অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टेहरी गढवाल संस्थान

टेहरी गढवाल संस्थान

टेहरी गढवाल संस्थान

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील कुमाऊँ प्रदेशातील एक संस्थान. क्षेत्रफळ १०,८८० चौ. किमी. लोकसंख्या ६,०२,११५ (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. ४१ लाख रुपये. उत्तरेस तिबेट, रावीन आणि बशहर ही पंजाबातील संस्थाने, पश्चिमेस डेहराडून, दक्षिणेस अलकानंदा व पूर्वेस यमुना यांनी सीमित झाले असून नद्यांपलीकडे ब्रिटिश वा पौडी गढवाल ही सीमा होती. संस्थान पूर्णतः हिमालयाच्या कुशीत असून समुद्रसपाटीपासून सु. ६,००० मी. वर वसले होते. संस्थानात २,४५६ खेडी होती; पण सर्व संस्थान मिळून एकच तहसील मानला जाई.

संस्थानचा इतिहास प्राचीन असला, तरी तत्संबंधी विश्वसनीय अशी माहिती फारशी उपलब्ध नाही. हिमालयातील संपूर्ण गढवाल राज्याची स्थापना ६८८ मध्ये राजा कनकपाल याने केली. त्यांतील राजा परदुमनशाह हा गुरख्यांशी लढताना मृत्यू पावला. नेपाळी युद्धानंतर (१८१५) त्याचा मुलगा सुदर्शनशाह यास ब्रिटिशांकडून हे संस्थान मिळाले.

१८५७ च्या उठावात त्याने ब्रिटिशांना हरएक प्रकारे मदत केली. तो १८५९ मध्ये मरण पावला. त्याला औरस पुत्र नसल्यामुळे ब्रिटिशांशी झालेल्या तहानुसार संस्थान विलीन होणार होते; पण भवानीशाह हा अनौरस पुत्र पुढे गादीवर आला आणि त्याने दत्तकांची मंजुरीही मिळविली. भवानीशाह १८७२ मध्ये मरण पावला आणि त्याचा मुलगा प्रतापशाह गादीवर आला. त्याने १८९४ मध्ये कीर्तिशाह या मुलास दत्तक घेतले. त्याने जंगबहाद्दुरच्या नातीशी (नेपाळ) लग्न केले. त्याचा मुलगा राजा नरेंद्रशाह पहिल्या महायुद्धानंतर गादीवर आला (१९१८). तथापि कीर्तिशाहच्या मृत्यूनंतर सर्व कारभार त्याची महाराणी नेपालिया साहिबा पाहत असे. तिने पहिल्या महायुद्धात इंग्रजांना अनेक प्रकारे मदत केली. त्याबद्दल तिला कैसर-इ-हिंद हे सुवर्णपदक व नरेंद्रशाहास कॅप्टन हा हुद्दा मिळाला.

संस्थानने सु. २४२ किमी. एवढे जंगल ब्रिटिश सरकाराला भाड्याने दिले होते. संस्थानात पहाडी प्रदेशामुळे पक्क्या सडका नव्हत्या. प्रथम कुमाऊँचा आयुक्त आणि पुढे १९३६ नंतर पंजाब पर्वतीय संस्थानांचा पोलिटिकल एजंट संस्थानवर देखरेख करी. राजाला न्यायदानाचे पूर्ण अधिकार होते. तो प्रधानच्या साहाय्याने कारभार पाही. जवळजवळ सर्व प्रजा हिंदू होती आणि राजपूत, ब्राह्मण, डोन या जातींची संख्या तुलनात्मक दृष्ट्या जास्त होती. ८८% लोक कृषिव्यवसाय करीत. जंगलापासून संस्थानला चांगले उत्पन्न मिळे. गंगोत्री व जम्नोत्री ही दोन यात्रास्थळे संस्थानात होती. १९४८ मध्ये संस्थानात जबाबदार राज्यपद्धती आली; ती फारशी यशस्वी झाली नाही. पुढे संस्थान संयुक्त प्रांतात विलीन झाले.


कुलकर्णी, ना. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate