অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तिरुपति–वेंकटकवुलु

तिरुपति–वेंकटकवुलु

दिवाकर्ल तिरुपतिशास्त्री (१८७१–१९१९) व चेळ्ळपिळ्ळ वेंकटशास्त्री (१८७०–१९५०) हे दोन कवी तिरुपति–वेंकटकवुलु या जोड नावाने तेलुगू साहित्यात प्रसिद्ध आहेत. विख्यात वैय्याकरणी चर्ला ब्रम्हय्याशास्त्री यांच्याकडे विद्यार्जन करीत असतानाच या दोघांची कायम मैत्री जडली. वेंकटशास्त्री हे प्रतिभासंपन्न कवी होते. त्यांच्या सहवासाने तिरुपतिशास्त्रीही काव्यरचना करू लागले. पंडितराय इ. कवींच्या मार्गाने जाऊन रसिकांना काव्यानंद देण्याची दोघांची प्रतिज्ञा होती. प्राचीन काव्याचे भरतवाक्य आणि तेलुगूतील आधुनिक काव्याची नांदी म्हणण्याचे श्रेय दोघांना आहे. ते दोघेही तेलुगू व संस्कृतचे पंडित होते. त्यांनी आंध्र प्रदेशातील सर्व भागांत अविरत फिरून आपले काव्य राजदरबारापासून तो गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोचविले व अफाट लोकप्रियता मिळविली. त्यांनी तेलुगूतील पारंपरिक ‘शतावधान’ हा काव्यप्रकार फारच लोकप्रिय केला. सामान्य माणसाच्या ठिकाणी काव्याबाबतची अभिरुची निर्माण करण्याचे श्रेयही त्यांच्याकडेच जाते. त्यांना आपल्या कवित्वशक्तीबाबत सार्थ अभिमान आणि आत्मविश्वास होता.

एडविन आर्नल्डच्या लाइट ऑफ एशियावरून अनुवादित बुद्धचरितमु (१९०२) तसेच देवी भागवत आणि लक्ष्मणापरिणय ही प्रबंधकाव्ये, श्रवणानंदमु (१९०९) हे खंडवाक्य, पाणिगृहिता (१९२९) हे कथाकाव्य, गीरतमु (१९३४)  हे महाभारतावरील विडंबनकाव्य, नानाराजसंदर्शन हा धनिकस्तुतिपर काव्यांचा संग्रह, मृच्छकटिक, मुद्राराक्षस इ. संस्कृत नाटकांचे अनुवादन, सु. पंधरा स्वतंत्र नाटके, जातकचर्या (१९३४) हे आत्मचरित्र इ. या दोघांची संयुक्त साहित्यनिर्मिती आहे.

तिरुपतिकवीच्या देहावसानानंतर वेंकटकवीने सुशीला (१९४१), पतिव्रता (१९४१), गोदेवी, पूर्व हरिश्चंद्रचरित्रमु (१९४६), मल्लेश्वरविज्ञप्ति, जयंती (१९३७) इ. ग्रंथ रचिले.

श्रवणानंदमु आणि पाणिगृहिता या काव्यांत समाजसुधारणेसाठी वेश्याव्यवसायाच्या निर्मूलनाची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली. भावार्थ, वृत्त व भाषा या दृष्टीने ही काव्ये मोठाच क्रांतिकारक बदल सुचवितात. बुद्धचरितमु  ही पुराणेतर महापुरुषावरील पहिलीच रचना होय. यातील बुद्ध हा लोकोत्तर असूनही मानवच आहे. यशोधरेचा त्याग करून जाणाऱ्या राजपुत्र सिद्धार्थाच्या मंनःस्थितीचे वर्णन त्यात मोठ्या आत्मीयतेने केले आहे. या कवींची शैली इतकी एकरूप होती, की कोणत्याही काव्यातील कोणता भाग कोणाचा आहे, हे कळणे शक्य नव्हते. त्यांनी तेव्हाच्या काव्याला नवी दिशा देऊन अनेक तरुणांना प्रेरणा दिली. त्यांच्या संयुक्त रचनेच्या प्रथेचे नंतर काही जणांनी अनुकरण केले.

पूर्वीच्या मद्रास राज्याने वेंकटकवीचा ‘राजकवी’ म्हणून गौरव केला. हा गौरव प्राप्त झालेले ते पहिलेच तेलुगू कवी होत.

संदर्भ : १) भीमसेन ‘नीर्मल’ संपा.

२) कवि–श्री माला : तिरुपति–वेंकट कवुलु, वर्धा, १९६२.

लेखक : व्यं. द. टिळक

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate