অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जुनागढ संस्थान

जुनागढ संस्थान

जुनागढ संस्थान

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्वीच्या काठेवाड एजन्सीमधील पहिल्या दर्जाचे एक संस्थान. क्षेत्रफळ ८,६४१ चौ. किमी. लोकसंख्या ६,७०,७१९ (१९४१). वार्षिक उत्पन्न पन्नास लाख रुपये. उत्तरेस बर्दा व हालाड, पूर्वेस गोहिलवाड आणि बाकीच्या बाजूंनी अरबी समुद्राने सीमांकित झालेल्या या संस्थानाची स्थापना १७३५ मध्ये शेरखान बाबी या साहसी शिपायाने मोगल सत्ता धुडकावून केली. प्रथम त्याची राजधानी दुसरीकडे होती. मुलगा सलाबतखानच्या कारकीर्दीत ती जुनागढला हलली. अठराव्या शतकात सैन्यबळावर काठेवाडात लहान संस्थानिकांकडून त्यांनी खंडणी उकळायला सुरुवात केली. त्याला झोरतलबी म्हणत. गायकवाडांनी जुनागढची शोधा जागीर काबीज करून खंडणी बसवली. १८०७ मध्ये संस्थान इंग्रजांचे मांडलिक झाले. त्यांनीच झोरतलबी वसूल करून द्यावी असे ठरले. ब्रिटिश व गायकवाड यांना संस्थानाला ६५,६०४ रु. खंडणी द्यावी लागे. महबतखान (१९००–  ) हा १९११ मध्ये गादीवर आला. हाच शेवटचा संस्थानचा नबाब. संस्थानात ७ शहरे, १८ नगरपालिका, ८११ खेडी होती. बहुसंख्य (८२%) प्रजा हिंदू होती. संस्थानची स्वतःची टाकसाळ व डाक-व्यवस्था होती. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रेल्वे, पक्क्या सडका, शिक्षण आणि आरोग्य यांत बऱ्याच सुधारणा झाल्या. सिंहांची वस्ती असलेला गिरनार पर्वत, वेरावळचे उत्तम बंदर, सोमनाथचे इतिहासप्रसिद्ध मंदिर ही संस्थानाची वैशिष्ट्ये होत. संस्थानिकांना फाशीची शिक्षा देण्याची परवानगी होती. येथील संस्थानिकास नबाब हा किताब होता व अकरा तोफांचा मान असे. मुसलमानी कायद्याप्रमाणे दत्तक घेण्याची सनद त्याला मिळाली होती.

जुनागढच्या नबाबाने २२ एप्रिल १९४७ रोजी पाकिस्तानात विलिन होण्याचा मनोदय व्यक्त केला. त्याच वर्षी मेमध्ये सर शाहनबाज भूत्तो हे मुस्लिम लीगचे कार्यकर्ते संस्थानाचे दिवाण झाले. १३ सप्टेंबर १९४७ रोजी पाकिस्तानने संस्थानाचा सामीलनामा मंजूर केल्याचे कळवले; परंतु त्याला जनतेचा विरोध होता. सामळदास गांधींच्या नेतृत्वाखाली येथे आंदोलन सुरू झाले. बाबरियावाड, सरदारकड, बांटवा या छोट्या जागिरींनी भारतात सामील होण्याचे ठरविले. काठेवाडच्या संस्थानिकांनी संरक्षण मागितल्याने भारताने बाबरियावाड, मंगरोळ, मानवदार या जुनागढच्या मांडलिक संस्थानांचा ताबा घेतला. ९ नोव्हेंबर १९४७ रोजी ब्रिगेडिअर गुरुदयालसिंग व मुलकी प्रशासक यांनी जुनागढ ताब्यात घेतले. २० फेब्रुवारी १९४८ च्या सार्वमतानुसार संस्थान १९४९ मध्ये सौराष्ट्र संघात आणि १ मे १९६० पासून गुजरात राज्यात समाविष्ट झाले.


कुलकर्णी, ना. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate