অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

यूझेफ ईग्नाट्सी क्राशेव्हस्की

यूझेफ ईग्नाट्सी क्राशेव्हस्की

जन्म : २८ जुलै १८१२

मृत्यू : १९ मार्च १८८७

पोलिश कादंबरीकार. वॉर्सा येथे जन्म. रशियन सत्तेविरुद्धच्या कटात सामील; त्यामुळे कारावास (१८३०). विल्नो विद्यापीठाची पदवी (१८३२). त्यानंतर व्हॉलिन्य येथे लेखन, कृषिव्यवसाय व समाजकार्य यांत त्याने काही काळ व्यतीत केला. विल्नो येथे Ateneum ह्या समालोचनात्मक नियतकालिकाचे संपादन व प्रकाशन केले (१८४९–५२). वॉर्सा येथील Gazeta Codzienna (इं. शी. डेली गॅझेट) ह्या दैनिकाचा तो काही काळ संपादक होता (१८५९–६२). १८६३ मध्ये काही राजकीय कारणाने देश सोडावा लागल्याने तो ड्रेझ्डेन येथे स्थायिक झाला. पुढे फ्रान्सच्या वतीने हेरगिरी केल्याच्या आरोपावरून त्यास शिक्षा झाली (१८८४); परंतु तो जामिनावर सुटला (१८८५). त्यानंतर तो स्वित्झर्लंडला गेला.

क्राशेव्हस्की हा मुख्यतः कादंबरीकार होता.Poeta i Swiat(१८३९, इं. शी. द पोएट अँड द वर्ल्ड) ही त्याची पहिली यशस्वी कादंबरी. याशिवाय त्याने शंभरांहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या असून त्यांतील बऱ्याचशा कादंबऱ्यांची कथानके पोलंडच्या इतिहासाशी निगडित आहेत. वाङ्‍मयीन दृष्टीने त्यांतील सर्व श्रेष्ठ आहेत असे म्हणता येत नसले, तरी पोलंडमधील फ्रेंच कादंबऱ्यांचा बहुतेक वाचकवर्ग त्याने आपल्याकडे वळवून घेतला. त्याचे कादंबरीलेखन त्याच्यानंतरच्या अनेक लेखकांना प्रेरक वाटले.

Chata za Wsia(१८५४-५५, इं. शी. द हट अ‍ॅट द व्हिलेज एंड), Morituri (१८७४),Jermola (१८५७, इं. भा. जेर्मोला द पॉटर, १८९१) व Stara Basn, (१८७६, इं. शी. अ‍ॅन एन्शंट टेल) या त्याच्या काही उल्लेखनीय कादंबऱ्या आहेत. Anafielas (१८४०–४३) हे लिथुएनियावरील महाकाव्य आणि Mio’d Kasztelanski(१८६०) हे नाटकही त्याने लिहिले आहे.  रशियन सत्तेविरुद्ध झालेल्या बंडानंतर (१८६३) तत्कालीन भावनोद्रेक प्रतिबिंबित करणाऱ्या द चाइल्ड ऑफ ओल्ड वॉर्सा, द स्पाय आणि वी अँड दे ह्या इंग्रजी शीर्षकार्थांच्या कादंबऱ्या त्याने लिहिल्या. पोलिश साहित्याच्या इतिहासातील स्वच्छंदतावादी आणि वास्तववादी कालखंडांना सांधणारा तो एक दुवा होय. जिनीव्हा येथे तो निधन पावला.

लेखक : विमल गोखले

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate