অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गोवर्धनराम माधवराम त्रिपाठी

गोवर्धनराम माधवराम त्रिपाठी

(२० ऑक्टोबर १८५५ –४ जानेवारी १९०७). युगप्रवर्तक गुजराती कादंबरीकार, कवी व विचारवंत. त्यांचा जन्म नडियाद येथे नागर ब्राह्मण कुलात झाला. शिक्षण नडियाद आणि मुंबई येथे. त्यांचे सुरुवातीचे आयुष्य हलाखीत गेले. १८७५ मध्ये ते एल्फिन्स्टन कॉलेजमधून बी. ए. झाले. १८७९ ते ८३ पर्यंत त्यांचे वास्तव्य भावनगरला होते. १८८३ मध्ये ते एल्‌एल्‌. बी. झाले आणि त्यांनी १८८४ मध्ये मुंबईस आपला वकिली व्यवसाय सुरू केला; तथापि त्यात त्यांचे मन रमले नाही. वयाच्या त्रेचाळिसाव्या वर्षी भरभराटीत असलेला आपला वकिली व्यवसाय सोडून ते नडियादला आले आणि त्यांनी स्वतःस साहित्यसेवेस संपूर्णपणे वाहून घेतले.

गुजराती साहित्यातील दलपत–नर्मद यांच्या सुधारक युगानंतरच्या पंडित युगाचे प्रतिनिधित्व करणारे गोवर्धनराम त्रिपाठी हे श्रेष्ठ लेखक होत. त्यांनी संस्कृतिचिंतन व साहित्यसेवा यांत आपले जीवन वेचले. विद्यापीठाच्या उच्च शिक्षणातील संस्कृताध्ययन, रामकृष्ण परमहंस, विवेकानंदांनी केलेली धर्मजागृती, राष्ट्रीय आंदोलनामुळे निर्माण झालेली राष्ट्रीय अस्मिता व न्यायमूर्ती तेलंग (१८५०–९३) यांच्या वैचारिक प्रभावातून गोवर्धनरामांचा पिंड तयार झाला होता. गुजराती साहित्यात अढळ स्थान प्राप्त करणारी सरस्वतीचंद्र ( ४ भाग, १८८७, ९२, ९९, १९०१) ही त्यांची बृहत्‌ कादंबरी युगप्रवर्तक मानली जाते. ह्या कादंबरीत त्यांनी सरस्वतीचंद्र व कुमुदसुंदरीची प्रणयकथा वर्णन केली असून धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्या पुरुषार्थांचे आणि पर्यायाने भारतीय जीवनाचे साकल्याने दर्शन घडविले आहे. गोवर्धनरामांनी तीत उत्कृष्ट गद्यलय साधली असून शैलीत आशयानुकूल वैचित्र्य आहे. विविध भारतीय भाषांत तिची भाषांतरे झाली असून तिच्यावर हिंदीत चित्रपटही निघाला. स्नेहमुद्रा (१८८९) हे ११० काडांमध्ये विभागलेले त्यांचे प्रदीर्घ काव्य आहे. आपल्या पत्नीच्या मृत्यूची घटना या निर्मितीचे निमित्त असली, तरी कवीने स्वतंत्र काव्यकथा कल्पून प्रणयाच्या स्थूल व सूक्ष्म अंगोपांगांची प्रत्ययकारी वर्णने व मीमांसा या काव्यात केलेली आहे. त्यात मनोहर निसर्गवर्णन असून त्यांच्या चिंतनशील शैलीचाही प्रत्यय येतो. लीलावती जीवनकला (१९०५) ही गोवर्धनरामांनी वात्सल्यभावाने लिहिलेली स्वतःच्या मृतकन्येची जीवनकथा असून, तीत व्यक्तीदर्शनापेक्षा चिंतनाचा भाग अधिक आहे. लीलावतीच्या निमित्ताने त्यांनी त्यात श्रेय व प्रेय, यजमान व आतिथ्यधर्म इ. विषयांची चर्चा केली आहे. नवल ग्रंथावलि (१८९१) मध्ये नवलराम (१८३६–८८) यांच्या ग्रंथांचे संकलन आणि चरित्र आहे. दयारामनो अक्षरदेह (१९०८) मध्ये भक्तकवी दयाराम (१७७७–१८५२) याचे व्यक्‍तिमत्त्व आणि वाङ्‌मय यांबाबतचे त्यांचे अध्ययन ग्रथित आहे. क्‍लासिकल पोएट्स ऑफ गुजरात (१८९४) हा त्यांचा इंग्रजी ग्रंथ आहे. स्वतःच्या खाजगी जीवनाचे चिंतनपूर्ण सार त्यांनी इंग्रजीत लिहिलेल्या स्क्रेपबुक ह्या दैनंदिनीत आले आहे. त्यांच्या विचारधन व अर्थगंभीर प्रौढ शैलीचे साक्षरजीवन (निबंध, अपूर्ण, १८९९–१९०३ क्रमशः, ग्रंथरूपात १९१९) व अध्यात्मजीवन हे दोन ग्रंथ असून त्यांत त्यांचे दार्शनिक विचार प्रकट झाले आहेत. क्षेमराज अने साध्वी, सरस्वती अने माया ही त्यांची दोन अपूर्ण नाटके होत. पाश्चात्य हास्यरस, वडनगरानागर ब्राह्मणोनी वंशावळी, सती चुनी ( १९०३), ‘कविता, काव्य अने कवी ए विषये मिताक्षर’, ‘आध्यात्मिक कवि अने तेनी कविता’ इ. बरेचसे त्यांचे लेखन असून त्यातील काही अद्यापि अप्रकाशित आहे.

गुजराती साहित्यावर सरस्वतीचंद्रचा अनन्यसाधारण प्रभाव पडला. नंतरच्या अनेक लेखकांनी तिच्या विविध अंगांचे अनुकरण करून आपल्या कादंबऱ्‍या लिहिल्या. गुजराती साहित्यातीलच नव्हे, तर भारतीय साहित्यातील एक उत्कृष्ट कादंबरी म्हणून तिचा उल्लेख करावा लागेल. गुजराती साहित्यात युगप्रवर्तक कादंबरीकार म्हणून गोवर्धनरामांना मानाचे स्थान आहे. नव्याने स्थापन झालेल्या गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्षपद १९०५ मध्ये भूषविण्याचा आद्य मानही त्यांना देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. मुंबई येथे ते निधन पावले.

लेखक : सु. न. पेंडसे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate