অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उदयपूर

उदयपूर

उदयपूर

(उदेपूर). पूर्वीच्या उदयपूर संस्थानही राजधानी आणि सध्या राजस्थान राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण. लोकसंख्या १,६१,२७८ (१९७१). हे अहमदाबाद-हिंमतनगर-उदयपूर रेल्वेमार्गाने अहमदाबाद पासून २९७ किमी. व जयपूरपासून नैर्ऋत्येस सडकेने ३३६ किमी. आहे. १५६७ मध्ये अकबराने चितोडचा पाडाव केल्यावर मेवाडच्या महाराणा उदयसिंहाने आपल्या राजधानीसाठी अरवली पर्वताच्या मधोमध पिचोला तलावाच्या काठी असलेल्या या सुरक्षित ठिकाणी हे नगर वसविले. उदयसिंहाच्या नावावरून त्याला उदयपूर अथवा उदेपूर हे नाव पडले.

उदयपूरची उंची समुद्रसपाटीपासून सु. ७६२ मी. असून हवा समशीतोष्ण व आल्हाददायक असते. पूर्वीच्या नगराभोवती तटबंदी असून शहरात प्रवेश करण्यासाठी पाच दरवाजे होते, पण आजचे शहर तटाबाहेरही पसरलेले आहे. हे व्यापारी केंद्र असून येथे हातमागावरील कापड, बांधणी हा साडीप्रकार, कापडावरील भरतकाम, सोन्याचांदीचे दागिने, जरीकाम, हस्तिदंती नक्षीकाम, हत्यारे, मूर्ती, कापडी व लाकडी खेळणी, रबरी शिक्के इ. उद्योग चालतात. शिवाय अ‍ॅस्बेस्टस, चिकणमाती, जस्त-शुद्धीकरण यांचे कारखाने व सुती कापडाच्या गिरण्या येथे आहेत. शिक्षण क्षेत्रातही उदयपूर आघाडीवर असून येथील उदयपूर विद्यापीठाला आगळे महत्व आहे.

गावाच्या पश्चिम बाजूस असलेला प्रसिद्ध पिचोला तलाव चौदाव्या शतकात वंजारा लमाणाने बांधल्याचे सांगतात; त्याचा व्यास १०.३६ चौ. किमी. असून तो सज्जनगढ टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या उत्तरेकडील फत्तेसिंह तलावाशी कालव्याने जोडलेला आहे. तलावाभोवती डांबरी रस्ता असून तलावात नौकाविहाराची सोय करण्यात आली आहे. या तलावाच्या सभोवती असलेले डोंगर, घाट, राजप्रासाद, मंदिरे व प्रशस्त उद्याने यांची प्रतिबिंबे तलावाच्या संथ पाण्यात पडून या सरोवराचे दृश्य नयनमनोहर दिसते. पिचोला तलावात दोन लहानशी बेटे असून त्यांवर राजप्रासाद उभे आहेत.

दक्षिणेस जगमंदिर राजवाडा असून उत्तरेस जगनिवास राजवाडा आहे. तलावाच्या पाण्यात पडणारी त्यांची प्रतिबिंबे हृदयसंगम वाटतात. या राजवाड्यातील बागकाम व कलाकुसर प्रेक्षणीय असून सध्या त्यांचे रूपांतर हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. पिचोलाव्यतिरिक्त येथे स्वरूपसागर, रंगसागर ही सरोवरे असून ती एकमेकांशी जोडल्यामुळे शहरास राजस्थानचे व्हेनिस म्हणतात. तसेच शहरातील बहुतेक इमारती पांढऱ्या सफेत असल्याने उदयपूरला ‘शुभ्र नगरी’ ही म्हणतात.

सिटी पॅलेस हा प्रमुख राजप्रासाद वालुकामय दगड व संगमरवर यांच्या चौथऱ्यावर उभा आहे. त्याला अनेक मजले असून बांधणीतील राजस्थानी कलाकुसर वैशिष्ट्यपूर्ण आहे. यातील माणिकमहाल, मोतीमहाल, बारीमहाल व चिनीका चित्रमहाल हे अत्यंत प्रेक्षणीय आहेत. शीशमहालातील आरसे व रंगीबेरंगी मीनाकाम आणि काचमहालातील विविधरंगी काचेच्या तुकड्यांचे मोर डोळ्यांना भुरळ पाडणारे आहेत. परंतु यापेक्षाही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे राजवाड्याच्या चौथ्या मजल्यावरील बगीचा होय. खालपासून माती भरून तयार करण्यात आलेल्या या बगीचाने राजप्रासादाच्या सौंदर्यात चांगली भर घातली आहे.

शहरात अनेक बागबगीचे आहे. ‘सहेलियों की बारी’ सर्वांत उत्तम असून त्यातील अनेक आकारांच्या पुष्करिणी व कारंजी यांमुळे येथील वातावरण मनमोहक व रमणीय वाटते. सज्जननिवास अथवा गुलाबबागेत वस्तुसंग्रहालय, प्राणिसंग्रहालय व ग्रंथसंग्रहालय आहे. उदयसिंहाने बांधलेल्या मूळ महालाच्या उद्‌ध्वस्त जागेजवळ उभारलेला महाराणा प्रतापसिंहाचा भव्य पुतळा व बगीचा प्रवाशांचे आकर्षण ठरला आहे. तसेच नगरातील जगन्नाथ मंदिर, आणि २३ किमी. वरील एकलिंगजीचे मंदिर आणि २७ किमी. वरील नाथद्वाराचे श्रीकृष्णमंदिर इ. प्रेक्षणीय आहेत. (चित्रपत्र ७६).

जोशी, चंद्रहास

 

 

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate