणी देणे कठीण होते. ती परिणामकारक व्हायची, तर विशेष चमत्कृती वा विरोध आणणे आवश्यक असते. हे अनेक वेळा अशक्य होत असल्याने पहिल्या बारा ओळींतील अर्थाचेच पुनर्वचन विशेष आकर्षक अशा सूत्रीने करावे लागते. उदा., केशवसुतांचे ‘ आम्ही कोण ‘ हे सुप्रसिद्घ सुनीत. त्यात पहिल्या भागात कवींची थोरवी सांगितल्यानंतर शेवटच्या दोन ओळींत तोच विचार अधिक प्रभावीपणे आणि अभिनिवेशाने मांडला आहे :

‘आम्हाला वगळा-गतप्रभ झणी होतील तारांगणे।

आम्हाला वगळा-विकेल कवडीमोलावरी हे जिणे॥’

१९६० च्या सुमारास मराठी नवकवितेत विंदा करंदीकर यांनी मुक्त सुनीते लिहून या काव्यप्रकारात प्रयोगशीलता व नावीन्य आणले. त्यांनी तेरा वा पंधरा ओळींची सुनीतरचना केली; शिवाय त्यात वृत्त व यमकातील संगतीही पाळली नाही. मुक्तछंदातले स्वातंत्र्य व पसरटपणाला आवर घालणारी बंदिस्त रचना ही या मुक्त सुनीतांची वैशिष्ट्ये होत. सुनीत या काव्यप्रकाराचा मूळ गाभा कायम ठेवून केलेला प्रयोगशील रचनात्मक विस्तार, असे या मुक्त सुनीतांचे स्वरूप होते. दिलीप चित्रे यांनीही काही मुक्त सुनीते लिहिली. पुढे विलास सारंग यांनी प्रति-सुनीते लिहून प्रयोगशीलतेची आणखी एक दिशा सुचित केली.

संदर्भ : 1. Fuller , John, The Sonnet, London, 1978 .

२. कुलकर्णी, वि. म.; बुद्घिसागर, मा. ग. संपा. मराठी सुनीत, १९५१.

लेखक: रा. श्री. जोग ; अ. र कुलकर्णी ; श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate