অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सेतुबंध

सेतुबंध

माहाराष्ट्री प्राकृतातील सर्वोत्कृष्ट महाकाव्य. कर्ता प्रवरसेन ( पाचवे शतक). ह्या महाकाव्याचे कथानक मुख्यतः वाल्मीकिरामायणाच्या युद्धकांडावरून घेतले आहे. लंकेवर स्वारी करण्यासाठी वानरसेनेने बांधलेला सेतू आणि त्यानंतर रामाने केलेला रावणवध हा या सेतुबंधाचा विषय. ह्या महाकाव्याचे १५ आश्वास (सर्ग) असून गाथा व श्लोक धरून एकूण पद्यसंख्या १२९१ आहे. त्यांपैकी १२४७ गाथा (आर्या-गीती) असून उरलेले ४४ विविध वृत्तांतील श्लोक आहेत. ह्या महाकाव्याच्या कथेची मांडणी अशी : सीतेचा शोध घेण्यासाठी वानर निरनिराळ्या दिशांना जातात. सीतेचा शोध लागल्यावर राम आपली वानरसेना घेऊन लंकेकडे प्रयाण करतो. तिथे विराट सागराचे दर्शन घडल्यानंतर तो सागर कसा पार करावा हा प्रश्‍न त्याला पडतो. राम समुद्राला वाट देण्याची प्रार्थना करतो; पण प्रार्थनेपेक्षा रामबाण अधिक उपयोगी पडतो आणि सागरदेव रामाला 'माझ्यावर सेतू बांध' असा सल्ला देतो. मोठमोठी गिरिशिखरे वानर समुद्रात फेकतात; पण सेतू बांधला जात नाही. सुग्रीवाच्या विनंतीवरून नल ते काम हाती घेऊन योजनापूर्वक सेतू बांधतो. त्यानंतर समुद्र पार करून वानरसैनिक सुवेल पर्वतावर छावणी उभी करतात. ह्या सैन्याच्या आगमनाप्रमाणेच रावणाचा धाकटा भाऊ विभीषण हा रामाला मिळाल्याची वार्ता मिळाल्याने लंकेत घबराट उडते. सीता रावणाचा सतत अव्हेर करीत असल्यामुळे रावण तिला आपल्या मायेने निर्माण केलेले रामाचे शिर दाखवतो. सीता मूर्च्छित पडते व शुद्धीवर आल्यावर विलाप करते; पण राम सुरक्षित असून वानरसेना युद्धार्थ आली आहे ऱ्हे सत्यही तिला लवकरच कळते. युद्ध सुरू होते. रावणाचा मुलगा मेघनाद (इंद्रजित) रामलक्ष्मणांना नागपाशात बद्ध करतो. त्यामुळे रामाच्या सैन्यात हाहाकार उडतो; पण रामाने गरुडाचे स्मरण केल्यावर गरुड त्यांना सोडवतो. नंतर झालेल्या घनघोर युद्धात अनेक राक्षसवीर धारातीर्थी पडल्यावर रावण रणांगणात प्रवेश करतो. नंतर कुंभकर्णही युद्धात येतो. राम कुंभकर्णाला आणि लक्ष्मण मेघनादाला ठार मारतो. अखेर राम-रावण यांचे युद्ध होऊन राम रावणाला ठार मारतो. रावणावर अग्निसंस्कार केल्यानंतर व सीतेच्या अग्निदिव्यानंतर राम तिला घेऊन अयोध्येला जातो.

प्रवरसेनाने वाल्मीकीच्या रामकथेत फारसा फरक केलेला नसला, तरी त्याला मर्यादित गाथासंख्येत रामकथा मांडावयाची होती. त्यामुळे त्याने भावनोत्कट आणि नाट्यमय प्रसंग निवडून त्यांत आवश्यक तेथे संक्षेप-विस्तार करून मांडणी केली. अशा मांडणीमुळे कथानकाला गतिमानता प्राप्त झाली आहे. वाल्मीकिरामायणातला सेतुबंध हा ह्या महाकाव्यातल्या सेतुबंधाइतका सविस्तर सांगितलेला नाही. ह्या महाकाव्याचा मात्र तो मुख्य विषय असल्यामुळे त्याच्यासाठी ५ ते ८ हे चार आश्वास कवीने योजिलेले आहेत. वाल्मीकिरामायणात मेघनादाचा पराक्रम व चरित थोडे सविस्तर दिलेले आहे. ह्या महाकाव्यात मात्र ते संक्षिप्त स्वरूपात येते. सेतुबंधाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात समुद्र ही कथानकातील एक व्यक्तिरेखाच असल्यासारखी वाटते. प्रवरसेनाने रामाच्या लंकाविजयातील काही ठळक घटना अतिशय हृदयंगम रीतीने रंगविल्या आहेत. त्याने केलेली निसर्गवर्णनेही जिवंत आहेत. त्याचे व्यक्तिरेखनही प्रभावी आहे. उदा., राम हा एक धीरोदात्त नायक असला, तरी भावनाशील, इतरांसारखाच सुखदुःख, आशानिराशा अशा द्वंद्वांचा मनावर परिणाम होणारा असा दाखविला आहे. रावण हा राक्षस असला, तरी त्याच्या स्वभावाची चांगली बाजूही त्याने दाखवली आहे. प्रवरसेनाची शैली आलंकारिक आहे. सेतुबंध  हे प्राकृत काव्य असले, तरी अलंकारांची उदाहरणे देताना त्यातील पद्ये संस्कृत कवींच्या बरोबरीने घेतली आहेत.

लेखक: ग. वा. तगारे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate